माया
भाग - १५
लेखन : अनुराग
तिसऱ्या दिवशी उशिरा दामोदर शेखर समोर उभा ठाकला. बाजीचा मृतदेह पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्यावर रात्रीतून अंत्यसंस्कार करण्यात आले.
"माया...! माया नाव होतं तिचं...!" दामोदर ने शेखरला वस्तीवरून आणलेली सगळी माहिती दिली.
" त्या नराधमाच्या क्रौर्तेला ती बळी पडली. अख्ख्या गावाला माहिती होतं, पण साधे तिचे कर्म करायला कोणी धजावलं नाही." पिशवी घेऊन दामोदर त्याच्या घरी जायला निघाला.
" आपण करूयात...!" जाता-जाता दामोदर थांबला.
" कशासाठी ? तुमचा संबंधच काय तिच्याशी?"
" तुम्हाला अजून वाटतं, की माझा याच्याशी काहीही संबंध नाही? त्या बंगल्यात जाऊन ,आपण सुखरूप परत आलो ! आणि हे...?" दामोदर च्या कमरेला टांगलेलं खंजीर त्याने बाहेर काढलं. " आणि तुमच्या शास्त्रात लिहिलं आहे ना, कर्म झाले नाही तर आत्म्याला गती मिळत नाही म्हणून..!" शेखरने मनाशी काहीतरी ठरवले होते.
" आणि बाजीचा मृत्यू, त्याच्या जागी आज माझे अंत्यसंस्कार करावे लागले असते तुम्हाला." बाजूची खुर्ची ओढून दामोदर बसला. " वाटतं तितकं सोपं नाहीये हे सगळं...! ती आता त्या तसबीरीत दिसते, तशी नाहीये. प्रेतयोनीत अडकलेली एक अतृप्त आत्मा झालेली आहे ती, जी तिच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येकाला मारत सुटली आहे."
" नाही , तुमच्यावर आणि बाजीवर हल्ला तिने नसेल केला. "
" आणि हे तुम्ही खात्रीने सांगू शकता...?" दामोदर ला शेखरला यापासून परावृत्त करायचे होते.
" हो, ती कोणाला मारू नाही शकत, कारण ती तिच्या ठिकाणांहून बाहेर पडू शकत नाही..!" शेखरच्या सांगण्यात आत्मविश्वास होता.
" जरा अजून विस्तारित करून सांगाल का?" दामोदरला काही कळत नव्हतं.
" तुमच्या अभ्यासानुसार मनुष्याचा जसा जन्म असतो, तसेच भोग त्याच्या वाट्याला येतात."
" हो , कलियुग याच धोरणावर चाललंय. अजूनतरी ! "
"मग...! हिच्या वाट्याला असलं आयुष्य का ? ती का नाही सुटली यातून? तुम्ही पहिली न तिची तसबीर, तुम्हाला वाटलं का, हिच्या हातून काही अपराध, गुन्हे घडले असतील ? " शेखर त्या खांजीराकडे पाहून बोलला.
" साहेब, आपल्याला डोळ्यासमोर जे घडतंय, ते आपण पहातोय, त्याकाळी जे घडलं, ते सगळे आपल्याला माहित नाहीये ना ! तिचे एखादे कार्य राहिले असेल, म्हणून मुक्ती नसेल मिळाली, किंवा, तिनेच स्वतःला बांधून ठेवलं असेल...!"
हा वाद न संपणारा होता. तो दुसऱ्या दिवसांवर ढकलून दोघे विश्रांतीसाठी आपल्या ठिकाणी पोहोचले.
....
मुंबईला झालेल्या दगदगिने कीर्तिकर थोडे आजारी होते. दुपारी त्याच्या घराच्या मागील अंगणात ते पहुडले होते. शिवपुरीला जाऊन शहानिशा करणे गरजेचे होते. पण तिथे त्यांनी जाऊन खरंच उपयोग होता का? ना ओळख, न पाळख..! कोणास काय विचारावे, हे सुद्धा कळत नव्हते. एक गोष्ट त्यांना पूर्ण ठाऊक होती ! लेखाचा जीव धोक्यात नव्हता. तिच्याद्वारे कोणीतरी काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होते.
" मुंबईला जाऊन काही हाती लागले नाही. त्या पोरीच्या दुखण्यात मात्र भर पडली. " नंदा त्यांच्या जवळ येऊन बसली.
" पंतांचा पोरगा आणि ती पोरगी, त्रास दोघांना होतो आहे. पण कोणामुळे, कशामुळे हे अजून समोर नाही आलेले."
" आपण पंतांना जाऊन भेटावे." नंदाने त्यांना सल्ला दिला. पुढच्या दारातून तोच खबऱ्या पून्हा आत येताना दोघांना दिसला. पंताच्याकडून पत्र होतं. त्यांना ताबडतोब त्यांनी वाड्यावर बोलावले होते.
पहाटे पंत वाड्यावर पोहोचले. देवडीवरूनच त्यांची नजर वरच्या खोलीकडे गेली. एक वेगळा आणि याआधी कधीही न अनुभवलेला एक वास त्यांना आला. वाड्यात याआधी इतकी शांतता कधीच नव्हती. माणसाच्या प्रत्येक चाहुली सोबत एक अज्ञात चाहूल होती. होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी बारीक नजर ठेवून होतं. हरेक सजीव-निर्जीव एका धाकाखाली जगत होते. अंगणातली तुळस जळत चालली होती. इतर झाडंही त्याच मार्गावर होते. एकही जनावर वाड्याच्या आसपास फिरत नव्हते. दिसत नसल्या, तरी अस्पष्ट काळ्या सावल्या प्रत्येक कोपऱ्यात आपलं बस्तान बसवून होत्या. वाऱ्यानेही आपला वेग थोडा कमी केला होताच. पावसाचेच दिवस होते. विजा वाड्याच्या रोखाने मुख करून चमकत होत्या.
'कोण असले हा?' किर्तीकरांनी मनालाच प्रश्न केला. 'मानवी उपचारांच्या अधीन असेल, तर बरं आहे...! नाहीतर....!' किर्तीकरांनी त्याचे शब्द आठवले. ' अख्ख्या कुळाचा नायनाट.' पिशवीतून लपवून आणलेला नारळ त्यांनी थरथरत्या हातांनी बाहेर काढला. तळहातावर घेऊन, ते एक-एक पाऊल चालू लागले. जसं-जसं वाड्याच्या वास्तूचं अंतर कमी होत होतं, ते नारळ शेंडीकडून थोडं-थोडं जळत होतं. त्याच्या तापाने किर्तीकरांचा तळवा भाजू लागला. पण ते घाबरले नाही. कारण पुढे घरात त्यांची वाट बघणारं संकट अधिक भयावह होतं. वाड्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवताच, ते नारळ फुटलं आणि आतून काळं पाणी वाहू लागलं. त्यांच्या हातून नारळ खाली पडलं.
" हे परमेश्वरा, तूझ्या इच्छेविरुद्ध घडतंय रे हे सगळं...!" ते देवाचा धावा करू लागले. "हे निसर्ग-नियमाच्या विरुद्ध आहे. आम्ही फक्त माणसं आहोत. या शक्तीशी लढण्याचे बळ दे आम्हाला...देवा!" आणि त्यांनी दुसरा पाय वर ठेवला.
आतापर्यंत शांत असलेला वाडा, अचानक एका मोठ्या ,किळसवाण्या आवाजाने दुमदुमला. कोणीतरी अफाट वेदनेने ओरडू लागले. पंत, सुमन, नर्मदा, सगळेच बाहेर आले. बाहेर पायरीवर उभे असलेले कीर्तिकर आणि फुटक्या नारळातुन वाहणारे काळे पाणी त्यांनी पाहिले. सगळे त्यांच्या आजू-बाजूला गोळा झाले. कीर्तिकर वर पहात होते. आनंद जोरजोराने विव्हळत होता. सगळ्यांचीच तोंडं कोरडी पडली. त्या अंधारल्या खोलीत सुरु असलेला दोन वेगळ्या सावल्यांचा खेळ सगळ्यांना खालून दिसत होता.
" बुवा, काहीतरी करा, थांबवा हे सगळं...सगळं संपून जाईल हो..!" सुमन त्यांच्या विनवण्या करू लागली. वर बघतच कीर्तिकर बोलले.
" शिवपुरी...! तिथेच काय उत्तरं मिळायची ती मिळतील." आणि वाड्यात शिवपुरीला जायची तयारी सुरु झाली. नर्मदेने झोपडीत जाऊन अर्धा पोतं हळद आणली. चुलीवर पाणी ठेवले गेले. त्यात हळद आणि मीठ टाकले गेले.
" मीठ म्हणजे हवा, पाणी आणि सूर्याच्या तेजाने बनलेले आहे, ज्यात सगळीच पंचमहाभूते आहेत. या पाण्याने सगळ्यांनी अंघोकी करा. लक्षात असू द्या. प्रवास लांबचा आणि धोकादायक आहे." नर्मदा सांगू लागली. इकडे किर्तीकरांनी गायीचे तूप काही गौऱ्यांवर टाकले आणि दोन दगडांच्या आधारावर चूल उभी केली. त्यावर भात शिजायला ठेवला. " मार्गात पिशाच्च लागतील, प्रत्येकाला या भाताचा घास देऊन, त्याला शांत करावं लागेल. प्रत्येकाने स्वतपाशी एक-एक शस्त्र ठेवा. त्याला हे लावा." त्यांनी आणलेली लिंबं त्यांनी सगळ्यांना दिली. सुमन व्यतिरिक्त सगळेच जाणार होते.
" आम्ही वाड्याच्या बाहेर पडताच गोमूत्र आणि गंगेच्या पाण्याने सडा घाला. तुळशीपाशी दिवा लावा. तुळस अजून पूर्ण मेली नाहीये. ती जगवावी लागेल, कारण तिच्या ठिकाणी देवाचा वास असतो." किर्तीकरांनी पंचांग पहिले. ज्या चांगल्या मुहूर्तावर ,आनंदच्या प्रबळ स्थानी चांगले ग्रह असतील, त्याच मुहूर्तावर निघावे लागणार होते. त्यांच्या प्रबल्याने अनिष्ठता कमजोर पडणार होती. विठोबाने पागेतून दोन चांगले घोडे आणून वाड्याबाहेर बांधले. दोन दिवसांनी मुहूर्त निघाला. मध्यरात्री नंतर घुबड पेंगु लागला, की बाहेर पडायचं ,हे ठरलं. पुढची दोन दिवस हातात होती. पाऊस सुरूच होता.
मध्यरात्र उलटू लागली. आभाळात चांदणं ढगाड होतं. विठोबानी पंजऱ्यात कोंडून ठेवलेलं घुबड पेंगु लागल्याची वाट सगळे बघत होते. डोळ्यांत तेल घालून सगळेच बसले होते. घुबडानी पिंजऱ्यात मान टाकली. तसा विठोबा उठला. देवडीच्या बाहेर येऊन त्याने घोडे टांग्याच्या खाली घातले. नर्मदा जिना चालून गेली आणि आनंदच्या खोलीचं कुलूप काढलं. हातात कंदील होता. आनंद पलंगावर बसला होता. नर्मदेने सांगितल्यावर तो मुकाट्याने उठला. तिच्या मागोमाग चालू लागला. तो अंगाने पूर्ण क्षीण झाला होता. जिन्याखाली उभ्या सुमननी पोराला डोळेभरून पाहिले. लांबूनच. शेजारी पंत देखील उभे होते. " बुवा, पोरगं तुमच्या स्वाधीन करतोय, त्याला होता तसा, नाहीतर आहे तसातरी परत आणा." कीर्तिकर काहीच बोलले नाही. आज १०-१५ दिवसांनी आनंदाचे पाय वाड्याबाहेर पडले होते. हळू-हळू एक-एक पाऊल बाहेर पडत होते. विठोबा टांगा घेऊन तयार होता. सगळे बसले. आनंदला बांधून ठेवण्यात आलं. टापांचा आवाज घुमवत टांगा शिवपुरीच्या दिशेने निघाला.
........
पिंजऱ्यात पेंगुन पडलेलं घुबड अचानक उठून ओरडू लागलं. त्याच्या बाजूला बसलेली रुक्मि सावध झाली.
" पंत...पंत...!" अजूनही बाहेर उभे असलेले पंत या आरोळीने मध्ये धावत आले. पिंजऱ्यात घुबड जागं होऊन ओरडू लागलं होतं. पहाटेच्या पाहिल्या प्रहराचा अंदाज पार चुकला होता. पंतांना घाम फुटला. आनंदला झपाटणाऱ्याने मोठा दगा केला होता. मध्यरात्र अजून तेवत होती, तोच त्याने किर्तीकरांना आणि नर्मदेला उठवुन गावच्या वेशीबाहेर काढले होते.
" काय मग...! शिवापुरीला जायचंय का ?" गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला आनंद बोलू लागला. नर्मदेच्या अंगावर सरसरून काटा आला. "याला वाचवायला निघालात दोघे...? कसं शक्य आहे...?" अचानक घोड्यांचा वेग वाढला, ते दुप्पट वेगाने धावू लागले. आनंद कुत्सित हसू लागला. " बुवा, बोललो होतो न मी, हा आमचा आहे...!"
" नाहीये तो तुझा...!" कीर्तिकर सावध झाले. " तू जे कुणि आहेस, हे जग तुझं नाहीये...!"
" आमचं हे जग कधीच नव्हतं बुवा. माणसं लाचार असतात, जगण्यासाठी धडपड करत असतात. एक-एका श्वासाठी झुंजत असतात. आमचं तसं नाहीये...! आमचं ठरलेलं असतं सगळं. शरीराने, मनाने , भीतीने माणूस गंजला, की आम्ही त्याच्यावर हावी होतो."
" नियतीच्या विरोधात जाऊ नकोस, नायनाट होईल तुझा...!"
" आपलं बघा बुवा...आणि टांग्यात असलेल्या या दोघांचं ! काय संबंध तुमचा इथे...! याची कुंडली तुम्ही पहिली आहे न ? तरी जिवाच्या आकांताने याला वाचवायला निघालात !" टांगा वेगात धावत होता. विठोबाने लगाम घट्ट धरून ठेवला होता.
" माझं काम होत नाही, तो पर्यंत हा माझ्या सोबत...नंतर याचाही...!"
" ते मी नाही होऊ देणार...लक्षात असू दे, ज्याने जन्म घेतला आहे, त्याला कधीतरी मृत्यूलोक सोडून जावे लागतेच. तुझे नरकातले भोग तुझी वाट बघतायत."
" माझ्या वाटच्या यातना, ती पोरगी भोगते आहे ना ! " आनंदच्या आतला दानव हसू लागला. " तिचे शरीर कुठे तिचे राहिले आहे ? तुम्ही पाहिलंत न बुवा..! आणि हो, तुम्ही याला वाचवायला शिवापुरीला चाललात...! पण तिथेच याचा अंत आहे.!"
" म्हणजे...!" किर्तीकरांनाही स्पष्ट ऐकायचं होतं.
" तुमची ती नियती आणि तुमचे ग्रह, माणसाला त्याचा मृत्यू असेल, तिथे घेऊन जातात नं बुवा...?"
क्रमश:
अनुराग
माया
भाग -१६
लेखन : अनुराग
शिवपुरीच्या जंगलात एक टांगा अढळून आला. टांगा नुकताच मोडला होता. घोडे इतरत्र फिरत होते. तिथून जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी पोलिसांना वर्दी दिली. दिगंबर ला घेऊन शेखर तिथे पोहोचला. टांगा पूर्ण मोडला होता. चाकं निखळून बाहेर पडली होती. घोड्यांच्या गळ्यातले लगाम देखील सुटून रस्त्यावर पडले होते.
" दरोडेखोरांचं काम दिसतंय !" शेखरने अंदाज लावला.
" नाही साहेब...सामान आणि घोडे आहे तिथेच आहेत." दिगंबरच्या बोलण्यात सुद्धा तथ्य होतं. टांग्यावर कोणाचेच नाव नव्हते.
" टांग्याच्या पार भुगा केलाय करणाऱ्याने...!" प्रत्येक वेगवेगळा भाग न्याहाळत दिगंबर बोलत होता.
" हो , पण त्यातली माणसं कुठे गेली?"
" क्रांतिकारी पण नाहीयेत. घोडे घ्या आपल्या सोबत. आणि ते समान सुद्धा." दोन माणसांनी सगळं सामान टांग्याच्याच घोड्यावर लादलं आणि गावाकडे निघाले. गावात चौफेर माणसं फिरून तपास करायला लागली. मंदिरं, धर्मशाळा सगळीकडे फिरली. कोणत्याही नवीन माणसाचा तपास लागला नाही. कोणीतरी शिवापुरीला येताना हा प्रकार घडलेला होता. पूर्ण गावात वणवा पसरला. लोक घाबरून जाऊ नये, म्हणून गस्ती वाढवल्या. त्या रात्री एका अज्ञाताला शोधण्याच्या नादात, कोणीच घरी गेलं नाही.
अर्धी रात्र उलटली. गावातल्या एका जुन्या गल्लीत कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागली. घराच्या ओट्यावर गस्तीवर फिरणाऱ्या काही पोरांना लांबून काहीतरी चालत येताना दिसलं. अत्यंत जड पावलं होती त्याची. रात्री स्पष्ट दिसत नव्हते, आणि सारख्या ठेचा लागत होत्या. त्यामुळे तो अडखळत चालत होतं. पोरं सावध झाली. एकाने हातात मशाल धरली आणि धीटपणे पुढे चालत गेला.
" कुठलं हो पावनं तुम्ही?" त्याने लांबूनच विचारलं. "कोणाकडे जायचं आहे." काहीच उत्तर आलं नाही. त्या पोराने पेटली मशाल त्याच्या चेहऱ्याजवळ धरली आणि त्याला धक्काच बसला. लांबून त्याच्याकडे बघत असलेल्या इतरांना तोडक्या उजेडात कोणीतरी तडफडत जमिनीवर पडलेलं दिसलं. त्यांनी हत्यारं आणि मशाली जमा करायच्या आत प्रेताच्या बाजूला उभी असलेली दुसरी आकृती अंधारात नाहीशी झाली.
प्रेताची अवस्था अत्यंत छिन्न झाली होती. पूर्ण चेहऱ्यावर एखाद्या हिंस्त्र श्वापदाने नखाने अक्षरशः मांस ओरबाडून काढले होते. डोळेही बाहेर आले होते. छाती फाडून हृदयापर्यंत त्याचे हात गेले होते. हे सगळे क्षणात झाले होते. सगळ्यांनाच घाम फुटला. आल्या पाऊली सगळेच मागे सरकले. स्वतःच्या सावलीलाच घाबरू लागले. मोजून चार जण, त्यातला एक गेला होता.
गावाच्या मुख्य चौकात चार प्रेतं पाहिल्यावर सगळ्यांचीच तारांबळ उडाली. शेखर आपल्या दलासह तिथे दाखल झाला. मेलेल्यांच्या घरचा अक्रोश मनाला भोकं पडणारा होता. मृत्यूच्या कारणापेक्षा मारणारा किती क्रूर होता, याचा पुरावा प्रेतांची झालेली दुरावस्था दाखवत होती.
"साहेब , जंगलातून लांडगं आलं असतील!" एका वृद्ध जाणकाराने आपलं मत मांडलं." वाघ...नाही, कित्ती वर्ष झाले, वाघ नाहीये जगलांत." दुसरा एकजण बोलला. हा-हा म्हणता अख्खा गाव तिथे गोळा झाला. प्रत्येकाची उत्तरं वेग-वेगळी होती. जे काल एका गल्ली पूर्ती मर्यादित होतं, ते आज पूर्ण गावात झालं.
भीतीमुळे गावबंद झाला. रात्रीच्या अंधारात फिरणारी टोळकी बंद झाली. हत्यारांचा खच घेऊन शेखर आणि इतर लोक गावभर फिरू लागले. पण तथाकथित जनावराची साधी पाऊलं सुद्धा मिळाली नाहीत. मधूनच थोड्या अंतरावर एखादी सावली हुलकावणी देऊन पळत असे. झाडाखाली माणसं आणि झाडाच्या फांद्यांवर लक्षवेधी हालचाली होऊ लागल्या. रात्री घरात लहान मुल रडू लागले की आयांना धस्स होई. हवेनी दाराच्या हलक्या कड्या वाजू लागल्यात, की काळीज पिळवटून निघे. हातात मशाली आणि मुठीत जीव घेऊन गावभर गस्त घळणाऱ्यांच्या घरी तर परिस्थिती अत्यंत बिकट होती. रात्रीच्या उरल्या प्रहरात दिगंबरला मारुती मंदिराच्या मागच्या बाजूस एक छोटा दिवा तेवत असलेला दिसला. खिडकीतून धुराची एक रेष इशाऱ्यासाठी पुरेशी होती. त्याने मंदिराचे दार उघडले. हातात एक छोटी तलवार होतीच.
"कोण तुम्ही..?" त्याने दरडावून विचारले. साठीच्या आसपासातली एक बाई दिवा घेऊन त्याच्याकडे पहात उभी राहिली. रात्रभर तिथे थांबून , दिगंबरने त्यांना सकाळी शेखर समोर हजर केले.
" गावात फिरणारं कोणी जनावर नाहीये." बाजूला अत्यंत बिकट अवस्थेत कीर्तिकर बसले होते. " त्याने आम्हाला फरफटत या गावी आणले. वाडीच्या पंतांचा पोरगा आहे तो. झपाटलेला आहे. इथे आल्यावर त्याच्यात अधिक बळ भरलं आहे."
" पण, इथे...?" शेखरचा अजूनही विश्वास बसत नव्हता.
" ते बुवा शुद्धीवर आले, की तुम्हाला कळेल. आमचा टांगा आणि त्यातलं सामान , सगळं गेलं..!"
" ते सांभाळून ठेवलंय आम्ही."
" साहेब, तो असा सापडणारा नाहीये. उलट त्याच्या मागावर असणाऱ्यांचे अशेच मुडदे पडत रहातील. जन्म आणि मृत्यु, यातल्या सगळ्यात बलवान स्थानावर तो पोहोचला आहे. तो असा कुठपर्यँत राहील, आणि किती जणांना मारेल, याची गणती तुम्हाला करता येणारच नाही. "
नर्मदेच्या बोलण्यात तथ्य होतं. शेखरनी त्यांची स्वतःच्याच घरी व्यवस्था लावली.
"इथे तुम्हाला काहीही त्रास नाही होणार. जपून रहा...!" अचानक त्याच्या दारावर थापा पडू लागल्या. त्याने बंदूक पुढे करून दारचं एक किवाड उघडलं. आलेल्या माणसाने निरोप दिला.
" मला जावं लागेल. आलोच मी, तुम्ही यांची काळजी घ्या. "
गावातल्या एका तरुण पोराला फरफटत मुख्य रस्त्यावरून ओढून नेताना गस्तीवरच्या काही लोकांनी लांबून पाहिलं. त्यातला एक शेखरला बोलवायला आला. चिखलात उमटलेल्या खुणा मशालीत दिसल्या. त्याचा माग काढत शेखर आणि ती पोरं एका वाड्यासमोर येऊन उभी ठाकली. सगळ्यांना प्रचंड घाम फुटला होता. आत एक मशाल पेटली होती. दाराच्या मोडक्या फळीतून शेखरने आत पहिले. साधारण त्याच्याच उंची-बांध्याचा एक माणूस त्याला वाड्याच्या अंगणात बसलेला दिसला. नुकतेच ओढून आणलेले प्रेत त्याच्या समोर पडलेले होते. या प्रेताचीही तीच अवस्था होती, जी पहिल्या चौघांची झाली होती. त्यांच्या अंगाला झालेल्या जखमातून वाहणारं रक्त तो पीत होता. शेखरचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्याच फटीच्या खालच्या भागातून बघत असलेल्या बाकीच्या पोरांना तर घाम फुटला होता.
" मी इथेच थांबतो, तुम्ही बाकीच्या गावकऱ्यांना गोळा करून आणा.." शेखरने इतरांना सांगितले.
" साहेब, कोणीच येणार नाही. आणि तुम्हीही स्वतःचा जीव धोक्यात नका घालू. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाहीये." एका पोराने मोलाचा सल्ला दिला.
" हा आहे तरी कोण?" शेखरला वाटले, बरोबरच्या लोकांना काहीतरी माहिती असेल.
" पहिल्यांदाच गावात असा प्रकार घडतोय साहेब. नरभक्षी असावा." त्यांच्या बाहेर असण्याची चाहूल कदाचित त्याला लागली असावी. तो सावध झाला. हसू लागला.
" या न, आत या...!" बाहेर असणाऱ्यांना तो काळाचाच आवाज आला. सावध होऊन शेखरने बाहेरून त्या मोठ्या दाराला कडी घातली.
" काहीही केलं, तरी मी नाही सापडायचो. कोणालाच नाही. माझं काम झालं, की या शरीराचा मला काही उपयोग नाही, यालाही....!" आणि तो हसू लागला.
एकदम रागाच्या भरात बोलला. " माझं इथे कोणाशीच वैर नाहीये...! माझ्या मार्गावर याल, तर जीवाला मुकाल." असे म्हणून तो उठला आणि दाराकडे धावत सुटला. आत्तापर्यंत घात लावून बसलेले बाहेरचे सगळेच तिथून पळत सुटले. एकाच्या हातातली एक मशाल दारापाशी पडली आणि दाराने पेट घेतला. पायथ्यापासून दार जळू लागले. थोड्या अंतरावर जाऊन शेखर मोठ्या हिमतीने एका झाडामागे दडला. पेटत्या दारातून त्या नराधमाला बाहेर येता आले नाही.
" फक्त अमावस्या येई पर्यंत. गाव बेचिराख करून टाकेल. पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील, इतका घाण मृत्यू येईल..!" त्याच्या त्या असुरी किंचाळीने कानाला कानठळ्या बसत होत्या. शेखरने मोठ्या हिमंतीने ते पहिले.
' हा कोण आहे, कुठून आला आहे ?' याची उत्तरं हाच देऊ शकेल. आत्तातरी इथून निघायला हवं. आपल्या हातात असलेली मशाल शेखरने त्या वाड्याकडे फेकली. दराने अजून जास्त पेट घेतला. चिडून तो आत गेल्याचे शेखरने पहिले.
गावातले रस्ते दिवसाढवळ्या ओस पडले. काल घडलेला प्रकार ज्यांनी पहिला, त्यांनी तो भेटेल त्याला सांगितला. जनावरं सुद्धा बाहेर येईनाशी झालीत. मंदिरं तेवढी उघडी होती.पण त्यांच्या गाभाऱ्यातले दिवे मात्र आज लागले नाहीत. गावात अचानक आलेल्या या काळाचा ठाव-ठिकाणा कोणालाही ठाऊक नव्हता.
दामोदर आपल्या घरीच होता. घडला प्रकार त्याचाही कानावर येत होता. जुन्या पुस्तकांत तो संदर्भ शोधत बसला होता. तोच दारात शेखर येऊन उभा राहिला.
" काय...बसला का विश्वास?"
" थोडासा...! काल पाहिलं मी त्याला." दामोदरने बसायला खुर्ची दिली.
" तो माणूस नाहीये, हेच काय ते कळलं मला. कुठून आणि का आलाय, याचा काही संदर्भ लागत नाहीये." शेखर दामोदरकडे मदत मागायला आला होता.
" जन्म आणि मृत्यू, यापलीकडचा विषय आहे हा ! त्या पिशाचाने धारण केलेलं शरीर माणसाचं आहे. त्यात काही अंशी मानवाचे गुण अजून आहेच. पण त्याची मानवी शक्ती याच्या पाशवीपणा पुढे क्षीण आहे. कसल्यातरी शोधात तो गावभर हिडतोय." दामोदरने आपला निष्कर्ष ठेवला.
" हे तुम्हाला कसं कळलं ?" शेखरचा प्रश्न सहाजिक होता.
" साहेब, त्याला गावाचा कोपरा-कोपरा माहिती आहे. आणि तो ज्या वाड्यात दबा धरून बसलाय, त्या वाड्याचा इतिहास पण चांगला नाहीये."
" इथे लोकांचा जीव धोक्यात आहे, तुम्ही कोडी कसली घालत बसलाय..?" शेखरला त्याचा राग येऊ लागला.
" साहेब, त्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या सुभानाचा तो वाडा आहे. मध्ये देवघर नाही, आणि वास्तूची प्रवृत्तीही तशीच , असुरी...!" दामोदरच्या बोलण्यात तथ्य होतं. " दाट झाडीमुळे आत सूर्यप्रकाश येत नाही. कित्येक वर्ष लोटली, कोणी माणूस तिकडे फिरकला नाहीये. अश्या ठिकाणी या शक्तींना बळ मिळतं. क्षणो-क्षणी त्यांची शक्ती वाढत जाते. तुमच्या-माझ्या सारख्या माणसाला विचारसुद्धा करता येणार नाही , इतकी शक्ती त्यात असू शकते."
" मग...आता ?" हे सगळं ऐकून शेखर हतबल होऊ लागला होता.
" जिथे माणूस हतबल होतो, तिथे देव धावून येतो. एक गोष्ट लक्षात असू द्या...! असुरी शक्ती कितीही बळकट असली, तरी कोणत्यातरी पंचमहाभूतापुढे ती गुडघे टेकतेच. पण या साठी ही योग्य वेळ नाही."
"मग, अजून किती जीव ...?"
" नाही, चुकता आहात तुम्ही. तो प्रत्येकाला मारत नाहीये. फक्त त्याला मज्जाव करणाऱ्यांना मारतोय. दिवसा तो तुम्हाला त्याच्या सर्व-शक्तीसह मूळ स्वरूपात सापडणार नाही. पण रात्रीच्या अंधारात त्याला बाहेर काढणे देखील सोपे नाही. सापाला बिळाच्या बाहेर काढायचं, म्हणजे उंदीर बांधावा लागेल. आणि तोही लवकर शोधावा लागेल.
त्या नराधमाला मारण्यासाठीचा उपाय सापडला नाही. पण दामोदरच्या बोलण्याने शेखरला मात्र धीर आला.
" या पृथ्वीवर प्रत्येकाचा अंत, आणि त्या अंताची पद्धत ठरली आहे. फक्त ती अचूक हेरता आली पाहिजे." खिडकीतून दिसणाऱ्या मारुतीच्या मंदिराकडे बघत दामोदरने एक निश्वास सोडला.