JHALAK-marathi bhaykatha |
वेळ मध्यरात्रीची... बरोब्बर तीनची वेळ.....
टिंग टॉंग.. टिंग टॉंग..
डोक्यावरची चादर काढून त्याने डोळे मिचकावले..
नक्की डोअरबेल वाजली कि भास झालाय.. काही कळायला मार्गच नव्हता.
टिंग टॉंग.. टिंग टॉंग..पुन्हा दारावरच्या त्या बेलेच्या आवाजाने त्या निरव शांततेत भंग केला.
मोबाईल ऑन करून त्याने वेळ पाहिली.. रात्रीचे तीन वाजले होते.
इतक्या रात्री नक्की कोण बेल वाजवतेय??
कंपनीने राहायला दिलेल्या नवीन घरात राहण्यास आल्यापासून अवघे दोनच दिवस झालेत.. शेजारीपाजारी कोणी ओळखीचे नाहीत. शिवाय कंपनी रेकॉर्डस व घरची मंडळी सोडली तर कुणा परीचितास आपला पत्ता ही ठाऊक नाही..
कोण असावे बरे या वेळेस दारावर..?
मनाचा हिय्या करत त्याने चादर झटकली..
मोबाईलचा टॉर्च ऑन करत त्याच्या उजेडात त्याने दारावरच्या आय- होल मधून बाहेरचे दृश्य दिसण्यासाठी नजर रोखून पाहिली..
एक साधारण साठीचे गृहस्थ दरवाज्यात उभे होते..
कोण असावेत? कदाचित शेजारी असावेत? काही मदत हवी असेल? काही बाका प्रसंग घडला असेल? झरझर त्याच्या डोक्यात प्रश्नांची मांदियाळी उभी राहिली.
कट.. कट...लॅचचे इंटरलॉक उघडत त्याने दरवाजा किलकिला करून बाहेरचा कानोसा घेतला.
कोण आहात आपण? काय हवे आपल्याला?
चेहऱ्यावर त्रासिक भाव आणत त्याने त्या गृहस्थाला विचारले.
अहो मी जोशी.. इथे बाजूलाच राहतो. आपण कोण?
काय मजा चालवली आहे काय? रात्रीचे तीन वाजले आहेत. या वेळेला दुसऱ्याची दारे वाजवून हा ओळख विचारतोय.. विक्षिप्त दिसतोय एक नंबरचा..पण पण थेट वाद नकोत यांच्याशी... शेजार नवीन आहे.. उगाचच गैरसोय व्हायची. त्याच्या मनात भराभर विचार आले.
हो पण काही काम होते का? नाही रात्रीचे तीन वाजलेत.. काही मदत हवी आहे काय??? त्याने त्या गृहस्थास विचारले.
अहो तेच तर.. माझ्या घरची बेल मी केव्हापासून वाजवतोय.. कुणी दरवाजा उघडत नाही.. तुम्ही जरा त्यांना उठवायला मदत करता का? ते गृहस्थ काहीश्या चिंतेत असलेले त्याला जाणवले.
म्हणजे मला काही समजले नाही नक्की काय झालेय आत घरामध्ये?? डोळे चोळून त्याने एक दीर्घ उसासा देत त्यांना विचारले.
अहो.. माझ्या घरचे बेल वाजवून सुद्धा दार उघडत नाहीत.. मी आताच बाहेरून आलोय... मनात चलबिचल होतेय... आत काय घडलेय नक्की? तुम्ही आवाज देऊन पाहता का?
नक्कीच तुम्हाला ते प्रतिसाद देतील.. व दार उघडतील..
काय टेन्शन आहे यांचं.. थांबा मी प्रयत्न करून पाहतो. दारातून बाहेर येत त्याने शेजाऱच्या फ्लॅटची डोअरबेल वाजवायला सुरुवात केली..
काका कुठे गेले होते आपण एवढ्या रात्रीचे?? फोन करून पहा ना..? घरच्या मंडळीना..? जबरदस्तीचे आमंत्रण दिल्यासारखं चेहरा करून त्याने त्या गृहस्थाला प्रश्न केला.. हो ते तर आहेच एक काम करा तुम्ही बेल वाजवा.. मी खाली जाऊन माझ्या सामानाच्या बॅगा वर आणतो.. तोपर्यंत..
पाठमोरे होऊन ते गृहस्थ झरझर माळ्यावरून पायऱ्या उतरत खाली बॅगा आणण्यासाठी निघून गेले..
मोबाईलवर त्याने वेळ पाहिली.. रात्रीचे तीन वाजून आठ मिनिटे... कमाल आहे घरच्यांची... आतापर्यंत दहा पंधरा वेळा सतत बेल वाजवली तरीही दार उघडत नाही.. खाली गेलेले काका अजूनही सामान घेऊन वर येत नाही.... डोळे चोळत त्याने दारावर निरखुन पाहिले.सेफ्टी डोअर गदागदा हलवून पाहिले.. मेन डोअर बाहेरच्या सेफ्टी डोअरला आतून बंद केले गेले होते..
त्या गृहस्थाची वाट पाहत असेच दोन एक मिनिटं गेली.. ते काही वरती येण्याचे नावच घेईना...
रागाने त्याने घरात जाऊन दार बंद केले...
झोपेचे चांगलेच खोबरे झाले होते.... शयनगृहात जाऊन त्याने दिवे मालवले... मनातल्या मनात काकांना दोन चार शिव्या हासडून त्याने डोक्यावर चादर ओढून घेतली...
सकाळी त्याला थोडी उशिराच जाग आली..मोबाईलचा अलार्म कधीचाच वाजून गप्प झाला होता. पटापट तयारी करून त्याने सकाळची नऊ बाराची फास्ट लोकल पकडण्यासाठी स्टेशनला प्रयाण केले.
ऑफिसमध्ये आज काही विशेष काम नव्हतेच.. असाच रमत गमत दिवसभर डुलक्या काढत उसासे देत त्याने तो दिवस कसाबसा ढकलला..
संध्याकाळी नेहमीची फास्ट लोकल पकडून तो अर्ध्या पाऊण तासात स्टेशनवर उतरला... स्टेशनवर प्रचंड गर्दी होती... एकमेकांना धक्के देत.. टकरा मारीत मान खाली घालून मोबाईलवर डोळे रोखून बरीच मंडळी मनाच्या अंदाजाने त्या गर्दीच्या परीघातुन वाट काढत आपापल्या घराकडे निघाली होती...
स्टेशनबाहेर येत त्याने रिक्षा थांबवली. दहा मिनिटात इमारतीच्या बाहेर रिक्षा थांबवून तो आत येऊ लागला.
किसके पास जानेका है? मेहमान हो? इधर रजिस्टरपर एंट्री करनेका..! हातातील रजिस्टर गेटवरच्या थापाने त्यांस पुढे केले..
अरे बहादूर रहने दो... कुछ जरुरत नही.. इधरही रहनेको आये है.. ये साब दो दिनो से..
गेटच्या पलीकडे असलेल्या बेंचवर बसलेल्या देसाई काकांनी थापाला आवाज दिला..
आप किधर? कोनसा माला? थापाने त्याला घरचा पत्ता विचारला.
वो आखिर के बिल्डिंग का तिसरा माला.... जोशीजी के बाजू का घर....
थापाने त्याला पुन्हा एकवार नीट न्याहाळले.
ठिक है साब जाओ आप.. काहीश्या अविश्वासाने त्याने त्याला जायला सांगितले..
अरे पर एक बात बता मुझे.... कल रात को तुही था ना इधर? त्याने अचानक काही सूचल्यासारखे थापाला विचारले...
हा साब.. क्या हुआ... थापाने आश्रर्याने त्याला विचारले..
वो रात मे जोशीजी बिल्डिंग के नीचे सामान रखे हुये थे क्या?
अरे साब मतलब आपको भी वोह......??
वोह मतलब?? मतलब क्या?
जाने दो ना साब... आपसे पहले भी कई लोग वहा रहनेको आये.. और जल्दही वो घर छोडके निकल गये..
साब उस माले पर तो पीछले कई सालोसे कोई रहता ही नही... डर के मारे.. जोशीजीका परिवार तो विदेश मे बस गया.
और जोशीजी को तो गुजरे हुयेे पांच साल हो गये....
सर्रकन त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला..
झापझाप पावले टाकत त्याने खोलीत जाऊन सामान बांधायला घेतले.