आरशातील_नजर_भयकथा
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_चार
भाग 5 वाचण्यासाठी 👇इथे क्लिक करा.
दोन दिवसांनी अमावस्या होती. चांगला काळोख पसरला होता. सगळी वस्ती रात्री साडेअकरा बारापर्यंत झोपी जात असे. रात्री एकच्या सुमारास शिरपा दोन पोरांना घेवून वाड्याच्या मागच्या दाराशी आला. आधीच अमावस्या असल्यानं सगळीकडे दाट अंधार पसरला होता. वाडा जुना झाल्या कारणाने वाड्याच्या मागच्या भागाची बरीच पडझड झालेली होती. जुन्या दारांच्या कड्याही खराब झाल्या होत्या. त्यामुळे जास्त आवाज न करता, त्या कड्या तोडून तिघांनी वाड्यात प्रवेश केला.
त्यांनी सोबत एक बॅटरी आणि तिघांनी आपापलेे मोबाईल सोबत घेतले होते. जास्त आवाज न करता ते हळूहळू वाड्याच्या आतील भागात आले. खूप दिवस वाडा बंद राहिल्याने आता सगळीकडे कोळीष्टक जमायला सुरुवात झाली होती. दिवसा सूर्याच्या प्रकाशात देखणा दिसणारा वाडा या अमावस्येच्या रात्री भयानक वाटत होता.
शिरपासुद्धा रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच वाड्यात आला होता, त्यामुळे त्यालाही वावरताना भीती वाटत होती.
वाड्यातल्या मुख्य चार खोल्या इनामदारांच्या वापरातल्या होत्या. त्यात बर्यापैकी उपयोगाच्या नव्या वस्तू उपलब्ध होत्या. बाकीच्या खोल्यामध्ये जुन्या पारंपारिक वस्तू, कपडे, भांडी, पलंग, पडदे, गालीचे, हंड्या, झुंबरं, खुर्च्या इत्यादी साहित्य ठेवलेले होते. शिरपाच्या सोबतची दोन मुले घरफोडी करण्यात पटाईत होती. त्यांनी फटाफट आवाज न करता सगळ्या खोल्यांची कुलपं तोडली आणि मोबाईलच्या उजेडात आतील वस्तूंची पहाणी केली.
ते तिघं जेव्हा मुख्य दिवाणखान्यात पोहोचले तेव्हा वाड्यात सगळीकडेच मिट्ट काळोख होता. वाड्यात विज चालू होती, पण दिवे लावले तर बाहेरच्या लोकांचे वाड्याकडे लक्ष जाईल म्हणून मोबाईलच्या उजेडात पहाणी चालू होती. प्रत्येक खोलीत शिरपा आधी प्रवेश करत असे, त्याच्या मागोमाग दोन मुले जात होती. अंधारचे एक अनामिक दडपण शिरपच्या मनावर आले होते.
शिरपाने दिवाणखान्यात हळूच प्रवेश केला. हा दिवाणखाना त्याच्या चांगल्याच परिचयाचा होता. दिवसा त्याने सगळा वाडा पालथा घातलेला होता पण रात्रीच्या अंधारात वाड्यात प्रवेश करण्याची त्याची पहिलीच वेळ होती. अचानक त्यांना खूप उकडत असल्याची जाणीव व्हायला लागली. रात्रीची वेळ असल्याने बाहेर हवेत सुखद गारवा होता, मग इथं इतकं गरम कशानं व्हायला लागलं ते त्यांना समजेना.
दिवाणखान्यात जुन्या पद्धतीच्या शोभेच्या वस्तू खूप सुंदर पद्धतीने मांडलेल्या तशाच होत्या. त्या धुळीने खराब होऊ नयेत म्हणून बऱ्याच मोठया किमती वस्तूंवर ईनामदारांनी जुन्या चादरी, बेडशीट टाकल्या होत्या. तिथल्या एका भिंतीवर इनामदारांच्या पूर्वजांची तैलचित्रे ओळीने लावलेली होती. त्याखाली त्यांचे नाव आणि जन्म मृत्यूच्या दिनांकांचीही नोंद होती.
एक एक चित्र पहात ते तिघेही पुढे सरकत होते. प्रत्येक चित्रातील व्यक्तिंच्या वेशभूषेत काळाप्रमाणे होत असलेले बदल दिसत होते, पण एक गोष्ट सर्व चित्रांत कॉमन होती, ती म्हणजे सर्व इनामदारांचे हिरवे घारे डोळे. शेवटच्या चित्रानंतर एक रिकामी फ्रेम त्यांना दिसली. त्या फ्रेमवर मोबाईलचा उजेड पडताच एकदम दिवाणखान्यात लख्ख उजेड पसरला. अचानक झालेला हा बदल पाहून सगळेच दचकले. घाबरून एकमेकांना धडकतच मागे सरकले. इतका वेळ रात्र असूनही त्यांना वाड्यात कसलीही भिती वाटली नव्हती, पण अचानक घडलेल्या या प्रसंगाने ते चांगलेच घाबरले. दिवाणखान्यातली उष्णताही हळूहळू वाढत होती. त्यांनी धीर एकवटून पुन्हा एकदा त्या शेवटच्या फ्रेमकडे पाहिले आणि तिघांनाही एकदम हसू यायला लागले. ती शेवटची फ्रेम चित्राची नव्हती तर तो एक सुंदर कलाकुसर असलेला जुन्या पद्धतीचा आरसा होता. तिघांच्या मोबाईलचा प्रकाश एकदम त्या आरशावर पडल्यामुळे दिवणखान्यात एकदम लख्खकन प्रकाश पडला होता. त्यांनी पटकन आपापले मोबाईल आरशासमोरून बाजूला केले, फ्लॅश बंद केले आणि कशी आपली फजिती झाली या विचाराने एकमेकांकडे पाहून हसायला लागले.
पण दोन मिनीटातच त्यांचं हसू गायब झाले. कारण मोबाईल बंद केल्यावरही त्या आरशातून हिरवा निळा उजेड बाहेर पडत होता. शिरपा थोडा पुढं होवून त्या आरशाकडे पाहू लागला. दिवसा त्यानं अनेक वेळा त्या आरशाकडे पाहिलं होतं, त्यांची सुंदर रचना, फ्रेमवरचं सुरेख नक्षीकाम, उत्तम प्रतीची आरशाची बेल्जीयमची काच, हे पाहून मनातल्या मनात त्याला कळलं होतं की चोरबाजारात या अॅन्टिक आरशाला चांगली किंमत मिळेल, म्हणून त्यानं मालकांना विचारलंही होतं की हा आरसा द्यायचाय का, पण तो पूर्वजांपासून चालत आलेला आरसा असल्यानं तो आम्ही जपून ठेवलाय असं त्यांनी सांगितलं होतं. हे सगळं आठवत तो स्वतःचा चेहेरा आरशात न्याहाळत होता इतक्यात त्याला स्वतःच्या चेहेर्याच्या जागी दोन निळसर हिरवे भेदक नजरेचे डोळे दिसले जे शिरपाचे निरीक्षण करत होते आणि त्या डोळ्यांत रागही दिसत होता. ते पाहून एकदम दचकून शिरपा मागे सरला. त्याने मागे वळून बघितले, त्याच्या मागे त्या दोन मुलांशिवाय कुणीच नव्हते. अजूनही त्या आरशातून उजेड येत होता. खोलीतलं तापमान अजून वाढलं होतं. भितीनं आणि उष्म्यानं तिघंही घामानं न्हाऊन निघत होते.
शिरपाला घाबरून आरशापुढून बाजूला होताना पाहून बाकीच्या दोघांनीही स्वतःचे चेहेरे आरशात पाहिले आणि त्यांनाही तेच निळसर हिरवे भेदक नजरेचे डोळे त्यांच्याकडे पहात असल्याचे दिसले. ते दोघेही घाबरले. धडपडतच त्यांनी हातातील मोबाईलची बॅटरी लावण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांचे मोबाईल बंद पडले. परंतू अजुनही त्या आरशातून हिरवट निळसर प्रकाश बाहेर पडतच होता. त्याच प्रकाशात पाहून त्यांनी त्यांची बॅटरी उचलली, ती पण चालू होत नव्हती, शेवटी कसेतरी एकमेकांचे हात धरून धडपडत ते दिवणखान्यातून बाहेर पडले. अंधाराचा अंदाज घेत, ठेचकाळत, भिंतींना घडकत ते हळूहळू वाड्याच्या मागच्या बाजूला आले आणि थोडा वेळापूर्वी कडी उचकटून उघडलेल्या मागच्या दरवाजातून ते पसार झाले.
*****
दुसर्या दिवशी नरसूदादाला भेटून त्यांनी झालेला सगळा प्रकार कथन केला. नरसूनं मोठमोठ्यानं हसून त्यांची टिंगल केली. त्यांच्या भेदरटपणाची चेष्टा केली. "तुम्ही वाड्यावर जाताना टाकली होती का ? जास्त झाल्यामुळं तुम्हाला तसे भास झाले असतील" असं म्हणून तो खो खो हसत सुटला.
शिरपानं नरसूदादाला सांगितलं की, "आम्ही तिघंही दारू न पिता वाड्यावर गेलो होतो. पूर्वी मी वाड्यावर जायचो तेव्हा अनेकवेळा मी त्या आरशात डोकावून पाहिलं आहे. त्याच्यावरचं नक्षीकाम सोडलं तर इतर आरशांपेक्षा त्याच्यात काहीच वेगळं नाहीये. तरीही काल रात्री जे घडलं ते खरंच आहे. आम्ही दिवाणखान्यात असताना खूप गर्मी निर्माण झाली होती. वाड्यातून बाहेर आल्यावर थंडी वाजायला लागली. हे आम्हाला विचित्र वाटतंय. तर तुम्ही कुणीही परत त्या वाड्यावर जायचा प्रयत्न करू नका."
नरसू शिरपाला म्हणाला, "तुम्ही जे सांगताय ते मला पटत नाही. पण आज तुम्ही घरी जा, आपण नंतर बघू काय करायचं ते."
शिरपा घरी निघून आला. रंगी त्याची वाट पहात होती. "माजी तब्येत बरी नाही हे माहित असूनबी तुमी इतक्या रातीचं बाहेर का म्हून भटकत होता" असं तिनं विचारलं. त्यावर "तुझ्या बाळंतपणासाठी पैशाची तजवीज कराया गेलो होतो. तू माजी काळजी करू नको. तुज्या तब्येतीकडे लक्ष दे." असं सांगून तो झोपी गेला.
दोन दिवसांनी नरसूने शिरपाबरोबर जी दोन मुलं रात्री वाड्यावर गेली होती त्यांना बोलावून घेतले. त्यांच्यात संगनमत होवून त्यांनी वाड्यावर डल्ला मारायचा विचार पक्का केला.
ठरल्याप्रमाणं रात्री तिघं वाड्यावर गेली. मागच्या अनुभवानं ती मुलं वाड्यावर जायला तयार होत नव्हती, पण नरसुनं त्यांची समजून काढली आणि चांगले पैसे द्यायचं आमिष दाखवल्यावर ते दोघे तयार झाले. यावेळी मोबाईल बरोबरच चांगल्या पॉवरच्या तीन बॅटर्याही त्यांनी सोबत घेतल्या होत्या. 10-12 रिकामी पोती सोबत बांधून घेतली होती. मागच्याच पद्धतीनं त्यांनी वाड्यात प्रवेश केला.
सोबतच्या दोघांनी वाडा फिरून कुठल्या खोलीत काय माल आहे ते नारसुला दाखवलं. सगळं पाहून झाल्यावर नरसुनं त्या दोन मुलांना कुठला माल आधी उचलायचा, कुठला नंतर ते व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याच्यादृष्टीनं जो मौल्यवान माल होता, तो त्यांनी आजच घेवून जाण्याचं ठरवलं. पटापट तिघांनी जवळच्या पोत्यांमध्ये माल भरून, पोत्यांची तोंडं बांधून, सगळा माल वाड्याच्या मागच्या अंगणातील दरवाज्याच्या जवळ आणून ठेवला. या सगळ्या कामात दोन तास तरी गेले. आवाज न करता माल भरत असताना त्या दोन्ही मुलांना सतत आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे याची जाणीव होत होती.
ते वाड्यातून बाहेर पडेपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. इतर खोल्या दाखवताना त्यांनी कटाक्षाने दिवाणखान्यात जायचे टाळले होते. निघताना त्यांना वाडाभर एक वेगळाच सुगंध पसरल्याचे जाणवत होते.
वाड्याच्या जवळ असलेल्या रस्त्यावर त्यांनी आधीच टेम्पो आणून ठेवलेला होता. त्यात पटापट पोती टाकून अर्धा तासांत त्यांनी तिथून पोबारा केला. या सर्व घटनेची शिरपाला सुतरामही कल्पना नव्हती.
(क्रमशः)