#आरशातील_नजर_भयकथा
#mbkg_lock
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_पाच
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_पाच
भाग 6 वाचण्यासाठी 👇इथे क्लिक करा.
इकडे शहरात, इनामदार आजोबांना दोन दिवस सारखं अस्वस्थ वाटत होतं. रात्रीची झोपही लागत नव्हती. चोरी झाली त्या दिवशी पहाटे मुळपुरूष त्यांच्या स्वप्नात आला आणि वाड्यातल्या वस्तू चोरीला जात असल्याचं स्वप्नं त्यांना दिसलं.
सकाळी उठल्यावर त्यांनी ही गोष्ट त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या कानावर घातली. मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही आमच्यासोबत इथं रहात असलात तरी तुमच्या मनात सतत वाड्याचे विचार असतात त्यामुळे तुम्हाला तसं स्वप्नं पडलं असेल. तरीही तुमची खात्री करून घेण्यासाठी शेजारी फोन करून चौकशी करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.
इनामदार वहिनींच्या मैत्रिणीला त्यांनी फोन करून चौकशी केली. वाडा ठीक आहे, माझं लक्ष आहे वाड्यावर, तुम्ही काळजी करू नका असे तिनं अश्वासन दिलं.
*****
इकडं दुसर्या दिवशी नरसूनं रात्री आणलेल्या मालाचं स्वतःच्या गोडावूनमधील आतील खोलीत जावून एकट्यानंच सॉर्टिंग केलं. एकंदर हाती लागलेला माल चांगलाच व्हॅल्युएबल होता. त्यांनं मदतनीस मुलांना हजार हजार रूपये भेट दिले. नंतर बोलावलं की या परत असं सांगितलं, आणि मालाची विल्हेवाट लावायला तो चोर बाजारात निघून गेला. प्रत्यक्ष माल विकताना त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम त्याला मिळाली. तो खर्या अर्थानं मालामाल झाला.
मग दर एक दिवसाआड नरसू वाड्याला रात्री व्हिजीट करू लागला. पण हे सगळं करताना त्यानं चुकूनही दिवाणखान्यात प्रवेश केला नव्हता. बाकीच्या खोल्यांतून मिळेल तो माल ते गोळा करत होते. असं करत करत जवळजवळ निम्मा वाडा त्यानं लंपास केला.
*****
मग काही दिवस त्यानं ब्रेक घेण्याचं ठरवलं. मिळालेल्या पैशातून जिवाची मुंबई करून येण्याचा त्याचा विचार होता. आपल्या हाती लागलेलं घबाड हे शिरपामुळं मिळालंय याची त्याला जाणीव होती. म्हणूनच आज त्यानं स्वतःहून शिरपाला बोलवून पंचवीस हजार रूपये बायकोच्या डिलीव्हरीसाठी म्हणून दिले होते. नरसूदादा आपल्यावर एकदम मेहेरबान का झाला अशी शंका त्याच्या मनात आली. त्यानं वाड्यावर जावून काही उद्योग केला की काय असंही त्याला वाटलं. पण आत्ता त्याला पैशाची गरज होती. ती बिनबोभाट पार पडल्यामुळं त्याच्या डोक्यावरचं पैशाचं ओझं उतरलं होतं. त्यामुळं जास्त विचार न करता तो पैसे घेवून घरी गेला.
*****
त्या रात्री त्याला कसल्याशा आवाजानं जाग आली. तो उठून बसला. त्याच्या खोपटातील मिणमिणत्या उजेडात त्यानं पाहिलं तर त्याची बायको कोपर्यात बसून गुडघ्यात मान खुपसून हुंदके देवून रडत होती. आता तिचे दिवस भरत आले होते. अशा परिस्थितीत तिला रडताना पाहून त्याच्या छातीत धस्स झालं. तो पटकन उठून तिच्याजवळ गेला. त्यानं रडण्याचं कारण विचारलं.
ती म्हणाली, "मला गेल्या हप्ताभर रात्रीची वंगाळ वंगाळ स्वप्नं दिसत हायेत."
"कसली स्वप्नं."
"मी झोपले की मला माझ्या गळ्यावरून, अंगावरून कायतरी सरपटत जात असल्यागत वाटतया. साप बीप असंल म्हणून मी ते झटकाय बगीतलं तर माझ्या हाताला जाड दोरीवाणी कायतंरी लागतंय त्यावर केसं लागली हुती. उठून बघते तर काय बी नसतंय. पण माझ्या हाताला त्या वस्तूचा स्पर्शाची जानीव सारखी होत र्हातीय आणि कसलातरी वासबी येतुया. झोपेत माझे डोळे बंद असूनबी मला डोळ्यात हिरवा उजेड दिस्तुया. मला भीती वाटतीया त्याची."
"मला येक सांगा, तुमाला त्या दादानं जे पैकं दिल्यात ते नक्की कसल्या कामाचं दिल्यात? तुमी कुठलंबी वंगाळ काम करीत न्हाय ना? मला तुमची आन माज्या येनार्या पोराची लय काळजी वाटाय लागलीय. कायतरी इपरीत घडंल की काय असं भ्या वाटाय लागलंय मला. एकदोन दिवस असं झालं तरी मला भास व्हतंय असं वाटलं. पण हे आता रोजच व्हाया लागयल. का होत असेल असं?"
"ऐक रंगे, बाळ पोटात असताना असं वंगाळ विचार करू नकोस तू. पायजे तर तू तुज्या माहेराला जातीस का? तसंही पुडच्या महिन्यात जानारच व्हतीस, ती जरा आधी जा. दवाखान्याचं, इतर खर्चाचं पैकं मी देवून ठेवतो तुझ्या आईबा कडं. तू फकस्त तुझी आन आपल्या येणार्या बाळाची काळजी घे. झोप आता. उद्या सक्काळी ठरवू काय कराचं ते."
रंगी झोपली, पण शिरपाच्या मनात वाड्याचे आणि नरसूदादाचे विचार थैमान घालत होते. उद्या नरसूला भेटून काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवून तो झोपी गेला.
(क्रमशः)