#आरशातील_नजर_भयकथा
#mbkg_lock
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_सहा_अंतिम
#mbkg_lock
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_सहा_अंतिम
भाग 1 वाचण्यासाठी 👇इथे क्लिक करा.
दुसर्या दिवशी सकाळी आपल्या आईबाशी बोलून त्यानं रंगीला तिच्या माहेरच्या गावी पाठवायचा निर्णय घेतला. तिला तिकडं सोडायला म्हणून आईबाला तिच्या सोबत जायला सांगितलं. त्यांना स्टॅन्डवर सोडून तो तडक नरसूकडं गेला. त्यानं त्याला डायरेक्टच विचारलं की "तू वाड्यावर डल्ला मारलास का? मला पंचवीस हजार रुपये कशाचे दिलेस?"
नरसू काही त्याला थांगपत्ता लागू देईना. मग त्यानं त्याला सांगितलं की आज रात्री आपण वाड्यावर चक्कर टाकून येवूया. त्याला नरसू लगेच तयार झाला.
रात्री ठरल्याप्रमाणं दोघं वाड्याच्या मागच्या दारातून आत शिरले. शिरपा नरसूला घेवून तडक दिवणखान्यात गेला आणि त्याला त्यानं आरशासमोर उभं केलं. सुरूवातीला नरसूला तिथं फक्त आरसाच दिसत होता. तो हसून शिरपाला म्हणाला, "बघ हाय का काय हितं? तू मी इथं वाड्यावर येवू नये म्हणून मला खोटं सांगितलं व्हतंस ना? म्हणे खोली गरम होतीया, आरशातून परकाश पडतूया, त्यातून डोळं दिसत्यात. कायबी बोलायचं व्हय?" असं म्हणून नरसू हसू लागला.
इतक्यात...... त्यांच्या हातातील विजेर्या बंद पडल्या, खोलीत उष्णता वाढू लागली आणि त्या आरशातून प्रकाश बाहेर पडू लागला. तेच भेदक हिरवे डोळे दिसू लागले. आता त्या डोळ्यांत रक्त उतरल्यासारखं दिसत होतं. ते पाहून नरसूची खात्री झाली की शिरपा खरं सांगत होता. पण आता काय करावं ते त्याला काहीच सूचत नव्हतं. बघता बघता त्या आरशातून एक काळा सर्प बाहेर पडला. हळू हळू तो मोठा व्हायला लागला. त्याच्या अंगावर असलेली केसांची लव चमकू लागली. त्याच्या तोंडातून रागाने उमटणारे फुत्कार गंधकाच्या वासासारखे विषारी येवू लागले. नरसू आणि शिरपा ते अजस्त्र रूप पाहून पार भेलकांडून गेले. जिवाच्या भितीनं थरथर कापू लागले.
नरसूला त्याच्या बायकोनं सांगितलेलं स्वप्न आठवलं. म्हणजे हाच साप आपल्या बायकोच्या स्वप्नात येत होता.
त्या सापाच्या तोंडून गूढ गंभीर असा आवाज येवू लागला. "मी या वाड्याचा मूळपुरूष आहे. या वाड्याचं रक्षण करणं माझं काम आहे. वाड्यात माणसं नाहीत हे पाहून तुम्ही वाड्यात चोरी केली. वाड्याची मालमत्ता विकून पैसा कमावला. याची तुम्हाला शिक्षा देण्याची जबाबदारीपण माझीच आहे. मला तुम्ही काय काय केलंय हे सगळं माहित आहे."
शिरपानं त्याच्यापुढे हात जोडले. तो म्हणाला, "मी इनामदार साहेबांचा निष्ठावान मानूस हाय. मी इथल्या पापात सामील नाय. मी यांनाबी सांगितलं व्हतं की इथल्या कशावरच नजर टाकू नका पण त्यांनी ऐकलं नाय माझं. पण यात माझ्या बायकोची कायबी चुकी नाय. माझ्या बायकोला आणि माज्या होणाऱ्या बाळाला याची शिक्षा देवू नका. मला माफ करा. मला माफ करा. माझ्या मनात या वाड्याबद्दल खरंच कायबी पाप न्हाय. मला माफ करा. इनामदार सायबांचा पण माझ्यावर जीव हाय. मी असं पाप कधीच करनार नाय."
आता त्या सापानं नरसूकडं आपला मोर्चा वळवला. तोपर्यंत नरसूची पँट भिजलेली होती. आपण शिरपाचं ऐकलं नाही याचा त्याला पश्चाताप होत होता. इतरवेळी दादा म्हणून मिरवणारा नरसू आता भीतीने पार ससा होऊन थरथर कापत होता.
तो पण हात जोडून माफी मागू लागला. "आमची चुकी झाली. परत आमी असं कायबी करनार नाय. माझ्याकडं जो माल शिल्लक हाय तो मी वाड्यावर परत आणून ठेवतो. इनामदार सायबांची पण माफी मागतो पण आमाला जावूद्या."
"तुमची चूक माफ करण्यासारखी नाहीये. पण मी तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो. येत्या पोर्णिमेच्या आंत इथून उचललेला सगळा माल परत आणून जसाच्या तसा जमा करायचा या बोलीवर तुम्हाला आज सोडतोय. जर पोर्णिमेपर्यंत हे झालं नाही तर तुमचा मृत्यू अटळ आहे."
"आम्हाला माफी करा. मी तो माल चोरबाजारात विकून टाकलाय. पण मिळेल तेवढा माल मी परत आणायचा प्रयत्न करतो. एक डाव माफी करा, असं म्हणत नरसू रडू लागला."
क्षणात दिवाणखान्यात अंधार पसरला. हवेतली उष्णता कमी झाली. त्यांच्या बॅटर्यापण चालू झाल्या. दुसर्या क्षणी दोघांनी मागच्या दाराकडे धाव घेतली. धापा टाकत ते वाड्याच्या बाहेर आले आणि तिथंच बेशुद्ध पडले. पहाटे केव्हातरी त्यांना जाग आली. कालचा प्रसंग आठवून त्यांचे चांगलेच धाबे दणाणले. त्यांनी लगेच शिरपाच्या घराकडे धाव घेतली.
घरात पोहोचताच शिरपानं डेर्यातलं पाणी घटाघटा प्यायलं. नरसूलाही दिलं. दोघंही धापा टाकत जमिनीवर फतकल मारून बसले.
शिरपानं एक जोरदार शिवी हासडून नरसुला विचारलं, "झालं का समाधान? तरी मी सांगत होतो वाड्याकडं जावू नका. मला अंधारात ठिवून तुमी शेवटी जे करायचं तेच केलंत. तरी मी विचार करतोय, दादाला माजी एवढी काळजी कशी वाटाय लागली? येकदम 25000 रूपये देवून मेहेरबानी कशी काय केलीसा? तर हे कारण होतं. किती माल लुबाडला तिथून?"
नरसू आधीच घाबरला होता. तो कसंनुसं तोंड करून शिरपाला हात जोडून म्हणाला, "शिरप्या, चुकी झाली बाबा माजी. मला वाटलं आमी वाड्यावर चोरी करू नाई म्हनून तू आमाला भिती दावायसाठी खोट्या थापा मारतूयास. पन आमी चोरीला गेलो तवाबी पयल्या टायमाला आमाला ह्ये असलं काय दिसलं नाय. मग आमाला भ्या वाटायचं बंद झालं. मग आमी खूप येळला वाड्यावर गेलतु, पन येगदाबी हे काय दिसलं नाय. पन आता माझी खात्री पटली हाय. मी एक काम करतो, चोर बाजारात जावून काय काय माघारी मिळतंय ते बगतो, आन परत आणतो. तरी दोन तीन दिस जातील. मग आपण दोघं जावून वाड्यावर परत ठिवून यिवू. कसं?"
"आता जर का माज्याशी खोटं वागशीला तर याद राख दादा. तुज्या चुकीमुळं माजाबी जीव जायची बारी आलीया. तो साप माज्या बायकूच्या स्वप्नात येत होता रोज. म्हणून मी तीला म्हायेरी पाठवली. तवाच मला शंका आली, कायतरी गडबड हाय म्हणून. हे तू दिलेलं पैकं पन नगंत मला. जा घिवून. माझ्या बायको पोराचं काय करायचं ते माजं मी बगीन. पन तू तो माल सगळा वाड्यावर परत ठिवून ये म्हंजे झालं." असं म्हणून त्यानं घरात शिल्लक होते ते सगळे पैसे दादाला परत दिले.
नरसू तातडीनं चोर बाजारात माल परत मिळवण्यासाठी निघून गेला.
*****
इकडं शहरात इनामदारांना रोजच तो मुळपुरूष स्वप्नात येवू लागला. शेवटी त्यांनी मुलाची समजूत घालून किमान पोर्णिमेचा नैवेद्य दाखवण्यापुरतंतरी आम्ही दोघं वाड्यावर जावून येतो म्हणून सांगितले. शेवटी मुलगा त्यांना पाठवायला तयार झाला.
दोन तीन दिवस चोरबाजारात फिरून नरसूनं जवळजवळ 75 टक्के माल जादा किंमत देवून परत मिळवला आणि आपल्या गोदामात आणून ठेवला. त्याला साथ देणार्या दोन चोरांना बोलवून सगळा माल पोत्यात भरून तयार ठेवला. पोर्णिमेच्या आदल्या रात्री ते टेम्पो घेवून शिरपाला सोबत घेवून परत वाड्याजवळ आले आणि आवाज न करता एक एक पोतं उतरवून वाड्यात परत ठेवले.
सगळा माल मिळाला नसल्यामुळं नरसूला भिती वाटत होती की आता काय होईल? सगळा माल ठेवल्यावर ते परत जायला निघाले. त्यांनी कटाक्षानं दिवणखान्यात जायचं टाळलं होतं. ते दबक्या पावलांनी मागच्या अंगणात आले तर, अंगणात एक सुगंध पसरला होता. बाहेर पडायच्या दारासमोर तो साप वेटोळं घालून बसलेला होता. त्याच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडत होता. तो रागानं फुत्कारत होता. आता आपलं काही खरं नाही असं वाटून चौघंही चळाचळा कापू लागले.
तो साप बोलू लागला, "तुम्ही शब्द दिल्याप्रमाणं बरीचशी मालमत्ता परत आणली आहे. पण या वाड्याला फसवण्याचं आणि चोरी करायचं पाप तुम्ही केलंय. इथली मालमत्ता विकून तुम्हाला मिळालेल्या पैशाचा कोळसा होईल. तो पैसा तुम्ही कुठल्याच कामासाठी वापरू शकणार नाही हा माझा तुम्हाला शाप आहे."
शिरपा हात जोडून त्या सापाला म्हणाला, "मी यांच्या चोरीत सामील नव्हतो, आणि त्यानं दिलेले पैशेबी मी परत केलेत. म्हणून तुम्ही मला माफ करा. आम्हाला जावूद्या."
तो साप तिथून क्षणात गायब झाला. आपण यातून सुटलो म्हणून चौघंही लपतछपत टेम्पोपर्यंत आले आणि भरधाव वेगानं घराकडे जावू लागले. पहाटेची वेळ असल्यानं रस्त्यावर अजिबातच वर्दळ नव्हती त्यामुळे जीव वाचवून पळणे एवढ्याच उद्देशानं नरसू जोरात टेम्पो हाणत होता आणि तेवढ्यात त्याला समोरच्या काचेवर सापाची आकृती दिसली. त्यानं भरधाव टेम्पोला कचकन ब्रेक दाबला. दुसर्या क्षणी टेम्पो पलटी होवून फरपटत लांबपर्यंत गेला.
एवढा मोठा अपघात होवूनही शिरपाला किरकोळ जखमा झाल्या. नरसू आणि सोबतच्या दोन चोर साथीदारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीला धावले आणि त्यांना दवाखान्यात घेवून गेले. दोन दिवसांनी शिरपा व्यवस्थित परत आला. नरसूला बऱ्याच जखमा झाल्या होत्या, एक हात मोडला होता. मणक्याला जबरदस्त मार लागल्याने तो कायमचा अपंग झाला. दोन्ही साथीदारांचे हात पाय मोडल्यामुळे त्यांना तीन महिने प्लास्टरमध्ये रहावे लागले. अशा पद्धतीने वाड्याच्या मूळ पुरूषानं चोरांचा बदला घेतला.
#आरशातील_नजर_भयकथा
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_सहा_अंतिम
©#लेखिका_संध्या_प्रकाश_बापट
#भाग_सहा_अंतिम