सवाष्ण-भयकथा
लग्न होऊन लता सासरी आली .तशी साधीच होती ती . पहिल्या पावसाच्या ओल्या सरी सारखी .थोडी निखळ थोडी अवखळ.सासरी जाताना तिची आजी बोलली , “तुझं नावच लता आहे गं जन्मभर नवऱ्या नावाच्या झाडाला घट्ट बिलगून रहा !” आजी असं बोलताच लता चे मूळचे गुलाबी गाल आणखी गहिरे झाले .राजेश शाळेत शिक्षक होता .लग्न झालं आणि त्या बरोबर बदलीच पत्र हाती पडलं.लता ला घेऊन जावं सोबत कि गावीच ठेवावं असा प्रश्न त्याला पडला . घरच्यांनी मात्र तुझं बिऱ्हाड सोबत घेऊन जा रे असं म्हणताच त्याचा जीव भांड्यात पडला . बदली कोकणात झाली होती . लताला मात्र कोकण भारी आवडायचा .समुद्र , लाल माती , आणि माड बस्स आपण तिथं राहणार आहोत या कल्पनेनेच तिचा जीव पाखरा सारखा सैरभैर झाला .आपण कधी एकदाचे कोकणात जातोय असं तिला झालं .राजेश तसा पापभिरू कमी बोलणारा कमी व्यक्त होणारा माणूस लता वर मात्र त्याचा प्रचंड जीव .रत्नागिरीच्या एका गावात त्याची बदली झाली आणि गावातील एका वाड्यात त्याला तात्पुरती खोली मिळाली .वाडा भक्कम होता इन मिन तीन बिऱ्हाडकरू तिथं होते आणि वाड्याचे मालक माधव शेट आपल्या विधवा बहिणी सोबत राहायचे . मुलं बाळ काही नव्हतं .लग्नकेलं होतं पण पुढे काय झालं ते कळलं नाही .गावात त्यांचं अगदी बऱ्यापैकी प्रस्थ . उरलेल्या दोन बिराहडकरू मध्ये एक तिथंच कॉलेजात शिकणारा विद्यार्थी तर एक जण कसलासा उद्योग करायचे जे कायम फिरतीवर असायचे.एवढ्या मोठ्या वाड्यात लता आणि राजेश हे एकमेव जोडपं . तसा वाडा उगाचभकास वाटायचा जवळ गेलं तर आपल्याला मटकन गिळून टाकेल कि काय असा भास व्हायचा .अशा ठिकाणी लता राजेशच्या संसाराची सुरवात झाली .वाड्याच्या मागे छोटेखानी विहीर खोलवर गेलेली पाण्याकडे पाहिलं की कसचं व्हायचं . परसदारातील नारळी फोफळीची झाडं आणि दूरवर येणारी समुद्राची गाज काहीसं विलक्षण मिश्रण असायचं ते . लता दिवसभर एकटी असायची सोबतीला फक्त त्या वाड्यातील गूढ शांतता . बाकी सकाळी सकाळी माधव शेट मोठं मोठ्याने स्तोत्र म्हणताना तेवढा आवाज यायचा.नाही तर दुपारी झोपळ्याच्या वाजणाऱ्या कड्यांचा . माधव शेट ची बहीण फारशी दृष्टीस पडायची नाही ती सतत माजघरात कधी काळी पूजेला फुले घेताना बागेत दिसायची .लता नंतर या शांततेचा कंटाळा येऊ लागला .शाळा सुरु झाली होती राजेश दिवसभर शाळेत असायचा .अशातच वटपौर्णिमा आली .लता च लग्न झाल्यावरपहिलंच व्रत .तिने लग्नाचा शालू काढला .अंगभर दागिने ल्याली .नाकात मोत्यांची नथ , कानात झुबे , गळ्यात कोल्हापुरी साज , पाटल्या बांगड्या आणि हातभर हिरवी काकणं. आरशात स्वतःला बघून तीने स्वतःचीच दृष्ट काढली मनातल्या मनात . वड पुजायला निघणार तोच झोपळ्याच्या आवाजाने दचकली बाहेर माधव शेट झोपळ्यात बसले होते .क्षणभर तिची आणि त्यांची नजरानजर झाली आणि तिने चटकन खाली पाहिल.पुरुषाची नजर ओळखण्याची कसब स्त्रीजातीला जन्मजात असते.माधवशेटच्या नजरेतील जरब आणि लालसा तिला स्पष्ट जाणवली . ती घराबाहेर पडली पूजा आटोपल्यावर रस्त्याने विचार करत निघाली आणि कशी कोणास ठाऊकएके ठिकाणी तिला जोरात ठेच लागली . ‘ आई गं ..! म्हणून ती मटकन खालीच बसली पूजेचे ताट पडणारच होतं हातातून पण अचानक कोणाच्या तरी नाजूक हाताने ते सावरलं .वर बघितलं तर साक्षात लक्ष्मी असावी असं रूप असलेली एक साधारण पस्तिशीची स्त्री सवाष्ण रुपात उभी होती .’ काय गं लागलं का ..? वेंधळीच आहेस ! ती बोलली. लताला पण हसू आलं. ‘ अहो कळलंच नाही कशी ठेच लागली ते .!’ लता ..’ नीट लक्ष ठेव हो. सगळेच दगड डोळ्यांना दिसत नाहीत . इथं पावलोपावली खाच खळगे आहेत .दर वेळी कोणी येणार नाही तुझं ताट सांभाळायला ..’आणि नंतर दोघी जणू बऱ्याच दिवसांची मैत्री असल्या सारख्या बोलत राहिल्या .बोलता बोलता वाडा आला आणि लता ची ही नवीन मैत्रीण ‘सुशीला ‘ तिला वाड्याजवळ सोडून पुढे निघून गेली . लताला आता जरा बरं वाटू लागलं होतं .कमीत कमी एकजण तरी तिला बोलायला भेटलं होतं . पुढे सुशीला आणि लताच्या भेटी गाठी वाढू लागल्या.कधी बाजारात कधी दर्या वर तर कधी कधीसुशीला घरी पण यायची . दिवस मजेत चालले होते . एक दिवस पहाटे लता न्हाणी घरातून बाहेर पडली आणि समोर माधवशेठ उभे .लताच्या काळजात धस्स झालं .ती त्यांना बगल देऊन पुढे निघून गेली .पण दिवसभर तिच्या डोक्यात तोच विषय .राजेशला सांगायचं तरी कसं .तिने ठरवलं सुशिलाला सांगायचं आणि ती आल्यावर तिने सगळं सांगितलं .सुशीला खाली मान घालून ऐकतहोती आणि अचानक तिचे डोळे लालभडक झाले .’ माधवशेठ ss ! ‘ असं काहीसं पुटपुटत निघून गेली .पुढे सुशिलाच लताच्या घरी येणं वाढलं कमालीचं .ती सतत वाड्यातच असायची. एक दिवस अचानक माधवशेठच्या बहिणीने लताला विचारलं, ‘ जरा परसदारातील माडा खाली दिवा ठेवत जा.काही बाही बडबडत असता.कित्येक वेळा पाहिलं तुम्हाला एकट्याच बडबडताना ! ‘त्यांच्या बोलण्याचं लताला हसू आलं आणि ती धूम ठोकत खोलीत गेली आणि सुशा आपल्या सोबत असते हे याना कस सांगायचं बाई याचा विचार करीत राहिली. हळूहळू माधवशेठ ची बहीण पण लताशी बोलू लागल्या . कारण ही तसंच होतं.लताला दिवस गेले होते. काय हवं काय नको बघत होत्या . माधवशेठ राहत होते त्या भागात जाण्याचा कधी प्रश्नच येतं नव्हता. पण त्यांच्या बहिणीने लताला तिच्या खोलीतच सगळं काही देण्याची व्यवस्था सुरु केली. आपली इतकी काळजी करणार माणूस बघून तिचा जीव सुपा एवढा झाला. आता ती वाड्यात पूर्ण रमून गेली होती .सुशीला पण अधून मधून येत होती . दिवस जात होते फुलपाखरासारखे . एक दिवस अचानक राजेशने सांगितलं की मला मुंबईला जावं लागेल पुढच्या आठवड्यात .आता लता इतकी रमली होती की राजेश गेला तरी तिला वाड्यात मुळीच एकटं वाटणार नव्हतं . एक दिवस ती माधवशेट च्या बहिणीला पण हे बोलली ,’राधक्का …हे मुंबई ला जाणार आहेत पुढच्या शुक्रवारी ..!”तसं राधक्का ने चमकून वर पाहिलं .”हो का ? जाऊ दे की आम्ही आहोत ना इथं..”लताला या वाक्याने हायसं वाटलं . राधक्का खरं किती चांगल्या आहेत आपणच माणसं ओळखायला कमी पडतो .दिवस गेल्यापासून तर किती काळजी घेतात आपली .हे आपलेपण कुठे मिळालं असतं ना.ती मनाशीच विचार करू लागली .हा हा म्हणता गुरुवार उजाडला .दुपारी लता जरा आडवी पडली होती .अचानक धप धप आवाजाने तिला जाग आली .उठून पाहिलं तर परसदारात दोन माणसं खड्डा खणत होती .तिला आश्चर्य वाटलं तिने धावत जाऊन राधक्का ला आवाज दिला ,”अक्का हा खड्डा कशाला हो ..? “” नवीन कलम लावायचं आहे गं ..राधक्का .”पण मुळातच जागा कुठे आहे ना ? दाटी होईल ना ? ..लता बोलली”हे शेवटचं असेल गं मग सगळं नीट होईल “राधक्का बोलली .लताला फारसं कळलं नाही पण जास्त खोलात न जाता तिने विषय बंद केला . खूप दिवसापासून सुशा पण पूर्वी सारखी येत नव्हती .मुळात लता पण फारशी बाहेर जायची नाही . तिला भयंकर डोहाळे लागले होते .पोटात अन्नाचा कणटिकायचा नाही .सारख्या उलट्या मळमळ.नुसती हैराण झाली होती .अंगात अजिबातत्राण नसायचा तिच्या .त्यामुळे आजकाल फक्त राधक्का आणि ती हीच जोडगोळी सोबत असायची . उद्या राजेश मुंबईला गेला तरी राधक्का होतीच सोबतीला .राजेश शुक्रवारी पहाटेच्या गाडीने निघाला .जाताना त्याला उगाच आपण जावंनाही असं वाटू लागलं .त्याने झोपलेल्या लताला डोळेभरून पाहिलं.इतकी सुंदर , सुशील आणि निर्मळ मनाची बायको आपल्याला मिळाली याचं त्याला भारी कौतुक वाटायचं .जाताना त्याने तिला हाक मारली , ” लता येतो गं काळजी घे ” या आवाजाने लता लगबगीने उठली .”निघालात ..? असं म्हणून त्याला घट्ट बिलगली .”जायला हवं ना ..महत्वाचं काम आहे.लवकर येतो काळजी घे आणि काही हवं नको असेल तर राधक्का ला सांग चल येतो मी “.असं म्हणत राजेश निघाला .त्याला सोडवायला लता खोली बाहेर आली .बाहेर अजून ही काळोख होता .तशी राधक्का जागी झाली असावी कारण ती रोज अगदी पहाटे उठायची . राजेश वाड्याबाहेर पडला पण आज त्याच मन जरासं सैरभैरच होतं .त्याने एकवार मागे वळून पाहिलं.तो वाडा त्याच्याकडे बघून हसतोय असात्याला जणू भासच झाला . राजेशला आपल्या विचारांचं हसू आलं आणि तो पुढे निघाला.लता खोलीत आली पण तिला झोप लागेना.उगाच या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता तिला झोप लागली आणि जाग आली ती राधक्काच्या हाकेने .” लता उठला का ? आज पुजा आहे आपल्या इथं आवरा लवकर ..आज सवाष्णींचा खासा मान आहे हो पूजेला .लगबगीने तयारी करा आणि आमच्याकडे या ..!” “आवरते हा अक्का”असं म्हणत लता उठली . भरभर तिनेपेटीतील हिरवी साडी काढली ..तिच्या आई ने घेतली होती .आई ने मायेने गालावरून हात फिरवावा तशी तिने साडी आपल्या गालाला लावली आणि तिला आईच्या मायेचा स्पर्श त्यात ही जाणवला .ती तलम रेशमी साडी , सगळे दागिने आणि काळ्याभोर केसांच्या आंबड्यावर बागेतील सोंनचाफ्याची दोन फुलं खोचायला ती विसरली नाही..तिने आरशात पाहिलं मूळचा गोरा रंग गर्भारपणाच्या नाजूक ओझ्याने पिवळसर झाला होता . मासोळी सारखे दोन काळेभोर डोळे दाट पापण्यांच्या झालरीने सजून गेले होते . तिने पुन्हा पुन्हा आरशात पाहिलं एकवार सगळ्या दागिन्यांवर हलका हात फिरवला अलगद तिचा हात पोटाशी येऊन थांबला ..’ आई ‘ आपण आई होणार आहोत या जाणिवेने ती क्षणभर शहारून गेली.इवलासा जीव आपल्या आत रुजतोय मोठा होतोय या जाणिवेने ती सुखावून गेली.इतक्यात पुन्हा राधक्का चा आवाज आला.” लता येतेस ना ..? “” हो निघालेच असं म्हणत तिने दार लोटून घेतलं .संथ पावलं टाकीत ती माधवशेठ च्या दारात उभी राहिली .आज पर्यंत ती कधी आत गेली नव्हती .तिने पाहिला होता तो फक्त झोपाळा .ती आत आली आणि थक्क झाली सुंदर अशा शिसवी लाकडाचे कोरीवकाम अखंड दिवाणखान्यात दिसत होतं . वाडा बाहेरून जुनाट वाटत असला तरी आत मात्र सरंजामशाही थाट होता . छताला लागलेली झुंबर , भितींवरच्या उंची तसबिरी दृष्ट लागण्या सारखं वैभव .तीदिवनखान्यातच उभी राहिली इतक्यात अक्का आली . “इथं कुठे उभी आत ये ..! असं म्हणत अक्का पुढे आली आणि तिचा हात धरून आत घेऊन गेली .आत किती खोल्या होत्या कोणास ठाऊक नुसता भूल भुलैया. एक एक खोली करता करता अक्काने तिला एका खोली समोर थांबवलं . त्या खोलीतून धूप दीपांचा दरवळ येत होता . जराशी अंधारी वाटणारी ती खोली दिव्यांच्या उजेडात अगदी गूढ दिसत होती .लता चा जीव उगाचच घाबरुन गेला . तिला तिथं उभे राहवेना ” अक्का कुठे आहात म्हणून ती बाजूच्या खोलीत वळली पण समोरच दृश्य बघून जागच्या जागीच थिजून गेली ..समोर सुशा ची तसबीर होतीआणि तिला तिला चंदनाचा हार …!!लताला कळेना हे कसं शक्य आहे तिने जोरात आवाज दिला .” अक्का हे काय ? सुशाचा फोटोला हार कसा ? तशी अक्का धावत बाहेर आली . ” तू कशी ओळखते हिला ?अक्का बोलली .” मी चांगली ओळखते हिला अक्का ही माझीमैत्रीण आहे अहो आपल्या वाड्यात नेहमी येते माझ्याशी गप्पा मारते .” लता सांगू लागली .” काय बरळते आहेस ? ही माधवची बायको आहे हिला मरून २ वर्षे झालीत कशी दिसणार तुला .वेडसर होती वेडाच्या भरात कुठे निघून गेली ती सापडलीच नाही मग आम्हीच तिला मृत घोषित केली..!!” अक्का सांगत होती .” नाही आक्का त्या जिवंत आहेत तुमचा गैरसमज झाला आहे मी मी बोलावते तिला थांबा.” असं म्हणत लता मागे फिरणार तितक्यात अक्का मोठ्याने ओरडली ” या या हातांनी तिच्यावर माती लोटली मी आणि परसदारात विहिरीजवळ जिवंत समाधी दिली .त्या मातीत एक माडा च कलमव लावलं आणि तुला कशी दिसेल ती गं ? चल मागे फिर माझ्या माधवाच्या वाटेत अडसर झाली होती .तोंड बंद ठेवलं असतं तर आता राजाची राणी बनून राहिली असतीना पण नाही गेली वैकुंठाला …”!आपण हे काय ऐकतोय हेच लताला कळेना काय चाललंय आपण कुठे आहोत तिच्या डोळ्यासमोर घेरी येऊ लागली आणि इतक्यात त्या धूप दीपांच्या खोलीतून एक आडदांड व्यक्ती बाहेर आली .माधवशेठ हो मधवशेठच होते ते .” अक्का पकडं तिला आणि आण आंत आपला हा शेवटचा नरबळी त्यानंतर तळघरातील ते गुप्त धनाचे सात रांजण आपले .मला वाईट वाटत सुशाच पाचव्या बळीच्या वेळी तिने नको ते पाहिलं आणि तिला पण मला संपवाव लागलं .मोजून सात सवाष्णींचे बळी द्यायचे होते ही सातवी .आता मी या पंचक्रोशीचा मालक होणार अमाप धनसंपत्ती मला मिळणार ..!” असं म्हणत तो छद्मिपणे भेसूर हसू लागला .तो पर्यंत लता ग्लानी येऊन जमिनीवर पडली होती .जाग आली तर त्या अंधार खोलीत हो त्या विचित्र खोलीत हळदी कुंकवाचे रिगण करून त्यात तिला बसवलं होतं .कपाळावर मळवट भरला होता.लता च्या आईने मायेने दिलेली साडी माधवशेठच्या स्वार्थाने बरबटलेल्या गुलाल बुक्याने भरून गेली होती .आपण आता संपणार आहोत या जाणिवेने लता गलितगात्र झाली होती . आपल्या बाळाला या जगात येण्यापूर्वीच आपण त्याचा जगण्याचाहक्क हिरावून घेत आहोत . क्षणभर तिच्या डोळ्या पुढून माहेर तरळून गेलं .आजी कुठे आहेस गं ..? राजेश लवकर ये मला जगायचं आहे या नराधमा पासून मला सोडवा. अजून एक नाव तिच्या ओठी आलं सुशा ….सुशा एका दगडापासून वाचवायला मला आलीस ना ..इतके दिवस माझ्या आस पास होतीस .आज परत ये माझ्या बाळासाठी मला जगायचं आहे गं..माझी मदत कर ..ती जिवाच्या आकांताने ओरडू लागली .तशी राधक्का ने तिच्या जोरदार कानशिलात लगावून दिली .” ती मेलेली सुशी येत असती ना तर उरलेल्या पाच जणी पण यायला हव्या होत्या ना ? आली मोठी ..चल आवाज बंद कर”आता चांगलंच अंधारून आलं होतं.दिवसभर हा तमाशा चालू होता . दिवसभरात कोणाचा आवाज ही आला नव्हता.कोणी आलं असेल तरी या तळघरात कसं पोहचणार कोणी ?” अक्का उठव तिला आणि घेऊन चल विहिरीजवळ घटिका भरली आहे .” माधवशेठ बोलला . अक्काने खसकन तिचे दोन्ही हात ओढून तिला उभी केली .लता असहाय पणे अक्का कडे पहात होती .” अक्का आई च्या मायेने सगळं केलंत होमाझं .जरा उणीव भासू दिली नाहीत .मला जगायचं आहे हो .माझ्यावर नसेल पण माझ्या बाळावर तरी दया करा ..!” लता जीव एकवटून बोलत होती .” बंद कर गं बडबड चल पुढं ..असं म्हणत अक्का तिला बळेबळे ओढून नेत होती.हळूहळू तिला विहिरी जवळच्या त्या पुरुषभर उंचीच्या खड्याजवळ आणण्यातआलं .माधवशेठ ने पुन्हा मंत्रोच्चारण सुरु केलं आता तिला खड्ड्यात लोटणार तोच एक जोराचा झटका त्याच्या हाताला लागला .मागे वळून पाहिलं तर सुशा तिथं उभी होती .” हात सोडा तिचा …एक धीरगंभीर आवाज आला .” नीचपणाला ही किळस वाटावी अशी माणसं तुम्ही .किती लालसा किती हव्यास ?? इतक्या निरपराध लोकांचे बळी घेऊन कसलं घबाड मिळवणार तुम्ही ..? सुखी व्हाल त्यात ? खुप झालं आता होणार नाही ..भरला तुमच्या पापाचा घडा…तिला सोडा .”इतका क्रूर माधवशेठ पण या आवाजाने घाबरून गेला . त्याचे हातपाय लटपट कापू लागले .त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सुशा त्याच्या समोरच उभी राहिली .घाबरलेले माधवशेठ आणि राधक्का गयावया करू लागली .” आमचं चुकलं माफ कर पुन्हा असं करणारनाही जीवदान दे ..असं बोलू लागली .” माफी आणि तुम्हाला ? अरे नीच माणसा सात जन्म रक्षण करण्याचं वचन घेतलेला माणूस तू स्वतःच पाप लपवण्यासाठी माझा स्वतःच्या पत्नीचा पण बळी दिलास तू ..माझ्या उदरात तुझा अंश वाढत होता रे पण तुला नाही आली दया ..इतक्या वर्षांनी घरात पाळणा हलणार होता पण तुझ्या क्रूरतेने माझ्या बाळाचा पण जीव घेतला तू …तुला माफी नाही …!”या शब्दा बरोबर माधवशेठ ला जोराचा धक्का लागला आधाराला त्याने राधाक्काचा हात धरला पण तो फोल ठरला दोघे ही धाडकन विहिरीत पडली जोराचा आवाज झाला काही तरी फुटल्याचा…बहुदा पापाचा घडा फुटला होता .इतक्यावेळ स्तब्ध असलेली लता मग मात्र जिवाच्या आकांताने ओरडली वाचवा ss आणि क्षणार्धात सारा गाव गोळा झाला .वाड्याभोवती लोकांचा गराडा पडला . कोणीतरी लताला पाणी दिलं ..आज पर्यंत गुप्त धनाची गोष्ट साऱ्या गावाला कळाली होती .पोलीस आले.पंचनामा झाला . माधवशेठ आणि राधक्काचा राहत्या घरात विहिरीत पडून गूढ मृत्यू ….राजेश ला ही बातमीस्टेशन ला समजली तसा तो जिवाच्या आकांताने घरी धावत आलाराजेशला बघून लता धावत जाऊन बिलगली.हे कसलं अघोरी संकट आपल्यावर ओढवल होतं याची त्याला जाणीव झाली . त्या क्षणी सगळं सामान बांधून त्याने वाडाच नव्हे तर ते गाव सोडायचा निर्धार केला . सगळं सामान गाडीत टाकलं गेलं आता लता गाडी त बसणार तोच तिला पुन्हा ती दिसली ….सवाष्ण सुशा.त्याच लक्ष्मीच्या रुपात आणि लताने मनोमन हात जोडले .पुढे नऊ महिने झाल्यावर लताने एका कन्यारत्नाला जन्म दिला आणि नाव ठेवलं सुशीला ..तिला जीवनदान देणाऱ्या सुशाचा आत्मा मुक्त होऊन पुन्हा तिच्या पोटी आला होता आणि लतापण आपल्याला जीवनदान देणाऱ्या सुशाचे उपकार मातृत्वाच्या हक्कानेतिला न्हाऊ माखू घालून फेडीत होती….!!
लेखक : अलका