कापालिक : भाग १
रोज पेक्षा आज स्मशानात जरा जास्तच वर्दळ होती. एरवी संध्याकाळी साडेसात आठ वाजता निर्मनुष्य होणारा स्मशानाचा परिसर रात्रीचे साडेदहा वाजूनही माणसांनी गजबजलेला होता. त्याला कारणही तसेच घडले होते. गावातील पाटलाची सून एकाएकी गेली होती. आणि त्याच कारणाने सगळे स्मशानात जमले होते. काहींच्या मते पाटलानेच सुनेला मुलगा देत नाही म्हणून मारले होते, तर काहीच्या मते एवढ्यात मुल नको म्हणून सुनेने कसलासा काढा घेतला आणि त्याचे विष तयार होऊन तिला जीवाला मुकावे लागले होते. तर काहींच्या मते अघोरी सिद्धी प्राप्त व्हाव्यात यासाठी तिचा बळी देण्यात आला होता. सतरा जणांची सतरा मते. पाटीलही तिच्या अशा अचानक जाण्याने हबकले होते. पण आपणच खचलो असे दिसले तर मुलाला धीर कोण देणार? हा विचार करून ते कसेतरी स्वतःला सावरून मुलाला धीर देत होते. चितेची सगळी तयारी झाल्यावर अग्नी देण्याची वेळ आली. पाटलाच्या मुलाचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. पण हे कर्तव्यही पार पाडणे गरजेचेच होते. रात्रीची वेळ असल्यामुळे मंत्राग्नी ऐवजी भडाग्नी देण्यात येणार होता. शेवटी स्वतःवर ताबा मिळवत त्याने थबथबल्या डोळ्यांनी चितेला अग्नी दिला आणि चितेने धडधडत पेट घेतला. जसजसा अग्नीचा भडका वाढू लागला, तसतसे लोकं पाटलाला आणि पाटलाच्या मुलाला सांत्वना देत काढता पाय घेऊ लागले. अर्थात थंडीचे दिवस असल्यामुळे ते योग्यही होते. तसेही तिथे उभे राहून काहीच उपयोग नाही असे वाटल्याने पाटीलही मुलाला घेवून घरी निघाले. जवळपास १५/२० मिनिटानंतर जवळपास सगळीच मंडळी साश्रू नयनाने घरच्या वाटेला लागली.
या सगळ्या गोष्टी लांब उभा राहून कापालिक पहात होता. त्याच्या मनात अघोरी विचार उमटत होते, आणि ते पूर्ण करून घेण्यासाठी त्याला तिथे उभे राहणे गरजेचेच होते. पाटलाच्या घरची सगळी मंडळी स्मशानाच्या दारातून बाहेर पडली आणि कापालिक हळूहळू अंधाराचा आडोसा घेत चितेकडे सरकू लागला. खरं तर त्याला घाई करावी लागणार होती, पण कुणी पाहिले तर सगळ्या गोष्टीवर पाणी फिरेल या एका विचाराने तो आपले प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलत होता. जसजसा माणसांचा आवाज दूरदूर जाऊ लागला तसतसा कापालिक चितेच्या जवळ येऊ लागला. आता त्याला चितेच्या झळया चांगल्याच जाणवू लागल्या. इतका वेळ अंधारात गुप्त झालेली कापालिकाची आकृती चितेच्या उजेडात उठून दिसू लागली. अंगात काळ्या रंगाचा पायघोळ, त्यावर पोवळ्यांच्या, रुद्राक्षांच्या आणि कवड्यांच्या माळा, सहा साडेसहा फुट उंची असलेली आडदांड शरीरयष्टी, काळे कुळकुळीत केस, गडद काळा रंग, कपाळाला काळा टिळा, मोठे आणि लालसर डोळे, खांद्याला काळ्याच कापडाची झोळी आणि एका हातात लोखंडाचा चिमटा असा कापालिक चितेच्या लालसरपिवळ्या प्रकाशात अगदी भेसूर वाटत होता. एखाद्याने कापालिकाला त्याठिकाणी असे पाहिले असते तर नक्कीच तो एखादा राक्षस पाहतोय असे वाटून भोवळ येवून पडला असता. क्षणाचाही विलंब न करता कापालिकाने हातातील चिमटा चितेत खुपसला. खरे तर सामान्य माणसाला अशा धडधडत्या चितेच्या इतके जवळ जाणे सहन होत नाही, पण कापालिकाच्या चेहऱ्यावर उष्णतेचा त्रास होणारे कोणतेच भाव नव्हते. काही पळातच त्याने चितेची लाकडे पलीकडील बाजूला लोटली आणि तोंडाने कसलासा मंत्र पुटपुटत त्याने ते अर्धवट जळालेले प्रेत ओढून बाहेर काढले. प्रेताचे केस पूर्ण जळाले होते, काही ठिकाणी त्वचा भाजून हाडांना चिकटली होती. चिमटयाच्या साह्यानेच प्रथम त्याने प्रेताची कवटी व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावर अघोरी हास्य उमटले.
तसा आता तिथे इतर कुणी माणूस येईल याची शक्यताच नसल्यामुळे त्याने आपला वेग थोडा मंदावला. चितेच्या त्या प्रकाशात अर्धवट जळलेले ते प्रेत महा भयानक दिसत होते. चुलीत भाजलेले भरताचे वांगे जसे नंतर लिबलिबीत होते अगदी तशीच त्या प्रेताची अवस्था झाली होती. कापालीकाने परत एकदा सगळीकडचा कानोसा घेतला आणि आपल्या झोळीत हात घातला. त्याचा हात झोळीतून बाहेर आला तेंव्हा त्याच्या हातात कसलीशी बाटली होती. त्याने ती बाटली डाव्या हातात घेवून त्यातील द्रव उजव्या हाताच्या ओंजळीत घेतले. एरवी लाल असणारे ते रक्त आता बरेचसे काळपट पडले होते. हातातील बाटली खाली ठेवून त्याने एकदा हातातील रक्तावर नजर टाकली आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र पूर्ण होताच त्याने ते रक्त त्या प्रेतावर डोक्याकडून पायाकडे सडा शिंपडावा तसे तीन वेळेस शिंपडले आणि नवीन अघोरी मंत्र पुटपुटत झोळीतून धारदार सुरा बाहेर काढला. सुऱ्याचे पाते त्या चितेच्या प्रकाशात लक्ख चकाकत होते. नंतर त्याने प्रेताच्या हनुवटी पासून चार बोटांचे अंतर मोजले आणि सुरा असलेला हात हवेत उचलला गेला. या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या असुरी भावात कुठेच कमतरता नव्हती. त्याचा हात खाली आला त्यावेळेस प्रेताचे शीर धडापासून एक फुट अंतरावर वेगळे होऊन पडले होते. अतिशय बीभत्स असे ते कृत्य कापालिकासाठी अगदीच किरकोळ होते. त्यानंतर त्याने ते शीर विरहित धड परत अर्धवट विझत चाललेल्या चितेवर टाकले आणि मातीत पडलेले शीर थंड झाल्याची खात्री करून आपल्या झोळीत टाकले. आपल्या कार्यात कुठलेच विघ्न आले नाही हे पाहून त्याचा चेहरा अघोरी समाधानाने फुलला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्या आहेत याची खात्री करून, काहीसा अट्टाहास करीत तो लांब टांगा टाकत अंधारात गायब झाला
राजधेर गावात एकच हाहाकार उडाला होता. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच विषय होता आणि तो म्हणजे आदल्या रात्री झालेली पाटलाच्या सुनेच्या चितेची विटंबना. सकाळी जेव्हा पाटलाच्या घरचे लोकं चितेच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानात गेले तेंव्हा त्यांना झालेला प्रकार समजला होता. चितेतील काही लाकडे इतस्ततः विखुरली गेली होती. शीर नसलेला देह अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिथेचं चितेवर पडला होता. आधी सगळ्यांना हे एखाद्या जनावराचे काम वाटले. कारण बऱ्याच वेळेस जंगली जनावरे मांसाच्या वासाने अशी गोष्ट करतात हे सगळे जाणून होते. पण हा प्रकार मात्र वेगळाच भासत होता. तशा घटनेत जनावरांच्या पायाच्या खुणाही सगळीकडे दिसतात. इथे मात्र प्रेताचे शीरच तेवढे गायब झाले होते. सकाळपासून गावकऱ्यांनी गावाच्या चारी दिशेला बराच तपास केल्यानंतरही काहीच हाती लागले नव्हते. सगळेच जण रिकाम्या हाताने परत आले होते. यामागे नक्कीच काहीतरी विपरीत हेतू असल्याचे आता सगळ्यांचे एकमत झाले.
“म्या काय म्हन्तो पाटील... ह्ये कायतरी येगळंच काम हाय बगा... कायतरी लैच वंगाळ... मला वाटून ऱ्हायलं, तालुक्याला पोलीस चौकीला सांगावा धाडावा... काय म्हंता?” जवळच उभा असलेला शिरपू नाना म्हणाला आणि इतरांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
“मला बी त्येच वाटू ऱ्हायलं... ह्ये काम जनावराचं न्हवं...” वयानं पाटलाच्याच बरोबरीचा असलेला बंडू तात्या म्हणाला. पाटलाचे मन आणि अनुभव देखील त्याला हेच सांगू लागले. लगोलग त्यानं आपल्या पोराला आवाज दिला.
“संपत... ये संपत...” पाटलाचा आवाज ऐकताच संपत लगबगीने त्याच्या समोर हजर झाला.
"आरं समद्यांचं मत हाय की ह्ये कायतरी येगळंच प्रकरन हाय. आसं कर चांदवडच्या पोलीस चौकीला वर्दी दे... आता पोलीसच याचा सोक्समोक्स लावतीन...” काळजीच्या सुरात पाटलानं पोराला सांगितलं मात्र अन संपतनं चांदवड पोलीस स्टेशनला फोन लावला.
“ये पोरांहो... कशाला बी हात लावू नगा रं... आता पोलीसच पंचनामा करतीन.” अर्धवट जळलेल्या चितेची लाकडे नीट करण्यासाठी निघालेल्या पोरांना उद्देशून पाटील म्हणाले. खरं तर आपल्या सुनेचं प्रेत असं बीभत्स स्वरुपात पाहणं पाटलाला जास्तच हेलावून सोडत होतं, पण कोणताही पुरावा नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी कुणालाच तिकडे जाऊ दिले नाही. संपतचा चेहरा तर रागानं लाल झाला होता. काही लोकं ज्याने हे कृत्य केले असेल त्याला शिव्यांची लाखोली वहात होते. तर काही नुसतेच बघे, चितेभोवती उभे राहून वेगवेगळे तर्क लढवण्यात दंग होते. तसेही खेडेगावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे कामावर जायला थोडा उशीर झाला तरी त्यांना काहीच फरक पडणार नव्हता.
थोड्याच वेळात मातीचा धुराळा उडवत पोलीस जीप घटनास्थळी दाखल झाली. सब. इन्स्पेक्टर आहिरे, बरोबर ३ हावलदार आणि फोटोग्राफरला घेऊन जीपमधून खाली उतरले. चितेवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत शीर नसलेला देह तसाच पडलेला होता. चितेची काही लाकडे अजुनही थोड्याफार प्रमाणात धुमसत होती.
“सावंत... आधी पंचनामा करून बॉडी ताब्यात घ्या आणि पीएमला पाठवायची तयारी करा.” सब. इन्स्पेक्टर आहिरेंनी एका हावलदाराला सूचना केली. पोलिसांचा फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगलमधून घटनास्थळाचे फोटो घेत होता. इतर हावलदारही काही धागा मिळतो का याची बारीक तपासणी करू लागले. सगळ्यांना कामाला लावून आहिरेंनी आपला मोर्चा डोक्याला हात लावून झाडाला टेकलेल्या पाटलाकडे वळवला.
“मयत बाई तुमची कोण?”
“सून व्हती सायेब...” काहीसे सावरून बसत आणि भावनांना आवर घालत पाटील बोलले.
“तुम्हीच फोन केला होता?”
“न्हाई... माह्या पोरानं फोन केल्ता तुम्हास्नी”
“बरं... हे तुमच्या कधी लक्षात आलं?” विस्कटलेल्या चितेकडे मानेनेच खुण करून आहिरेंनी पुढचा प्रश्न केला.
“ते आमी समदे राख आणायला हिड आल्तो तवां...”
“बरं... कशामुळे मृत्यू झाला होता तुमच्या सुनेचा?”
“त्ये... हार्टचा प्राब्लेम व्हता... चांगली हसत व्हती दुपारपोतूर... पन कायनु काय झालं अन छातीवर हात ठिवून खाली बसली ती पुनः उठलीच नाई.... आम्ही समदेचं व्हतो... लगोलग डाक्टरला बोलीवलं... पन त्येचा काय उपेग नाय झाला बगा...” पाटलानं डोळ्यातील पाणी खांद्यावरील उपरण्याला टिपत उत्तर दिलं.
“बरं... लोकं म्हणत होते की ती गर्भारशी होती... मग त्यामुळेच तर तुम्ही....” पाटलाच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने पहात आहिरेंनी गुगली टाकला.
“अरारारा... असं वंगाळ काम न्हाय व्हायाचं आमच्याकडनं... गावचं पाटील आमी. सारं गावं बघतया आमच्याकडं...” आख्या गावादेखत आहिरेंनी विचारलेल्या प्रश्नाने पाटील उखडलेच.
“बरं... बरं... डॉक्टरचा रिपोर्ट देता का जरा...”
संपतने लगेच एका घरगड्याला डॉक्टरांनी दिलेले डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी घरी पिटाळले. १० मिनिटातच आहिरेंच्या हातात डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र होते. त्यावर एक ओझरती नजर टाकून त्यांनी संपतकडे आपला मोर्चा वळवला.
“तुमचं लग्न कधी झालं?”
“साडेतीन वर्ष झालीत साहेब...”
“अस्सं... तुमचे आपसातील संबंध कसे होते?”
“कसे म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला? मी मारलं माझ्या बायकोला?” एकतर पाटलाचा पोरगा आणि अशा घटनेमुळे संतापलेला... संपत चवताळला.
“हे पहा मिस्टर... आम्ही आमचं काम करतो आहोत. त्यामुळे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या.” संपतचा आवाज चढलेला पाहताच आहिरेंनीही आपला आवाज चढवला.
“अहो पण साहेब... कुणीतरी माझ्या बायकोच्या चितेची विटंबना केली आहे याबद्दल आम्ही तक्रार नोंदवली आहे. आणि तुम्ही मात्र आमचे संबंध कसे होते हे विचारताय?” काहीशा नरमाईच्या सुरात संपत उत्तरला...
“हे पहा... आम्हाला सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो त्यामुळे असे काही प्राथमिक प्रश्न आम्हाला भावना बाजूला ठेवून विचारावेच लागतात.” आहिरेही थोडे नरमाईत आले.
“बरं.. तुमचा कुणावर काही संशय? म्हणजे एखादा तांत्रिक, मांत्रिक वगैरे?”
“नाही साहेब... आमच्या गावात असा कुणीच माणूस नाही. एकतर शंबरएक घराचं लहानसं गाव. त्यामुळे प्रत्येकाला आम्ही नावानिशी ओळखतो. नाही म्हणायला डोंगरावरच्या मठात एक भगत राहायचा पण काही दिवसापूर्वीच तो मेला. इथंच सगळ्यांनी मिळून त्याला अग्नी दिला. आता नवीन कुणी बुवा बाबा आला असेल तिथे तर माहिती नाही.”
“बरं... आता आम्ही बॉडी ताब्यात घेतो आहोत. उद्या दुपारपर्यंत ती तुम्हाला पोस्टमार्टेम करून परत मिळेल.” आहीरेंनी सांगून टाकले आणि तपास करत असलेल्या सावंतकडे आपला मोर्चा वळवला.
“त्याची गरज काय आहे साहेब? इथे कोणताही खून झालेला नाहीये. मग पोस्टमार्टेम कशासाठी?” संपत पुरता वैतागला आणि काही अंतर सब. इन्स्पेक्टर आहीरेंच्या बरोबरीने चालत त्याने आहीरेंना प्रश्न केला.
“त्याचे काय आहे नां... त्यातून आम्हाला तपासाची दिशा मिळते.” आहिरेंनी समजावणीच्या सुरात सांगितले. खरं तर इतर वेळी आहिरेंनी पोलिसी खाक्या वापरला असता पण हे प्रकरण जरा नाजूक होतं. त्यातून पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. आणि म्हणूनच जितके शांतपणाने घेता येईल तितके घ्यावे हाच एक विचार करून त्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. इतर काही जुजबी माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी हावलदार सावंतला बाजूला घेतलं.
“सावंत... काय वाटतंय तुला? काय असावा हा प्रकार?”
“साहेब... मला तर हा मंत्र तंत्राचा प्रकार वाटतो आहे. कारण बॉडीच्या मानेवर धारदार शस्त्राचा वार करून मुंडके कापून नेले आहे. त्यामुळे हे प्रकरण वाटते तितके सोपे नाहीये.” अनुभवी हावलदार सावंतने आपले मत सांगितले.
“हं... मलाही तसंचं वाटतंय. म्हणजे आता याचा तिढा सोडवता सोडवता डोक्याला मुंग्या येणार तर...” काहीश्या काळजीच्या सुरात आहिरे तोंडातल्या तोंडात पुटपुटले आणि जीप मध्ये जाऊन बसले.
रात्रीच्या अंधारात राजधेर गावातून निघालेला कापालिक कडाक्याच्या थंडीतही झपझप पावले टाकीत चालतच होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत राजधेरपासून दूर जाणे गरजेचे होते. एकतर सकाळी अशी घटना लोकांच्या लक्षात आल्यावर त्याचा बोभाटा होणार याची त्याला खात्री होती आणि अमावास्येच्या आधी त्याला इतर गोष्टीही करायच्या होत्या. सगळीकडे काळाकुट्ट अंधार आणि डोंगरदऱ्यांचा प्रदेश असूनही कापालिकाला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते. तो आपला एखाद्या बागेतून फिरावे इतक्या निर्धास्तपणे पाऊले टाकत होता.
जसजसी रात्र सरत चालली तसतसा पहाटेचा बोचरा वारा कापालिकाच्या अंगाला झोंबू लागला. आकाशातील तारेही अंधुक दिसू लागले. पूर्व दिशेला सोनेरी रंगाची सूर्याची प्रभा फाकू लागली. रात्रभर अविश्रांत चालल्यामुळे त्याला थोडा थकवा जाणवू लागला. त्याने त्याचा वेग काहीसा मंदावला पण तरी सूर्य डोक्यावर येण्याच्या आत त्याला निर्जन पण आराम करण्यायोग्य जागी पोहोचणे गरजेचे होते. परत त्याने स्वतःचा वेग वाढवला. समोर दिसणारा कांचन किल्ल्याचा डोंगर आता अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला. लवकरात लवकर तिथे पोहचून आराम करणे त्याला आवश्यक झाले होते. त्याने चालण्याचा वेग जास्तच वाढवला आणि आपण परत एकदा लोकवस्तीत येत आहोत याची त्याला जाणीव झाली. कांचन किल्ल्याच्या वाटेत असलेले खेल्दरी गांव जरी लहान होते तरी लोकांची शेतावर जायची वेळ असल्यामुळे लोकवस्तीतून जाणे त्याला यावेळी फायद्याचे ठरणार नव्हते. काखेतल्या झोळीत असलेले पाटलाच्या सुनेचे शीर अर्धवट जळाले असल्यामुळे त्याला करपट उग्र दर्प सुटला होता. त्या वासाने गावातील कुत्रे त्याला अडथळा करू शकणार होते आणि म्हणून त्याने परत एकदा आपला मार्ग बदलून शक्य तितके गावाला वळसा घालून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सुदैवाने तो अजून तरी कुणाच्या दृष्टीस पडला नव्हता.
उन आता चांगलेच वाढले होते. कापालिक कांचन डोंगराच्या चढणीला लागला. एरवी माणसाला इतक्या उन्हात अशी चढण चढणे खूप कष्टाचे झाले असते, पण कापालिकाच्या वेगात मात्र काहीही फरक पडलेला दिसत नव्हता. त्याच्यासाठी अशा जागा आणि रस्ते नेहमीचेच. पाउण एक तासातच तो डोंगराच्या पठारावर आला. कांचन किल्ला त्याला दुपारचा काही तास आराम करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण होते. एकतर तिथे पिण्याच्या पाण्याचे टाके होते आणि आराम करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली गुहाही होती. त्या निसर्ग निर्मित गुहेची रचना अशी काही झाली होती की तिथे अगदी माध्यानीच्या उन्हात देखील थंडगार आणि मोकळी हवा मनाला आणि शरीराला आल्हाददायक अनुभव देत होती. आतापर्यंत तहान भूक हरपलेला कापालिक गुहेत शिरल्यावर जरासा स्थिरावला. त्याने एकवार संपूर्ण गुहेत आपली नजर फिरवली. त्याला कपारीत कुठेही धुळीचे साम्राज्य दिसले नाही की इतर कचराही दिसला नाही. धूळ नव्हती याचा अर्थ तिथे भरपूर प्रमाणात हवा खेळती होती आणि इतर कचरा नाही याचा अर्थ तिथे लोकवावर अगदीच नगण्य होता किंवा नव्हता म्हटले तरी चालेल. त्याच्या दृष्टीने ती जागा आराम करण्यासाठी अतिशय योग्य होती. कालीचा जयघोष करत त्याने तिथेच फतकल मारली. खांद्याला अडकवलेली झोळी शेजारीच ठेवली आणि परत एकदा त्याची नजर सभोवार भिरभिरत फिरली. यावेळी मात्र त्याची नजर जराशी शोधक होती. रात्रभराची पायपीट आणि उन्हात डोंगरची चढाई यामुळे त्याला अगदी सडकून भूक लागली. एकंदरीत गुहेचा अंदाज घेता त्याला तिथे खाण्यायोग्य काही मिळणे केवळ अशक्य होते. गुहेत काहीच मिळणार नाही याची खात्री झाल्यावर खाद्य शोधण्यास तो बाहेर पडला.
एकेकाळी अगदी हिरवागार असणारा कांचन किल्ला आता पूर्णतः ओसाड झाला होता. किल्ल्याचे कुठल्याही प्रकारचे अवशेष तिथे शिल्लक राहिले नव्हते. कधी काळी या ठिकाणी कुणी रहात असेल असे आता कुणाला सांगूनही पटले नसते. सगळीकडे नुसते दगड नी धोंडे. झाड म्हणून फक्त खुरट्या जंगली वनस्पती आणि पिवळे पडलेले गवत. पूर्वीच्या लोकवस्तीची साक्ष म्हणून फक्त एक पाण्याचे टाके तेवढेच तिथे उरले होते. ज्यात अजूनही पाणी होते. कापालिकाने शक्य तितके आजूबाजूला फिरून काही सापडते का याचा शोध घेतला पण त्याच्या पदरी फक्त निराशा आली. आज फक्त पाणी पिऊन भूक भागवावी लागणार असा विचार करीत तो पाण्याच्या टाक्यावर आला. टाक्याच्या आजूबाजूला शेवाळे साठल्यामुळे टाक्यातील पाणी संपूर्ण हिरवे पण अगदी स्वच्छ दिसत होते. कापालिकाने गुडघे टेकून आणि हाताची ओंजळ करून पाण्यात हात घातला. वर तळपता सूर्य असूनही टाक्यातील पाणी मात्र चांगलेच थंड होते. कापालिकाच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. टाक्यातील थंडगार पाणी पोटात जाताच त्याला बरीच तरतरी आली. पाणी पिऊन कापालिक मागे वळणार एवढ्यात त्याला बाजूच्या वाळलेल्या गवतात सळसळ ऐकू आली. आवाजाच्या दिशेने कापालिकाने नजर रोखली. त्याच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर एक पिवळी जरद धामीण भक्ष शोधत होती. कापालिकाचे डोळे चमकले. कान तीक्ष्ण झाले. चित्त स्थिरावले. हालचाल सावध बनली आणि चेहऱ्यावर काहीसे स्मित झळकले.
“जय काली... तुझ्या नैविद्याची सोय झाली...” त्याने मनातल्या मनात म्हटले. कफनीच्या खिशात हात घालून त्याने कसलीशी उदी बाहेर काढली. ती तळहातावर घेत कसलासा मंत्र म्हटला आणि कालिकेचा जयघोष करत धामीणीच्या दिशेने ती राख हवेत फुंकली. धामीण जागच्या जागी जखडली गेली. ती धामीण जरी वळवळत होती तरी तिला पुढे मात्र जाता येत नव्हते. क्षणाचाही विलंब न लावता अगदी चपळतेने हालचाल करत कापालिकाने हात पुढे करून धामीणीला शेपटाकडून उचलले आणि बाजूच्या दगडावर जोरात आपटले. एकाच फटक्यात तिची वळवळ बंद पडली. तिच्या बेजान वेटोळ्याला गळ्यात घालून कापालिक गुहेत परत आला. झोळीत ठेवलेला कालिकेचा फोटो काढून तो त्याने तिथेच एका दगडाच्या आधाराने मांडून ठेवला. झोळीतून दारूची बाटली काढून त्याचे त्याने त्या फोटोपुढे चौकोनी मंडल केले. त्यावर त्या मेलेल्या धामीणीचे वेटोळे ठेवले. बाटलीतील थोडी दारू उजव्या हातात घेवून ती त्या वेटोळ्याभोवती ३ वेळेस उलट्या बाजूने फिरवली आणि हात जोडले.
“हे माते... तुझ्या भक्ताने, भक्तिभावाने आणलेला हा नैविद्य गोड मानून घे... लवकरच तुला नरमांसाचा नैविद्य अर्पण करून कायमचे प्रसन्न करून घेईल... जय महाकाली...”
प्रार्थना करून झाल्यावर त्याने ते वेटोळे हातात घेतले आणि आधाशासारखे त्याचे लचके तोडायला सुरुवात केली. काही वेळातच त्याने तृप्तीचा ढेकर दिला आणि थोडा आराम करण्यासाठी जमीनीवर अंग टाकले. रात्रभरची पायपीट आणि रिकाम्या पोटात भर पडल्यामुळे काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली.
कांचन किल्ल्यापासून २५ मैलावर असलेल्या मार्कंडेयाच्या डोंगरावरील एका गुहेत एक योगी आपल्या योग समाधीत लीन होता. सावळा वर्ण, मानेवर रुळत असलेले काळेभोर केस, भव्य कपाळावर लावलेला चंदनाचा त्रिपुंड तिलक, कानात कुंडले, गळा, दोन्ही दंड आणि दोन्ही मनगटांवर धारण केलेली रुद्राक्षांची माला, हातावर भस्माचे त्रिपुंड आणि भगवे वस्त्र परिधान केलेला योगी तेजपुंज वाटत होता. जवळच दोन भगव्या रंगाच्या झोळ्या ठेवलेल्या होत्या. लहान झोळीत विभूती आणि मोठ्या झोळीत एक भिक्षेचा कटोरा आणि एकदोन वस्तू इतकेच काय ते सामान त्या झोळ्यामध्ये ठेवले होते. पद्मासन घालून ताठ बसलेल्या योग्याची श्वासोच्छवास सोडला तर इतर कोणतीच हालचाल होत नव्हती. तो कधीपासून समाधी लावून बसला असावा हे देखील सांगणे कठीणच होते.
थोड्याच वेळात गुहेत कुणी आल्याची जाणीव त्या योग्याला झाली. एरवी काही झाले तरी न भंगणारी त्याची समाधी यावेळेस मात्र भंग पावली. योग्याने डोळे उघडले तो समोर हिरव्या रंगाची कफनी, एक दीड वीत पांढरी दाढी, डोक्याला मळकट फडके, हातात भिक्षेचा कटोरा घेतलेला फकीर त्याच्याकडे पाहून गूढपणे हसताना त्याला दिसला. फकिराच्या बरोबर दोन कुत्र्यांनीही गुहेत प्रवेश केला. बाह्यरूप कसेही असले तरी योग्याने मात्र आपल्या गुरूला तत्काळ ओळखले आणि ताडकन उठून मलंग वेशातील आपल्या गुरूच्या पायावर त्याने डोके ठेवले.
“उठ आदिनाथा... आता तुझी तपश्चर्या पूर्ण झाली. आता तुला तुझे विहित कर्तव्य करण्यासाठी बाहेर पडायचे आहे.” गुरुदेव योग्याला हाताने उठवत म्हणाले.
“जशी आपली आज्ञा गुरुदेव...” अत्यंत नम्रतेने आदिनाथाने हात जोडून आणि किंचित मान लवून प्रणाम करत आपण त्यांच्या आज्ञेबाहेर नसल्याची ग्वाही दिली.
“एक लक्षात ठेव... आता लवकरच तुझ्या कार्याची सुरुवात होणार आहे, पण ते कार्य तू कसे पूर्ण करतोस यावर तुझे नंतरचे विहितकार्य अवलंबून असेल.... यशस्वी भवं...” इतके बोलून गुरुदेवांनी तिथून प्रयाण केले.
आदिनाथ क्षणभर गुरुदेवांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला आणि लगेचच परत भानावर येवून “ॐ गुरुदेव” म्हणत गुरूच्या पाठमोऱ्या आकृतीला त्याने नमस्कार केला. लगोलग “अलख निरंजन” चा ध्वनी गुहेत घुमला.
बऱ्याच वर्षांच्या तप साधने नंतर आदिनाथाला गुरूची आज्ञा आणि आशिर्वाद मिळाला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. एकदा त्याने सभोवार नजर टाकली. गेल्या अनेक वर्षांपासून याच गुहेने त्याला आसरा दिला होता. या जागेचा वियोग होणार या विचारानेच त्याचे डोळे काहीसे पाणावले. पण आता त्याला कोणत्याही मोहात अडकायचे नव्हते. काहीशा जड अंतकरणाने त्याने बाजूला ठेवलेली विभूतीची झोळी उचलून ती उजव्या खांद्याला अडकवली, मोठी झोळी डाव्या खांद्याला अडकवली आणि हातात लोखंडाचा चिमटा घेवून तो गुहेच्या बाहेर पडला. गुरूदेवांचा आदेश तर मिळालाच होता पण आता त्याला जे कार्य हाती घ्यायचे होते त्यासाठी आईचा आशिर्वादही तितकाच महत्वाचा होता. त्याने लगेचच सप्तशृंगी गडाचा रस्ता धरला. तसे पाहिले तर मार्कंडेय डोंगर आणि सप्तशृंगी गड यातील अंतर काही फार नाही. अगदी समोरासमोर असलेली दोन शिखरे, पण वाट मात्र खूप अवघड. आदिनाथ सप्तशृंगी गडावर पोहोचला तेंव्हा संध्याकाळ झाली होती. अगदी काही वेळातच देवीची आरती सुरु होणार होती. मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचताच आदिनाथाने सप्तशृंगीच्या नावाचा जयघोष केला. संपूर्ण गाभारा त्याच्या खड्या आवाजातील जयघोषाने निनादला. अठरा हाताचे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचे ते एकत्रित महिषासुर मर्दिनी रूप पाहून आदिनाथाचा चेहरा आनंदाने फुलला. त्याचे डोळे आपोआप मिटले गेले. मोठ्या भक्तिभावाने त्याने हात जोडले आणि मनोमन तो देवीची स्तोत्रे गाऊ लागला. आरतीला सुरुवात झाली तसा नगारा वाजू लागला, टाळांचा आवाज निनादू लागला आणि आरतीचे सूर कानी पडू लागले. सर्व आसमंत सात्विक स्वरांनी भरून गेला. देवीचे पुजारी देवीला पंचारती ओवाळून शेजआरती म्हणत होते. आरतीचे प्रत्येक शब्द, उच्चार आदिनाथाच्या मनात नवीन चेतना जागवत होते. आदिनाथ भान हरपून आईचे ध्यान करण्यात मग्न झाला होता. आरती संपली आणि आरतीचे ताट आदिनाथासमोर आले. मोठ्या भक्तिभावाने त्याने आरती घेतली आणि परत एकदा मनोमन देवीची स्तुती करायला सुरुवात केली. आदिनाथाचे स्तोत्र पठण संपत आले तसे त्याच्या ज्ञानचक्षुसमोर देवीचे ते तेजस्वी, आठरा हाताचे मनोहारी रूप साकार होऊ लागले. त्याचे स्तोत्र पठण संपले त्यावेळेस त्याच्यापुढे साक्षात जगदंबा प्रकट झालेली होती.
“आई... मी माझ्या कार्याची सुरुवात तुझ्या आशिर्वादाने करतो आहे... मला यश दे... काय चांगले, काय वाईट हे समजण्याची बुद्धी दे आणि तुझा हा वरदायक हात सदैव माझ्या डोई असू दे...”
“तथास्तु... आदिनाथा... ज्या वेळेस तुला माझी गरज असेल मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. तुझ्या प्रत्येक कामात यश मिळण्याचा मी तुला आशिर्वाद देत आहे... तू घेतलेले लोकं कल्याणाचे कोणतेही कार्य कधीही असफल होणार नाही... यशस्वी भवं...” आदिनाथाला त्याच्या कार्यात सफल होण्याचा आशिर्वाद देऊन देवी अंतर्धान पावली. आदिनाथाने डोळे उघडले त्यावेळेस देवीचे ते मनोहारी रूप आपल्या आठरा हातांनी त्याला आशिर्वाद देत आहे असा त्याला क्षणभर भास झाला. जगदंबेचा आशिर्वाद घेवून आदिनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आला तोपर्यंत बाहेर चांगलाच अंधार पडला होता.
आई जगदंबेचे दर्शन घेतल्यानंतर नाथ पंथाचे आद्य उपास्य भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आदिनाथाची पाऊले महादेव मंदिराकडे वळली. मंदिरातील महादेवाचे ते मन मोहून घेणारे शिवलिंग अगदी तेजस्वी वाटत होते. आदिनाथाने शिवलिंगासमोर गुडघे टेकले आणि मनोमन महादेवाची प्रार्थना करून त्यांचा आशिर्वाद मागितला. महादेवाच्या पिंडीवर असलेले फुल त्याच वेळेस उजव्या बाजूस खाली पडले. हा महादेवांनी आदिनाथाला दिलेला उजवा कौल होता.
आदिनाथ गाभाऱ्यातून बाहेर आला त्यावेळेस चांगलाच काळोख दाटला होता. आमावस्या जवळच आलेली असल्यामुळे चंद्राची कोर अगदीच बारीक दिसत होती. चंद्रप्रकाश फक्त नावालाच आणि अगदी बेताचाच होता. आदिनाथाने महादेवाच्या मंदिरातच मुक्काम करण्याचे ठरवले. एकभुक्त असल्यामुळे तसेही त्याला रात्री काहीही खायचे नव्हते. महादेवांच्या नावाचा जयजयकार करत त्याने मंदिरातच एका बाजूला जमिनीवरच अंग टाकले.
आदिनाथाने डोळे उघडले त्यावेळेस नुकताच पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता. त्याने प्रातर्विधी उरकून शिवतीर्थाच्या कुंडात बुडी मारली. अत्यंत थंडगार पाण्याचा स्पर्श अंगाला होताच त्याच्यामध्ये एका नवीन उर्जेचा संचार झाला. अजून सूर्यनारायणाने जरी दर्शन दिले नव्हते, तरी रात्रीचा अंधार बऱ्याच प्रमाणात दूर झाला होता. पूर्व दिशेला समोरच मार्कंडेयाचा डोंगर दिसत होता. अनेक तीर्थांचा वास असलेला, अनेक योग्यांच्या सिद्धीचा साक्षी असलेला, त्याची स्वतःची तपोभूमी असलेला मार्कंडेय डोंगर त्याला गुरुसमान वाटला आणि त्याने मनोभावे त्याला नमस्कार केला. परत एकदा त्याने दोन्ही झोळ्या आपल्या खांद्याला अडकवल्या आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली.
चांदवड पोलीस चौकीत सब. इन्स्पेक्टर आहिरे काल घडलेल्या घटनेचाच विचार करत बसले होते. तसं पाहिलं तर नोंदवली गेलेली केस फक्त चितेच्या विटंबनेची होती, पण ती राजधेर गावाच्या पाटलाशी संबंधित असल्यामुळे त्याचे महत्व काहीसे वाढले होते. तसेच ही केस एखाद्या नवीन गुन्ह्याची सुरवात असण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. आणि म्हणूनच त्याचा विचार करणे आहीरेंना गरजेचे वाटत होते. इतक्यात केबिनचा दरवाजा उघडून कळवणचे सब. इन्स्पेक्टर कदम आत आले. कदम त्यांच्या कसल्याशा केसच्या संदर्भातच चांदवडला आले होते. प्राथमिक हाय हॅलो झाले आणि तेवढ्यात हावलदार सावंत हातात एक रिपोर्ट घेवून आत आला.
“साहेब... कालचा पीएम रिपोर्ट आला आहे.”
“अस्सं... आण इकडे. पाहु तरी काही धागा मिळतोय का ते...” आहिरे रिपोर्ट हातात घेवून त्यातील एकेक गोष्ट काजळीपूर्वक वाचायला सुरुवात केली. संपूर्ण रिपोर्ट वाचून झाल्यावर मात्र त्यांनी तो वैतागाने टेबलावर आपटला.
“च्यायला ह्येच्या... साला यातून काही मिळेल वाटत होतं पण तेही नाही.”
“अरे इतकं काय झालंय वैतागायला? कोणती केस आहे?” सब. इन्स्पेक्टर कदमांनी आहीरेंना प्रश्न केला.
“काही नाही रे... काल राजदेर गावात एका चितेची विटंबना करण्यात आली. कुणीतरी रात्रीच्या वेळेस जळती चिता उधळून त्या प्रेताचे फक्त मुंडके कापून नेले...” आहिरेंनी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला.
“काय सांगतोस?... च्यायला... अरे ४ दिवसांपूर्वी अशीच एक केस माझ्याही ठाण्यात नोंदवली गेली आहे. खेडगावच्या स्मशानातही अशीच जळती चिता उधळून त्या प्रेताचे मुंडके कापून नेल्याची घटना घडली आहे.” काहीसे आश्चर्यचकित होत कदमांनी तशाच एका केसबद्दल आहीरेंना सांगितले.
“काय? सेम केस? म्हणजे हे प्रकरण आता फक्त एका तालुक्यापुरते मर्यादित नाहीये तर.” आहीरेंच्या चेहऱ्यावर आता चिंता साफ दिसायला लागली.
“मला काय वाटतेय आहिरे, हे दोन्ही गुन्हे बहुतेक एकाच व्यक्तीने केले असावेत आणि यामागे नक्कीच काहीतरी जादूटोणा यासारखा प्रकार असावा. यावर वेळीच आवर घातला नाही तर पुढे याचा परिणाम काय होईल हे आज सांगणे मुश्कील आहे.” कदमांनी आपला विचार बोलून दाखवला.
“ओह... बहुतेक याचा तपास आता आपल्याला संयुक्तपणे करावा लागणार. तसे मी आजच त्याबद्दल वरिष्ठांना कळवतो. बरं मला तुझ्या केसबद्दल अजून काही माहिती सांग बरं...” आहिरेंनी कदमांकडून त्यांच्या ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या केसबद्दलची प्राथमिक माहिती घ्यायला सुरुवात केली. रिपोर्ट मधून जरी काही धागा मिळाला नव्हता तरी कदमांकडे नोंदविलेल्या केसमुळे आहिरेंना एक दिशा सापडली होती. अर्थात अजून ती पुरेसी स्पष्ट मात्र नव्हती. आवश्यक ती सगळी माहिती कदमांकडून घेऊन ते सावंतकडे वळले.
“सावंत... उद्या आपल्या परिसरातील सगळे जोगडे, तांत्रिक, मांत्रिक, म्हसनजोगी, बाबा, बुवा... जे कुणी असतील त्यांना चौकीत हजर करा. परिसरात कुठे काही पूजा हवन आहे का याचाही तपास करायला आपल्या लोकांना सांगा. गायकवाड तू राजधेरमध्ये जावून अजून काही हाती लागते का ते पहा... चला... लागा कामाला.”
नंतर कदमांकडे वळून त्यांनी काहीशी स्वगतचं सुरुवात केली.
“जोगडा फक्त हातात सापडू दे, सोलून काढतो साल्याला... हरामखोर... भोळ्या भाबड्या लोकांना फसवून त्यांच्या पोरीबाळीची, आया बहिणींची अब्रू लुटायची, पैसा लुटायचा आणि वर धर्माच्या नावाने बोंब ठोकायची. नुस्ता सुळसुळाट झालाय अशा बुवांचा.” आहिरेंच्या कपाळाच्या शिरा तट्ट फुगल्या. इतर केस च्या मानाने अशा केसमध्ये आहिरे जास्त इंव्हाल्व होत होते. कारण त्यांच्या मते इतर केस मध्ये गुन्हा घडून गेलेला असतो आणि त्याचा फक्त तपास करायचा असतो. पण अशा केसची गोष्ट वेगळी असते. इथे गुन्हा घडूनही गेलेला असतो आणि नवीन गुन्हा घडणारही असू शकतो. अशा वेळेस तपासा बरोबरच होणारा गुन्हा थोपवणे हे जास्त किचकट काम असते. बरे अशा केसेस खूप काळजी पूर्वक हाताळाव्या लागतात, कारण पत्रकार आणि सामान्य लोक अशा केसेसचा संबंध लगेचच धर्माशी लावून मोकळे होतात. त्यातून सामाजिक सलोखा सांभाळणे जास्तच दुरापस्त होऊन बसते. आणि म्हणूनच आहिरेंना आता वेळ दवडून चालणार नव्हते. काही झाले तरी याच्या मुळाशी पोहोचायचेच असे त्यांनी मनोमन पक्केच केले. लगेचच त्यांनी सगळ्यांना वेगवेगळ्या सूचना देऊन कामाला लावले आणि तातडीने नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन हेड ऑफिसला फोन लावला. थोड्याच वेळात झालेल्या घटनेचा प्रायमरी रिपोर्ट फोनवर आपल्या वरिष्ठांना देऊन रिसिव्हर खाली ठेवला.
“कदम... तुझ्या भागात झालेल्या केसचे सगळे डिटेल्स मला दे आणि कालच्या केसबद्दलचेही सगळे डिटेल्स सावंत कडून घे. मी असाच नाशिकला जातो आणि आजूबाजूच्या पोलीस चौकीत अशी अजून एखादी केस नोंदवली गेली आहे का याचाही तपास करतो.” ही केस आहिरेंनी चांगलीच मनावर घेतल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले.
सब. इन्स्पेक्टर कदमांनीही याचा पुरता छडा लावायचे ठरवले आणि आहिरेंचा निरोप घेवून ते बाहेर पडले. काहीतरी लक्षात आल्याने आहिरेंनी टेबलवरील बेल वाजवली तसा हावलदार थोरात आत आला.
“थोरात... दोन माणसांना बरोबर घे आणि राजधेर किल्ला, इंद्राई किल्ला आणि आसपासच्या गुहा, कपारी चेक कर. काही आढळले तर तत्काळ मला वर्दी दे... निघ लगेच... आणि हो... तो पाटलाचा पोरगा राजधेर किल्ल्यावरील कपारीत राहण्याऱ्या कुणा बुवाबद्दल बोलला होता. तो बुवा कोण होता? कधी आला होता? किती दिवस होता? त्याची वागणूक? त्याच्या पूजेचा प्रकार ह्या सगळ्याची गावात चौकशी करा. आता प्रत्येक गोष्टीचा आपल्याला बारीक तपास करावा लागणार आहे. चल निघ लवकर.”
“होय साहेब...” आहिरेंना एक कडक सॅल्युट ठोकून थोरात दोन हावलदार आपल्या बरोबर घेऊन तपास करण्यासाठी राजधेरच्या दिशेने निघाला.
कापालिकाला जेव्हा जाग आली त्यावेळेस गुहेत सगळीकडे अंधार पसरला होता. एकतर तसा सगळाच भाग अगदीच निर्जन. त्यात रातकिड्यांच्या आवाज. त्यामुळे त्याची भयानकता अजूनच वाढली होती. मध्येच येणारी बिबट्याची एखादी डरकाळी भल्याभल्यांना घाबरवायला पुरेशी होती. चंद्राचा प्रकाश आज आणखीनच कमी झाला होता. गुहेत संपूर्ण काळोखाचे साम्राज्य पसरले होते. पुरेशी झोप झाल्यामुळे कापालिकाला चांगलीच तरतरी आली. कालीच्या नावाचा जयघोष करत त्याने पाण्याचे टाके गाठले. टाक्यातले पाणी एकदम शांत होते. वाऱ्यामुळे त्यावर जे काही तरंग उठत होते त्यात दिसणारी चंद्रकोर कधी इकडे तर कधी तिकडे हेलकावत होती. अंगातील कफनी काढून त्याने त्यावर छोटासा दगड ठेवला. पुन्हा एकदा कालीच्या नावाचा जयघोष करत त्याने टाक्यात उडी घेतली. अंगाला गार पाण्याचा स्पर्श होताच त्याच्यातील उरलीसुरली मरगळही दूर झाली. पाण्यात तीन बुड्या मारून ओल्या अंगानेच त्याने मंत्रोच्चारण सुरु केले. जवळपास एक तास तो पाण्यात उभा राहून अघोरी साधना करत होता. साधना पूर्ण होताच त्याने आपली कफनी अंगात चढवली. गुहेत परत येऊन आपल्या सगळ्या वस्तू बरोबर घेतल्या आणि पुन्हा एकदा त्याने चालायला सुरुवात केली.
रात्रीच्या या अंधारात कापालिकाला कुणी पाहणे शक्यच नव्हते. अंधार पडल्यानंतर या भागात जंगली श्वापदांचे राज्य चालू होत होते आणि कापालिकाला त्यांची जराही भीती वाटत नव्हती. पुढचा पल्ला तसा जास्त लांबीचा नव्हता. जास्तीत जास्त १२/१५ किलोमीटर असेल पण सगळा मार्ग दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरातून असल्यामुळे त्यात जास्त वेळ जाणार होता. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये धोडप किल्ल्यावर उजाडायच्या आत पोहोचणे गरजेचे होते. जितके अंधारात तो किल्ल्यावर पोहोचेल तितके त्याच्यासाठी चांगले असणार होते.
तो धोडप किल्ल्याच्या माचीवर आला त्यावेळेस रात्रीचे साडेतीन वाजले होते. आता त्याला जरा सावधपणे जावे लागणार होते, कारण पुढचा मार्ग सोनारवाडी नावाच्या छोट्या वस्तीतून जात होता. तो थोडा पुढे जातो न जातो तोच वस्तीवरील एक कुत्रे मोठ्याने भुंकू लागले. त्याच्या अचानक भुंकण्याने कापालिक काहीसा संतापला, पण लगेचच त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले. त्या कुत्र्यावर आपले लालसर मोठे डोळे रोखत त्याने झोळीत हात घातला. हात बाहेर आला तेव्हा त्यात एक छोटे हाडूक होते. ते अभिमांत्रित करून त्याने भुंकणाऱ्या कुत्र्यापुढे टाकले. त्यासरशी कुत्र्याचा आवाज एकदम बंद झाला. पुन्हा एकदा कापालिकाने गड चढायला सुरुवात केली. काही वेळातच तो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजासमोर उभा होता. दरवाजा पार करून त्याने पायऱ्या चढायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात अर्धवट तुटलेल्या त्या पायऱ्या कधी घात करतील हे सांगता येणे कठीण होते. आजूबाजूला वाढलेल्या काटेरी झुडुपातून एखाद्या जंगली श्वापदाचे चमकणारे लाल डोळे आपल्या सावजाचा वेध घेऊन क्षणार्धात होत्याचे नव्हते करण्याची ताकद बाळगून होते. पण कापालिकाला मात्र त्याबद्दल जराही काळजी वाटत नव्हती. खरं तर कोणत्याही श्वापदापेक्षा कापालिक जास्त घातक होता. इतक्या अंधारातही कापालिक अगदी आरामात गड चढून वर आला. आता शेवटचा दरवाजा पार केला की पडका वाडा आणि त्यानंतर तलाव ओलांडला की पलीकडे कातळात कोरलेल्या गुहा. त्यातील सगळ्यात शेवटची गुहा इतर गुहांच्या मानाने थोडी मोठी होती. त्या गुहेत एका बाजूला देवीची मूर्ती बसवलेली होती. जवळपास संपूर्ण किल्ल्याची पडझड झालेली होती परंतु या शेवटच्या गुहेत मात्र काही जण अगदी आरामात राहू शकत होते.
“जय महाकाली...” कापालिकाने रात्रीच्या अंधारात देवीच्या नावाचा गजर केला. गुहेत जरी सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता तरीही कापालिकाला मात्र अगदी दिवस असल्या प्रमाणे सगळे स्वच्छ दिसत होते. थोडे पुढे होऊन त्याने मूर्तीपासून थोड्याच अंतरावर हाताचा दाब दिला मात्र आणि थोडासा आवाज करत एका बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या तयार झाल्या. एकेक करत कापालिक पायऱ्या उतरू लागला. जवळपास १०० एक पायऱ्या उतरल्यावर समोर एक भव्य दालन लागले. हीच ती कापालिकाची तप करण्याची जागा. त्या दालनाला हवा खेळती राहावी यासाठी दोन झरोके तयार केले गेले होते. त्यातूनच हवेबरोबरच सकाळच्या वेळेस प्रकाशही आत येत होता. तळघराच्या समोरच एक १२/१३ फुटाची कलिकेची मूर्ती उभी करण्यात आलेली होती. रात्रीच्या वेळेस प्रकाशासाठी मशाली लावलेल्या होत्या पण त्या वापरात असण्याचे कोणतेच चिन्ह तिथे दिसत नव्हते. त्या गुहेतच अजूनही काही गुहा कोरलेल्या दिसत होत्या. बहुतेक याचे मुख्य उद्दिष्ट किल्ल्यावर शत्रूने चढाई केली तर या मार्गाने पळायला किंवा मागून येवून हल्ला करायला सोपे जावे हेच असावे. या गुहेला अजून एक असाच गुप्त मार्ग होता जो सोनारवाडीच्या जवळील मारुती मंदिरात उघडत होता. तळघरातील सगळ्या वातावरणात एक कुबट, कोंडट आणि जरासा उग्र वास दरवळला होता. अजून उजाडायला सुरुवात झाली नव्हती. कापालिकाने देवीपुढे फतकल मारली आणि तिथे ठेवलेल्या एका दिव्याची ज्योत पेटवली. रात्रीच्या किर्र अंधारात त्या छोट्याशा दिव्याचा पिवळसर प्रकाश सगळीकडे पसरला.
आता ती मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. देवीच्या मूर्तीचे ते रूप त्या दिव्याच्या प्रकाशात जास्तच भयावह दिसत होते. मूर्तीकाराने मूर्ती इतकी तन्मयतेने बनवली होती की सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या असल्याप्रमाणे भासत होत्या. मूर्तीच्या डोळ्यांच्या जागी कवड्यांचा वापर खुबीने करण्यात आला होता. कालिकेच्या तोंडातून बाहेर आलेल्या जिभेला कसलासा जंगली झाडांच्या सालापासून तयार केलेल्या रंगाचा लेप लावण्यात आला होता त्यामुळे त्याचा तांबडा रंग अजूनही कुठेच कमी झालेला दिसत नव्हता. मूर्ती जरी दगडाची होती तरी मूर्तीच्या हातातील शस्त्रे मात्र धातूंची असल्यामुळे त्या मूर्तीला जिंवंतपणा आला होता. देवीच्या गळ्यातील कवट्याची माळ खऱ्या कवट्यांचा वापर करून बनवली गेली होती. देवीच्या एका हातातील नरमुंड हे दगडाचे असले तरी त्यावर जंगली रंगमिश्रित मेणाचा वापर केल्यामुळे अगदी हुबेहूब आणि नुकतेच कापून आणल्यासारखे भासत होते. कालिकेचे हे रूप पिवळसर प्रकाशात जास्तच भेसूर वाटत होते. सामान्य माणसाने जर कधी हे रूप पाहिले असते तर नक्कीच त्याच्या तोंडातून भीतीने एखादी किंकाळी फुटली असती.
देवीच्या पुढे एक मोठी पंचकोनी चांदणी पिठाचा वापर करून काढण्यात आली होती. त्यातील मध्यावर एक साबरी मंत्र पिठानेच लिहिला होता. त्याच्या चार कोनात चार अर्धवट जळालेली शीरे ठेवण्यात आली होती आणि त्याचाच उग्र वास सर्व दालनात पसरला होता. कापालिकाने झोळीत हात घातला आणि बरोबर आणलेले पाटलाच्या सुनेचे शीर उरलेल्या पाचव्या कोनात साबरी मंत्राचा उच्चार करून ठेवले. ती पाचही शीरे चांदणीतील मध्यावर लिहिलेल्या साबरी मंत्राकडे तोंड करून ठेवली होती.
कालिकेच्या पुजेची सगळी तयारी झाली. तिथेच जवळच काही दगडी कटोरे एका रांगेत मांडून ठेवले होते. त्यात अनुक्रमे हळद, कुंकू, गुलाल, काळी हळद, आघाडा, दारू हळदीच्या काही वाळलेल्या मुळ्या, गव्हाचे पीठ, चितेतील राख अशा गोष्टी भरून ठेवल्या होत्या. त्याच्या पुढे दोन मोठ्या आकाराचे धातूचे भांडे ठेवण्यात आले होते. त्यातील एका भांड्यात कुठल्याशा प्राण्याचे रक्त आणि दुसऱ्यात दारू भरून ठेवण्यात आली होती. शेजारीच एक मोठ्या आकाराचे खड्ग धार लावून ठेवण्यात आले होते. कापलिकाने सगळ्यात पहिले त्या पाचही शीरांना काळ्या हळदीचा तिलक लावला. त्यानंतर त्यावर मंत्रोच्चार करत शेजारच्या पात्रात ठेवलेल्या प्राण्यांच्या रक्ताचे प्रोक्षण केले. प्रत्येक वेळेस वेगवेगळा मंत्र कापालिक उच्चारात होता. काही वेळातच त्याचा हा विधी पूर्ण झाला. नंतर त्याने शेजारी ठेवलेले खड्ग हातात घेतले. त्यावरही रक्ताचे प्रोक्षण करून नंतर ते शेजारीच ठेवलेल्या दारूच्या पात्रात बुडवून स्वच्छ केले. त्यानंतर एकदा त्या खड्गाकडे आणि एकदा माता कालिकेकडे पहात तो मोठ्याने हसला.
“माता... माझ्या कामना पूर्तीसाठी तुला मी माझ्या परीने संतुष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. माझ्यावर कृपा करणे हे आता तुझे कर्तव्य बनले आहे. फक्त नरबळी दिला की तुझी पूर्ण कृपा मला प्राप्त होईल आणि मग या संपूर्ण जगावर मी माझ्या मर्जीनुसार वर्चस्व गाजवेल... जय महाकाली...”
सगळी पूजा तर मांडलेलीच होती, आता गरज होती ती फक्त एखाद्या १५/१६ वर्षाच्या कुमारिकेची. कारण तिचाच बळी कापालिक कालिकेला देणार होता आणि देवीला प्रसन्न करून घेणार होता.
दिवस उजाडायला लागला तसा त्याने कालिकेच्या नावाचा मोठ्याने गजर केला. त्याचा आवाज त्या प्रशस्त दालनात निनादत घुमला. रात्रीच्या पायपिटीने थकलेल्या कापालिकाने आता आराम करायचे ठरवले. त्याला भूकही चांगलीच लागली होती म्हणून त्याने त्या दालनाच्या एका कोनाड्यात साठवून ठेवलेली कंदमुळे बाहेर काढली. देवीच्या मूर्तीला त्याचा आधी भोग लावला आणि मग त्यावर यथेच्च ताव मारला. काही वेळ आराम करावा आणि दुपारच्या वेळेस सावज शोधण्यासाठी किल्ल्यातून बाहेर पडावे असे त्याने मनाशी ठरवले आणि धरणीवर अंग टाकले.
सप्तशृंगी गडावरून निघून आदिनाथ त्याच्या प्रवासाला लागला. सप्तशृंगीचा आशिर्वाद मिळवल्यावर चांदवड गावी जाऊन एकदा रेणुका मातेचा आशिर्वाद घ्यावा आणि पुढे निघावे असा विचार करून त्याने कळवणचा रस्ता धरला. कळवण वरूनच त्याला चांदवडला जाता येणार होते. आता पर्यत ऊन चांगलेच तापले होते. सगळीकडे रखरखीत ऊन आणि ओसाड जमीन तेवढी दिसत होती. अधेमधे नाही म्हणायला काही मोठी झाडे होती, पण ती रस्त्याच्या कडेला नसल्यामुळे त्याचा फारसा फायदा नव्हता. आदिनाथ मात्र या गोष्टींचा विचारही करत नव्हता. रस्ता अगदीच निर्जन होता. मनात भगवंताचे नामस्मरण आणि आई रेणुका मातेकडे घेऊन जाणारी वाट हेच काय ते त्याचे सोबती होते. दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास तो ओतूर गावात पोहोचला. या गावात थोडा विश्राम करून भिक्षा मागावी, आणि पोटातील क्षुधा काही प्रमाणात शांत करून पुढच्या प्रवासाला निघावे असा विचार करून त्याने विश्राम करण्यासाठी मंदिर शोधायला सुरुवात केली. लवकरच त्याला गावातील मारुतीचे मंदिर दिसले. पटपट पाऊले उचलून त्याने मंदिर गाठले. मंदिराचे प्रांगण चांगलेच मोठे होते. प्रांगणात वाळू पसरून ठेवण्यात आली होती. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात केले होते. तसा मंदिराचा गाभारा जरी त्यामानाने लहान असला तरी त्यापुढे प्रशस्त ओटा बांधण्यात आला होता. त्याला पत्र्याची शेडही करण्यात आली होती. २०/२५ माणसे आरामात रिंगण करून भजन करू शकतील इतका तो प्रशस्त होता. आदिनाथाने पहिल्याच पायरीला वाकून नमस्कार केला...
“अलख निरंजन...”
दगडामध्ये कोरलेली पाच साडेपाच फुटाची शेंदूर लावलेली वीर हनुमानाची ती मूर्ती प्रसन्न वाटत होती. आदिनाथाने आधी हनुमानाचे दर्शन घेतले आणि मग नाथ संप्रदायातील प्रथेप्रमाणे फक्त पाच घरातून भिक्षा मागून जितके मिळेल त्यात उदरभरण करण्यासाठी तो मंदिराबाहेर पडला.
“अलख निरंजन” एका घरासमोर येऊन त्याने मोठ्याने आरोळी दिली. थोडा वेळ झाला आणि एक १५/१६ वर्षाची सुंदर मुलगी त्याला भिक्षा वाढण्यासाठी दारात येवून उभी राहिली. तपकिरी डोळे, गोरा रंग, एक वेणी आणि चेहऱ्यावर अल्लड हास्य असे तिचे रूप मनाला मोहिनी घालत होते. ऐन दुपारच्या वेळी आपल्या दारात आलेल्या साधूची झोळी रिती जाऊ नये म्हणून तिने वाटीत गव्हाचे पीठ आणले होते.
“हे घ्या बाबा... झोळी करा पुढे...” मंजुळ आवाजात तिने आदिनाथाला म्हटले.
आदिनाथाने झोळी पुढे करत एकवार तिच्याकडे पाहिले आणि त्याला तिच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागली. तिच्या भोवती गडद राखाडी रंगाचे ढग जमा झाले आहेत असा त्याला भास झाला. मुलीच्या चेहऱ्यावरील हास्य जरी मोहक होते तरी तिच्या मागे उभ्या असलेल्या नियतीचे हास्य मात्र असुरी होते. येणाऱ्या संकटाबद्दल या मुलीला कसे सावध करावे असा त्याला प्रश्न पडला.
“मुली... घरात कुणी मोठे असेल तर त्याला बोलाव... मला काही सांगायचे आहे.” त्याने झोळीत पीठ ओतून घेताघेता म्हटले.
“बाबा... घरात आई आहे पण तिचा विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर...” मुलीने काहीशा बेफिकीरीने उत्तर दिले. खरं तर तिचाच असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्यातून या बाबाने आईला काही सांगितले तर आपल्यावर आणखी बंधने येतील म्हणून तिने खोटेच सांगितले होते.
तिच्या मनातील भाव आदिनाथाने केंव्हाच ओळखले.
“मुली... एकदा बोलाव त्यांना... त्यांनी नाही ऐकले तर मी निघून जाईन.”
“संगे... कोण आहे गं?” आपली मुलगी कोणा गोसाव्याशी बोलते आहे हे पाहण्यासाठी तिची आई दारात आली. तेवढ्यात आदिनाथाचे वाक्य तिच्या कानी पडले. आदिनाथाच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव आणि तेज पाहून तिलाही तो काय सांगतो आहे हे ऐकण्याची इच्छा झाली आणि ती पुढे आली.
“काय सांगायचंय बाबा तुला? मीच हिची आई...”
“बाई गं... दोन दिवस तुला सावध राहावं लागेल. येत्या दोन दिवसात तुझ्या मुलीवर मोठं संकट येणार आहे. त्यामुळे हिला बाहेर येवू देऊ नकोस. काही गोष्टी या टाळता येत नसल्या तरी आपण आपली खबरदारी घेतली तर त्याचा फायदाच होतो. अलख निरंजन...” इतके बोलून आदिनाथ माघारी वळला.
“बाबा... कोणतं संकट? त्यासाठी काही उपाय नाही का करता येणार?”
“बाई गं... गुरुदेव दत्तांचे नामस्मरण हाच खूप मोठा उपाय आहे. देव तुझं आणि मुलीचं भलं करो...” इतके बोलून आदिनाथ पुढच्या घरी भिक्षा मागण्यासाठी निघाला. पण त्याचे मन काहीसे विचलित झाले होते. मुलीवर संकट येणार हे तर त्याला समजले होते पण कोणते हे मात्र समजले नव्हते. शेवटी काही दिवस इथेच राहून तिला वाचवण्याचा प्रयत्न करायचा असे त्याने ठरवले. पुढच्या घरीही त्याला पुरेशी भिक्षा मिळाल्यामुळे तो मंदिरात परतला. मंदिराच्या एका कोनाड्यात त्याने आपली झोळी आणि इतर वस्तू ठेवल्या आणि मंदिरातून बाहेर येवून थोड्या अंतरावर त्याने तीन विटांची चूल तयार केली. आजूबाजूला पडलेला पालापाचोळा, वाळलेल्या फांद्या याचे सरपण बनवून मिळालेल्या पिठाच्या होतील तितक्या छोट्या छोट्या चांदक्या बनवल्या. गुरूला, ग्राम देवतेला, मारुतीला, तेथील प्राण्यांना आणि स्वतःसाठी असे त्याचे पाच भागात विभाजन करून मारुतीचा, गुरूचा आणि ग्रामदेवतेचा भाग मारुतीच्या मूर्तीपुढे त्याने आणून ठेवला. त्याच्या भोवती पाणी फिरवून मनोभावे वंदन केले. मग एक भाग तेथील कुत्र्याला देऊन उरलेला भाग स्वतः खाण्यास बसला. खरं तर हा त्याचा नित्यक्रम होता पण आज मात्र त्याचे मन विचलित होत होते. खाण्याकडे त्याचे लक्षच लागत नव्हते. सतत त्याला या भागात काहीतरी अघोरी प्रकार घडत असल्याचे वाटत होते. पोटपूजा झाल्यावर थोडासा विश्राम करून तो मंदिराच्या ओट्यावरच एका बाजूला समाधी लावून बसला. मारुतीच्या दर्शनाला आलेले लोकं आदिनाथाच्या चेहऱ्यावर असलेले तेज पाहून त्यालाही नमस्कार करून जात होते. आदिनाथाने जरी डोळे मिटले होते तरी त्याला त्या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट दिसत होत्या.
दुपार झाली तसा कापालिक बाहेर पडला. आता परत त्याला माचीवरील सोनारवाडीमधून जावे लागणार होते. लोकवस्तीचा संपर्क टळावा म्हणून त्याने आडबाजूचा मार्ग धरला. तसे हा मार्ग काहीसा धोकादायक होता पण कापालिकाला मात्र त्याचे फारसे काही वाटत नव्हते.
काही वेळातच तो माचीवर आला. इथून तीन मार्ग वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. एक मार्ग म्हणजे इखार्याचा मार्ग, रात्रीच्या वेळेस याच मार्गाने तो आलेला होता. दुसरा मार्ग माचीवरून खाली हट्टी गावात जात होता आणि तिसरा मार्ग जात होता उत्तरेच्या बाजूने ओतूर गावाकडे. हट्टी गावं हे खूपच लहान होते. त्यामानाने ओतूर मात्र मोठे होते. त्यामुळे त्याने ओतुरचा मार्ग धरला. तसेही ओतूर गावं धोडप किल्ल्यापासून बऱ्याच लांब असल्यामुळे त्या गावात जरी लोकांनी त्याला पाहिले असते तरी त्याचा त्याला खास काही फरक पडणार नव्हता. संध्याकाळ पर्यंत कापालिक ओतूर गावात हजर झाला. त्याचा मुख्य उद्देश फक्त कालिकेचा बळी शोधणे हेच असल्यामुळे त्याने प्रत्येक देवळात जाऊन पाहण्याचे ठरवले. याचे मुख्य कारण म्हणजे संध्याकाळच्या वेळेस गावातील बरेच लोकं मंदिरात दर्शनासाठी जात आणि इथेच त्याला त्याचा नरबळी मिळणार होता.
कापालिक मारुती मंदिराजवळ आला आणि तिथेच त्याला समाधी धारण केलेला आदिनाथ दिसला. त्याला पाहिल्याबरोबर कापालिकाच्या मनात चर्र झाले. आदिनाथाच्या चेहऱ्यावरील तेजच तो खूप पोहोचलेला आहे हे समजण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे त्यापासून जितके दूर जाता येईल तितके दूर जावे म्हणून कापालिक वळला आणि त्याची धडक संगीताला बसली. संगीता आईने पुष्कळ बजावून देखील फक्त देवळात जाऊन येते म्हणून तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर पडली होती. कापालिकाची नजर संगीतावर पडली मात्र आणि त्याला त्याचा बळी सापडला. त्याच्या डोळ्यात आसुरी तेज चमकायला लागले आणि मग इतर कुठेही वेळ न दवडता त्याने पुन्हा धोडप किल्ल्याचा मार्ग धरला.
हे सगळे समाधीत असलेला आदिनाथ बंद डोळ्यांनी पहात होता, पण त्याने आपली समाधी मात्र सोडली नाही. कापालिक यानंतर काय करणार आहे हे त्याला पाहायचे होते आणि त्यासाठी त्याला समाधीतच राहणे भाग होते.
ओतूर गावातून निघालेला कापालिक तडक किल्ल्यावर आला. तो पर्यंत चांगलाच अंधार पडला होता. माचीवरील सोनारवाडीही शांत झाली होती. कापालिक तडक किल्ल्यावरील शेवटच्या गुहेखालील तळघरात आला. त्याने लावलेला दिवा अजूनही मंदपणे तेवत होता. आता त्याचे फक्त एकच उद्दिष्ट होते आणि ते म्हणजे कसेही करून ओतूर गावातील त्या तरुणीला गडावर आणायचे. तिला इथे कसे आणावे याचा तो विचार करू लागला. तिला संमोहित करून आणायचे तर तिच्या घरातून ती बाहेर पडणार नव्हती. जरी काही कारणाने ती घराबाहेर पडली तरी ते लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नसता. खूप विचार केल्यानंतर शेवटी त्याने त्याच्या अघोरी शक्तीची मदत घेण्याचा विचार मनामध्ये पक्का केला. खरं तर त्याला त्याशिवाय काही गत्यंतरही नव्हते. पण त्यासाठी त्याला रात्रीच्या दुसऱ्या प्रहरापर्यंत थांबणे गरजेचे होते.
जसा रात्रीचा दुसरा प्रहर सुरु झाला तसे कापालिकाने अघोरी पुजेची तयारी सुरु केली. जवळच ठेवलेल्या झोळीमध्ये काही त्याच्या दृष्टीने महत्वाच्या वस्तू टाकल्या. बरोबर आपला चिमटा घेतला आणि गडावरून खाली माचीवर येवून सरळ इखाराच्या बाजूला निघाला. या ठिकाणाचा पूर्वी स्मशानासारखा वापर केला जायचा त्यामुळे त्याला पायथ्याच्या गावातील स्मशानात जाण्याची गरज वाटली नाही. ज्या ठिकाणी तो पोहोचला त्या ठिकाणी त्याला अनेक समाध्या आणि कबरींचे अवशेष दिसत होते. थोड्या थोड्या अंतरावर काही खुरटी झुडपेही असल्यामुळे त्या जागेची भयानकता आणखीनच वाढत होती. त्यात आमावस्या जवळ आल्यामुळे चंद्रप्रकाशही अगदीच जेमतेम होता. मोडकळीस आलेल्या कबरींचे पांढऱ्या रंगातील अवशेष मात्र त्यातही उठून दिसत होते. रात्रीच्या वेळेस या भागात कुणीही फिरकत नव्हते. अनेकांच्या मते या ठिकाणी मेलेल्या सैनिकांची भुते फिरत असत. अनेकांनी या ठिकाणी अनेक प्रकारचे चित्रविचित्र आवाजही ऐकले होते. पूर्वी किल्ल्यावर मृत्यू झालेल्या बाळंतीण बायकाही इथे हिंडतात असेही काही लोकं म्हणत. कापालिकाला तर अशाच जागेची आवश्यकता होती.
त्यातल्या त्यात थोडीशी सपाट जागा शोधून त्याने ती हातानेच साफ केली. तिथेच एका कबरीजवळ पडलेला जरासा लांबट असा एक सव्वा फुटाचा दगड आणला आणि साफ केलेल्या जागेवर ठेवला. आता त्याने झोळीत आणलेल्या वस्तू एकेक करून बाहेर काढायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने दोन बाटल्या बाहेर काढल्या. त्यातील एका बाटलीत रक्त आणि दुसऱ्या बाटलीत दारू भरलेली होती. त्यानंतर त्याने एक डबी बाहेर काढली. त्यात कसलीशी तयार केलेली पेस्ट होती. नंतर त्याने माणसाच्या हाताची दोन हाडे बाहेर काढली. त्यानंतर गुलाल, कुंकू, काळी हळद आणि लव्हाळा वनस्पतीची वाळलेली पाने आणि काही रिकाम्या कटोऱ्या बाहेर काढल्या. नंतर कालिकेच्या नावाचा जयजयकार करून स्वतः भोवती आणि त्या दगडाभोवती लोखंडाच्या चिमट्याने एक वर्तुळ काढले. नंतर स्वतःच्या वर्तुळा बाहेर अजून एक छोटे वर्तुळ काढले आणि काळ्या हळदीची पूड हाती घेऊन साबरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र पूर्ण होताच त्याने ती पूड आखलेल्या दोन्ही वर्तुळांवर टाकली आणि पुन्हा एकदा कालिकेच्या नावाचा गजर केला. नंतर त्याने दोन्ही बाटल्या हातात घेतल्या आणि एका रिकाम्या कटोऱ्यात दारू आणि रक्त एकत्र करून त्याचा सडा त्या दगडापुढे शिंपडला व उरलेल्या मिश्रणाने त्या दगडाला अंघोळ घातली. त्यानंतर त्या दगडाच्या वरच्या भागाला कुंकवाचा वापर करून डोळे, नाक तोंड काढले आणि त्यावर गुलाल आणि काळ्या हळदीचा अभिषेक केला. त्यापुढे माणसाच्या हाताची दोन हाडे क्रॉस करून ठेवली व त्यानंतर अभिमंत्रित केलेली लव्हाळ्याची पाने त्या दगडावर वाहून कालिकेचे आवाहन चालू केले. आवाहन मंत्र पूर्ण झाल्यावर त्याने बरोबर आणलेल्या डबीतील पेस्ट मधोमध स्वतःच्या कपाळाला उभ्या गंधासारखी लावून त्याचा दोन्ही डोळ्यांना आणि कानाला स्पर्श केला.
आता त्याला त्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या ज्या एरवी माणसाला दिसत नाहीत. प्रत्येक कबरीच्या वर आणि इतरही बाजूला त्याला एकेक धुरकट आकृती दिसत होती. ती सगळी तिथे गाडल्या गेलेल्या किंवा मुक्ती न मिळालेल्या व्यक्तींची वासनाशरीरे होती. त्यातील बरीच वासनाशरीरे अगदी शांत आणि स्थितप्रज्ञ दिसत होती. काही मध्येच खालीवर होत होते आणि थोड्या थोड्या वेळाने किंचाळत होते. काही वासनाशरीराचे हुंदके त्याला स्पष्ट ऐकू येत होते. कापालिक प्रत्येक वासनाशरीराकडे कडे अगदी लक्षपूर्वक पहात आणि ऐकत होता. कारण त्याला असे एखादे वासनाशरीर पाहिजे होते ज्याच्याकडून त्याला पाहिजे तसे काम करून घेता येईल. जी वासनाशरीरे अगदी शांत होती त्यांनी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांवर नियंत्रण मिळवले होते त्यामुळे त्यांना कह्यात करणे अवघड होते. हे पहात असताना त्याला असे एक वासनाशरीर दिसले जे इतरांपेक्षा खूपच जोरात खालीवर होत होते आणि ज्याचा रडण्याचा स्वरही इतरांपेक्षा मोठा होता. कापालिकाने परत एकदा हातात काळी हळद घेतली आणि मग त्यावर साबरी मंत्राचा उच्चार करून ती त्या वासना शरीराच्या दिशेने फुंकली.
आता त्या वासनाशरीराची तडफड पहिल्यापेक्षा कैक जास्त पटीने वाढली आणि ते कापालिकाच्या दिशेने धावून आले. पण कापालिकाने स्वतः भोवती आखलेल्या वर्तुळात त्याला प्रवेश करता येईना. तेवढ्यात परत एकदा कापालिकाने साबरी मंत्राचा उच्चार करून आपल्या हातातील चिमटा त्या वासना शरीराला मारला आणि ते मोठ्याने कळवळले. त्यानंतर त्याला दुसऱ्या छोट्या वर्तुळात कैद करून कापालिकाने विकट हास्य केले. आता मात्र त्या वासनाशरीराच्या धुरकट चेहऱ्यावरील भाव सारखे बदलत होते. कधी संतापाने ते ओरडत होते तर कधी वेदनेने विव्हळत होते.
“कापालिका... मला का असे बांधले आहेस?” ते वासनाशरीर संतापाने कापालिकावर ओरडले.
“हडळे... चूप... आता तू माझ्या ताब्यात आहेस. जे काय विचारायचे ते मी विचारणार आणि मीच सांगणार”
“काय विचारणार आहेस मला? याचे परिणाम खूप वाईट होतील.”
“ते मी पाहून घेईन. आधी माझे काम कर, मग मी तुला मोकळी करीन.” वासनाशरीराच्या कोणत्याही धमकीची पर्वा न करता कापालिकाने आज्ञा केली.
“कोणते काम? आणि मी नाही केले तर?”
“तर? तर तुझे यापेक्षाही जास्त हाल करेन.” विकट हास्य करत कापालिक उत्तरला.
कापालिकाच्या हसण्याचा भयंकर संताप येवून त्या वासनाशरीराने आपली सगळी शक्ती एकवटून कापालिकावर धावायचा प्रयत्न केला पण आपण पूर्णपणे बांधले गेलो आहोत हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आता त्या वासनाशरीराला कापालिकाचे काम करण्यावाचून काहीच गत्यंतर नव्हते.
“ठीक आहे... काय करायचे आहे मी?”
“जास्त काही नाही. फक्त एका तरुणीच्या शरीरात प्रवेश करून तिला इथे या ठिकाणी घेवून यायचे आहे. आजच्या आज. जर तू हे काम व्यवस्थितपणे पूर्ण केले तर मी तुला कोणत्याही शरीरात प्रवेश करण्याची शक्ती देईन आणि तुला तुझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेता येतील. पण जर माझ्याशी कपट करण्याचा विचारही मनात आणलास तर मात्र त्याची खूप भयंकर शिक्षा तुला भोगावी लागेल. बोल आहेस तयार?”
आता मात्र या कापालिकाची मदत केली तर आपल्याला आपल्याही इच्छा पूर्ण करून घेता येऊ शकतील हा विचार करून त्या वासनाशरीराने त्याला होकार दिला.
“पण ज्या तरुणीच्या शरीरात मला प्रवेश करायचा आहे ती कुठे आहे? आणि अजून माझ्यात ती शक्तीही नाहीये.”
“त्याची काळजी तू करू नको. ती शक्ती मी तुला माझ्या मंत्राच्या सामर्थ्यावर देऊ शकतो.” इतके बोलून त्याने परत एकदा हातात काळी हळद घेतली आणि मंत्रोच्चार करून ती त्या वासनाशरीराच्या दिशेने फुंकली. त्याबरोबर ते शरीर मोकळे झाले. तसेच त्याला आता त्याच्यात नवीन शक्तीचा संचार झाल्याचेही जाणवू लागले. आता कापालिकाने हातात गुलाल घेतला आणि त्यावर मंत्र उच्चारून तो त्या वासनाशरीराच्या समोर फुंकला. त्यासरशी तेवढ्या भागात एक ढग तयार झाला आणि त्यात हळूहळू एक चित्र तयार होऊ लागले. त्या चित्रात संगीताचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. आता वासनाशरीरानेही सातमजली हास्य केले आणि त्याच्या धूसर चेहऱ्याने स्त्रीचा आकार धारण केला. क्षणार्थात ती हडळ तिथून नाहीशी झाली आणि काहीशा दूरवर असलेल्या ओतूर गावातील संगीताच्या घरासमोर प्रकट झाली.
या सगळ्या गोष्टी फक्त एकजण पहात होता... आदिनाथ... जरी लोकांना तो समाधीत लीन आहे असे वरकरणी दिसत होते तरी त्याचे सगळे लक्ष कापालिकाच्या कृतींवर होते. कापालिकाने पाठवलेली हडळ आता संगीताच्या दारासमोर उभी असलेलीही त्याने पाहिली. परंतु त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसून आले नव्हते. सध्या तो फक्त कापालिक कोणत्या गोष्टी करतो आहे आणि त्याची शक्ती किती आहे याचा अंदाज घेत होता. आदिनाथाने ठरवले असते तर तिथल्या तिथेच या सगळ्या गोष्टी त्याने थांबवल्या असत्या पण त्याचा अंतरात्मा त्याला फक्त पाहण्याचीच अनुमती देत होता.
हडळीने एकदा घरातील परिस्थितीचा अंदाज घेतला. तशी मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे सगळीकडे सामसूम झाली होती. दार आतून लावलेले होते. पण हडळीला त्याची काहीएक काळजी नव्हती. भिंतीच्या बाहेरूनच हडळीने धुरात पाहिलेला चेहरा कुठे दिसतो आहे का याचा तपास केला. एका खोलीत तिला संगीता पलंगावर झोपलेली आढळून आली. क्षणार्धात हडळ भिंतीच्या आरपार जावून संगीताच्या पलंगाजवळ पोहोचली. जर कुणी त्यावेळेस तिथे आले असते तर त्या हडळीचे ते बिभत्स रूप पाहून तिथेच घेरी येवून पडले असते. हडळीचा चेहरा एकदम दुधासारखा पांढरा फटक होता. नाकाच्या जागी फक्त दोन भोके होती. डोळे होते पण त्यात बुबुळे दिसत नव्हती. केस खूपच लांबसडक होते, पण तेही पूर्णपणे पांढरे आणि अस्ताव्यस्त विस्कटलेले होते. संगीता मात्र अगदी शांत झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावरील मासूम भाव तिच्या सौदर्यात भरच घालत होते. हडळीने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले. एरवी कोणीही हसताना चांगलेच वाटते, पण हडळीच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र तिच्या भेसूरपणात आणखीनच भर घालत होते. हडळ एकटक संगीताकडेच पहात होती आणि तेवढ्यात संगीताची झोप चाळवली गेली. तिने डोळे उघडले मात्र आणि तिच्या तोंडून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडण्याआधीच तिची शुद्ध हरपली.
इतके दिवस हडळीला शरीर मिळाले नसल्यामुळे ती कुणाला दिसत नव्हती. तिचे ओरडणे, किंचाळणे, हुंदके देणे कुणाला ऐकूही जात नव्हते. पण आज तिला तात्पुरते असले तरी शरीर प्राप्त होणार होते. त्यामुळे एरवी कुणालाही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ न शकणारे वासनाशरीर आता लोकांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देणार होते. आपल्याला पाहून एक मुलगी बेशुद्ध होऊन पडते ही भावनाच तिला असुरी आनंद देऊन गेली. कापालिकाच्या या छोटाशा कामाने आपल्याला आता बऱ्याच गोष्टी करता येतील याचाही आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला. तिचा चेहरा आता जास्तच भीतीदायक बनला. तेवढ्यात तिला कापालिकाची आठवण झाली आणि तिने लगेचच संगीताच्या शरीरात प्रवेश केला. हडळीने प्रवेश केल्यामुळे जेव्हा संगीताने डोळे उघडले त्यावेळेस तिच्या डोळ्यातील बुबुळे ही निम्म्याने लहान झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील गोऱ्या रंगाची जागा पांढऱ्या रंगाने घेतली होती. तिच्या कपाळावरील नसा तट्ट फुगून वर आल्या होत्या आणि त्या गडद हिरव्या रंगाच्या दिसू लागल्या होत्या. झोपेतून उठल्यामुळे तिचे काळेभोर केस जरासे राठ आणि विस्कटलेले दिसत होते. तिच्या चेहऱ्यावरील ते उठून दिसणारे खळाळते हास्य आता विकट बनले होते. तिचे हे रूप तिनेच आरशात पाहिले असते तर ती पुन्हा घाबरून बेशुद्ध पडली असती.
संगीताने आता तडक घराचे दार उघडले आणि ती कुठेही इकडे तिकडे न पाहता धोडपच्या दिशेने निघाली. तिच्या चालण्यातील वेग हळूहळू खूपच वाढला आणि आता तिचे चालणे पळण्यात रुपांतरीत झाले.
हे सगळे आदिनाथ बसल्या जागेवरूनचं पहात होता. एकदा त्याचे मन संगीताच्या या अशा परिस्थितीमुळे व्याकूळ झाले. तिला या परिस्थितीतून बाहेर काढावे असाही एक विचार त्याच्या मनात येवून गेला, पण त्याचे उद्दिष्ट याच्या मुळाशी जाऊन या गोष्टीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे होते. त्यामुळे त्याला आपल्या मनातील विचारावर नियंत्रण ठेवावे लागले. अगदी काही वेळातच संगीता धोडप किल्ल्याच्या माचीवर पोहोचली जिथे कापालिक आपली साधना करत बसला होता. इतरांना जरी ती संगीता दिसली असती तरी कापालिकाला मात्र संगीताच्या शरीरात असलेली हडळ दिसत होती. हडळीने आपले काम चोख बजावलेले पाहून कापालिकाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला.
“हडळे... तू तुझं काम चांगलं बजावलं आहे. आता तू माझी गुलाम झाली आहेत त्यामुळे ज्या वेळेस मला गरज असेल त्या वेळेस मी तुला अशी एखादी कामगिरी सोपवणार आहे, आणि त्याबदल्यात मी तुला लोकांच्या शरीरात प्रवेश करून तुझ्या अपुऱ्या रहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सिद्धी देतो आहे. पण लक्षात ठेव... माझ्याशी जर कपट करशील तर मात्र तुला फार भयानक यातना द्यायला मी बिलकुल मागेपुढे पाहणार नाही. कारण तू नाही तर मी दुसऱ्या कुणाकडूनही माझे काम करून घेऊ शकतो. पण तुला शक्ती मात्र मीच देऊ शकतो हे ध्यानात ठेव...”
“कापालिका... मी बिलकुल तुझ्याशी कपट करणार नाही. कारण आज तू मला ही सिद्धी देऊन माझ्यावर उपकार केले आहेत. आता मला काय आज्ञा आहे?” एरवी मंजुळ असलेला संगीताच्या आवाजात एकदम बदल होऊन तो चिरका बनला होता.
“अजून तुझे काम संपलेले नाही. दोन दिवसांनी आमावस्या आहे. त्या दिवशी मी हिचा बळी देणार आहे. तो पर्यंत हिने काही करू नये म्हणून तुला हिच्या शरीरातच राहावे लागणार आहे. पण ते इथे नाही तर किल्ल्यावरील तळघरात.”
“ठीक आहे... चल तर मग... मी तुझ्या मागोमाग येते.”
कापालिकाने मांडलेल्या पुजेची सांगता केली आणि आपल्या सगळ्या वस्तू बरोबर घेवून तो चालू लागला. संगीताच्या शरीराचा ताबा हडळीने घेतला असल्यामुळे तीही कापालिकाच्या मागोमाग चालू लागली.
सकाळ झाली तेव्हा संगीताच्या घरात एकदम गोंधळ उडाला होता. शेजाऱ्यांची घरासमोर एकच गर्दी लोटली होती. संगीताच्या आईने सकाळी उठल्या बरोबर पाहिले तो घराचे दार सताड उघडे असलेले तिला दिसले. घरात संगीताचा कुठेच पत्ता नव्हता. काही लोकांच्या मते संगीता कुणा प्रियकराचा हात धरून पळून गेली होती तर काहींच्या मते तीचे घरातून अपहरण करण्यात आले. काही जण म्हणत होते की आईबापाशी भांडण करून संगीताने घर सोडले होते. अनेकांची अनेक मते. सगळीकडे तपास केल्यानंतरही तिचा पत्ता न लागल्याने तिच्या आईवडिलांनी गावातील पोलीसस्टेशन गाठले.
आतापर्यंत ओतूर गावातील पोलीस स्टेशनला मुख्यालयाकडून एखाद्या केसमध्ये बाबाचे / बुवाचे नाव असेल तर चांदवड पोलीस ठाण्याच्या सब. इन्स्पेक्टर आहीरेंना रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच तो तपास त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची ऑर्डरही नुकतीच फॅक्सद्वारे त्यांना प्राप्त झाली होती. त्याबद्दलच पोलिसांमध्ये चर्चा चालू असताना १०/१२ जणांचा घोळका पोलीसस्टेशन मध्ये घुसला.
“साहेब... साहेब... माझ्या पोरीला वाचवा हो...” संगीताच्या आईने दिसेल त्याला हात जोडून विनंती करायला सुरुवात केली. शेवटी तिथल्या एका हवलदाराने त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत चौकशीला सुरुवात केली.
“बाई.. आधी शांत व्हा... पाणी प्या... आणि नीट सांगा... काय झाले?”
“साहेब... माझी पोरगी हो... घरातून नाहीशी झाली. सकाळी दार सताड उघडे होते पण ती मात्र घरात नव्हती.” पाण्याचा एक घोट घेवून संगीताच्या आईने सांगितले.
“बरे.. घरातील काही वस्तू गेल्या आहेत का?”
“नाही हो... इतर कोणत्याच गोष्टीला हातही लागलेला नाही. माझ्या पोरीचे कपडेही जागच्या जागी आहेत. म्हणजे ती पळून गेली नाही हे नक्की.”
“बरे... मला सांगा... रात्री कुणी घरात आले होते का?”
“नाही... कुणीच नाही...”
“सकाळी दार उघडल्याचा आवाज आला का?”
“आम्ही सगळे झोपेत होतो त्यामुळे आम्हाला कुणालाच त्याबद्दल माहिती नाही.”
“बरे घरात आणखी कोण कोण असतं?”
“मी, माझा लहान मुलगा विसू, संगीता आणि संगीताचे बाबा असे चौघेच असतो.”
“बरे... तुमचा कुणावर काही संशय? येत्या एकदोन दिवसात तीच्या वागण्यात काही बदल किंवा एखादी विशेष घटना जी त्यावेळेस विशेष वाटली नाही पण आता ती विशेष वाटेल अशी?”
“नाही तसा कुणावर संशय नाही पण.... हो... काल एक बाबा आमच्याकडे भिक्षा मागायला आला होता. त्याने एकदा माझ्या पोरीकडे पाहिले आणि मला बोलावून सांगितले कि येत्या दोन दिवसात तिच्यावर संकट येणार आहे.” संगीताच्या आईला एकदम आदिनाथाचे स्मरण होऊन तिने ती घटना पोलिसांना सांगितली.
“ए... हे तू मला का नाही सांगितले कालच?” संगीताचे वडील बायकोवर ओरडलेच.
“शांत व्हा..!!!” एका हावलदाराने संगीताच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण केसमध्ये बाबाचा उल्लेख आल्याने पोलीस सजग झाले. त्वरित त्यांनी चांदवडच्या आहिरेंना फोन केला. कारण तशाच ऑर्डरचा फॅक्स त्यांना आला होता.
“हेल्लो चांदवड पोलीस स्टेशन” पलीकडून आवाज आला.
“हेल्लो मी ओतूर पोलीसस्टेशन मधून हावलदार जाधव बोलतोय... मला आहिरेसाहेबांशी बोलायचे आहे.”
“बोला हावलदार... मी सब. इन्स्पेक्टर आहिरेचं बोलतो आहे.”
“साहेब एक केस आली आहे. पोरगी घरातून नाहीशी झाल्याची. त्याच्या चौकशीत बुवाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे तुम्हाला फोन केला.”
“ठीक आहे... लगेच निघतो मी इथून... तुम्ही त्यांची रीतसर फिर्याद नोंदवून घ्या. मी पोहोचतोच..”
जवळपास दीड तासात इन्स्पेक्टर आहिरे ओतूर पोलीस स्टेशनला पोहोचले. तो पर्यंत हावलदाराने संगीताच्या कुटुंबियांना घरी पाठवले होते आणि थोड्या वेळात आम्ही तुमच्या घरी येऊ,पण शक्यतो कोणत्या गोष्टी हलवू नका अशी सूचना केली होती.
हावलदाराकडून जुजबी माहिती घेऊन आहिरे संगीताच्या घरी पोहोचले. संगीताच्या आईचे अश्रू अजूनही थांबले नव्हते. पोलिसांना पाहताच ती धावतच दारात आली.
“साहेब... लागला का काही तपास?”
“अहो बाई... लागेल... तुम्ही काळजी करू नका. आम्ही आलोत ना आता...” अगदी आश्वासक आवाजात त्यांनी संगीताच्या आईला धीर देण्याचा प्रयत्न केला.
“बरं आता परत पहिल्यापासून मला सांगा बरं... काय काय घडलं ते... आणि हो तुम्हाला कुणी बाबाने सांगितलं होतं तिच्यावर संकट येणार आहे म्हणून? खरंय का हे?” आहिरेंनी आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला.
संगीताच्या आईने घडलेली सगळी हकीकत परत एकदा सांगून टाकली.
“बरं... मला सांगा... कसा होता तो बाबा ज्याने तुम्हाला संगीतावर संकट येणार आहे असे सांगितले? म्हणजे त्याचा पेहराव किंवा उठून दिसतील अशा काही खुणा?”
“तो एक नाथ जोगी होता साहेब... खूप तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर” संगीताच्या आईने आहिरेंना जरी आदिनाथाबद्दल सांगितले तरी तो असे काही करेल असे तिला बिलकुल वाटत नव्हते.
तेवढ्यात तिथे बघणाऱ्यांपैकी एक जण उत्तरला...
“आयला... त्यो जोगी तर हिडंच हाय... मारतीच्या देवळात बशेल हाय कालपास्नं”
“काय सांगतोस? हावलदार... चला... पाहूच कोण आहे तो जोगडा... चल रे बस गाडीत आणि चाल मंदिरात...” त्या पोराचा हात धरत आणि त्याला गाडीत बसवत आहिरे निघाले.
आहिरे आणि त्यांची टिम मंदिरात पोहोचले तेंव्हा आदिनाथ त्यांना समाधीतच बसलेला दिसला. गाडीतून खाली उतरताच आहिरेंनी संगीताच्या आईला विचारले.
“काहो बाई... हाच जोगी काल आला होता का तुमच्या कडे?”
“हो साहेब... यानेच सावध केले होते मला.” तिने आदिनाथाकडे इशारा करत सांगितले.
आहिरे लगेचच मंदिराच्या ओट्याजवळ आले.
“बाबा... ओ... बाबा... उठा... तुम्हाला काही विचारायचे आहे...” कोणताही बाबा / बुवा दिसला कि आहीरेंच्या तळपायाची आग मस्तकात जायची. हे लोकं देवाच्या नावाखाली भोंदूगिरी करून सामान्य लोकांना फसवतात हेच त्यांनी त्यांच्याकडे आजवर आलेल्या केसेस वरून पाहिले होते. पण तरीही लगेच आदिनाथाला एकेरी संबोधणे त्यांना योग्य वाटले नाही. पण आदिनाथाकडून काहीच हालचाल न झाल्याने आहिरे भडकले.
“सावंत... खेचा त्याला खाली... साला नाटकं करतो... ए गोसावड्या... चल उठ!” सगळ्या गावादेखत हा गोसावडा आपला अपमान करतो म्हणजे काय? चरफडत त्यांनी हावलदार सावंतला हुकुम सोडला.
आहीरेंच्या बोलण्याचा अवकाश आणि सावंत पायऱ्या चढून ओट्यावर आला. पुढे सरसावून त्याने आदिनाथाला हालवण्यासाठी हात लावला मात्र आणि तो दोन फुट लांब जाऊन पडला. अगदी अनपेक्षितपणे तो फेकला गेल्यामुळे त्याच्या कमरेला चांगलाच मार बसला होता आणि त्या झटक्याने तो चांगलाच कळवळला. काय घडले, कसे घडले हे मात्र कुणालाच कळेना. एखादे भूत पहावे तसे सावंतने भेदरून आदिनाथाकडे पाहिले. आदिनाथाचा चेहरा मात्र पहिल्या सारखाच निर्विकार होता. हे सगळे पाहून आहिरे जाम भडकले.
“साला... हरामखोर... तीनपाट टोटके करतोस? तू असा नाही ऐकायचा, तुला आमचा पोलिसी खाक्याच दाखवतो. थोरात... चौदावं रत्न दाखवा त्याला.” आहिरेंनी हावलदार थोरातला फर्मान सोडले. साहेबांची आज्ञा त्याला पाळावीच लागणार होती. पण त्याने सावंतची झालेली हालत देखील पाहिली होती त्यामुळे तो जरा घाबरतच पायऱ्या चढला. सावंतने डायरेक्ट हात लावला म्हणून त्याची अशी स्थिती झाली असे समजून थोरातने आपल्या हातातील दंडुका त्याच्या अंगाला टोचून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्या काठीचा स्पर्श होताच त्याचीही तीच स्थिती झाली जी सावंतची झाली होती.
डोळ्यासमोर घडलेला चमत्कार पाहून लोकांची कुजबुज वाढली. आदिनाथ पूर्वीप्रमाणेच स्थितप्रज्ञ होता. काही लोकांनी त्याला आहे तिथूनच नमस्कार घातला. तसेही चमत्कार दिसला की लगेच नमस्कार करण्याची लोकांची वृत्ती यावेळीही दिसल्याने आहिरे वैतागले. पण आता याला उठवायचे कसे याचा त्यांना विचार पडला. काही जण आहीरेंना त्याला शरण जाण्यासाठी सांगू लागले, तर काही जण साक्षात मारुतीरायाच नाथबाबाचं रूप घेवून इथे बसला आहे असे म्हणू लागले. आहीरेंही मनातून थोडे चरकलेचं होते. जो व्यक्ती लाकडाच्या काठीतूनही झटका देऊ शकतो तो नक्कीच कुणीतरी पोहोचलेला असणार याची त्यांना खात्री पटली.
“बाबा... माझ्या पोरीला वाचवा...” संगीताच्या आईने पळत जाऊनच आदिनाथाचे पाय पकडले. पण आश्चर्य म्हणजे तिला कोणताही झटका बसला नाही. तिच्या हातांचा आदिनाथाच्या पायाला स्पर्श झाला मात्र आणि त्याने डोळे उघडले.
“माई... हे काय करतेस? पाय धरायचे तर मारुतीरायाचे धर, गुरुदेव दत्तांचे धर... उठ!!! काळजी करू नको. त्यांनी ठरवले तर तिचे कुणीही काहीच वाकडे करू शकणार नाही. त्यासाठीच मला त्यांनी इथे थांबायचा आदेश दिला असावा.” संगीताच्या आईला उठवत, तिला समजावण्याचा त्याने प्रयत्न केला. नंतर सब. इन्स्पेक्टर आहीरेंकडे वळून त्याने सुरुवात केली.
“इन्स्पेक्टर... मी तुमचीच वाट पहात होतो. तुमच्या हावलदारांची अशी गत फक्त यासाठी करावी लागली कारण तुम्हाला हे समजणे महत्वाचे होते की प्रत्येक ठिकाणी तुमचा खाक्या किंवा तुमची शस्त्रे उपयोगी पडणार नाहीत. आणि या घटनेत तर नाहीच नाही.”
“तुम्हाला माहित होतं मी इथे येतो आहे म्हणून?” आहिरेंनी काहीशा आश्चर्याने विचारले.
“होय... गुरूच्या कृपेने मी त्या सगळ्या गोष्टीही पाहू शकतो, ज्या एरवी तुम्ही पाहू शकत नाहीत.” आदिनाथाने उत्तर दिले.
“मग बाबा... तुमच्यात जर इतकी पावर आहे तर तुम्हीच या बाईच्या मुलीला का नाही वाचवलं?” आहिरेंनी परत प्रश्न केला.
“कारण मला त्याला पकडून द्यायचं आहे सर्व पुराव्यासह आणि त्या मुलीचे ग्रहमानही तसे होते.”
“म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे ते?”
“हो... माहिती आहे... सध्या ती धोडप किल्ल्यावरील तळघरात आहे आणि परवाच्या अमावास्येला तिला बळी देण्याचा कापालिकाचा विचार आहे.”
आहिरे एकेक प्रश्न विचारात होते आणि आदिनाथ अगदी शांतपणे त्याची उत्तरे देत होता.
“काय सांगता? कोण आहे तो हरामखोर? आता चामडी सोलतो साल्याची.” परत एकदा आहिरेंचा राग अनावर झाला.
“इतकं सोपं नाहीये ते इन्स्पेक्टर. तो खूप पोहोचलेला कापालिक आहे. अनेक सिद्धी त्याने प्राप्त करून घेतल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत.”
“वाईट करू शकणार नाही म्हणजे?”
“म्हणजे??? आपण सगळे आता तिकडेच जाणार आहोत. त्यावेळेस समजेलच तुम्हाला... आणि हो, तिथे किल्ल्यावर तुम्हाला जे काही दिसेल त्याने विचलित होऊ नका, आणि माझ्या नजरेच्या टप्प्यातून बाजूलाही जाऊ नका. कारण माझ्याही काही मर्यादा आहेत.”
नंतर त्याने संगीताच्या आईकडे वळून म्हटले...
“माई... तुलाही आमच्या बरोबर यावे लागेल. कारण त्या मुलीला तुझ्या आधाराची गरज पडणार आहे...” इतके बोलून आदिनाथाने आपले आसन सोडले. मंदिरात जाऊन कोनाड्यात ठेवलेल्या आपल्या झोळ्या आणि चिमटा घेतला आणि तो मंदिराच्या पायऱ्या उतरू लागला. त्याच्या बरोबर संगीताचे आईवडील, सब. इन्स्पेक्टर आहिरे आणि त्यांच्या बरोबर आलेले हवलदार असा सगळा लवाजमा किल्ल्याकडे निघाला. हावलदार थोरात आणि हावलदार सावंत यांना जरी आदिनाथापासून कसलीच भीती नव्हती, तरी दोघे आदिनाथापासून चार हाताचे अंतर ठेवूनच चालत होते. न जाणो चुकून आपला हात या बाबाला लागायचा आणि झटका खावा लागायचा. अर्थात इतर हावलदारांची गतही काही याहून निराळी नव्हती.
कापालिकाने गावातील मंदिरात आदिनाथाला आधीच पाहिले असल्यामुळे आणि तो त्याच्या कार्यात विघ्न आणू शकतो याचीही त्याला जाणीव झाल्यामुळे त्याने आदिनाथावर लक्ष ठेवायचे ठरवले. जो पर्यंत त्याचे उद्दिष्ट सफल होत नाही तोपर्यंत कोणताही धोका पत्करणे त्याला परवडणारे नव्हते. संगीतासह तळघरात आल्या बरोबर त्याने मंत्र सामर्थ्याने हडळीच्या आत्म्याला संगीताच्या शरीरात बंदिस्त करून टाकले. कारण जोपर्यंत हडळ संगीताच्या शरीरात असणार होती, तोपर्यंत ती त्याच्या ताब्यात राहणार होती. ही गोष्ट हडळीला मात्र बिलकुल पसंत पडली नाही.
“कापालिका... मला असे का बांधले आहेस? मी तुला सहकार्य करणार हे वचन दिले आहे ना?”
“हो... पण माझा तुझ्यावर अजून पूर्ण विश्वास बसलेला नाही. दोन दिवसांनी माझा हेतू सफल झाला कि मग मी तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही. तोपर्यंत चूप बस...” कापालिक हडळीच्या अंगावर काहीसा खेकसलाच.
कापालिकापुढे बोलून काहीच उपयोग होणार नाही हे लक्षात आल्याने तिला गप्प बसणे भागच होते. ती जरी गप्प बसली तरी शांत मात्र झाली नाही. किंचाळणे, हुंदके देणे, धाप लागणे यासारख्या गोष्टी ती संगीताच्या शरीरात असूनही करतच होती. मध्येच ती जमिनीपासून चार फुट वरती जात होती, मध्येच परत खाली येत होती. कापालिकालाही तिची ती स्थिती माहिती असल्यामुळे तो त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होता. आता त्याने आदिनाथ काय करतो आहे हे पाहण्यासाठी पूजा मांडायला घेतली.
कालिकेच्या मूर्तीसमोर पण मुख्य पूजेपासून थोड्या दूर अंतरावर त्याने एक खापराचे मध्यम आकाराचे भांडे ठेवून त्यात काठोकाठ कुठल्याशा प्राण्याचे रक्त भरले. त्याच्या पुढे एक चांदणीचा आकार तयार करून त्यात वेगवेगळी अक्षरे लिहिली आणि त्यापुढे बसून तो मंत्र म्हणण्यात गुंग झाला.
थोडा वेळ होतो न होतो तोच त्या भांड्यातील रक्ताचा रंग हळूहळू बदलू लागला. त्यात ओतूर गावातील मारुतीचे मंदिर आणि मंदिराच्या ओट्यावर ध्यानस्थ बसलेला आदिनाथ त्याला स्पष्ट दिसू लागले. हळूहळू ते जवळ येते आहे असा भास झाला आणि त्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः उभे राहून पाहतो आहोत असे वाटू लागले. त्याचे लक्ष फक्त आणि फक्त आदिनाथावर होते. थोडा वेळ हे दृश्य दिसते न दिसते तोच त्याला तिथे पोलीस आणि गावकरी जमलेले दिसले. मारुती मंदिराच्या आवारात घडणारा सर्व प्रकार कापालिक त्याच्या बसल्या जागेवरून पहात होता आणि त्याच बरोबर आदिनाथाची शक्ती किती आहे हेही त्याला हावलदारासोबत घडलेल्या प्रकाराने काहीसे लक्षात यायला सुरुवात झाली. जसजसे तो मन लावून पहात होता तसतसा त्याचा चेहरा भेसूर वाटू लागला. त्याचे डोळे संतापाने लाल होऊ लागले. त्याचा श्वासोच्छवास जलद होऊ लागला आणि आता त्याचा संताप शिगेला पोहोचला.
संगीताच्या शरीरात बंदिस्त असलेली हडळ वर खाली होता होताच कापालिकाच्या चेहऱ्याचे बदलणारे भाव पहात होती. जसजसे कापालिकाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले तसतसा हडळीचा खेळही कमी कमी होत गेला. आता तर ती हडळ देखील अगदी घाबरून एकाच ठिकाणी थरथरत उभी होती. आणि जसे पोलिसांना घेवून आदिनाथ किल्ल्यावर येण्यास निघाला आहे हे कापालिकाने पाहिले, तसा त्याने रागाच्या आवेशात एक जोरदार फटका त्या खापराच्या भांड्याला मारला. तो फटका इतका जोरदार होता की त्या भांड्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होवून त्या इतस्ततः विखुरल्या गेल्या. सगळीकडे रक्त रक्त तर झालेच पण काही रक्त कापालिकाच्या चेहऱ्यावर उडून त्याचा चेहरा आधीपेक्षाही भयानक दिसू लागला.
काही क्षणातच त्यांने स्वतःवर नियंत्रण मिळवले आणि तो आदिनाथाला किल्ल्यावर येण्यापासून रोखण्याच्या तयारीला लागला.
संतापाने थरथरतच कापालिकाने मुख्य पूजेसमोर फतकल मारली. एकदा कालिकेच्या नावाचा मोठ्याने जयघोष केला आणि हातात काळी हळद आणि कुंकू घेवून तो मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला. आता तो पाचही तत्वांचे मंत्र म्हणून त्या तत्वांना आवाहन करत होता. जसजसे एकेक मंत्र पूर्ण होऊ लागले, तसतशी एकेका तत्वाची शक्ती चांदणीच्या कोनात ठेवलेल्या एकेका कापलेल्या शीराच्या वर फिरू लागली आणि कालिकेचा जयघोष करताच त्या शीरामध्ये प्रवेश करू लागली. पुढच्या पाच मिनिटातच प्रत्येक शीर हळूहळू तीन साडेतीन फुट वर उचलले गेले, आणि एकेक करून प्रत्येक शिराच्या डोळ्यावरील झापडे उघडले गेले. आता त्या शीरांच्या डोळ्याच्या जागी प्रत्येक तत्व दिसत होते. पहिल्या शीरात आप म्हणजे पाणी तत्वाने प्रवेश केला होता, त्याचे डोळे फक्त निळसर रंगाचे दिसत होते. मध्येच त्याचा रंग हिरवट तर मध्येच चहाप्रमाणे मातकट दिसत होता. त्या शीराच्या तोंडातून हळूहळू पाण्याची खळखळही स्पष्टपणे ऐकू येत होती. दुसऱ्या शीरात तेज तत्वाने प्रवेश केला होता. त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याचे डोळे मध्येच पिवळे, मध्येच लाल तर मध्येच पांढरे पडत होते. त्याच्या मुखातून एखादी वस्तू जळते त्यावेळेस जसा तडतड आवाज येतो त्याप्रमाणे आवाज येत होता. तिसऱ्या शीरात वायू तत्वाने प्रवेश केला होता. त्याचे डोळे धुरकट पांढऱ्या रंगाचे दिसत होते. मध्येच ते राखाडी बनत होते तर मध्येच तिथे फक्त पोकळी असल्याचा भास होत होता. त्याच्या तोंडातून वाऱ्याचा घूघू आवाज आसमंतात घुमत होता. चौथ्या शीरात पृथ्वी तत्वाने प्रवेश केला होता. त्याचे डोळे एकदम काळेकभिन्न दिसत होते. मध्येच ते काहीसे मातकट बनत तर मध्येच हिरवेगार बनत. त्या डोळ्यांकडे पाहणारी व्यक्ती अपोआप तिकडे खेचली जाईल अशी एक चुंबकीय शक्ती त्यात होती. या शीराच्या मुखातून एकाच वेळेस अनेक वेगवेगळे आवाज उमटत होते. पाचव्या शीरात आकाश तत्वाने प्रवेश केला. त्याचे डोळे एकदम निळे पण खोल खोल दिसत होते. काही वेळेस ते मध्येच काळे होत तर कधी लालभडक बनत. त्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपली नजर एका ठराविक अंतरानंतर पाहू शकत नाही, पण तरीही त्यापलीकडेही अनंत, अमर्याद पोकळी भरून राहिलेली आहे असा भास होता होता. पण इतर चार शीरांप्रमाणे या शीराच्या मुखातून कोणताच ध्वनी उत्पन्न होत नव्हता. बाकीची सगळी शीरे अधांतरी तरंगत असताना काहीसे हेलकावे घेत होती पण हे पाचवे शीर मात्र अगदी स्थिर होते. त्यात जरा देखील हालचाल दिसत नव्हती.
थोड्याच वेळात प्रत्येक शिराच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडले. प्रत्येक शीराच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द हा काहीसा घोगरा परंतु धीरगंभीर असा होता.
“कापालिका... आम्हाला का जागवले आहेस?”
“तुम्हाला माझे काम करायचे आहे.”
“कसले काम?”
“थोड्या वेळात आदिनाथ काही लोकांना घेवून किल्ल्यावर प्रवेश करणार आहे. त्याला इथे पोहचू द्यायचे नाही.” कापालिकाने त्यांना हुकुम केला.
“कापालिका... ही खूप मोठी चूक तू करतो आहेस. आदिनाथाला सात्विक शक्तीचे पाठबळ आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्याच्याशी शत्रुत्व करू नकोस...”
“ते तुम्ही मला सांगू नका... मला माहिती आहे, काय करायचे ते. माझी तुम्हाला जितकी आज्ञा आहे तितकेच तुम्ही करा.” कापालिक वैतागलाच.
“ठीक आहे... जशी तुझी मर्जी... पण एक लक्षात ठेव, जर त्याची शक्ती तुझ्यापेक्षा प्रबळ ठरली तर मात्र आम्ही काही करू शकणार नाही...” इतके बोलून एकेक शीर दालनाच्या झरोक्यातून बाहेर पडले.
आदिनाथाने सगळ्यांना बरोबर घेऊन किल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात केली. भर दुपारची वेळ असल्यामुळे सूर्य वरून आग ओकत होता. आदिनाथाला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते. सब. इन्स्पेक्टर आहिरे हे सुद्धा या सगळ्याचा तपास लावायचाच यासाठी झपाटले गेल्यामुळे त्यांनाही त्याचे काही वाटत नव्हते. संगीताच्या आई वडिलांना तर फक्त संगीता सही सलामत परत पाहिजे होती त्यामुळे त्यांचा वेग इतरांपेक्षा जास्त होता. फरफट होत होती ती त्यांच्या बरोबर असलेल्या हावलदारांची. पायथ्यापर्यंत वाहन येत होते पण वर जाण्यासाठी मात्र पायी चढूनच जावे लागणार होते. किल्ल्याच्या माचीपर्यंत काही प्रोब्लेम आला नाही. पण माचीच्या दरवाज्यात आदिनाथाने पाय ठेवला आणि वातावरणात एकदम बदल झालेला सगळ्यांना दिसून आला. खूपच जोरदार सोसाट्याचा वारा सुटला. सगळी कडे फक्त धुळीचे लोट दिसत होते. डोळे उघडून चालणे खूपच जिकरीचे जात होते. एकाएकी वादळाचा वेग भयानक वाढला. आता जे त्याच्या पट्ट्यात येईल त्याला एखाद्या कस्पटाप्रमाणे उडवायला त्या वादळाने सुरुवात केली. आपण सगळे जण वाऱ्याच्या वेगात उडून जाणार असेच आता सगळ्यांना वाटू लागले. तसेही हा किल्ला चढताना बऱ्याच ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या होत्या, काही ठिकाणी जिथे पायऱ्या नव्हत्या तिथे मुरुमामुळे पायाची पकड नीट बसत नव्हती आणि त्यात असे सोसाट्याचे वारे... प्रत्येकाचे कपडे धुळीने पूर्ण माखले गेले असल्यामुळे ते सगळे एकाच मातकट रंगाचे दिसत होते. केसही पूर्णपणे विस्कटले गेले होते. चेहऱ्यावर मातीचा थर जमा झाल्यामुळे एकमेकांची ओळख पटणेही अवघड बनले होते. कोणती तरी अनामिक शक्ती आपल्याला पुढे जाऊ देत नाही याची सगळ्यांनाच खात्री पटली. जिथे उभे राहणे अवघड होते तिथे पुढे सरकणे तर शक्यच नव्हते. सगळे जण फक्त आहे त्या ठिकाणी टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. याही परिस्थितीमध्ये फक्त आदिनाथच काय तो शांत दिसत होता. त्याच्या कपड्यांची आणि चेहऱ्याची अवस्था काही इतरांपेक्षा वेगळी नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही दृढनिश्चय स्पष्ट दिसत होता. थोडावेळ निश्चल उभा राहून आदिनाथाने अंदाज घेतला आणि मग त्याच्या जवळील भस्माच्या झोळीत हात घातला, चिमुटभर भस्म हातात घेतले आणि मोठ्याने गुरुदेवांचे नाव घेवून मंत्र म्हणायला सुरुवात केली. ४/६ ओळींचा तो मंत्र पूर्ण होतो न होतो तोच संपूर्ण वादळ एकाएकी शांत झाले. तिथे इतस्ततः विखुरलेल्या वादळाच्या खुणा काय त्या वादळाची जाणीव करून देत होत्या. पण वातावरण मात्र परत पूर्वीप्रमाणे भासू लागले.
“स्वामीजी... हे काय होतं?” घाबरतच हावलदार सावंतने आदिनाथाला विचारले.
“हे वायू तत्व होते... कापालिकाने आपण तिथे पोहचू नये यासाठी आपल्यावर सोडलं होते”
“आयला... लैच पोचलेला दिसतोय गडी” हावलदार थोरात उद्गारला.
“हो... पोहोचलेला तर आहेच, पण चुकीच्या मार्गाला लागला आहे. याचा उपयोग त्याने लोकांच्या कल्याणासाठी केला तर त्याचे आणि लोकांचे दोघांचेही भले होईल.” आदिनाथाच्या बोलण्यात हळहळ दिसून येत होती.
हे सगळे पाहून काय बोलावे हे सब. इन्स्पेक्टर आहीरेंना मात्र समजत नव्हते. कारण त्यांनी मंदिरात ज्या वल्गना केल्या होत्या, त्या किती फोल होत्या हे त्यांना एरवी चांगलेच लक्षात आले होते. शेवटी त्यांनी न राहवून आदिनाथाला विचारले.
“स्वामीजी... अजूनही असे अडथळे त्याने तयार केले आहेत का आपल्यासाठी?”
“हो... अजून चार तत्व आहेत. जे आपल्याला तिथे पोहोचण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतील. पण आपल्या पाठीशी गुरुदेव आहेत. त्यामुळे काळजी करू नका... फक्त काहीही झाले तरी माझ्या नजरेच्या टप्प्यातून बाजूलाही जाऊ नका...” आदिनाथाने सगळ्यांना ताकीदच दिली.
“आता कसले जातोय बाजूला? घरी सलामत पोहोचलो तरी खूप आहे.” अजून एक हावलदार बोलून गेला.
आता पर्यंत सर्वजण माचीवरील एका पडक्या वाड्याजवळ आले. आता जरी वाड्याची फक्त एक खोली थोडीफार सुस्थितीत होती तरी एकेकाळी हा वाडा नक्कीच भव्य असणार हे त्या ठिकाणी असलेले इतर भग्न अवशेष पाहून लगेच लक्षात येत होते. एकाएकी आदिनाथ थांबला. परत काहीतरी अघटीत घटणार असे त्याचे मन त्याला राहून राहून सांगू लागले. पण काय हे मात्र त्याला उमजेना म्हणून त्याने सगळ्यांना त्या वाड्याच्या खोलीत आश्रय घ्यायला सांगितले. ते त्या खोलीत शिरतात न शिरतात तोच एकाएकी सगळे आकाश भरून आले. जिकडे पाहावे तिकडे काळेढग जमा झाले. एकाएकी ढगांच्या गडगडाटाबरोबर विजा चमकू लागल्या. हे सगळे ढग आपल्या पासून फक्त काही फुटांवर एकमेकांवर आपटत आहेत असे जाणवू लागले. ढगांचा तो आवाज इतका प्रचंड होता की आपण नक्कीच बहिरे होणार असेच प्रत्येकाला वाटू लागले. सगळीकडे अंधार दाटून आला. अगदी सेकंदांच्या अंतराने विजा चमकत होत्या. बाहेर पाहणे तर शक्यच नव्हते. विजांचा तो प्रकाश माणसाला कायमचे आंधळे करण्यासाठी पुरेसा होता. १० मिनिटांपूर्वी जर यातील कुणाला आता पाऊस येणार आहे असे सांगितले असते, तर या सगळ्यांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच पावसालाही सुरुवात झाली. हवेत एकदम गारवा उत्पन्न झाला. आधी काहीसे मोठे असणारे थेंब आता गारांमध्ये परावर्तीत झाले आणि गारा बर्फाच्या मोठ्या दगडांमध्ये परावर्तित झाल्या. गारांचा आकार उत्तरोत्तर वाढू लागला आणि काही वेळात वाड्याची ही खोलीही पावसाच्या आणि गारांच्या या माराने कोसळेल असे वाटू लागले. सगळ्यांचेच चेहरे भयग्रस्त दिसत होते. सगळ्यांचे लक्ष आता फक्त आणि फक्त आदिनाथावर होते आणि त्या वेळेस आदिनाथ मात्र झोळीतील विभूती दोन बोटांच्या चिमटीत धरून आकाशाकडे पहात तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. काही क्षणांच्या अवधीतच त्याने मोठ्याने गुरुदेवांच्या नावाचा जयजयकार केला आणि बोटांच्या चिमटीत धरलेली विभूती बाहेरच्या दिशेला फुंकली. काही क्षणातच पाऊस अचानक बंद झाला, जमा झालेले काळे ढग पांगले गेले आणि आकाश पुन्हा पूर्वीसारखे निरभ्र दिसू लागले. आदिनाथाने सगळ्यांना बाहेर येण्यास सांगितले तोपर्यंत बाहेर रखरखीत ऊन पडले होते.

भाग १३ [अंतिम भाग]
मिलिंद जोशी, नाशिक...
आता मात्र सगळ्यांना आदिनाथ हा एकच तारणहार वाटू लागला. सगळे त्या खोलीतून बाहेर येतात न येतात तोच सूर्याचे ऊन जास्तच कडक भासू लागले. प्रत्येकाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. क्षणापूर्वी पडलेल्या गारांच्या पावसाने ओले झालेले गवत क्षणार्धात कोरडे झाले. साचलेल्या पाण्याची वाफ होऊ लागली आणि हळूहळू आता आजूबाजूची झाडे कोमेजून जाऊ लागली. उन्हाचा उकाडा इतका असह्य झाला की प्रत्येकाच्या अंगाची आग आग होऊ लागली. कुणीतरी आपल्याला जिंवत जाळतो आहे असा प्रत्येकाला भास होऊ लागला. आदिनाथाने काही सांगायच्या आधीच सगळ्यांनी परत एकदा पडक्या वाड्याच्या खोलीचा आसरा घेतला. बाहेरचे वातावरण एकदम बदलले होते. गवताने आपोआप पेट घेतला होता. सगळीकडे आगीचे तांडव दिसत होते. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आगीच्या ज्वाळाच काय त्या दिसत होत्या. हळूहळू ती आग आता वाड्याच्या दिशेने पसरू लागली. प्रत्येकाला आपल्या अंगावरील कपडेही नकोसे वाटू लागले. सगळेजण हाताने, कापडाने पंखा हलवून वारे घेण्याचा प्रयत्न करत होते, पण येणारे वारेही पूर्णतः गरम होते. इतक्या आगीत होणारी जीवाची उलघाल कुणालाच सहन होत नव्हती. बाहेर दिसणारा डोंगर पूर्ण आगीने पेटलेला दिसत होता. सगळ्यांनी वणवा पेटणे म्हणजे काय हे ऐकले होते, काहींनी पाहिलेही होते, पण पेटलेल्या वणव्यात अडकलेल्या जीवांचे काय हाल होतात हे मात्र सगळेजण पहिल्यांदाच अनुभवत होते. सगळे जण असे वेगवेगळे विचार करत असताना मात्र आदिनाथ झोळीतील विभूती दोन बोटांच्या चिमटीत धरून मंत्र म्हणण्यात मग्न होता. खरं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील तो इतका स्थितप्रज्ञ कसा राहू शकतो याचेच आहिरेंना आश्चर्य वाटत होते. काही वेळा नंतर परत एकदा वातावरणात आदिनाथाचा आवाज घुमला. वातावरणात अलख जागवला गेला आणि हवेतील उकाडा एकदम कमी झाला.
जसजसे एकेक अडथळे येत होते तसतसा संगीताच्या आईचा धीर सुटत चालला.
“स्वामीजी... वाचेल ना हो माझी मुलगी? तुम्हीच आता तिचे तारणहार. तिला वाचवा हो...” संगीताच्या आईने अगदी दीनवाणीने आदिनाथाला साकडे घातले.
“काळजी करू नको माई... माझ्या जीवात जीव असे पर्यंत तुझ्या मुलीला मी काहीही होऊ देणार नाही. विश्वास ठेव. तुझी गुरुदेवांवरील श्रद्धाच तुझ्या मुलीचे सुरक्षा कवच आहे हे विसरू नकोस...” आदिनाथाने धीर देण्याचा प्रयत्न केला.
संगीताच्या आईचे ते शब्द ऐकून सब. इन्स्पेक्टर आहिरेच काय तर इतर हावलदारांच्या ही पोटात गलबलून आले. आहिरेंनी आतापर्यंत जरी अनेक केसेस पहिल्या होत्या तरी अशा पद्धतीची ही पहिलीच केस होती. इथे त्यांची सगळी हुशारी, धाडसी वृत्ती आणि सहनशक्ती या सगळ्यांचाच थिटेपणा त्यांच्या लक्षात आला होता. माणूस सगळ्या गोष्टींचा सामना करतो, पण जर अमानवीय गोष्टी घडायला लागल्या तर मात्र तो हतबल होतो. त्याचाच प्रत्यय सगळे घेत होते.
आता अजून कोणते नवीन संकट येते याचा विचार सगळे करत असतानाच एकाएकी पायाखालची जमीन हादरायला सुरुवात झाली. वाड्याच्या इतक्या जाड भिंती पण त्याचे दगडही एकेक करून निखळू लागले. आता इथे थांबलो तर सगळ्यांचा कपाळमोक्ष होणार यात काहीच संशय उरला नाही. त्यामुळे सगळे पटापट पटांगणात आले. डोंगराच्या बाजूने देखील एकेक दगड खाली घरंगळत येऊ लागले. इतकी जाड किल्ल्याची तटबंदी पण त्यालाही चिरा जाऊ लागल्या. परत एकदा सगळ्यांनी आशेने आदिनाथाकडे पाहिले. आदिनाथाच्या चेहऱ्यावर जरा देखील काळजीचे भाव नव्हते. त्यांने परत एकदा गुरुदेवांचे स्मरण केले आणि मंत्र जागवला. क्षणार्धात हलणारी पृथ्वी पूर्वपदावर आली. सगळीकडे शांतता पसरली आणि सगळयांनी परत एकदा सुटकेचा निश्वास सोडला.
सगळ्यांचे जरी चेहरे खुलले होते तरी त्याच्या विपरीत आदिनाथाच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली होती. आता पर्यंत त्याने वायू, आप, तेज आणि पृथ्वी या तत्वांवर जय मिळवला होता, पण उरलेले पाचवे तत्व आकाश. यावर जय मिळवणे मात्र अवघड काम होते. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या चार तत्वांवर त्याने जय मिळवला होता त्या सगळ्यांचे एक अस्तित्व होते. त्यांना जसा उगम होता तसाच अंतही होता. पण आकाश हे तत्व मात्र असे होते कि ज्याला उमग नाही आणि अंतही नाही. जिथे फक्त शून्य आहे. ज्याचे अस्तित्व सगळीकडे असूनही कुठेच नाही. ज्याचे अस्तित्वचं नाही त्यावर जय मिळवायचा हे त्याच्या शक्तीच्या बाहेरचे काम होते. आणि लवकरच त्याला त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली. त्याच्या बरोबरचे सगळे लोकं हळूहळू विस्मरणात जाऊ लागले. त्याला सुद्धा आता त्याचे मंत्र नीटसे आठवेनात. कुणीच कुणाला ओळखेनासे झाले आणि त्याने मोठ्याने गुरुदेवांना हाक मारली.
लांबून आदिनाथाला एक व्यक्ती येताना दिसली. डोक्याला भले मोठे पागोटे, अंगात बंडी, दुटांगी धोतर नेसलेली आणि हातात एक काठी घेतलेला शेतकरी आदिनाथाजवळ आला आणि येताच त्याने आदिनाथाला विचारले.
“तू कोण? तुझा परिचय काय? कुठून आलास आणि कुठे चाललास?”
आदिनाथाला आता डोक्याला खूप ताण द्यावा लागत होता. त्याला कोणत्याच गोष्टी काही केल्या आठवेनात. त्याच्यावर आता आकाश तत्वाने आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली होती. शेवटी कसे तरी करून त्याने गुरुदेवांचे स्मरण केले आणि त्या आलेल्या शेतकऱ्याला उत्तर दिले.
“मी ही तूच, आणि तूच माझा परिचय, मी तुझ्याकडूनच आलो आणि तुझ्याकडेच निघालो आहे.” आदिनाथाच्या उत्तराने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटले.”
“म्हणजे तू शून्य आहेस तर...”
“हो... मी शून्यच आहे. माझे स्वःत्व मी केव्हांच तुझ्यात मिसळले आहे. आता मी असून नसून सारखाच...”
आदिनाथाचे हे उत्तर त्याच्या मुखातून बाहेर पडले मात्र आणि आता त्याला एकेक गोष्टी आठवू लागल्या. त्याचे सगळे मंत्रही त्याला आठवू लागले. इतर मात्र अजूनही आपण कोण आणि आपण इथे कशासाठी आलो आहोत हे सगळे विसरून भ्रमिष्ट बनलेले होते.
“आदिनाथा... अरे आकाश तत्व म्हणजे शून्य. कोणतीच गोष्ट नसणे. कोणतेच अस्तित्व नसलेले ठिकाण आणि त्यावर जय मिळवायचा तर माणसाला स्वतःचे अस्तित्व सोडावे लागते. जर तू तुझा परिचय आदिनाथ असा करून दिला असतास तर मात्र तुला आकाश तत्वावर कधीच विजय मिळवता आला नसता. भौतिक जगात “मी” महत्वाचा आणि आध्यात्मिक जगात “तू” महत्वाचा. ज्या वेळेस तुम्ही “मी” चा त्याग करतात त्याच वेळेस तुम्ही आणि परमात्मा यांच्यातील द्वैत भाव जाऊन त्यांच्यात अद्वैत भाव प्रकट होतो आणि हेच तुला आता पुढील जीवनात सर्वात उपयोगी पडणार आहे. एका परीक्षेत तर तू पास झालास अजून एका परीक्षेत तू पास झालास तर तुला तुझ्या जीवनाचे ध्येय सांगितले जाईल.”
आदिनाथ फक्त हात जोडून ऐकत होता. शेतकऱ्याने सगळ्यांच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवला मात्र आणि सगळ्यांना आता ते कोण आहेत, का आले आहेत या सर्व गोष्टी आठवू लागल्या. तेवढ्या वेळात तो शेतकरी झपझप पावले टाकत नाहीसाही झाला होता.
कापालिकाने इकडे मुख्य पुजेची तयारी सुरु केली. कितीही मोठा योगी असला तरी पंचतत्वांवर विजय मिळवणे शक्य नाही हेच तो समजून चालला होता. बळी द्यायचा तरी तो एका विशिष्ट पद्धतीनेच द्यावा लागणार होता. आणि त्याचीच सगळी तयारी करण्यात तो गढून गेला होता. कापालिकाच्या चेहऱ्यावरील संताप बराच कमी झाल्यामुळे संगीताच्या शरीरातील हडळीने परत किंचाळायला आणि वर खाली होण्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. तसेही कापलिकाला आता तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच होताच कुठे?
एकाएकी दालनाचा दरवाजा उघडला गेला आणि आदिनाथासह पोलीस आणि संगीताचे आईवडील तिथे येवून पोहोचले.
दालनात खूपच अंधुक प्रकाश असल्यामुळे ते दालन आहे त्यापेक्षा जास्त मोठे वाटत होते. कापालिकाचे ते तळघर, ती देवीची मूर्ती, मांडलेली पूजा, एका बाजूला ठेवलेले ते खड्ग आणि वरखाली झोके घेणारी, अगदी पंढरी फटक पडलेली संगीता यांच्याकडे पाहून सगळ्यांचेच धाबे दणाणले. संगीताची आई जोरात “संगीता...” म्हणत तिच्याकडे धावली आणि जेव्हा तिची नजर संगीताच्या नजरेला भिडली त्याबरोबर ती घाबरून चार पावले मागे सरली. तिचे ते घाबरणे संगीताच्या शरीरात बंदिस्त झालेल्या हडळीला खूप छान वाटले आणि तिने एक विकट हास्य केले.
“कापालिका... थांबव तुझे अघोरी कृत्य, मी तुला आदेश देतो आहे” आदिनाथाचा स्वर दालनात घुमला. आदिनाथाच्या या आदेशाने कापालिक उभा पेटला.
“जोगड्या... तू कोण मला आदेश देणारा... बऱ्या बोलानं इथनं निघून जा. माझ्या मार्गात येशील तर फुका प्राणाला मुकशील.” दातओठ खात कापालिक ओरडला.
“हरामखोरा... तुझी नाटकं लगेच बंद कर, नाहीतर परिणाम वाईट होतील.” कापालिकावर पिस्तुल ताणत आहिरे ओरडले.
“ए.... गप बस शिपूरड्या... तुझे ते खेळणे मला काहीही करू शकणार नाही. पाहिजे तर प्रयत्न करून पहा.” अगदी तुच्छतेने आहीरेंकडे पहात कापालिक ओरडला.
कापालिकाचे असे शब्द ऐकून आहीरेंचा राग अनावर झाला आणि त्यांनी कापालिकाच्या दिशेने पिस्तुल झाडले. पण गोळी कापालिकापासून थोड्या अंतरावर थोडी थांबली आणि खाली पडली. खरं तर आहिरे त्यामानाने कोणताच निर्णय असा तडकाफडकी घेणाऱ्यातील नव्हते, त्यामुळे त्यांचे कापालिकावर गोळी झाडणे हे त्यांच्या बरोबर नेहमी राहणाऱ्या सावंतला देखील कुठेतरी खटकले. आपला आपल्या मनावरील ताबा इतका कसा ढासळला ह्याचे नवल आहिरेंनाही वाटत होते. पण आपण झाडलेल्या गोळीचा कोणताच परिणाम कापालिकावर झाला नाही ही गोष्ट त्यांना सगळ्यात जास्त अचंब्यात टाकत होती.
परत एकदा आदिनाथचा आवाज घुमला...
“कापालिका... अजूनही वेळ गेलेली नाही... तुझे उद्योग थांबव.”
“अरे हट... मी तुझ्या बोलण्याला भिक घालत नाही.” असे बोलून त्याने हातात काळी हळद घेतली आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत आदिनाथाच्या दिशेने फुंकली. आता आदिनाथ जागचा हलू शकणार नाही असेच कापालिकाला वाटत होते, पण आदिनाथावर मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. परत त्याने दुसरा मंत्र म्हणत अशीच पूड पुन्हा एकदा आदिनाथाच्या दिशेने फुंकली आणि तीही आदिनाथावर निष्प्रभ ठरली. आता मात्र कापालिक पुरता चवताळला आणि बाजूला ठेवलेले खड्ग घेवून आदिनाथावर धावून गेला. तेवढ्यात आदिनाथाने स्तंभन मंत्राचा प्रयोग करत कापालिकाला जगाच्या जागी खिळवून ठेवले. कापालिकाचे हातपाय आता जडावल्या सारखे झाले. धरती मातेने आपले पाय धरून ठेवले आहेत असा त्याला भास होऊ लागला.
“जोगड्या... तुला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” आता मात्र कापलीकाच्या डोळ्यातून अंगारे बाहेर पडत होते. कापालिकाची ही स्थिती पाहून सगळेच अवाक झाले होते. कापालिकाने तेवढ्यात कालिकेचा जयजयकार केला आणि आदिनाथाने केलेल्या स्तंभनातून स्वतःची मुक्तता करून घेतली. कापालिकाने मोकळे झाल्या बरोबर हातातील खड्ग आदिनाथाच्या दिशेने भिरकावले पण आदिनाथाचा अलख सगळ्या दालनात घुमला आणि त्याचाकडे येणारे खड्ग जगाच्या जागी थांबले. आता मात्र कापालिकाला बांधणे गरजेचे होते. आदिनाथाने झोळीत हात घातला, झोळीतून चिमुटभर भस्म बाहेर काढले आणि “आदेश” म्हणत कापालिकाच्या दिशेने फुंकले. कापालिक पुन्हा एकदा बांधल्या सारखा झाला. पण आता त्यातून मुक्त होण्याचा कोणताच मंत्र त्याला काही केल्या आठवेना. त्याच्यातील सगळ्या शक्ती लोप पावल्या होत्या आणि चरफडण्याखेरीज इतर काहीच त्याला करता येत नव्हते.
“कापालिका... मुक्तीच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडसर म्हणजे सिद्धी मिळणे. तू तुझ्या साधनेने तिथपर्यंत पोहोचलास पण सिद्धी मिळताच अहंकारी झालास. याच अहंकारामुळे तू पथभ्रष्ट झालास. या सिद्धींचा वापर जर तू लोकं कल्याणासाठी केला असतास, तर तुझे खरे कल्याण झाले असते. पण तू त्याचा वापर भौतिक जगातील स्वतःच्या स्वार्थासाठी केलास. तुला जगातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती व्हायचे होते. पण आज तू शक्तिहीन झाला आहेस. स्वतःच्या इच्छेने तू एक पाऊल देखील टाकू शकत नाहीस. पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादा असतात, काही मर्यादा पाळाव्या लागतात. पण तू मात्र त्या सगळ्या गोष्टी आपल्या सिद्धीच्या अहंकारात पायदळी तुडवल्यास. प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घेतल्या नंतर त्यांनाही मरण चुकले नाही तर ते तुला चुकेल असे तू समजलासच कसे? तुझ्या ह्या कृत्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. पण तो अधिकार माझा नाही. पोलीसच तुला ती शिक्षा देतील. त्यानंतर तू ज्यावेळेस शिक्षा भोगून परत येशील त्यावेळेस तुला तुझ्या सिद्धी काही प्रमाणात परत मिळतील. पण त्याचा वापर तू फक्त इतरांसाठीच करू शकशील. स्वतःसाठी तुला तो कधीच करता येणार नाही. आणखी एक... अजूनही वेळ गेलेली नाही. लोकंकल्याण करून स्वतःचे कल्याण साधून घे.” कापालिक फक्त चरफडत आदिनाथाकडे पाहण्यावाचून काहीच करू शकत नव्हता.
“इन्स्पेक्टर... कापालिकाला ताब्यात घ्या. आता तो काहीच करू शकणार नाही.”
“चल... तुला आता पोलिसी खाक्या दाखवतो मी...” आहिरेंनी पुढे होऊन कापालिकाच्या हातात बेड्या घातल्या. त्याला हावलदारांच्या स्वाधीन करून ते आदिनाथाकडे वळले.
“स्वामीजी... मला एक प्रश्न पडला आहे. पण विचारावे की नाही हेच समजत नाहीये...” काहीसे घोटाळत ते आदिनाथाला म्हणाले.
“मला माहिती आहे इन्स्पेक्टर... तुम्ही मला काय विचारणार आहात ते... हेच ना... एरवी अपराध्याच्या अंगावर हात टाकतानाही दहा वेळेस विचार करणारे तुम्ही, एकदम कापालिकावर पिस्तुल कसे चालवले?”
“हो... हो... हाच प्रश्न मला सतावतो आहे.” काहीसे अधीर होत आहिरे म्हणाले.
“त्याचे कारण म्हणजे सध्या या जागेवर असुरी शक्तींचा प्रभाव आहे, त्यामुळे तुमच्यातील राग, द्वेष हे तामस गुण लगेच उफाळून आले. माणसातील अशा गुणांवर नियंत्रण ठेवण्याचेच काम दैवी शक्ती करत असतात.” हे संभाषण चालू असेपर्यंत सगळ्या हावलदारांनी कापालिकाच्या मुसक्या बांधल्या थोड्या अंतरावर संगीताच्या शरीरात बंधन केलेली हडळ थरथरत उभी होती. कापालिकाला पोलीस घेवून जात आहेत हे पाहून ती जवळजवळ ओरडलीच...
“कापालिका... मला मुक्त कर...”
“तो आता स्वतःला मुक्त करू शकत नाही, तुला काय मुक्त करणार?” हावलदार सावंत बेफिकीरीने म्हणाला आणि संगीताच्या आईने पुन्हा एकदा आदिनाथाचे पाय पकडले.
“स्वामीजी... माझ्या मुलीला वाचवा हो.”
“उठ माई. काळजी करू नकोस. गुरुदेव दत्ताचे आशिर्वाद आहेत हिच्या पाठीशी.”
नंतर आदिनाथाने संगीताकडे एकवार पाहिले, झोळीतून चिमुटभर भस्म बाहेर काढले आणि मंत्र म्हणत संगीताच्या दिशेने फुंकले मात्र आणि संगीताच्या शरीरात बंदिस्त असलेले वासनाशरीर बाहेर पडले. त्याबरोबर संगीता भोवळ येऊन खाली पडली. संगीताची आई आणि वडील धावतच संगीताजवळ पोहोचले.
ते वासनाशरीर आता सगळ्यांना दिसत होते.
“स्वामी... माझ्यावर कृपा करा. मलाही या पीडेतून सोडवा...” आदिनाथाकडे पहात ते वासना शरीर उद्गारले. परत एकदा आदिनाथाने गुरुदेवांचे स्मरण केले आणि कसलासा मंत्र म्हटला. त्यानंतर तो त्या वासनाशरीराला उद्देशून म्हटला...
“जा आता... गुरुदेवांच्या आदेशाने मी तुला पुढची गती देतो आहे.” आदिनाथाचे वाक्य पूर्ण होते न होते तोच हळूहळू वासनाशरीराचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आणि काहीवेळाने ते पूर्णपणे दिसेनासे झाले. आदिनाथाने एकदा त्या तळघरातील कालिकेच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार केला आणि सगळे जण तिथून बाहेर पडले.
तळघरातून बाहेर येताच सगळ्यांनी आदिनाथाचे आभार मानले. माचीपर्यंत सगळे बरोबरच होते पण नंतर सगळे ओतुरकडील रस्त्याला लागले. आदिनाथ मात्र सरळच चालत राहिला. इखाऱ्याच्या दिशेने. थोड्याच अंतरावर त्याला परत त्याच्या गुरुदेवांचे शेतकऱ्याच्या रुपात दर्शन झाले. आदिनाथाने लगेच पुढे जावून त्यांच्या पायावर डोके ठेवले.
“उठ आदिनाथा!!! या परीक्षेतही तू पास झालास. कापालिकाला शिक्षा करणे तुला बिलकुल कठीण नव्हते, पण तरीही तू मनात आकस न धरता करुणा ठेवलीस आणि त्याची शक्ती त्याने इतरांना त्रास देण्यासाठी वापरू नये इतकीच तजवीज करून बाकी सगळे त्या परमेश्वरावर सोडलेस. तुला हिच गोष्ट यापुढेही करायची आहे. जे जे संकटात असतील त्यांना त्यातून सोडवणे हेच तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे... जा तुझे कल्याण होईल...”
“जशी आज्ञा गुरुदेव... आदेश...” इतके बोलून आदिनाथाने गुरुदेवांना प्रणाम केला आणि तो पुढच्या प्रवासाला लागला.
***** समाप्त... *****
आपली प्रतिक्रिया अपेक्षित
भयानक अप्रतिम आहे कथा याचा पुढचा भाग कधी येणार आणि तुम्ही प्रतिलिपी वर आहात का?
ReplyDeletePudhacha bhag kadhi yenar hai. Khup bhari ani man halvun takanari katha hai.
ReplyDelete