रघूकाका
डॉक्टर साहेबांनी माथेरानला बंगला बांधला तेव्हापासून रघूकाका देखभालीसाठी बंगल्यावर रहात होते. बघता बघता चाळीस वर्षे उलटून गेली होती. रघूकाकाकांचे खरे नाव काही हे नव्हते. रघूकाका तिथे रहायला आले त्याच वर्षी राजेश खन्नाचा बावर्ची सिनेमा आला होता. त्यातला राजेशने सादर केलेल्या रघूकाका डॉक्टरांच्या बायकोला फार आवडला होता. म्हणून त्यांनी हे नाव त्यांना दिले. बावर्ची सिनेमा पाहिल्यानंतर रघूकाकांनाही ते नाव आवडले होते. मग तेच नाव रूढ झाले, इतके की काकानाही आपले दुसरे काही नाव होते याची आठवणच उरली नव्हती. तो बंगला, त्याची देखभाल, डॉक्टर रहायला आले की त्यांची सेवा यातच रघूकाका विलय पावले होते. त्यांना स्वतंत्र असे काही अस्तित्वच उरले नव्हते.
नाही म्हणायला मधली तीन वर्षे जरा वेगळी उगवली होती रघूच्या आयुष्यात. त्याला जगन्नाथ माळ्याची मुलगी आवडली होती. तीस बत्तीस वर्षांचा रघू जेमतेम वीस वर्षांच्या मीनाच्या प्रेमातच पडला होता. माळी कानडी होता. त्याच्याकडे सहा बंगल्यांचे काम होते. शिवाय त्याचा एक घोडाही होता. शनिवार रविवार तो पठारावर प्रवाश्यांना घोड्यावरून फिरवायचा. त्याला अनेक भाषा अवगत होत्या. त्याची मुलगी मीना दहावीची परीक्षा देवून सुट्टीला बाबांकडे आली होती. उजळ रंगाची आणि हसऱ्या चेहेऱ्याची मीना कोणालाही आवडेल अशीच होती. कानडी मीनाला मराठी किंवा हिंदीचा गंधही नव्हता. पण म्हणतात ना, प्रेमाला भाषा लागतच नाही! त्यांचे प्रेम ‘एक दूजे के लिये’ सारखे फुलत गेले.
डॉक्टरांची बायको मालथी नेहेमीप्रमाणे महिन्याची बेगमी करून द्यायला माथेरानला आली असताना रघूच्या मनातले हे नवे रेशम बंध तिच्या लक्षात आले. तिला गोरी मीना आवडली. मालथी केरळी होती. तिला गोऱ्या रंगाची खूपच आवड होती. डॉक्टर सुद्धा लख्ख गोरे होते. त्या महिन्यात मालथी मीनाला बरोबर घेऊनच बाजार हिंडली होती. मीनाचा स्वभाव तिला आवडला. खरेदी करतानाचा व्यवहारीपणा तिने हेरला. रघूला मीना छान शोभेल असे तिला वाटले. तिने माळ्याशी बोलून त्याची संमती मिळवली आणि रघूचे लग्न लावून दिले.
लग्नानंतरची दोन वर्षे म्हणजे रघूसाठी स्वर्गीयच! म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमच आमच सेम असत! बाकीचे जग मात्र नेहेमी प्रमाणेच सुरू होते. डॉक्टर जाऊन येऊन माथेरानला असायचे. मालथी न चुकता महिन्याच्या अखेरीस येऊन बाजार वगैरे करून जायची. रघुला हातखर्चाचे पैसे आणि मासिक पगार देऊन जायची. मीनाची विचारपूस करायची. नवरा त्रास देत नाही ना असे मीनाला विचारले की ती झक्क पैकी लाजायची!
मीनाचे गांव धारवाडच्या जवळ होते. तिला माथेरानची हिरवाई आणि डोंगर दऱ्या बघून गावाची आठवण यायची. पण ती माथेरानवरही खूश होती. इथला बाजार, मोठ्या शाळा वगैरे तिच्या नजरेतून अपूर्वच होते. रघूची आवड जपण्यात तिचे दिवस छान चालले होते.
एकदिवस तिच्या लक्षात आले की ती आई होणार होती. डॉक्टरांनीही तिला तपासून खात्री करून घेतली. तिच्या संसारात चारही दिशांनी आनंद कोसळत होता. रघूही खूश होता. पण आपल्या आयुष्यातले सुखासमाधानाचे ते शेवटचे वर्ष होते ते त्याला तरी कुठे माहीत होते. नियतीचे काय हिशोब असतात ते नियतीलच ठाऊक. मैनाराघूच्या या सुखाला कोणाची तरी दृष्ट लागली. सातव्या महिन्याची मीना एकदा संध्याकाळच्या वेळी देवळातून घरी परत येत असताना तिला वाटेत एक म्हातारी आडवी आली. मोठा मळवट भरलेला आणि कमरेवर टोपली. त्यात हळद कुंकू आणि बुक्का भरलेला. म्हातारीने बचकभर कुंकू उचलले आणि मीनाच्या कपाळावर आडवे पसरले. मीना जाम घाबरली. तिने म्हातारीचा हात झिडकारून दिला. हातातले कुंकू जमिनीवर सांडले. हा अपशकुन बघून मीना घाबरली. म्हातारी तर भयंकर चिडली होती. तिने मीनाला शिव्याशाप द्यायला सुरवात केली. मीनाला काय करावे सुचेना. ती घाबरून पळून जायला लागली.
पुढे जे घडले ते त्या बाईच्या शापामुळे घडले, मीनाच्या दैवामुळे घडले की कोणाच्या करणी मुळे घडले ते कधीच समजले नाही पण जे घडले ते अतिशय भयंकर होते. मीनाच्या साडीत तिचाच पाय गुरफटला आणि ती पोटावर पडली. एक जीवघेणी कळ तिच्या ओटीपोटातून उठली. तिला जागचे हलताही येईना. जमिनीवर रक्त पसरायला लागले. आजूबाजूच्या लोकांनी कुठून तरी एक खाट मिळवली आणि तिला त्यावर झोपवून मिशन हॉस्पिटल घेऊन गेले. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. रक्तस्त्राव मीनाच्या नाजुक कुडीला झेपला नाही. सात महिन्याची गरोदर मीना आपल्या बाळासकट हे जग सोडून गेली. रघूला निरोप मिळेपर्यन्त सगळे संपलेले होते. ही बातमी मिळताच मालथी माथेरानला यायला निघाली. डॉक्टरांना असे तातडीने जाणे कधीच जमत नसे. मालथीच्या गाडीला चौक फाट्याजवळ अपघात झाला. तिलाही जोरदार दुखापती झाल्या आणि हॉस्पिटल मध्ये सहा महिन्यांकरता अडकून पडावे लागले. इकडे मीनाच्या बाबांनी मीनाच्या अशा अचानक जाण्याची हाय घेतली. ते काही बोलेनासे झाले.
संकटांच्या गराड्यात रघू एकटा पडला. त्याला खायची शुद्ध सुद्धा उरली नाही. मीना गेल्यानंतर तेराव्या दिवशी तो एकटाच ज्या पिंपळाखाली मीनाला अपघात झाला त्या जागेवर गेला. तिथली मीनाच्या रक्ताने माखलेली माती त्याने हातात घेतली. त्याला रडू कोसळले. तो बेभान होऊन रडत होता. अचानक त्याला आपल्या केसांतून कोणाची तरी बोटे फिरत आहेत असा भास झाला. तो दचकला. खरेच त्याला कोणी तरी अंजारत होत. त्याची समजूत काढत होत. त्याच्या डोळ्यातली आसवं टिपत होत. आधी तर तो घाबरलाच. पण त्याला त्या भास होत असलेल्या स्पर्शात मार्दव जाणवले. तो स्पर्श त्याच्या ओळखीचा होता. मीनाचा होता. रघूच्या अंगावर कांटा आला. तो सावरून बसला.
थोड्या वेळाने तिथली माती मुठीत घेऊन तो घरी आला. ती माती त्याने बंगल्यातल्या आंब्याच्या मुळात टाकली. दर अमावास्येला तो आंब्याच्या मुळात दिवा लावायला लागला. तेव्हापासून त्याला बंगल्यात वावरताना सतत मीनाचा भास जाणवायला लागला. त्या दिवसानंतर त्याला कधीच एकटे एकटे वाटले नाही.
डॉक्टरांना आणि मालथीलाही माथेरानला आल्यानंतर कधी कधी कुजबूज ऐकायला यायची, कोणाची तरी चाहूल लागायची. पण त्यांना प्रत्यक्षात कधीच काही दिसले नाही.
पण एक नक्की, त्यानंतर कधीच कोणालाही डॉक्टरांच्या बंगल्याच्या आवारात एकही कुत्रा फिरताना दिसला नाही.
अरुण गाडगीळ
१४ डिसेंबर २०१९.