वासना (अंतिम भाग)-लेखक -संदीप पाटील
अमित पुजारी बाबांनी दिलेल्या पत्त्यावर आला,त्याच्यासमोर वीरभद्राचे राजवाड्यासारखे दिसणारे वीरभद्र पॅलेस उभे होते.आत प्रवेश करताच त्याला शिवशंकराचे मंदिर दिसले. नकळतच त्याची पावले तिकडे वळाली. मंदिरात गेल्यावर तो जागीच थबकला, एक बलदंड शरीरयष्टी असलेला उंचापुरा,गौरवर्णीय तरुण भगवान शंकराच्या पिंडीजवळ विरासनात डोळे लावून ध्यानमग्न बसलेला होता.त्याच्या चेहऱ्यावरील तेज व आत्मविश्वास पाहूनच अमितला आपण योग्य जागी आल्याची जाणीव झाली.वीरभद्र ध्यानातून बाहेर आला,मंदिरातील प्रवेशद्वाराकडे नजर जाताच त्याला विमनस्क अवस्थेतील अमित दिसला. अमित जवळ येऊन त्याने अमितच्या खांद्यावर हात ठेवला,त्याचा हात खांद्यावर पडताच अमितचे अस्थिर मन शांत झाले.वीरभद्रचा सहवास त्याला आश्वासक व निश्चिंत करणारा वाटला. वीरभद्र अमितला त्याच्या खास रूम मध्ये घेऊन आला.अमितकडून सर्व माहिती जाणून घेतली.अमितने रोहितच्या मृत्यूपासून ते अजयच्या मृत्यूपर्यंत सर्व घटना सांगितल्या.वाड्याच्या विषयी सांगताना त्याच्या अंगावर काटा उभा राहल्याचे वीरभद्रच्या नजरेतुन सुटले नाही.अमितने दिलेल्या माहितीवरून वीरभद्रच्या शंकांचे निरसन झाले नाही.तो अमितला म्हणाला की तुला संमोहन अवस्थेत नेऊन अजून माहिती घ्यावी लागेल.अमित कोड्यात पडत वीरभद्रला की मी पूर्ण व सत्य माहिती दिली तरी मग संमोहन का??
वीरभद्र बोलला "तुम्ही बिमार पडल्यावर उपचारासाठी डॉक्टरकडे जाता, तुम्हाला काय त्रास होत आहे हे विचारून डॉक्टर तुम्हाला तपासतो.समाधान झाल्यास औषधे देतो पण समाधान न झाल्यास तुम्हाला रक्त,लघवी तपासायला सांगतो,गरज पडल्यास इतर टेस्ट सांगतो.आम्ही पण एकप्रकारे उपचारच करत असतो व त्यासाठी आम्हालासुद्धा काही टेस्ट करव्या लागतात ,फरक एवढाच की डॉक्टर शरीर तपासतो आम्ही मनाचा वेध घेतो".मानवी मन..ईश्वराचा अद्भुत,असामान्य अविष्कार.मोठमोठे ऋषीमुनी,ज्ञानी मनाला शब्दांत बांधू शकले नाहीत,काबूत ठेवण्यासाठी तपस्या करतात.अघटित घडण्यापूर्वी हेच मन मानवाला वेगवेगळ्या प्रकारे सूचना देत असते.कधी अस्वस्थ होते,कधी अंगावर काटा आणते पण मानव स्वतःच्या अहंकाराच्या, सुशिक्षतीतपणाच्या तोऱ्यात दुर्लक्ष करून संकट ओढवून घेतो व आयुष्यभर रडतो.हेच मन माणसाचा आतील गाभारा दाखवितो.त्यासाठीच संमोहन महत्वाचे.वीरभद्रचे बोलणे ऐकून अमितच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन त्याने वीरभद्रला लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.वीरभद्रने अमितला त्याने बनविल्या खास खुर्चीत बसविले व विशिष्ट संगीत लावुन संमोहनवस्थेत घेऊन गेला.त्याच्याकडून हवी तेवढी माहिती मिळाल्यावर वीरभद्रने त्याला संमोहनवस्थेतुन बाहेर काढले.वीरभद्र गोंधळात पडलेला होता,अमितने दिलेल्या माहितीवरून त्याचे समाधान झाले नाही.त्याने अमितला त्याच्या गावाकडील वाडा दिसलेल्या जंगलाला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली.अमितला या प्रकरणाचा छडा लावायचा असल्यामुळे त्याने दुसऱ्याच दिवशी निघण्यास सहमती दर्शवली पण वीरभद्र ने पुढच्या आठवड्यात जाण्याची सूचना अमितला केली व अमितनेही ती मान्य केली.अमित घरी जाण्यासाठी निघण्याअगोदर आपली भेट व चर्चा गुप्त ठेवण्याचे अमितला सांगण्यास वीरभद्र विसरला नाही.
अमित निघून गेल्यावर वीरभद्र ने या प्रकरणात लागणारे साहित्य एका ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली.त्याच्या अद्भुत अगरबत्ती,विचित्र द्रावण,मानव कवटी,रुद्राक्षभगव्या,काळ्या, लाल धाग्यांना एकत्रित करून बांधलेले मोठे बंडल, राळ,कुंकू,मोठा होम करण्यासाठी आवश्यक असणारे हवन पात्र आणि भगवान परशुरामाच्या परशुशी साधर्म्य दाखविणारा परशु हे सर्व साहित्य मोठ्या बॅग मध्ये भरून ठेवल्यानंतर ध्यानाची तयारी करू लागला.वीरभद्रचे हे एक विशेष होते,कुठल्याही मोहिमेला निघण्याच्या काही दिवस अगोदर तो ध्यानमग्न राहत असे.ध्यान केल्याने मन शांत होऊन सक्षम होते व सक्षम झालेले मन कुणाच्याही बंधनात येत नाही,कुठल्याही परिस्थितीत न डगमगता निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते असे त्याचे मत होते व ते खरेही होते म्हणा.ऋषी, देव,दैत्य ध्यानधारनेचाच वापर करत असत.शक्ती प्राप्त करण्यासाठी,मनःशांतीसाठी,वरदान प्राप्तीसाठी.
मनःशांतीसाठी त्याच्याजवळ अजून एक पर्याय होता,त्याच्या खास अगरबत्ती.त्याच्या अगरबत्ती अद्भुत यासाठी होत्या की त्या लावल्यावर कुठलीही नकारात्मक वा वाईट भावना मानवाच्या मनात येतच नसे.त्याबाबत विश्लेषण देतांना वीरभद्र म्हणत असे "मुळात वाईट व अमानवी शक्ती ह्या मानवाच्या सोबतीशिवाय एकट्या काहीच करू शकत नाहीत,त्या मानवी मनात नकारात्मक विचारांचे जाळे तयार करून मग त्याच्यावर स्वतःचा अंमल प्रस्थापित करतात.या जाळ्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला काही बाह्य गोष्टींची मदत घ्यावी लागतेच.तुम्हाला अनुभव घ्यायचा असलाच तर सकाळी व संध्याकाळी आई,बहीण वा पत्नी पूजा करून देवाजवळ अथवा तुळशिजवळ अगरबत्ती लावते तेव्हा तुम्ही घरी नसले तरी बाहेरून आल्यावर अगरबत्तीच्या वासानेच तुमच मन प्रसन्न होते,तुमच्या दिवसभरातील नकारात्मकता शरीबाहेर जाते.एकदा अनुभव घ्याच".
शेवटी अमितच्या गावाला जायचा दिवस उजाडला.अमित काव्याला त्यांच्या गावाच्या जवळच कंपनीच्या कामासाठी जात असल्याचे सांगून वीरभद्रला घ्यायला वीरभद्र पॅलेस वर आला.वीरभद्र तयारीतच होता पण तत्पुर्वी त्याने अमितला बंगल्यातील महादेवाच्या मंदिरात नेऊन दर्शन घ्यायला लावले व ध्यानमग्न बसण्यास सांगून त्याच्या डोक्यावर हात ठेवत तोंडात काहीतरी पुटपुटण्यास सुरुवात केली.नंतर अमितच्या गाडीत दोघेही अमितच्या गावाकडे निघाले.गावी पोहचल्यावर त्याने अमितला गाडी त्याच्या घरी न घेता सरळ शेताजवळील जंगलात घ्यायला सांगितले.अमितने गाडी जंगलाजवळ आणून उभी केली, येथून पुढे त्यांना पायीच वाटचाल करायची होती.जंगलातुन पायी चालत ते खूप आत आले परंतु वातावरणात कुठलाही बदल नव्हता वातावरण दैन्यनदीन दिवसारखे शांत असल्याचे पाहून अमितला आश्चर्य वाटत होते पण वीरभद्र मात्र झाडे,झुडुपे,पक्षी व वातावरणात होणारे बदल टिपत होता.सध्यातरी त्याने निघतांना मनात जे तर्क बांधले होते ते खरे होत होते.खूप वेळ चालल्यावर ते जिथं अमितला वाडा दिसला त्या जागी आले.तिथे फक्त पिंपळाचे भले मोठे झाड डोळे वटारून त्या दोघांकडे पाहत होते.अमितने याच जागी वाडा दिसल्याचे व वाड्यात पिंपळाचे झाड दिसल्याचे खात्रीपूर्वक वीरभद्रला सांगितले.वीरभद्रने त्या मोठया झाडाला दोन फेऱ्या मारल्या,अमितला इशारा करून त्याच्या मागोमाग येण्याची खुण केली.झाडापासून थोडे दूर आल्यावर चांगली मोकळी जागा पाहून विरभद्रने मोठा षटकोनी आकार काढला व त्याच्याभोवती मंत्र म्हणत अकरा फेऱ्या घालून अमितसोबत त्या षटकोनात प्रवेश केला.अमितला काहीही झाले तरी षटकोणातून बाहेर न पडण्याची सुचना देऊन ध्यानमग्न झाला.ध्यानातून बाहेर आल्यावर त्याचा चेहऱ्यावर चिंता होती तर अमितच्या चेहऱ्यावर प्रश्न.अमितने विचारले की वाड्याचा अनुभव आम्ही घेतला पण आता तिथ वाडा का नाही?यावर वीरभद्र म्हणाला"याच्या दोन शक्यता असू शकतात एक म्हणजे काही गोष्टी घडून येण्यासाठी विशिष्ट परिस्थिती जुळून यावी लागते,चंद्र किती दूर आहे तरीही त्याच्या प्रभावाने समुद्राला भरती ओहोटी येते व दुसरी शक्यता म्हणजे कुलूप त्याच्याच चावी न उघडते दुसरी चावी त्याला लागत नाही तशी या प्रकाराला पण काहीतरी चावी असेलच मग ती वस्तू,व्यक्ती,वार,तिथीच्या रुपात असु शकते,ती चावी शोधावी लागेल".इकडे तुमच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी मी ध्यानात बसलो होतो पण सर्व चित्र अस्पष्ट व धूसर दिसते होते याचाच अर्थ की जागेवर कुणाचा तरी अंमल चालतो पण विशेष वेळेतच.आपण आता तुझ्या गावातील घरी जाऊ तु घरच्यांना माझी ओळख वनस्पती संशोधक म्हणून दे अन काव्याला बोलावुन घे.काव्याचे नाव निघाल्यावर अमितने काव्याला बोलावून घ्यायची खरंच गरज आहे का यावर वीरभद्रने फक्त हो उत्तर दिले.
अमितच्या गावातील घरी पोहचल्यावर वीरभद्रने सांगितल्याप्रमाणे
अमितने ओळख करून दिली.अमितने काव्याला शेताच्या कागदपत्रांवर तिच्या सह्यांची गरज असल्याचे सांगून उद्याच निघायला सांगितले.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काव्या तिथे पोहचली,काव्याला पाहून उर्मिला व सुमित ला आश्चर्य झाले पण अमितने त्यांना कागदपत्रांचा विषय सांगून वेळ मारून नेली.रात्री वीरभद्रने जंगलातील औषधी वनस्पती शोधण्यासाठी सर्वांना जंगलात चालण्याची विनंती केली तेव्हा काव्याला भोवळच आली.वीरभद्र ने काव्याला भीती न बाळगण्याविषयी सांगितले सर्वजण झोपी जाण्यासाठी निघाले,उर्मिलाच्या आसुरी हसण्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते.दुसरा दिवस उजाडला तोच अशुभाचे सावट घेऊन.आकाशात काळ्या ढगांची गर्दी होऊन सर्वत्र अंधारून आलेले होते.थोड्या वेळाने अमित,अमितचा भाऊ,त्याची पत्नी, काव्या अन वीरभद्र जंगलाकडे निघाले, निघतांना वीरभद्र आपली बॅग घ्यायला विसरला नाही.जंगलातील पिंपळाच्या झाडाकडे ते निघाल्यावर मध्येच एक काळे मांजर केस व शेपटी ताठ करून सर्वांकडे पाहत फिस्कारत निघून गेली अन वीरभद्र सावध झाला.त्याने अमितला जर एकमेकांपासून दूर झालोच तर सर्वांना पिंपळाच्या झाडाजवळ वा वाडा दृश्य रुपात आलाच तर वाड्याच्या आत घेऊन यायला सांगितले.थोड्याच वेळात वातावरणात बदल झाले.हवेतील गारठा वाढून सर्वांना हुडहुडी भरली,त्यात ढगफुटीसारख्या पावसाला सुरुवात होवून जवळचेही दिसने कठीण झाले.सोसाट्याचा वारा सुटून ते ढकलल्या जात होते जणू कुठलीतरी शक्ती त्यांना तिच्या इप्सित स्थळी येण्यास बाध्य करत होती.सर्वजण एकमेकांपासून दूर झाले.
एकमेकांपासून दूर झाल्यावर कोण कुणासोबत आहे हे समजायला मार्ग नव्हता.थोड्या वेळाने आकाश निरभ्र झाल्यावर जेव्हा सर्वांनी परिस्थितीचा आढावा घेतल्या तेव्हा उर्मिला व वीरभद्र त्यांच्यात नव्हते.त्या दोघांना सोबत नसल्याचे पाहून अमितला उर्मिलाच्या डोळ्यातील चमक व तिचे छद्मी हसणे आठवुन वीरभद्रच्या काळजीत पडला.इकडे वीरभद्र समोर वाडा उभा होता अन यावेळेस काव्याच्या जागा उर्मिलाने घेतली होती.वाड्यात शिरल्यावर पिंपळाच्या झाडाजवळच्या ओसरीत ते दोघंही आलेत अन अचानक उर्मिलाच्या देहबोलीत फरक पडला.उर्मिला वीरभद्र कडे मादक व घायाळ करणाऱ्या नजरेने पाहू लागली.वीरभद्र तिच्याकडे जायला निघाला तेव्हा तिच्या नजरेत सावज जाळ्यात अडकल्याची चमक होती पण तिने वीरभद्रला ओळखलेच नाही.शिवाच्या गणाचा वीरभद्र चा अंश अन त्याचे नाव घेऊन आला होता तो.एका क्षणाला आसक्त तर दुसऱ्याच क्षणाला विरक्त होण्याची असामान्य क्षमता होती त्याच्यात.तो उर्मिलाजवळ गेला आणि बॅगेतील कुंकू तिच्यावर उधळले.कुंकू अंगावर पडताच उर्मिलाच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत जाऊन ती बेशुद्ध झाली.वीरभद्रने तिला उचलून पिंपळाच्या झाडाखाली आणले,तिच्याभोवती अभिमंत्रित रिंगण केले.तोपर्यंत वीरभद्रने सांगितल्याप्रमाणे अमित इतरांना घेऊन वाड्यात आला.सर्वजण वाड्यात आल्यावर वाड्याचे दार करकरत बंद.वीरभद्रने पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, प्रदक्षिणा घालतानाच तो खिशातून एक एक रुद्राक्ष ठराविक अंतरावर टाकत होता.अचानक पिंपळाच्या झाडाने जोराने सळसळ करायला सुरुवात केली,झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासून होणाऱ्या आवाजाने उरात धडकी भरत होती. पिंपळाच्या झाडाकडे पाहणाऱ्याला झाडावरून दोन डोळे आपल्याकडे रोखलेले दिसायचे तर कधी त्याच्या फांद्यावरून कुणी अंगावर झेप घ्यायच्या पावित्र्यात दिसायचे.वीरभद्र प्रदक्षिणा पूर्ण करण्यातच होता की अचानक कुणीतरी त्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला.वीरभद्र डोळे विस्फारून मारणाऱ्या वैक्तिकडे बघत असतांनाच त्याच्या डोळ्यांसमोर अंधार होत तो बेशुद्ध झाला.
वीरभद्रला मारणारा व्यक्ती होता सुमित,अमितचा भाऊ.घडलेली घटना डोळ्यांनी मेंदूपर्यंत पोहचवली पण मेंदू स्वीकारायला तयार नसल्यावर काही काळ व्यक्ती काय करायचं हे न समजून सुन्न पडते तशी अवस्था अमितची झाली होती.स्वतःच्या सख्या भावाने असे का वागावे हे त्याला कळत नव्हते.वीरभद्र शुद्धीवर आला पण जोरदार झालेल्या वाराने त्याच्यातील त्राण गेले होते.अमितने धावत जाऊन सुमितला धक्का दिला व वीरभद्रला आधार देऊ लागला.त्याने मदतीसाठी काव्याला आवाज दिला आणि त्याच्या आयुष्यातील दुसरा धक्का बसला जो पचविणे जड होते,काव्या सुमितच्या हातात हात घालून हसत होती.अमितला उर्मिलाचा संशय होता पण घडले मात्र वेगळेच.अचानक अमितला काहीतरी आठवले ज्याची दिक्षा निघताना वीरभद्र ने त्याला मंदिरात दिली होती. त्याने काळ्या,लाल धागे पिंपळाला बांधायला सुरुवात केली व तोंडाने पुटपुटत होता
कैलाशपती अर्धचंद्र धारी
जटांच्या लाटा त्रिनेत्र कारी,
भुत पिशाच्च प्रेतांचा संहारी
धाव शंभो आम्हास तारी.
जसजसा अमित पिंपळाच्या झाडाला अभिमंत्रित धागे बांधत होता तसतशी काव्या बंधनात अडकत होती.वीरभद्रने सोबत आणलेला परशु काढून पिंपळाच्या खोडावर जोरदार वार केला तशी वाड्यात किंकाळी घुमली.ती किंकाळी काव्याची होती,काव्याचे रूप जाऊन तिच्या जागी नवीन रूप आकारास येत होते.चेहऱ्यावर मोठमोठे फोड उठत होते,त्यातुन पु बाहेर पडत होता,अर्धा चेहरा जळलेला होता,डोक्यावर केसच नव्हते.काव्या जोरजोरात किंचाळत होती पण बंधनात अडकल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते.तिने सुमित कडे पाहत इशारा केला तसा सुमित अमित व वीरभद्रच्या अंगावर धावून जायला निघाला पण त्याचे पाय हलतच नव्हते.वीरभद्र हसला, त्याने सुमितला जाग्यावरच स्तब्ध केले होते.वीरभद्र आता हातातील परशूने पिंपळाच्या मुळावर वार करायला सुरुवात केली.काव्या त्या वारांबरोबर वेदनेने विव्हळत होती.वीरभद्र तीला म्हणाला "मी तुला दोन प्रकारे मुक्ती देऊ शकतो,त्रासदायक किंवा शांततेत.तुला शांतपणे मुक्त व्हायचे असेल तर सत्य काय ते सांगावे लागेल."
काव्याने वीरभद्रच्या प्रस्तावाचा विचार केला.तसंही तिच्या शक्ती वीरभद्रपुढे कमी पडत होत्या.ती वीरभद्रला म्हणाली "मी अवंतिका.चारशे वर्षापुर्वी या जागी एक नावाजलेले सरदार होऊन गेले,त्यांना दोन पत्नी होत्या.मी दुसऱ्या क्रमांकाची. सरदारांच्या व माझ्या वयात वीस वर्षांच अंतर होते.जास्त वय, सतत युद्धात व राजकारणात राहत असल्यामुळे माझी शारीरिक गरज सरदारांकडून पूर्ण होत नसल्यामुळे मी दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध प्रस्थापित केले.सरदारांना ही गोष्ट समजली,त्यांनी माझ्या अंगावर उकळते तेल टाकून मला जिवंत जाळले.शरीर गेले पण माझी वासना अतृप्तच होती.अमित व काव्याचे गुपित फक्त सुमित ला माहीत होते.अमितमध्ये पुरुषार्थाची कमी असल्यामुळे काव्याला मूल होत नव्हते तशीच तिची शारीरिक गरज पूर्ण होत नव्हती अशातच सुमित व काव्यामध्ये संबंध निर्माण झाले.असेच एकदा अमितचा भाऊ सुमित व काव्या या जंगलात फिरत आले व या पिंपळाच्या झाडाखाली एकमेकांच्या शरीराराचा उपभोग घेत असतानाच माझ्या अंमलाखाली आले.मी ओळखले की दोघंही कामाचे आहेत व दोघंही आपापल्या वासनापूर्तीसाठी काहीही करू शकतात,मी दोघांनाही माझे हस्तक बनविले.सुमित ला मी वाड्यातील खजाना देण्याचे तर काव्याला मूल प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले.या दोघांकडे कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून उर्मिलाचा वापर करून घेत होतो,ती तिच्या नकळत आमच्या अंमलाखाली तिच्यावर संशय येईल अशी वागत होती.हे पिंपळाचे झाड म्हणजे माझे प्रतीक आहे,किंबहुना माझा जीवच त्यात आहे.वीरभद्र आजपर्यंत हे कुणी ओळखुशकला नाही पण तू ते शोधून काढलेस व माझ्यावर आक्रमण न करता झाडावर केलेस म्हणून माझी शक्ती संपली."
काव्याच्या रूपातील अवंतिकाचे बोलणे संपल्यानंतर वीरभद्र ने बोलायला सुरुवात केली."अवंतिका,मी रोहित अन अजय च्या मृत्यूचे नेमके शास्त्रीय कारण जाणण्यासाठी दोघांच्या डॉक्टरांना भेटलो.त्यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले अति संभोग.कारण ऐकून मी पण हैराण झालो,रोहितचे एक वेळ समजू शकतो पण अजयचे तर लग्नसुद्धा झाले नव्हते आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की कुणीतरी अमानवी शक्ती यांच्यासोबत रोज अमानवीय संभोग करत होती व त्यामुळेच हे खंगत खंगत जाऊन मरण पावले.वासना ही फक्त शारीरिक नसते,काव्याला मूलप्राप्तीची वासना होती तर सुमितला वाड्यातील खजिन्याची.कुठल्याही गोष्टींची अती हाव ठेवणे म्हणजेच वासना.दुर्दैवाने आम्ही वासना हा शब्द फक्त एकाच गोष्टीसाठी लक्षात ठेवतो व तो ऐकल्या वा वाचल्याबरोबरच आमच्या भावना चेतविल्या जातात.एक गोष्ट लक्षात घ्या अमानवीय शक्ती अतृप्त व महत्वाकांक्षी माणसांना सहज लक्ष करून आपले हस्तक बनवितात, कारण अशी माणसे आपली सारासार विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात.अरे अमानवीय शक्तींना आपल्या जगात येण्याचे आमंत्रण आपणच देत असतो.कधी स्वार्थासाठी,कधी कुणावर सूड उगविण्यासाठी तर कधी आपल्या विविध प्रकारच्या वासनापूर्तीसाठी.अमानवी शक्तींना बोलावणे सोपे असते पण परत पाठविणे जवळजवळ अशक्य."
एवढे बोलून वीरभद्र ने हवनकुंड लावून त्यात पिंपळाच्या झाडाचे पाने,काटक्या टाकल्या.त्यावर राळ,कुंकू टाकत मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्या वेळाने काव्या व सुमितच्या शरीरातून काळपट धूर निघून पिंपळाच्या झाडात सामावला.सुमित व काव्या भोवळ येऊन खाली कोसळले.वीरभद्रने हवनकुंडातील जळत्या लाकडाचा तुकडा पिंपळाच्या झाडावर टाकला आणि झाड धडाधड पेटले.काही वेळातच त्या झाडाच्या ठिकाणी फक्त राखेचा ढिगारा शिल्लक होता.
अवंतिका पर्व संपलेले होते परंतु झालेल्या प्रकरणात खूप रहस्यांचा भेद झाल्यामुळे अमित,सुमित,काव्या, उर्मिला यांच्या आयुष्यात वितुष्ठ निर्माण होणार होते म्हणून वीरभद्रने सर्वांना संमोहित करून त्यांच्या स्मृती पुसून टाकल्या.
वीरभद्र तेथून निघाला........पुढील आव्हानांसाठी
टीप-सदर कथा ही पुर्णपणे काल्पनिक असून निव्वळ
मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.कथेचा वास्तविक जीवनाशी
कुठलाही संबंध नाही.
समाप्त