#मानसिकता
"भीमा तुक्याची बायको आज बाजारात कुठल्या तरी दुसऱ्या गड्या शी बोलत होती ."
"कोण होता गडी ?"
"काय माहित नाय र , पण बेणं आपल्या गावाचा न्हवत बघ "
"यार असलं र तिचा तिच्या माहेरच्या गावाचा असलं ...."
" व्हय ती शिकायला होती नव कालेज ला तिकडचा यार असलं "
" अरे मग तुक्या ला सांगायला हवं बायको कड लक्ष दे नाय तर गण्या च्या बायको वाणी व्हायचं "
" हा रे ....लगीन झाल्यावर कशाला यारा संग भर बाजारात एवढा वेळ बोलत थांबायचं ..... आन त्यात भर म्हणजे दोघ त्या किसना च्या हॉटेलत जाऊन गप्पा मारत होते . त्या यारा बरोबर बोलत असताना रडत भी होती म्हणे बजा सांगत होता ...."
" बजा कोण ? "
" अरे किसना च्या हॉटेलत कामाला नाय का तो पोरगा . त्यानं सांगितले त्यांचं काय बोलणं चालू होत त्यानं नीट ऐकलं नाय पण जेव्हा तो तिथं चहा द्यायला गेला तेव्हा गण्याची बायको रडत होती . "
" अरे त्या यारा सोबत लग्न झालं नसेल म्हणून रडत असेल ......"
" अरे ती पोटुशी पण व्हती ना , ते पोर गण्याच नसेलच ती नाय का माहेरी गेली होती 1 महिना "
" अरे पण कोण तर म्हणाल तिच्या आई ला लकवा मारला होता आन तिची भावजय भी पोटुशी होती म्हणून ती तिकडं गेली होती म्हणे "
" हे सांगायचं कारण झालं , यारा ला भेटायला असं कस जाणार ना म्हणून असं माहेर च्या लोकांचं कारण पुढ केल"
" अरे देवा असं हाय वय , लईच चालू व्हती की अरे पण मग बायको 1 महिना नाय म्हंटल्यावर गण्या च अवघड झालं असलं की......... "
" अरे गण्याच कशाला अवघड होतय कमळी च घर हाई की गण्या साठी .... गण्याची संबंधी सोय होतीया तिच्या कडे ......."
स्वतःच्या जोक वर हसत भीमा व रामा दोघ बकुळाबाईचा तमाशा पाहून रात्री परत येत होते . चंद्र आणि चांदण्याचा छान उजेड पडला होता . दोघांना गावठी पण चांगलीच चढली होती . थंडीचे दिवस होते . पोटात दारू असल्याने त्या गर्मीत दोघ घराची वाट चालत होते .
" गण्याच्या बायकोने जीव दिला ना र त्या पुढच्या विहारीत , म्या न्हवतो तवा गावात , पण गावात चर्चा चालू होती पावसाळ्याच दिवस होत ..... त्या दिवशी पाऊस लई जोरात कोसळत होता .... तशा पावसात बाहेर पडून तिने त्या पुढच्या विहीरीत जीव दिला . दोन दिवस आभाळ फुटल्यागत पाऊस व्हता . त्या विहीरिच पाणी विहारी बाहेर आलं होत ..... तुक्याच्या बायकोच प्रेत जाम सडल व्हतं .... एवढा की डोक्याचा पार लगदा झाला होता . कुत्र्या नी भी तोंड लावलं नाय येवढ बेकार होत प्रेत . ती मेली तेव्हा ती नुकतीच पोटुशी राहिली होती ......"
"त्या याराला भेटली बाजारात त्या यारान धमकी दिली असलं की तुझ्या नवऱ्याला सांगतो हे पोर त्याच नाय म्हणून , आणि त्या भीती मुळे लगेच 2 दिवसात जीव दिला असलं तिने . गण्या धाय मोकलून रडत होता र ......"
" पण मग आता गण्या एकटाच हाई का ? "
" नाय रे कमळी संग त्याच झेंगाट पार लग्नाच्या आधी पासून हाय .... आन आता दुसऱ्या लग्नाचं बघत हाई असं ऐकायला मिळालं ........"
"अरे त्या विहारी पाशी कोण उभ हाय वाटत चल बघू कोण हाय ......."
रामा व भीमा दारूच्या नशेत चालत चालत विहारी पाशी आले . शरीरयष्टी वरून कोणी तरी बाई माणूस वाटत होत . ते जे कोण होत ते विहारी पाशी पाठमोर उभ होत .
जरा जवळ गेल्या वर समजलं बाई माणूस आहे . . चांदण्याच्या प्रकाशात ती गोरी ललना जास्तच सुंदर दिसत होती . लाल कलर ची साडी , केसांचा बांधलेला अंबाडा , कमनीय बांधा , दोघांना दारूची नशा जास्तच चढली . डोळ्यात जेवढी वासना आणता येईल तेवढी वासना आणून दोघ तिच्या पाठमोऱ्या अंगा कडे बघत होते. बाई पाठीमागून एवढी सुंदर दिसते तर बाई किती देखणी असेल याचा विचार दोघांच्या डोक्यात चालू होता .
" आपण कोण जी .......आणि या वक्ताला इकडं काय करताय जी ?????' """" रामा न एकदम साधेपणाचा आव आणून विचारलं .
" जी मी इथंच राहतीया ..... बाहेरगावी गेलो होतो जी .... गाडी ला उशीर झाला .... म्हणून आता घरी जात होते ... तहान लागली होती ..... विहीर दिसली .....म्हणून म्हंटल जरा पाणी प्यावं जी ..... घशाला लईच कोरड पडली व्हती ......."
मंजुळ आवाजात ती बोलली .
मंजुळ आवाजात ती बोलली .
" आव या इहरिच पाणी नका पिऊ जी ..... काय बाय मेलेलं पडलं असतया ....." रामा विहीरी कडे बघत बोलला .
" आता इहीर म्हंटल की काय बाय मरून पडणारच की ओ मग काय आमी तहान भागावायची नाय का परत ????" मंजुळ आवाजात प्रश्न आला .
" आणि मला तर इहरीत काय मेलेलं दिसत नाय , वाटल्यास तुम्ही बगा या .... उभारा माझ्या जवळ आन बघा इहरीत काय दिसत का ? " परत मंजुळ आवाजात ती बोलली .
बाई स्वतःहून जवळ बोलावत आहे हे बघितल्या वर रामा चा तोल सुटला . तो हळू हळू विहारी जवळ जाऊ लागला
भीमा तिथेच उभा होता ..... ती बाई अजुन पाठमोरी उभी होती . भीमा विचार करत होता . एवढ्या रातीला ही बाई एकटी इथं कशी हाय आणि ते पण याच विहीरी जवळ . आणि अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला . ती हिच विहीर होती ज्यात गण्याची बायकोने जीव दिला होता . त्या बाई च्या डोक्यातील आंबाड्यातुन रक्ताची धार लागली होती . टीपोर चांदण्याच्या त्या प्रकाशात ते दृश्य खूप विचित्र दिसत होत .
रामा अजुन ही ती विहीर बघत होता .
त्या बाई चा चेहरा बघायची रामा ला खूप घाई झाली होती पण तिने चेहऱ्यावरून पदर घेतला होता .
वैतागून त्यानं त्या बाई ला म्हंटल " आईला खरंच की विहीरी मध्ये काही पण मेलेलं पडलं नाय .... तरी तुम्ही पण एकदा बघता का नई म्हंटल बाई माणसाची नजर एकदम तेज असते ......."
" असं व्हय थांबा मग मी भी येते तुमच्या जवळ........" असं म्हणतं ती बाई रामाच्या दिशेने निघाली .
" रामा ही तिच विहीर हाय ना ज्यात गण्याच्या बायकोन जीव दिला होता ....??? " भीमा ने रामाला विचारलं .
रामा विहीरीत बघत असताना अचानक त्याला विहारीत गण्याची बायको दिसली . रामा चा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना . विहीरिच पाणी अचानक वाढू लागलं . तो घाबरून मागे सरकला .
त्या बाई ला म्हणाला " बाई ही विहीर वंगाळ हाय .... आमच्या गावातील गाण्याच्या बायकोन या विहीरीत उडी मारून जीव दिला होता.... ."
" जीव दिला न्हवता मूडद्या .... मला माझ्या नवऱ्यान मारून टाकलं ..... आणि बनाव केला मी आत्महत्या केल्याचा ......."
रामा समोर उभ्या असलेल्या त्या बाई ने चेहऱ्यावरचा पदर दूर केला ..... ती गण्याची बायको होती .... नखशिखांत ओली तिच्या अंगावरून पाणी ओघळत होते .....असं वाटत होत तिने नुकतीच पाण्यातून भिजून आली असावी तिचा पूर्ण नूरच पलटला होता ... तिच मास सडल होत .... डोक्याचा चेंदामेंदा झाला होता ......
रामा ने घाबरून धोतर ओले केले ..... भीमा आणि रामा पळून जायच्या तयारीत होते .
" थांबा मूडद्यानो .... नई तर हितच तुमच्या नरडी चा घोट घेईन .... "ती रागाने म्हणाली .
रामा आणि भीमा तिथच घाबरून उभारले .
" घाबरू नका तुम्हाला मारणार नई मी .... तुम्ही गावात जाऊन सगळं सत्य सांगायचं तरच मी तुम्हाला सोडणार नाय तर तुमच्या मानगुटी वरच बसेन ..... "
" मी आत्महत्या केली नाय ..... राम्या मूडद्या तुझ्या मुळे माझ्या संसारात विष पडलं ..... तूच माझ्या नवऱ्याला सांगितलस ना मी त्या हॉटेलात त्या माणसा बरोबर बसले होते ..... मी रडत होते ......"
" मला .......मला ......मला त्या बजा न सांगितले व्हतं तो बजा तिथे कामाला हाय .... " रामा ने घाबरून उत्तर दिले .
" कुत्र्या तुला आणि त्या बजाला माहित तरी होत का तो कोण हाय ते ? "
"माझ्या माहेरी माझ्या घरा शेजारी राहत होता तो "
"किशोर ..... माझ्या पेक्षा 5 वर्षांनी मोठा होता ..... लहानपणापासून राखी बांधायचे मी त्याला . दादा म्हणतं होते मी त्याला ..... "
"त्या दिवशी त्याच आपल्या गावात काहीतरी काम होत म्हणून तो आला .... त्याच काम झाल्यावर तो परत त्याच्या गावी जाताना त्याला मी बाजारात दिसले ."
त्यांन मला हाक मारली .
मी त्याला माझ्या घरी चल म्हणून खूप विनंती केली .
माझ्या लग्नाच्या वेळी तो न्हवता .
माझ्या सासरच्या माणसाशी माझ्या किशोर दादाची ओळख करून देणार होते . पण त्याला वेळ न्हवता .
म्हणून आम्ही बाजारात बोलत थांबलो . अगदीच आग्रह केल्यानंतर त्यां हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी गेलो .
तिथे गेल्यावर किशोर दादाने सांगितले की त्याची आई वारली . आजारी होती खूप . तिने माझ्यावर माझ्या आई सारखी माया केली होती .
ते ऐकलं आणि मला रडायला आलं . आणि ते तुझ्या बजा ने ऐकलं आणि तुला सांगितलं . आणि तु माझ्या नवऱ्याला सांगितलं .
दोन दिवसांनी माझा नवरा माझ्याशी भांडू लागला . माझ्या पोटात वाढणार मुलं त्याच नाही म्हणून मला मारू लागला .
माझ्या चारित्र्या वर संशय घेतला त्यानं . मला बदफैली ठरवलं त्यानं . ते पण माझं काही ऐकून न घेता .
त्याला एवढा राग आला होता की त्यानं घरातील वरवंटा माझ्या डोक्यात घातला .
पाऊस कोसळत होता .
माझा जीव गेला हे पाहून तो शांत झाला .
तशाच पावसात त्यानं मला ह्या विहीरीत फेकलं .
दोन दिवस पाऊस जोरात पडत होता .
त्यामुळे कुणी घराबाहेर पडलं न्हवत . 2 दिवसानि माझं प्रेत सापडल . सगळं शरीर पाण्यामुळे फुगल होत .... माझ्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता .....
माझ्या नवऱ्यान उठवलं की मी आत्महत्या केली .
ते पण तुझ्या मुळे रामा .
तु माझ्या नवऱ्याच्या डोक्यात संशयाचा किडा सोडलास . आणि त्यानं पण पुढचा मागचा विचार न करता , माझ् म्हणणं ऐकून न घेता मला बदफैली ठरवलं . आणि माझा जीव घेतला .
" आमाला कुठं माहित होत तो तुझा भाऊ हाय ते ..." रामा भीत भीत बोलला .
" अरे मूडद्या माहित न्हवत ना मग आधी माहित करून घ्यायच ."
"एक बाई आणि एक माणूस बोलत असले की त्यांचं लफडंच असत का ? "
उद्या सख्या भावा बरोबर पण बोलत उभ राहिल की तुम्ही लफडं हाय असं बोलणार .
आणि एका बाई मध्ये आणि पुरुषां मध्ये एवढे एकच नातं असत का ? मैत्री सारखं पवित्र नातं असू शकत नाही का ?
तुमच्या सारख्या माणसामुळे आज कित्येक बायकांचे संसार उध्वस्त झाले आहेत .
सगळेच पुरुष वाईट नसतात . पण तुमच्या सारख्या पुरुषांनमुळे समस्त पुरुष जात बदनाम होती .
ह्या जगात चांगले पुरुष पण हाईत . पण तुमच्या सारखे पुरुष त्यांच्या मनात संशय टाकतात .
मैत्री काय फक्त पोरां पोरांनची आणि मुली मुलींची असते का ?
एक मुलगा मुलगी चांगले मित्र असू शकत नाहीत का ?
पण तुम्ही लोक लगेच संशय घेता . तुमच्या मनात पाप असते .
अरे सुख दुःखात साथ देण म्हणजे मैत्री . मग त्यात मुलगा मुलगी असा भेदभाव कस करता ?
आणि माझा नवऱ्यान मला मारलं त्याला फक्त संशय होता तर त्यानं जीव घेतला माझा .
मग माझ्या नवऱ्याच गावातील कमळी बरोबर जे गुण उधळतो ते काय आहे ? लग्ना आधीपासून ते सगळे चालू हाय ते मला माहित नाही असं वाटल ?
पण आपण आपल्या माणसाला चुकीच्या रस्त्यावरून मागे आणलं नाही तर तो असंच भरकटत जाणार ना ? चुका सगळ्यांन कडून होत असतात पण म्हणून त्याची साथ सोडणं हे पण चूक आहे ना .
त्याला प्रेमाने नीट समजावणार का त्याची साथ सोडून त्याला चुकीचं वागण्यासाठी प्रोत्साहन देणार ?
मैत्री खूप पवित्र असती र पण तुझ्या सारख्या माणसान मुळे त्याला डाग लागतो .
" माझ्या बाबतीत जे झाल ते झालं ....मी काय परत येऊ शकत नाय पण हा मी मुक्त भी होणार नाय .....मी कुणाला त्रास नई देणार पण आता जर कुणी स्वतःच्या बायकांनवर विनाकारण संशय घेतला , एखादी बाई आणि पुरुष बोलत असतील आणि त्याबद्दल कुणी कुणाचं कान फुंकल तर रातीला त्याच्या नारडी चा घोटच घेईन मी ...."
"आता जा गावात ..... उद्या सकाळच्याला पोलीसा कड जा आणि समदं खरं सांग ..... माझ्या नवऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे ......"
"तुमची मानसिकता बदला रे खूप प्रगती होईल ..."
रामा आणि भीमा च्या डोळ्यात अश्रू होते . त्यांनी गण्याच्या बायकोला पाहून हात जोडले व गावाच्या दिशेने रवाना झाले .