प्रतापरावांना गेले काही दिवस अस्वस्थ वाटत होते.रात्री त्यांना झोपतांना सतत आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे,कुणीतरी आपल्या आसपास वावरत असल्याचा भास होत होता. रात्री बेरात्री ते किंचाळत उठत,कधी कधी स्वतःशीच रात्रभर बडबड करत होते.त्यांच्या अश्या वागण्याने त्यांची पत्नी,मुले चिंतित होती. नागराज प्रकरणात पोलीसांचा संशय शेवंतावर होता पण ती काहीच बोलत नव्हती.प्रतापरावसुद्धा तिला भेटायला गेले तेव्हा ती फक्त वेड्यासारखी हसत रहायची.प्रतापरावांना पण वाटायचे ती नाटक करते म्हणून.काही महिन्यांनी शेवंताची रवानगी वेड्यांच्या दवाखान्यात झाली.
ती रात्र नेहमीपेक्षा वेगळीच होती.सकाळपासूनच रिपरिप सुरू असलेल्या पावसाने रात्री आपला जोर वाढविला होता.
पावसाबरोबर वारा स्पर्धा लावत होता.बेडकांचे डराव डराव ओरडणे वातावरण अजून गंभीर बनवीत होते.प्रतापरावांना सागवान लाकडाची खूप मोठी ऑर्डर मिळाली होती.त्या ऑर्डर ची रक्कम त्यांना आज मिळणार होती.व्यवहार चोरट्या मार्गाने असल्यामुळे त्यांनी समोरच्या पार्टीला रात्री लाकडांच्या कारखान्यात पैसे घेऊन बोलाविले होते.आपली गाडी घेऊन ते त्या रात्री कारखान्याकडे निघाले पण जाण्याअगोदर एकदा त्यांनी भिंतीवरील कॅलेंडर पहायला हवं होतं.त्या दिवशी अमावस्या होती.
कारखान्यातील सर्व नोकर सहा वाजताच घरी गेले
होते.कारखान्यात पोहचल्यावर ते त्यांच्या वरच्या केबिन मध्ये पोहचले.आपल्या खुर्चीवर बसून त्यांनी थोडा वेळ ऑफिसचे रेंगाळलेली कामे केली.काही वेळ गेल्यानंतर त्यांनी घड्याळात पाहिले,रात्रीचे 9:30 वाजले होते.बाहेर पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता.व्यवहाराची रक्कम घेऊन येणाऱ्या व्यक्तीला कदाचित पावसामुळे उशीर होत असेल असे समजून प्रतापरावानी आपल्या ऑफिस मधील कपाट उघडून त्यातुन व्हिस्कीची बॉटल काढली.ग्लास भरून ते खुर्चीवर बसले, व्हिस्कीचे घोट घेत घेत त्यांनी सिगरेट पेटविली.ग्लासावर ग्लास ते भरत होते.अचानक कारखान्याचा दरवाजा कुणीतरी वाजवत असल्याचे त्यांना जाणवले,ग्लास खाली ठेवून ते कारखान्याच्या बाहेरील दरवाजाजवळ आले,त्यांनी दरवाजा उघडून पाहिले पण बाहेर कुणीच नव्हते.ते दरवाजा बंद करून परत केबिन मध्ये आले.ग्लासात उरलेली व्हिस्की त्यांनी पोटात रिचवून घड्याळात बघितले घड्याळ साडे अकराची वेळ दाखवीत होते.ते केबिन मधून उतरून खाली कारखान्यात आले.त्यांनी पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीला फोन केला तेव्हा समोरची व्यक्ती बोलली "मी सांगितले होते न की पुढचा नंबर तुमचा आहे बरं".
फोन वर बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकून प्रतापरावांच्या डोळ्यापुढे अंधारी येऊन हातातला फोन खाली पडला.हातपाय गळून ते खाली बसले तेवढ्यातच लाकूड कापणारे यंत्र सुरू झाले. थरथरत त्यांनी आजुबाजुला पाहिले तर कारखान्यातील अंधाऱ्या कोपऱ्यातून माकडसारखे चार पायांवर चालत काहीतरी हळूहळू त्यांच्याकडे येत होते.कसेतरी प्रतापराव उभे राहिले.त्यांच्या हृदयाचे ठोके त्यांना स्वतःला लाकूड कापणाऱ्या मशिनच्या आवाजातही स्पष्ट ऐकू येत होते.अंधारातून जे काही त्यांच्या दिशेने येत होते ते उजेडात आले,तिचा चेहरा पाहिल्यावर प्रतापराव गोंधळून गेले.ती शेवंता होती.वेड्याच्या रुग्णालयात असतांना ती इकडे आलीच कशी?दरवाजा बंद असतांना आत प्रवेश केला कसा?या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांना त्यांच लक्ष शेवंताच्या चेहऱ्याकडे गेले अन तो बदललेला चेहरा पाहून त्यांना त्यांचा शेवट जवळ आल्याची जाणीव झाली.शेवंता जवळ येत असल्याचे पाहून त्यांनी धावायचा प्रयत्न केला पण त्यांचे पाय कुणीतरी जखडून ठेवलेले होते.त्यांनी खाली पायाकडे पाहल तर सहा वर्षांच्या मुलाने त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली होती.त्याची मिठी सोडायचा प्रतापरावांनी खूप प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न फोल ठरले. अचानक प्रतापरावांच्या कानावर आवाज आदळला खी..खी..खी..खी.खी.. प्रतापरावांनी आवाजाच्या दिशेने पाहिले अन ते हादरले,शेवंता त्यांच्याकडे हिंस्त्र नजरेने डोळ्यांची पापणी न लवता बघत होती.तिच्या चेहऱ्यावर अचानक खुनशी हास्य आले.तिने मुलाकडे नजर फिरविताच मुलगा प्रतापरावांचे पाय सोडून बाजूला झाला व प्रतापराव हवेत उचलल्या गेले.हवेतून ते त्यांच्या कारखान्यातील लाकूड कापण्याच्या टेबल वर आदळल्या गेले.त्या टेबलच्या एका बाजूला यंत्राच्या साहाय्याने चालणारे मोठे करवतीचे पाते होते, मजुर दुसऱ्या बाजूला उभे राहून लाकूड त्या करवतीच्या बाजूला ढकलून त्याचे दोन तुकडे करायचे.पण यावेळी लाकडाच्या जागी प्रतापराव होते व ते हळूहळू करवतीच्या बाजूने ढकलल्या जात होते.त्यांनी शेवंताच्या शरीरातील स्त्रीला हात जोडून जीवाची भीक मागितली तेव्हा ती स्त्री बोलली " तुम्हाला मी इतके भयंकर मरण देईल की तुमचे प्रेत पाहणारा पण पुढचे कित्येक महिने झोपेतून दचकून जागा व्हायला हवा,एकाला दिले दुसरा तु अन तिसरा नंबर तुझ्या साहेबांचा".हळूहळू करवतीचे पाते प्रतापरावांच्या डोक्याला लागले अन प्रतापरावांच्या जीव पिळवटून टाकणाऱ्या किंचाळ्या बाहेरच्या पावसात विरु लागल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी मजुर कारखान्यात कामाला आले. प्रतापरावांच्या मॅनेजरने दरवाजा खोलला.सर्व आत आल्यावर संपूर्ण कारखान्यात किंकाळ्या घुमल्या.लाकूड कापण्याच्या टेबल वर मधातूनच दोन तुकडे झालेला प्रतापरावांचा देह पडलेला होता. शेवंता वेड्यांच्या रुग्णालयात काहीच घडले नाही अश्या थाटात बडबड करत फिरत होती.पोलिसांना बोलविल्यावर तेही प्रेत पाहून चक्रावून गेले होते.गर्दी वाढत होती.या गर्दीत एक व्यक्ती कारखान्यात घडणारी प्रत्येक गोष्ट साहेबांना कळवीत होता.साहेब म्हणजे साऱ्या पंचक्रोशीत,तालुक्यात व जिल्ह्यात दबदबा असणारे व्यक्तिमत्व.स्वतःचे साखर कारखाने, अफाट शेती याबरोबरच दारूचे,वरलीचे,जुगाराचे अड्डे,राजकारणात घनिष्ठ ओळख असणारे दादासाहेब सरपोतदार.दादासाहेबांच्या घरी लक्ष्मी ओसंडून वाहत होती.नवीन आलेला कुठलाही अधिकारी त्यांच्या घरी वर्णी लावल्याशिवाय जात नव्हता.असे हे दादासाहेब सरपोतदार गेल्या काही दिवसांपासून चिंतीत होते.त्यांच्या दोन माणसांना कुणीतरी अत्यंत निर्घृणपणे मारले होते व पोलिसांना जंग जंग पछाडूनही खुन्यांना पकडण्यात यश आलेले नव्हते. सर्वांची शंका शेवंता वर होती,पण ज्या फुलासारख्या कोमल शेवंताला कित्येकदा उपभोगली ती एवढे क्रूर कृत्य करेल असे दादासाहेबांना वाटत नव्हते.शेवंता मनोरुग्ण झाली असून आपल्या सानिध्यात असणाऱ्या,आपल्याला उपभोगणाऱ्या प्रत्येकाचा खून करण्याविषयी ती सतत बडबड करत असते व नागराज,प्रतापराव ह्यांचे खून तीने ह्याच वेडसर पणाच्या झटक्यात केल्याचा पोलिसांना संशय होता.वेडसर पणाच्या झटक्यात वेड्या व्यक्तीची ताकत कितीतरी पटींनी वाढते व ती व्यक्ती दहा-दहा लोकांना आवरत नाही असे शेवंताला ठेवलेल्या वेड्यांच्या रुग्णालयातील डॉक्टरांचे मत होते. दादासाहेब सतत विचारात रहायला लागले,रात्रीबेरात्री घरी यायला लागले.एवढ्यात त्यांचा मुक्काम त्यांच्या शेतात असलेल्या बंगल्यावर जास्त होत होता. स्वतःला वाटत असलेली भीती ते मदिरा अन मदिराक्षीच्या नशेत घालवायचा प्रयत्न करत होते.त्या दिवशी रात्री सुध्दा ते नेहमीप्रमाणे साखर कारखान्यात जाण्यासाठी निघाले पण आज अमावस्या असल्यामुळे कारखान्यातील वॉचमन सोडून सर्वांना सुटी दिल्याचे ते विसरले.कारखान्यात पोहचल्यावर वॉचमन त्यांना चावी देऊन निघून गेला. त्या कारखान्याच्या आवारातच एका टोकाला छोटा पण टुमदार बंगला तर दुसऱ्या टोकावर असलेल्या मोठ्या खोलीत साखरेसाठी रसवंतीवर ऊसाचा रस काढायला असते तसे खूप मोठे यंत्र होते.दादासाहेब बंगल्यातील प्रशस्त खोलीत आलेत.टेबलावर त्यांना लागणारे सामान अगोदरच मांडून ठेवण्यात आले होते.त्यात उंची मध्याची बाटली,गावरान भाजलेली कोंबडी, तळून तिखतटमीठ लावलेले काजू यांचा समावेश होता.ते खुर्चीवर बसले.ग्लासात पेग भरून पीत पीत समोरच्या मांडलेल्या पदार्थांचा आस्वाद ते घेत होते.अर्धी बॉटल संपविल्यावर ते डुलत डुलत बेडकडे निघाले.बेडवर पडल्या पडल्या त्यांना झोप लागली. मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या छातीवर कुणीतरी बसल्याचे त्यांना जाणवले,दारूचा अंमल असल्यामुळे हळूहळू त्यांनी डोळे उघडले अन समोरचे दृश्य पाहताच त्यांची दारू खाडकन उतरली.त्यांच्या छातीवर एक मुलगा बसलेला होता व त्याचे हात त्यांच्या गळ्याकडे येत होते.पूर्ण ताकदीनिशी दादासाहेब किंचाळत उठले,त्या मुलाला झटकत ते दरवाज्याकडे पळाले अन जागीच थबकले.दारात शेवंता उभी होती,तीने दादासाहेबांच्या डोळ्यात डोळे घातले अन दादासाहेबांचा स्वतावरील ताबा सुटला.शेवंताने त्यांना इशारा केला तसे ते तिच्या मागेमागे निघाले.शेवंता त्यांना उसाचा रस काढन्यासाठी असलेल्या चरख्यासारख्या मोठ्या यंत्राच्या खोलीकडे नेत होती, मागोमाग तो मुलगा पण येत होता.खोलीत आल्यावर उसाचा रस काढणारे यंत्र अचानक सुरू
झाले.दादासाहेबांचे लक्ष शेवंतांच्या चेहऱ्याकडे जाताच ते गोंधळले.शेवंतांच्या चेहरा बदलत जाऊन तिच्या जागी दुसराच चेहरा आला.तो चेहरा पाहताच दादासाहेब ओरडले दिपशिखा
...तुम्ही..
दादासाहेब अचंभीत होते.त्यांना काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवल्या.दिपशिखा राणे ह्या कर्तव्यनिष्ठ पत्रकार होत्या. दादासाहेबांच्या साखर कारखान्यातुन भेसळयुक्त साखरेचा पुरवठा होत असल्याच्या खूप तक्रारी त्यांना आल्या होत्या.त्यांनी दादासाहेबांच्या सर्व काळ्या धंद्याविषयी आपल्या वर्तमानपत्रात लेखमाला प्रसिद्ध केली,त्यामुळे शासनाला दाखल घ्यावी लागून दादासाहेबांच्या साखर कारखान्यावर धाड पडून तो बंद पडला. राजकीय वर्तुळात व समाजात त्यांची नाचक्की झाली.याचा राग मनात ठेवून दादासाहेबांनी दिपशिखा यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नागराजवर सोपवली. मागची ती रात्र अशीच अमावस्येची रात्र होती.दिपशिखा ह्या आपल्या सहा वर्षांच्या मुलासोबत मार्केटमध्ये आल्या असतांना संधी साधुन नागराज व शेवंताने त्यांचे अपहरण करून त्यांना प्रतापरावांच्या लाकडाच्या कारखान्यात आणले.तिथं प्रतापराव व दादासाहेब अगोदरच हजर होते. दिपशिखा यांच्या देखत त्यांच्या मुलाच्या मानेवर नागराजने अर्धा चाकू फिरवून त्याला तसेच तळपत मरण्यासाठी सोडले. सोडले.दिपशिखा ओरडत होत्या,रडत होत्या पण तिघांनाही दया आली नाही.मुलाने आई,आई ओरडत प्राण सोडले.नंतर तिघेही दिपशिखा यांच्या शरीरावर तुटून पडले.रात्रभर तिघांनी त्यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले.इतके अत्याचार झाल्यावर दिपशिखा यांची प्राणज्योत मालवली.नागराज व प्रतापरावांनी त्या दोघांच्या शरीराचे लाकूड कापायच्या करवतीच्या यंत्राने बारीक तुकडे करून त्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले.दादासाहेबांना हे सर्व आठवले व आपले मरण दिसू समोर लागले.शेवंतांच्या शरीरातील दिपशिखा बोलल्या "दादासाहेब सरपोतदार,कस वाटते स्वतःचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहून,त्या दिवशी मी अशीच केविलवाणी होऊन प्राणांची भीक मागत होते, तुम्ही माझ्या शरीराची तर विटंबना केलीच पण माझ्या निष्पाप पोराचा सुद्धा जीव घेतला.तेव्हापासून आम्ही दोघेही मुक्तीसाठी तळपत आहोत आणि ती आम्हाला तुमच्या मृत्यूनंतरच मिळेल".एवढे बोलून त्यांनी मुलाकडे नजर टाकली त्याबरोबर मुलगा दादासाहेबांचा लचका तोडण्यासाठी पुढे आला.
मुलाने दादासाहेबांवर झेप घेतली पण तो दूर फेकल्या गेला.हे पाहून चवताळलेल्या दिपशिखा यांनी दादासाहेबांकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला पण पण त्या जाग्यावरून हलूच शकत नव्हत्या. त्यांच्याभोवती अग्नीने वेढलेले रिंगण तयार झाले, जिवापाड प्रयत्न करूनही त्या ते रिंगण पार करू शकत नव्हत्या.अविश्वास,राग,आश्चर्याच्या भावना दिपशिखा यांच्या चेहऱ्यावर आल्या. दादासाहेबांचे गडगडाटी हास्य त्यांच्या कानांवर पडले.आता गोंधळात पडण्याची वेळ शेवंतांच्या शरीरातील दिपशिखा यांची होती.दादासाहेबांनी आवाज दिला "कपाली" त्याबरोबर एका खोलीतून लांब दाढी,काळे कपडे,डोक्यावर कफन,हातात कवटी,चेहऱ्यावर मोठा व्रण असलेला कपाली मंत्र पुटपुटत बाहेर आला.दादासाहेब दिपशिखाला म्हणाले "मला दादासाहेब म्हणतात,दादासाहेब सरपोतदार,नागराज व प्रताप च्या मृत्यूनंतरच मला शंका आली होती की हे काम शेवंता एकटी करूच शकत नाही.मी ह्या कपालीला घेऊन शेवंताला भेटायला वेड्यांच्या दवाखान्यात गेलो होतो तेव्हाच मला कपालीने ह्यामागे कुणीतरी अमानवी शक्ती असल्याचे सांगितले होते.ती शक्ती तु आहेस हे आता समजल. हा कपाली आहे,अघोरी साधू.तुझ्यासारख्या कित्येक प्रेतात्मा याच्या दासी आहेत.जिवंतपणी तर तुला यातना दिल्याच पण आता मेल्यावरही हा दादासाहेब तुझे काय हाल करतो बघच आता.तुला वाटल तु माझी शिकार करत आहेस पण मीच मुद्दाम तुझ्या जाळ्यात आलो,तुला पकडण्यासाठी".दादासाहेबांनी कपालीला इशारा केला तसा कपालीने आपला मोर्चा दिपशिखा यांच्या मुलाकडे वळविला.त्याने खिशातुन छोटी बाहुली काढली.ती पुढ्यात घेऊन तो मंत्र पुटपुटत होता व त्या बाहुलीवर कुंकू टाकत होता.तिकडे दिपशिखा यांचा मुलगा केविलवाणा होऊन किंचाळत होता.मुलाकडे पाहून दिपशिखा अगतिक होत्या.त्यांनी त्या आगीने वेढलेल्या रिंगणातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्या पुन्हा आत फेकल्या गेल्या.मुलाचा प्रतिकार कमी होत होता,कपालीने समोर आग पेटविली.ती छोटी बाहुली एका हाताने वर उंचावीत म्हणाला "दिपशिखा ह्या तुझ्या मुलाच्या आत्म्याला मी तुझ्यादेखत संपवित आहे,मदत करू शकशील तर कर".त्याचवेळी त्या खोलीचा मोठा दरवाजा धाड आवाज करीत उघडला,काही क्षणासाठी सर्वांचे लक्ष दरवाजाकडे गेले.त्या एका गाफील क्षणाने आपले काम चोख केले.दरवाजावर पुर्ण काळे कपडे घातलेला, सहा फूट उंच,पिळदार शरीरयष्टी, गौरवर्ण,तेजपुंज डोळे आणि चेहऱ्यावर आश्वासक हास्य असलेला युवक उभा होता.तो दमदार पावले उचलत या सर्वांकडे येत होता आणि शेवंताच्या शरीरातील दिपशिखा यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.वीरभद्र होता तो.
वीरभद्र उद्गारला "का थांबलास कपाली,तु तुझे काम कर मी माझे करतो".वीरभद्रला तिथे पाहून कपाली चवताळलला,दोघेही एकमेकांना जाणून होते.फरक एवढाच की वीरभद्र आपल्या शक्तींचा उपयोग चांगल्या कामासाठी करत होता तर कपाली वाईट कामांसाठी.कपालीने आपल्या वर केलेल्या हातातील बाहुली समोर केलेल्या आगीत टाकण्याचा प्रयत्न केला अन तो हादरला.त्याचा हात मनगटापासून छाटल्या गेला होता.खोलीत आल्या आल्याच वीरभद्रने आपला परशु कपालीच्या हाताकडे फेकला होता.त्याची हालचाल इतकी वेगवान होती की कुणाच्याही काहीच लक्षात आले नाही.कपालीने मंत्र म्हणत अमावस्येच्या रात्री मुक्तीसाठी फिरणाऱ्या असंख्य आत्म्यांना आव्हाहन केले.बघता बघता त्या खोलीत वेगवेगळ्या आकाराचे,बीभत्स चेहऱ्याचे अतृप्त आत्मे जमले.कपाली ने त्यांना वीरभद्रच्या दिशेने इशारा केला.वीरभद्रने मंत्र पुटपुटत आपली रुद्राक्ष माला समोर केली.त्याच्या अंगावर धावून येणाऱ्या आत्म्यांना खुण पटली,त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्याच्या आदेशाची वाट पाहू लागले.कपाली आयुष्यात पहिल्यांदाच हे दृश्य पाहत होता.त्याने आव्हान केलेले,त्याच्या अंकित असलेले आत्मेच त्याच्या आदेशाची अहवेलना करत होते.वीरभद्र बोलला "कपाली अस आश्चर्यचकित नको होऊस,वीरभद्र नाव आहे माझे.भगवान शिवाच्या महान गणाचा वीरभद्रचा अंश आहे मी आणि भगवान शिवाला वेताळनाथ म्हणतात".असे बोलत त्याने त्या आत्म्यांना कपाली कडे बोट दाखवत इशारा केला त्याबरोबर ते कपालीवर तुटून पडले.कपालीच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. दिपशिखा यांच्या भोवतीच आगीचे रिंगण नष्ट झाले आता त्या मोकळ्या होत्या.
दादासाहेबांना आपले भविष्य समजून चुकले होते.वीरभद्र दादासाहेबांना म्हणाला "दादासाहेब तुम्हाला वाटल तुमची करणी कुणाला कळणार नाही आणि त्या कैफात तुम्ही पापांवर पाप करत गेलेत पण तुम्ही एक गोष्ट विसरले निसर्गाचा नियम आहे अंधारात केले,पण उजेडात आले.तुम्ही कितीही गुप्तपणे गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उघडकीस येतेच.तुम्ही तुमच्या कारखान्यातील साखरेमध्ये गुप्तपणे गेली कित्येक वर्षे भेसळ करत होते पण ती गोष्ट दिपशिखा ताईंनी उघडकीस आणलीच न.मग त्यांच्यावर, त्यांच्या मुलावर झालेला अन्याय,तुम्ही अंधारात केलेलं पाप त्या उजेडात आणल्याशिवाय कश्या राहतील.अहो हिटलर, सद्दाम,बगदादी यांनी केलेली कृत्ये कालांतराने उघडकीस आलीच ना?शेवटी इतके शतक गेल्यावरही मानवाला सत्ता व संपत्तीच्या कैफाचे दुष्परिणाम समजलेच नाही.श्रीराम,श्रीकृष्ण,यांच्यापासून आपण काही शिकलो नाहीच पण त्याबरोबरच रावण,दुर्योधनापासून सत्ता व संपत्ती कशी नाशास कारणीभूत ठरते याचा धडा घेतला नाही.गेले काही दिवस माझ्या स्वप्नांत दिपशिखा यायच्या,मदतीची विनवणी करायच्या. त्यांना रोखण्यासाठी तुम्ही कुण्यातरी मंत्रिकाच्या संपर्कात असल्याची जाणीव त्यांना झालीच होती. वीरभद्र जरी अमानवीय शक्तींशी लढत असला तरी फक्त वाईट शक्तींशीच.तुम्ही दिपशिखा ताईंदेखत त्यांच्या मुलाला मारून त्यांच्या मातृत्वाला आव्हान दिले अन मग आई कुठलीही असो मानवांतील किंवा जनावरांतील आपल्या लेकरांसाठी लढतेच. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतेच.जिवंतपणी वा मेल्यावरही.माझ्या तराजुच्या पारड्यात दिपशिखा ताईंचं मातृत्व जिंकले,तुम्ही हरलात".एवढे बोलुन वीरभद्र तेथुन निघाला.
ऊसाचा रस काढणारे ते मोठे यंत्र परत सुरू झाले फक्त त्यातून ऊसाचा रस न पडता रक्त बाहेर पडत होते.ते दादासाहेब सरपोतदार यांचे होते.कारण दादासाहेब सरपोतदार उसासारखे त्या यंत्रात घातल्या गेले होते.मागच्या दोन केस सारखाच या केस चा तपास अजुनही सुरू आहे.फक्त ते अपघात समजावे की खून या विवंचनेत पोलीस आताही आहेत.शेवंता वेड्यांच्या रुग्णालयात अजूनही स्वतःशी बडबड करत फिरत आहे कारण तीने अंधारात केलेल्या पण उजेडात आलेल्या गोष्टीची शिक्षा तीला अश्याच प्रकारे आयुष्यभर भोगायची आहे.
टीप-सदर कथा ही पुर्णपणे काल्पनिक असून निव्वळ
मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.कथेचा वास्तविक
जीवनाशी कुठलाही संबंध नाही.या कथेतील पात्रांचा
कुणाशी काहीही संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग
समजावा.
मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.कथेचा वास्तविक
जीवनाशी कुठलाही संबंध नाही.या कथेतील पात्रांचा
कुणाशी काहीही संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग
समजावा.
भाग 1 लिंक