पांढरे सावट..*
२००३ सालची दिवाळीची गोष्ट आहे. त्या दिवशी दिवाळीची अमावस्या होती. त्याकाळी मी साधना क्षेत्रात नुकतेच पदार्पण केले होते. परंतु त्याआधी मी कुठलीही साधना गुरुआज्ञेशिवाय केलीली नव्हती. त्या दिवाळीत माझे गुरुजी गावी गेले असल्याने त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नव्हते म्हणून मी मनोमनच त्यांची आज्ञा घेऊन ठरवलं होतं की आज काहीतरी सिद्धी प्राप्तीसाठी साधना करायचीच. त्यासाठी मी आमच्या शेतावर असलेल्या रुम वर जायचे ठरवले होते. पण जबरदस्त म्हणजे नक्की काशी? अशी कुठली साधना आहे ज्यात थ्रिल अनुभवायला मिळेल? खूप विचारांती मी बगलामुखी साधना करायचे ठरवले. बागलामुखी साधनेविषयी मी माझ्या गुरुजींकडून असे ऐकले होते की, ही साधना खूपच कठीण असते आणि करायला खूपच धैर्य लागते म्हणून सहसा एकट्याने करू नये. तसेच करताना दहावेळेला तरी विचार करायलाच हवा कारण की साधना करत असताना वेगवेगळे आभास, ध्वनी ह्यामुळे माणसाला मानसिक आणि शारीरिक विकलांगता येऊ शकते. ही साधना खूपच कठीण असल्याने एक रात्रीत होण्यासारखी नाही तरीही जर का संक्षिप्त स्वरूपात केली तर कदाचित सिद्ध होऊ पण शकते.
गुरुदेवांचे शब्द आठवून आणि त्यांना मनोमन प्रार्थना करून शेवटी मी तीच साधना करण्याचे ठरवले. बगलामुखी देवी ही दशमहाविद्या पैकी एक आहे. परंतु हिची साधना मोक्ष प्राप्ती इत्यादी साठी करत नसून ती लौकिक आणि भौतिक कामनांसाठी करावयाची असते. शत्रूंनाश, वशीकरण, व्यापार, शत्रूजिव्हाबंधन, शत्रू उच्चाटन ह्या आणि अशाच कारणांसाठी ही साधना केली जाते परंतु ही साधना जर का तुम्ही यशस्वी करू शकलात तर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सिद्धाश्रमात जायचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि ह्याच कारणासाठी मला ती साधना करायची होती. ह्या साधनेसाठी सर्व सामग्री ही पिवळ्या रंगाचीच लागते आणि साधना स्थान पण पिवळेच लागते. सुदैवाने आमच्या शेतातल्या घराच्या भिंतींना पिवळा कलर दिलेला होता. आता फक्त पिवळी साधना सामग्री आणि पिवळी जपमाळ इतक्या गोष्टींचीच आवश्यकता होती. माझाकडे पिवळी जपमाळ, पिवळे आसन आणि इतर काही पिवळ्या गोष्टी ह्या होत्याच. मी सर्व सामग्री घेऊन शेतातल्या घरात दाखल झालो. सोबत माझ्या आत्याच्या मुलाला घेतले होते परंतु त्याला आपण ओली पार्टी करायला चाललोय असे सांगितले होत म्हणून तो तयार झाला होता. त्याची आई मात्र दिवाळी आणि त्यात अमावस्या असल्याने त्याला पाठवायला तयार नव्हती परंतु मी बरोबर असल्याने तिचा विरोध मावळला होता. तिकडे गेल्यावर जेव्हा मी सर्व सामग्रीची मांडामांड करायला घेतली तेव्हा माझ्या भावाला कळले की मी त्याला फसवले आहे पण तो पर्यंत रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. माझ्या भावाला इकडे आणण्याचे कारण म्हणजे खरंतर मलाही जराशी भीती वाटत होतीच कारण ते आमच शेतातल घर खूपच आडवाटेल आहे. शेताच्या त्याबाजूला कुठेही वस्ती नाही आणि आजूबाजूला पूर्ण गवताचे नंबर आहे. शेताला चांगले कम्पाउंड नसल्याने जनावरे म्हणजे इतरांचे गाय, बैल इत्यादी घुसायचे. आमच्या शेतातल्या घराला सर्व दारे खिडक्यांना सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडाचे ग्रील्स बसवले होते तसेच घराचा ओटा पूर्णपणे ग्रील्स लावून बंदिस्त केलेला आहे.
असे असले तरीही भीतीने माझा भाऊ परत जायला निघाला होता पण त्याला मी कसेबसे थांबवून घेतले. त्याला म्हटले की कशाला घाबरतोस मी आहे ना (मुळात मी पण घाबरलो होतोच). त्याने खूप राडा केला पण नंतर शांत झाला. मी त्याला म्हटल की तूला हवं तर तू दुसऱ्या खोलीत जाऊन झोप. आता सगळीकडे गुडूप अंधार पसरला होता. अमावस्या असल्याने चांदण्यांचा काय तो उजेड होता. माझा भाऊ मला मनातल्या मनात आणि आता उघडपणे शिव्या घालत होता की "काय आज अवदसा आठवली आणि तुझ्यासोबत आलो, आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिल इत्यादी इत्यादी",.
मी साधनेला सुरवात केली आणि तो दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. रात्रीचे २ वाजले असतील आणि तितक्यात बाहेरून कसलातरी फसफस, खसखस आवाज येऊ लागला. त्याच बरोबर एक वेगळाच आवाज येऊ लागला आणि वारा सुटण्यासारखा पण आवाज येऊ लागला आणि त्यातच अचानक लाईट गेली त्यामुळे गरम होऊन माझ्या भावाला जाग आली. जाग आली असता त्यालाही ते सर्व आवाज ऐकू आल्याने तो पण खुपच घाबरला आणि थरथरायला लागला. तो माझ्या रूम मध्ये येऊन त्याने मला घाबरून पकडल्यामुळे मलाही अजूनच भीती वाटू लागली. तेवढ्यात घराच्या बाहेरच्या लोखंडी ग्रील्सला कोणीतरी काहीतरी घासत आहे असा आवाज येऊ लागला. मला वाटले की नक्कीच साधना करताना माझ्या हातून काहीतरी चूक झालीय म्हणून हे सर्व घडत आहे. माझा भाऊ खूप घाबरला होता आणि सारख भूत भूत बरळत होता. आता आपला खर नाही, ते आपल्याला मारून टाकतील इत्यादी इत्यादी. आधीच माझ्या भावाने मला हात लावून माझ्या साधनेचे १२ वाजवलेच होते आणि त्यात आता हे सर्व.
मी त्याला शांत राहण्यास सांगितलं आणि सुचवलं की हे बघ भूत वगैरे काही नसते. हा हवेने आवाज येत असेल असे म्हटल्याबरोबर खणं करून मोठा आवाज झाला आणि असे वाटले की लोखंडी दारावर कोणीतरी जोरात धडक दिली आहे किंवा ते कोणीतरी लाथेने उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या आवाजाने तो अजूनच बिथरला. मी परत त्याला म्हटले की असेल भूत तर असुदे के होणार आहे, आपण जाऊन बघूया के आहे ते. तो यायला अजिबात तयार नव्हता म्हणून मी त्याला सांगितले की आपण आधी दाराच्या फटीतून पाहूया आणि नंतरच दार उघडून जाऊया. जारावेळाने आवाज लांब लांब जाऊ लागला तसं मी दाराच्या फटीला डोळा लावला आणि बाहेरचे दृश्य पाहून माझी बोबडीच वळली. ते दृश्य पाहून मी खाली बसूनच पडलो आणि एकदम शांत होऊन शून्यात बघू लागलो. हे पाहून माझा भाऊ मला हलवून विचारू लागला की काय झालं कोण आहे बाहेर. मी डोळ्यानेच इशारा करून त्याला पाहायला सांगितले. त्याने पाहिल्यावर त्याचे ही डोळे उघडेच राहिले. बाहेर ५० फूट अंतरावर ४ पांढऱ्या साड्या घातलेल्या बायका किंवा अजून काही दिसत होत्या. ज्यांचे केस पूर्ण पांढरेशुभ्र होते आणि खाली पायापर्यंत पोहोचले होते. त्या बायका किंवा अजून काही आमच्याच दिशेने पाहून मान हलवत होत्या आणि कधी मागे तर कधी पुढे अशा हालत होत्या.
मधेच त्या एकदमच मागे यायच्या तर मधेच पुढे जायच्या. मधेच घुंगरांसारखे आवाज व्हायचे तर मधेच वेगळीच खसखस, फसफस. ते दृश्य पाहून माझ्या भावाची बोबडीच वळली होती. बाहेर पूर्ण काळोख असल्याने त्या अजूनच उठून दिसत होत्या. आमच्या घराच्या आवारात गवत माजल्याने मधेच त्या कमीजास्त दिसत होत्या. मला वाटले कि कदाचित त्यांनी आम्हाला पाहिले असावे कारण की ते आता मागे मागे सरकत होत्या. आता मात्र आमचे धाबे दणाणले. मी साधनेचे सर्व सामान गुंडाळले आणि भावाला म्हटले की आता जर का आपण इथे थांबलो तर आपले मरण निश्चितच आहे. म्हणून मी मागच्या दरवाजाकडे वळलो आणि फटीतून पाहिले असता दिसले की तिकडे काहीतरी जास्तच गडबड आहे. आम्ही सर्वबाजूने घेरलो गेलो होतो. शेवटी मी भावाला सांगितले की आपण पुढच्या दारावजनेच जायचे. मी दार उघडीन आणि तू पळत सूट. जाताना मोठमोठ्याने ओरडत जा. असे म्हणतात की मोठमोठ्याने बोंबा मारत गेल की भूत लांब पळतात.
मी हळूच दोन्ही दार उघडली तशी त्यांच्यात जराशी हालचाल होतेय असं जाणवलं. माझ्या भावाला इशारा केला तसा तो बोंबा मारत पळत सुटला तसे ते जरासे बाजूला सरकले. तो त्यांच्या पार झाला हे पाहून मी पण पाळण्याची तयारी केली आणि पाळणार इयक्यात मला दिसले की माझा भाऊ पुढे जाऊन माझ्यासाठी थांबला आणि मला इशारा करण्यासाठी मागे वळून माझ्याकडे पाहू लागला आणि खोखो करून जोरजोरात हसायला लागला आणि जमिनीवर लोळायला लागला. त्याचा हा अवतार पाहून मला वाटले की नक्कीच ह्याला भुताने झपाटले आहे म्हणून त्याला वाचवायला मी पण त्याच्या दिशेने धावलो आणि त्याला जाऊन पकडले आणि त्याला नावाने हाका मारायला लागलो असता मला माझ्या जवळच कसलातरी ओळखीचा असा आवाज आला म्हणून मी पण मागे वळून पाहिले तर काय, तिकडे ४ ते ५ पांढरेशुभ्र घोडे गवत खात होते. त्यांची पाठ आमच्या घराकडे असल्याने त्यांचा पांढराशुभ्र पार्श्वभाग आणि त्यावर असलेली झुपकेदार शेपूट ह्यांचा मिळून झालेला आकार अंधारात सेम टू सेम एखाद्या बुटक्या बाईच्या डोक्यासारखा आणि लांबसडक केसासारखा भासत होता आणि आम्ही त्याच पार्श्वभागाला भागाला भूत समजलो होतो.
तर मित्रांनो कधीकधी भीतीमुळे आपली अशी फसगत होऊ शकते म्हणून आधी खात्री करून घ्या आणि मगच विश्वास ठेवा. धन्यवाद.