नैवेद्य पार्ट 2
भीमा बोलला "राम्या सकाळी देवाचं दर्शन न घेताच भाईर पडलो रे आपण ह्ये बघ इकडे देवीचं मंदिर हाय , मंदिरात जाऊ , देवीचं दर्शन घेऊ तिथंच जेवू आणि धानगाव ला जाऊ "
"लई भारी "रामा बोलला , आणि दोघे जण त्या पायवाटे कडे वळले . तासाभरानि दोघांना तो झाडा कडे जाणारा फाटा दिसला तसा रामा भीमा ला बोलला
" भीमा कसलं भारी झाड हाय बघ आणि त्याची फुल बघ रगता वानी लाल हाय ती !!
भीमा बोलला "व्हय र आणि सावली भी लई गार वाटत हाय , चल आधी त्या झाडा खाली जाऊ मस्त जेवण करू थोडा वेळ झोप काढू आणि मग देवीच्या दर्शनाला जाऊ , नाय तरी देवी कुठं पळून जाणार हाय , आणि तेथ काय चोरायाला मिळालं तर मिळालं , 2-3 दिवस बघायला नको . नवीन गावात सोय होईल त्या पैश्यातुन !"
दोघे त्या झाडा कडे जाणाऱ्या फाट्या कडे वळले . सूर्य माथ्यावर आला होता . तासभर चालून , घामाघूम होऊन दोघे त्या लाल फुलांच्या झाडा खाली आले . झाड मोठे होते , डेरेदार होते , जिकडे तिकडं नुसतं फुलांनी भरले होते . लाल फुलांचा नुसता सडा पडला होता .रामानी झाडाची 2 फुल काढली आणि फुलाचा वास घेतला .
" एवढं भारी मोठं फुल आणि फुलाला वासच नाय " रामा बोलला आणि अचानक रामा ला असं वाटले की त्या सर्व फुलांना डोळे आहेत आणि झाडावरची सर्व फुले त्यांच्या कडे वखवखलेल्या नजरेने बघत आहेत , आता रामा ला त्या झाडा खाली अस्वस्थ वाटू लागले होते . तो भीमा ला बोलला
" भीमा इथे कस तरीच वाटत हाय र , गुदमरल्या सारखं , ही जागा वंगाळ वाटतीया "
" हा हा हा , माकडा तुझ्या पोटात भूक लागली की तुझं डोस्क नीट काम देत नाय , अरे मरूदे ती फुल ये इकडं जेवण करूया आधी , पोटात कावळे ओरडत्यात ये इकडं लवकर "भीमा जेवणाची शिदोरी सोडत बोलला .
भीमा आणि रामा दोघांनी मिळून जेवण केल . पाणी पिले . भरपेट ढेकर दिली . का कुणास ठाऊक पण रामाला ती जागा ठीक वाटत न्हवती .
भीमा बोलला " राम्या चल वाईस दोन तास झोप काढू " .
काही तरी वाईट होणार असेल तर आपलें मन आपल्याला धोक्याचा इशारा देत असते आणि असाच इशारा आता रामाला त्याचे मन देत होते . पण मनाचे खेळ असतील म्हणून रामाने तिकडे दुर्लक्ष केले आणि रामा आणि भीमा ने तिथेच असलेले दोन दगड उशाला घेतले आणि दोघे झाडाच्या गारव्यात मस्त झोपी गेले . अचानक रामाच्या गालावर काही थेंब पडले त्याला वाटले झाडाचे पाणी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले आणि कुस बदलून झोपला , परत त्याच्या अंगावर काही थेंब पडले त्याने झोपेतच ते थेंब त्याच्या धोतराला पुसले आणि परत झोपी गेला , आता हळू हळू खूपच थेंब पडू लागले आणि वैतागून रामा डोळे चोळत उठला , 2 मिनिट रामाच्या तोंडातुन शब्दच बाहेर पडेनात , त्याचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते त्याने घाबरून वर पहिले त्याला दिसले त्या झाडावरच्या प्रत्येक फुलाच्या पाकळीला डोळे फुटले आहेत आणि त्यातून रक्त येत होते आणि झाडाची टोकदार मूळे जमिनीतुन वर येत होती , आणि ती मूळे भीमा व रामाच्या पायाला जखडून ठेवत होती , रामाला किंचाळायांचे होते पण त्याच्या तोंडून आवाज बाहेर पडत न्हवता , आणि अचानक त्या पडलेल्या विचित्र स्वप्ना मूळे रामा घाबरून जागा झाला त्याच्या पूर्ण अंगाला घामाच्या धारा होत्या .
क्रमश .....