हडळीचं पोर ! भाग 5
ते 24 तास काही औरच ठरले. त्यादिवशी सकाळपासून बयो खूप आनंदात होती. मी नको म्हणत असतांना तिनं मला खसखसून अंघोळ घातली. डोक्याला सुवासिक तेल लावलं. नवे कपडे घातले. गोडधोड खाऊ घातलं. शाळेचा डबा गोड खाऊने भरला. कपाळावर बुक्का लावला. मला सगळं विचित्र वाटत होतं. पण काही विचारलं तर तिला वाईट वाटेल म्हणून मी काहीच बोललो नाही.
दुपारी शाळा सुटली. मी विचारांच्या तंद्रीत वाड्याकडे परतत होतो. शाळेपासून काही फर्लांग आलो असेल तोच कुणीतरी मागून माझा खांदा गच्च धरला. भीतीची सणक माझ्या मणक्यातून गेली. मी मागे पाहिले...
तोंडावर असंख्य सुरकुत्यांचे जाळे असलेली जख्ख म्हातारी तोंडाच बोळक विचकून हसत होती..
तू बयोचा ना रे ? तिनं विचारलं. तिला यापूर्वी गावात कधीच पाहिलं नव्हतं.
हो..मी धीर एकवटून उतरलो.
हे कपाळावर काय लावलस ? तिने बुक्का लावल्या जागी अंगठा टेकला.
माहीत नाही. बयोने लावला...मी सांगितलं.
एव्हढा अधिकार, एव्हढी माया दाखवतेय..तिला विचार..बाळंतपणासाठी कोणती सुईण आणली होती ते ? म्हातारीच्या डोळ्यात अंगार फुलला होता.
काही वेळ माझे कान, गळा चाचपून आणि मस्तक हुंगून ती तरातरा निघून गेली. वयाच्या मानाने तिच्या चालण्याचा वेग खूप अधिक होता.
आणखी काही प्रश्नांचे नवे वादळ डोक्यात घेऊन मी वाड्यात पाऊल टाकले आणि काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव मला झाली. वाड्यात अभूतपूर्व गारठा पसरला होता. ओसरीत जाऊन पाहिले. तुळईवर उलटे टांगून घेतलेली वटवाघळ कातडी पंखांवर बर्फ साचल्याने शहारली होती. माजघरात जाऊन मी कावळ्यांसाठी काढून ठेवलेले ताट घेऊन चौकात आलो. तुळशी वृंदावनात त्यांचा घास टाकू लागलो. एरवी मला पाहताच झुंबड करणारे ते कावळे आज जणू अनोळखी झाले होते. ते जवळ येईनात. या अनपेक्षित उपेक्षेने मी रडवेला झालो. ते जिथे बसलो होते तिथे अन्नाचे तुकडे फेकू लागलो. पण आज मला त्यांनी वाळीत टाकले होते.
न राहवून मी कळवळून हाक मारली....बयो !!!!
(क्रमशः)
हडळीचं पोर भाग 6 *
माझी हाक वाड्यातल्या काळोख्या कानाकोपऱ्यांवर आपटून विरली. अशा एकापाठोपाठ हाकांच्या लाटा फुटल्या. पण बयोचा कुठेच पत्ता नव्हता. असं प्रथमच घडत होतं. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसणारी बयो माझ्या हाकेला उत्तर देत नव्हती. बयो...कुठं गेलीस तू ?? हे बघ, इथे सगळ्यांनी एकट पाडलय मला ! बयो, माझ्याकडे ये नाहीतर तू जिथं असशील तिथं बोलव मला..
आणि काही वेळानं ती आली. पण ती...ती माझी बयो नव्हतीच जणू ! रणांगणावर अनेक शत्रूंचा फडशा पाडून आलेल्या रणमर्दिनीसारखी ती दिसत होती. अंगात हिरवाकंच शालू होता. काळेभोर केस सागराच्या अजस्त्र लाटा उसळाव्यात तसे हिंदकळत होते. कपाळी गच्च काळ्या रंगाचा मळवट भरला होता. भट्टीतल्या निखाऱ्यांसारखा चेहरा लालबुंद होऊन फुलला होता. तिच्या डोळ्यांकडे तर पाहवत नव्हतं. त्या काळ्याशार डोहात जणू वादळ घुमत होतं. गळ्यात घातलेल्या चित्रविचित्र माळा प्रत्येक पावलागणिक हेलकावे घेत होत्या. तिचा उग्रवतार पाहून मी क्षणापूर्वी काय घडलं ते साफ विसरलो..तिच्याजवळ जाण्याचा धीर मला होईना...
बस्स....बंद करा हे...मी आलेय ! ती गरजली. हा आवाजही निराळा होता. त्यात जरब होती. हुकमत होती. काळालाही रोखण्याचे सामर्थ्य होते..
आणि खरंच काळ थांबला.. मृत्यूच्या स्पर्शासारखा भासणारा तो गारठा अचानक नाहीसा झाला..इतका वेळ माझ्याशी फटकून वागणारे ते कावळे निमूटपणे येऊन त्यांचा घास खाऊ लागले. वटवाघळे थिजलेले पंख झटकून वाड्यात घिरट्या घालू लागली. जणू त्यांच्यावरची अस्मानी आपत्ती टळली होती. कोंदटलेला आसमंत मोकळा मोकळा झाला.
बाळा..इकडे ये !! तिचा नेहमीचा प्रेमळ स्वर कानी पडला आणि इतका वेळ महत्प्रयासाने दाबून धरलेला माझा हुंदका फुटला...बयो !!!असा हंबरडा फोडून मी तिच्याकडे धाव घेतली.
पण तिने मला नेहमीप्रमाणे कवटाळले नाही. मला हातानेच रोखले. चौकातल्या दगडावर बसण्याची खूण केली. पाण्याने भरलेले घंगाळ जवळ ओढले. कमरेचे दोन बिब्बे काढून पाण्यात अनेक वर्तुळे तयार केली. तिने हात बाहेर काढला तरी कुणीतरी आज्ञा दिल्यासारखी ती वर्तुळे फिरतच होती.
(क्रमशः)
-सचिन पाटील