हडळीचं पोर भाग 11*
सकाळचे आठ वाजले असावेत. बयो आसपास नसल्याचे पाहून ते माझ्या कानात पुटपुटले..
आज शाळेत जाशील. पण वर्गात जाऊ नकोस. शाळेशेजारच्या आंब्याखाली मला भेटायला ये. तिला काही सांगू नकोस..
मी मान डोलावली. काही वेळाने दादा घरातून सटकले.
मी तयारी करून शाळेकडे गेलो. बाजूच्या आंब्याखाली दादा उभे होते. मी येताच त्यांनी दूरवर चौफेर पाहणी करून आम्हाला कुणी बघत नसल्याची खात्री करून घेतली. मला घेऊन गर्द झाडीच्या आडोशाला गेले.
माझ्या खांद्यावर हात ठेवून ते बोलत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. आवाज जड झाला होता. भाषा निरवानिरवीची होती.
बाळा, आज केवळ माझ्यामुळे तू दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडला आहेस. माझा स्वार्थ, लोभ आणि त्यासाठी केलेले अघोरी प्रयोग तुझ्या जीवावर उठलेत. मी एका भणंग घरात जन्मलो. सर्वच गोष्टींचा अभाव. कायम ओढगस्त चाललेली. त्यात अघोरी विद्येचा नाद जडला. या सृष्टीत मानवासोबत राहणाऱ्या मात्र अस्तित्व न जाणवू देणाऱ्या शक्ती ओळखायला शिकलो. एका अवसेच्या रात्री नदीकिनारी अघोरी साधना करत असतांना तुझ्या आईला बघितलं. होती नव्हती ती शक्ती पणाला लावून तिला वश केलं. पण शेवटी ती हडळच...तिच्या लोकांत परतण्यासाठी आसुसली आहे. तिचं सामर्थ्य आता कैक पटीने वाढलंय. ती मला सोडणार नाही.. हा वाडा, फुललेली शेती हे वैभव सर्व तिची माया आहे. तिथल्या मातीचा कण न कण तिच्या प्रभावाखाली आहे. या सर्व मायावी आभासांमध्ये एकच निखळ सत्य आहेस...ते म्हणजे तू !..
हडळी मुले जन्माला येऊ देत नाहीत. झालीच तर खाऊन टाकतात. पण का कुणास ठाऊक, तुला तिनं जन्म दिलाच शिवाय आईच्या खऱ्या मायेनं वाढवलही..आणि म्हणूनच मला तुझ्या जीवाची चिंता लागून राहिली आहे. ती पिशाच्चयोनीतली आणि मी मर्त्य मानव..आमच्या अघोरी संसाराचं तू प्रतीक आहेस..स्वतःला जप माझ्या पोरा..मी परमेश्वराजवळ अखेरची आळवणी करील की असा बाप आणि अशी आई कोणत्याच लेकराला देऊ नकोस..
हडळीचं पोर भाग 12
माझी आई सामान्य स्त्री नाही असे मला वाटत होतेच पण मी एका हडळीचा मुलगा असेल ही जाणीवच थरकाप उडवणारी होती. दादांनी ते सत्य सांगून मणामणाचे ओझे माझ्या डोक्यावर ठेवले होते..सोबत ती वस्तूही !!!
रेशमी कापडात गुंडाळलेली एक सुबक छोटी हस्तिदंती पेटी दादांनी माझ्या हवाली केली. ही जोवर तुझ्या ताब्यात आहे तोवर ती तुझं काहीच बिघडवू शकणार नाही. या रहस्याला सांभाळण्याची माझी पात्रता आणि शक्ती आता संपली आहे असे सांगून त्यांनी आणखी एक वस्तू हाती दिली.
ताम्रपटावर अगम्य अक्षरे कोरलेले ते एक यंत्र होते..
जगलो तरच आपली भेट...म्हणून दादा निघून गेले होते. आता ते भेटणार नव्हते...कधीच भेटणार नव्हते. बयोने त्यांचा घास घेतला होता.
तिच्यासमोर बसून हा घटनाक्रम माझ्या डोळ्यापुढून सर्रकन सरकला. किंवा बयोने तो आठवण्यास भाग पाडले असावे. माझ्यासोबत जणू तीही या गोष्टीचा एक भाग होती. कारण आता ती विक्राळ हसू लागली होती.
काय वाटलं तुला, मला कळणार नाही. आंब्याखाली भेटलास ना त्याला ? आयुष्यभर कधी तुझ्या डोक्यावरून हात फिरवला नाही पण नीचपणाचा वारसा कसा अचूक वेळी देऊन गेला..तुम्ही माणसे सगळी एकाच घाणीची..आता बयो अचकटविचकट बोलत होती.
दे..मुकाट्याने ती वस्तू दे नाहीतर तुझा खेळ संपला. बापामागे जाशील..वाकड्या मानेने..उखडलेल्या हातांनी ! तिने दात विचकत मान वाकडी झाल्याचा, हात पिरगळल्याचा हिडीस अभिनय करून दाखवला.
बयो, आणखी किती जीव हवेत तुला ? मी ही चिडलो होतो.
कितीही घेईल..माझ्या वाटेत येणाऱ्या कोणालाच सोडणार नाही. ती म्हातारी...निघाली होती मला वश करायला ! मी हाती लागली नाही म्हणून तुझ्यावर चेटूक केलं. मला इशारा दिला..पारंबीत आवळून मारली तिला. तो कावळा..तुझ्या वंशाचा मुळपुरुष..माझं खरं रूप तुला दिसावं म्हणून त्याने तुझा लचका तोडला...पिसे सोलून मारला त्याला.. बयो बरळत होती.
आणि मग रात्री त्याच्याजवळ का रडलीस ?? मी विचारता झालो.
क्षणभर तिचे हेलकावे थांबले..डोळे व चेहरा नेहमीसारखा झाला..
तुझ्यासाठी रे..तू पोटचा गोळा. तुझी बयो हडळ आहे, पिशाच्चयोनीतली आहे हे समजल्यावर तुझ्या मनाला काय वाटेल म्हणून माझा बांध फुटला...
बयोच्या डोळ्यात पाणी लकाकत होतं. तिची माया उफाळून आली की हडळीचा तो डाव होता हे मला कळत नव्हतं.
(क्रमशः)