हडळीचं पोर भाग 13 & 14
बयोची ही दोन परस्परविरोधी रूपे पाहून मी गोंधळून गेलो. क्षणापूर्वी मला संपवण्याची धमकी देणारी बयो आता पुन्हा माया दाखवत होती. माझ्या गोंधळाचा तिने अचूक फायदा उचलला.
बाळा, आईसाठी एव्हढही नाही करणार का ? ती म्हणाली.
नाही ग बयो, दुसरं काहीही माग. अगदी जीवसुद्धा देईन तुझ्यासाठी ! माझी तयारी भक्कम होती.
ती पुन्हा चिडली, दात ओठ खात किंचाळली.
तुलाही जन्मभर माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे का ? अशी कशी रे तुमची जात?
बयो, मला तुझी सेवा नको.हे वैभव नको, मला फक्त तू हवी आहेस..माझी आई, माझी बयो म्हणून..मी म्हणालो. आता तिची कीव येत होती. सुटकेसाठी चाललेली तिची धडपड पाहवत नव्हती.
ती विरघळली. मला कवटाळून रडू लागली. मी मात्र सावध होतो. बयोला या सर्व प्रकारातून सोडवण्यासाठी मी सज्ज झालो होतो.
बयो, तू पिशाच्चयोनीतली..मग मला जन्म का दिलास? मी अनेक दिवसांपासून कुरतडणारा प्रश्न केला.
बाळा, आम्हाला वश करून सत्ता गाजवणारा मुक्ती मात्र देऊ शकत नाही. त्याचा अंश आमची सुटका करू शकतो. तुझा बाप निपुत्रिक राहिला असता तर मी आयुष्यभर या वाड्यात अडकणार होती. म्हणून तुला जन्म देणे मला भाग पडले..बयोचा स्वर आता कातर झाला होता.
अगं, पण अशी मुलं टिकत नाहीत ना ? मी शंका विचारली.
हो, हडळीची मुले जन्म घेतात खरी पण लगेचच मरतात. ती टिकावीत म्हणून तिला मोठं बलिदान द्यावं लागतं..तू जन्मलास आणि जगलास त्या बलिदानापायीच ! बयो म्हणाली. माझ्यासाठी तिने केलेला त्याग पाहून मी प्रचंड भारावलो होतो.
बयो, त्या पेटीत काय आहे ? मी उत्सुकता दाबू शकलो नाही.
माझ्या केसांची बट आहे. अभिमंत्रित केलेली. ती तुझ्या हाताने माझ्या डोक्यात खोचशील तेव्हाच मी माझ्या लोकांत परतू शकेल. त्या पेटीसोबत ते ताम्रयंत्र जोवर आहे तोवर मी तिला हात लावू शकत नाही.
बयोने एव्हढं सांगितलं ते पुरेसं होतं. आतां तिच्या मुक्तीचा क्षण आला होता. मी तिचा हात धरून म्हणालो.
बयो, चल..तू तुझ्या लोकांत परत जा. आता तुझ्या हातून आणखी बळी जाऊ देणार नाही.
(क्रमशः)
हडळीचं पोर भाग 14 *
त्या मध्यरात्री बयो नखशिखांत नटली. ती हस्तिदंती पेटी खिशात घालून मी तिचा हात धरून वाड्याबाहेर पडलो. आमच्यामागे काही अंतरापर्यंत आलेले कावळे, वटवाघळे चित्कारत पांगले. त्यांची स्वामिनी निघाली होती. आपल्या मायेने हा वाडा तोलून धरणारी बयो, जिच्या नजरेने सर्वांचा थरकाप व्हायचा ती बयो कायमची निघाली होती.
नदीकाठी पोहचल्यावर आम्ही थांबलो. तिथे बयोने अंगावरचा साजशृंगार काढून माझ्याकडे दिला. डोक्यावरचे दाट केस किंचित बाजूला केले. मी त्या पेटीतली बट काढून तिच्या डोक्यात खोचली. त्यासरशी ती अधिक तेजस्वी दिसू लागली. मला तिने उराशी कवटाळले. तिच्या डोळ्यातले कढत अश्रू माझे डोके भिजवत होते. मी हंबरडा फोडला..
बयो, मला सोडून जाऊ नकोस ग !!!
बाळा, तुझ्यासाठी मला जावेच लागेल रे..तू जगलास तो माझ्या आयुष्यातून दिलेल्या वाट्यावर..मी जगले तर तू फार दिवस जगायचा नाहीस..आणि माझ्यासमोर तू संपलेला मी कसं पाहू शकेल ? हडळ असली तरी मी एक आई आहे!! म्हणत तिने निग्रहाने मला दूर लोटले.
बयो थांब ! एक सांगायचं आहे. मी ओरडलो.
ती थबकली...
बयो, दादांना माफ करशील? ! मी निरोप दिला.
डोळ्यातलं पाणी कसोशीने लपवण्याचा प्रयत्न करीत ती पाण्यात शिरली. किंचित उजाडलं होतं. तिच शरीर हळूहळू वितळत होतं. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या हडळीच्या पोराचे अश्रू पाण्यात मिसळत होते.
.........
हा इतिहास डोळ्यापुढे उभा करीत मी बयोच्या महावस्त्रासमोर उभा होतो. शेजारी सविता, माझी पत्नी कधी येऊन उभी राहिली ते कळलेच नाही.
ती स्वप्नाळू डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती.
किती छान आहे ना हा वाडा ? असं वाटतं इथून परत जाऊच नये...ती म्हणाली.
मी मात्र वेगळ्याच चिंतेत होते. दादांचा एक वारसा मला लाभला होता.
या सविताच्या केसांची बट कुठेतरी सुरक्षित स्थळी लपवून ठेवावी लागणार होती.
तिला होणारं मूल माझ्यासारख समजदार नसेल तर ???
समाप्त..!!
सचिन पाटील