पुन्हा 'तुंबाड' : निसटून गेलेलं काही...
'तुंबाड' दुसऱ्यांदा पाहतानाही भीती होतीच. भीती हा या चित्रपटाचा गाभा आहे. पण यावेळी तेवढंच नव्हतं. भीतीपेक्षा घृणा जास्त होती. हस्तरबद्दल नाही. एका क्षणानंतर हस्तरबद्दल करुणाच वाटू लागते. त्याच्या मोहाची शिक्षा त्याला मिळालीय. तो शेवटी शापित जीव आहे. पण विनायकचं काय? राघवचं काय? विनायकच्या मुलाचं काय? "सुना है वहाँ खज़ाना है" "हाँ, है... जाओ, लूट लो..." या विनायक आणि राघवमधल्या संवादानंतर दोघे ज्या राक्षसी पद्धतीने अक्राळविक्राळ हसतात, ते जास्त भयावह आहे. घृणास्पद आहे. हस्तर हे रूपक आहे फक्त. क्लायमॅक्सच्या दृश्यात हस्तरची अनेक रूपं तयार होणं हे माणसाच्या वाढत जाणाऱ्या लालसेचंच प्रतीक आहे. सगळं सोनं आणि धान्य गडप करू पाहणाऱ्या हस्तरमध्ये, विनायकमध्ये, राघवमध्ये, विनायकच्या मुलामध्ये मी हळहळू माझ्या नकळत स्वतःलाच पाहू लागतो आणि आजूबाजूच्या माझ्या माणसांनाही. पैसा गाठीशी असला आणि अॅमेझॉन वगैरे साईट्सवर सेल चालू असला की माझे डोळे चमकतात. गरज नसतानाही मी सगळी लिस्ट स्क्रोल करून पाहतो. शूज, कपडे, आणखी काहीबाही कार्टमध्ये भसाभस अॅड करतो आणि क्रेडिट कार्डवर खरेदी करतो. मोकळा वेळ असला की झोमॅटोवर मुंबईतली वेगवेगळी रेस्टॉरंट्स मी पालथी घालतो. भूक संपतेच कधीतरी, पण जिभेचे चोचले संपत नाहीत. एकदोन सुवर्णमुद्रांनी भूक भागते, पण हाव संपत नाही. पूर्वी इंटरनेट नव्हतं, तेव्हा इंग्रजी दैनिकांच्या झुळझुळीत पुरवण्यांवर येणाऱ्या कमनीय देहांच्या अंतर्वस्त्रांच्या, काँडोम्सच्या, बॉडी सप्लिमेंट्सच्या जाहिरातींनीही कामवासना शमत होती. आता मात्र वेगवेगळ्या पॉर्न साईट्स हुडकून काढूनही मन शांत होत नाही. मुक्ती मिळत नाही. आजूबाजूला मी मॉडेलिंग आणि चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांव्यतिरिक्त इतर लोकांनाही असलेलं बारीक होण्याचं किंवा जाड होण्याचं, एका विशिष्ट साच्यात बसणारं शरीर मिळवण्याचं लागलेलं व्यसन पाहतो, तेव्हा पुन्हा विनायकच आठवतो. सण-समारंभांना ट्रेडिशनल डे वगैरे साजरे करून संस्कृतीचा अभिमान वगैरे गोष्टी हावरटासारख्या ओरबाडून घेतानाही लोक माझ्याच आजूबाजूला दिसतात. मीही त्याला अपवाद नसतो आणि त्यात मला दुर्दैवाने काही गैरही वाटत नसतं. सद्सद्विवेकबुध्दीचा एकदा विसर पडला की काय योग्य आणि काय अयोग्य? प्रमोशन मिळूनही हवी तशी पगारवाढ न मिळालेले लोकही दुःखी, पगारवाढ मिळाली पण ऑनसाईट जायला मिळालं नाही म्हणूनही लोक दुःखी आणि यावर कडी म्हणजे स्वतःचं प्रमोशन, पगारवाढ सगळं होऊनही दुसऱ्यालाही ते स्वतःपेक्षा जास्त किंवा तेवढ्याच प्रमाणात मिळालं, तरीही दुःखी असणारे लोक माझ्या आजूबाजूलाच आहेत. हे लोक 'तुंबाड'मधल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळे कसे? स्वतःच्या मनाला कितीही समजावण्याचा खोटा प्रयत्न केला की मी त्यातला नाही, तरी आरशासमोर स्वतःला फसवता येत नाही. स्वतःच्या लिखाणाची मला किंमत कळू लागली, तेव्हा जिथे छापून येतं पण त्या लिखाणाचे अजिबात पैसे मिळत नाहीत, तिथे लिहायचं नाही, असे निर्णय मीही अधूनमधून घेतले आहेत. त्यामुळे मीही त्या विनायकच्याच जातकुळीत जाऊन बसतो... शेवटी या दुष्टचक्रातून मुक्ती मरणानंतरच... त्या आजीसारखी... राघवसारखी... विनायकसारखी...
>'तुंबाड' : भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक अद्भुतरम्य सोनेरी पान
>'तुंबाड' : भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक अद्भुतरम्य सोनेरी पान
'रॉकस्टार' चित्रपटातला एक डायलॉग पुनःपुन्हा आठवत राहतो... "टूटे हुए दिल से ही संगीत निकलता है..." 'तुंबाड' पाहायला जाण्यापूर्वी अमोल सरांनी राही अनिल बर्वे यांच्यावर लिहिलेला लेख वाचला आणि आज चित्रपट पाहिला तेव्हा हेच वाक्य आठवत राहिलं. १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकारलेली ही कलाकृती म्हणजे फिल्ममेकिंगचं स्कुल आहे. दिग्दर्शन, संगीत, पार्श्वसंगीत, अभिनय, स्पेशल इफेक्ट्स, कथा, पटकथा, छायाचित्रण, कपडेपट, कला दिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट उत्कृष्ट आहे. पण ही पोस्ट त्याबद्दल नाही. भीतीच्या त्या अनुभवाबद्दल आहे. धारपांच्या ज्या कथांवर चित्रपट बेतलेला आहे, त्या मी वाचलेल्या नाहीत. पण तशा प्रकारच्या भयकथा, गूढकथा वाचलेल्या आहेत. त्यामुळे कागदावर असलेली लेखकाची फँटसी रुपेरी पडद्यावर साकारताना किती श्रम घ्यावे लागतात याची कल्पनाच करता येऊ शकते फक्त. चित्रपट हे दृश्य माध्यम आहे, याचा आपल्याला अधूनमधून विसर पडतो आणि त्याची पुसली जाणार नाही अशी जाणीव हे असे शतकातून कधीतरी साकार होणारे चित्रपट करून देत असतात. चित्रपटगृहातल्या अंधाराला, शांततेला अर्थ मिळवून देणारा हा चित्रपट आहे. भयाने मनाला वेढा घालायला सुरुवात केलेली असतानाच कथा मानवी षड्रिपूंच्या अक्राळविक्राळ घाणेरड्या रूपाचं आपल्याला दर्शन करून देते. पडद्यावर जे चाललंय ते सत्य नाही हे माहित असूनही काळजाचा थरकाप उडतो. 'सात खून माफ'मधला नसिरुद्दीन शाह यांचा डायलॉग आठवू लागतो, "ज्यादा कभी ज्यादा नहीं होता... ज्यादा हमेशा कम ही लगता हैं..." पुरुचं तारुण्य मागणारा ययाती आठवू लागतो. या चित्रपटातून माणसाची तीच लोभी प्रवृत्ती राक्षसी रूप प्रकट करत पडद्यावर साकारते. भारतीय साहित्यातला असा मौल्यवान खजिना प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवण्याचं स्वप्न दहा वर्षांपासून एक ध्येयवेडा माणूस उराशी जपत न डगमगता ते साकारतो काय आणि चित्रपटाच्या सुरुवातीला 'हे सगळं काल्पनिक आहे' असा डिस्क्लेमर येतो काय, सगळंच परिकथेसारखं. स्वप्न आणि सत्याचे रंग पॅलेटमध्ये मिसळून मर्ज होऊन गेल्यासारखं... हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन न पाहता तो कधीतरी नेटवर उपलब्ध होईल आणि मग मोबाईलच्या स्क्रीनवर आपण तो पाहू, असा विचार जर करत असाल, तर तो एका सुंदर स्वप्नाचा पराभव ठरेल...