त्रिकाळ... भाग ०१
(सदर कथा सत्य घटनेवर आधारीत असली तरी लेखका शिवाय त्याचा वास्तवाशी कोणीही संबंध जोडू नये ही विनंती...)
कपाळावर पडलेल्या कसल्याश्या थेंबांनी अण्णांची झोप चाळवली... रूम मधल्या अंधाराला अजून डोळे सरावत होते... बेडरूम मधल्या आपल्या पलंगावर अण्णा उठून बसले... बाजूला माई शांत झोपली होती... कपाळावर पडलेले पाण्याचे थेंब ओघळत आता गालावर आले होते...
"म्हणजे खरंच आपल्याला जाग आली ती कपाळावर काहीतरी पडलं या जाणिवेनेच... पण पाणी पडलं तरी त्याचा स्पर्श गरम होता... पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस मी म्हणून बरसत आहे आणि त्यात खिडकी डोक्याशीच, कदाचित तीच उघडी राहिली असेल म्हणून पाणी आलं आत..."
अण्णा स्वतःशीच विचार करत होते... चेहऱ्या वरून आपल्या हाताचे तळवे फिरवून अण्णा चष्मा घ्यायला वळले... चष्मा घालून टेबल लॅम्प लावला... उठून खिडकी बघितली तर खिडकी तर बंद... "आलं असेल पाणी..." अण्णा तसेच बाथरूम कडे वळले... डोळ्यात तशीही अजून झोप होतीच... बेसिन मध्ये हात धुताना सहज अण्णांचं लक्ष हाताकडे गेलं आणि अण्णा चमकले... हात धुतल्यावर पडणार पाणी लाल रंगाचं होतं... "आपल्या हाताला लाल रंग कुठून आला?" अण्णा चक्रावले... बराच वेळ हात धुवून सुद्धा पाण्याचा लाल रंग काही कमी होईना... अण्णांची झोप आता पुरती उडाली... हाताला काय लागलंय बघायला अण्णांनी हात चेहऱ्या समोर घेतले आणि समोर आरशात बघून दचकलेच... अण्णांचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता... दोन मिनिटं अण्णांना घेरी आल्या सारखी वाटली... बाथरूमच्या दरवाज्याचा आधार घेऊन अण्णा दोनच मिनिटात सावरले... आयुष्यात भोगलेली दुःख आणि यातना इतक्या होत्या की या अश्या गोष्टींचा अण्णा धसका वगैरे घेणाऱ्यातले नव्हते... अण्णांनी पुन्हांदा आरशात स्वतःचा चेहरा बघितला... अख्खा चेहरा रक्ताने माखला होता...
"म्हणजे मगाशी कपाळावर पडलं ते पाणी नाही रक्त होतं? पण कोणाचं? इतक्या रात्री हे काय पडलं असं कपाळावर? कोणता पक्षी वगैरे नसेल ना घुसला रूम मध्ये? पंख्याच्या पात्यात अडकून?..."
असे अनेक प्रश्न चेहरा धुताना अण्णांना पडत होते... चेहरा आणि हात स्वच्छ धुवून अण्णा बेडरूम मध्ये आले... बेडरूमचा लाईट लावला आणि आता मात्र अण्णांच्या पायाखालची जमीन सरकायची बाकी राहिली... अण्णांच्या अख्ख्या बेडरूम च्या भिंतीवर जागोजागी रक्ताने माखलेल्या हाताचे छाप आणि रक्ताने भिंत सारवल्या सारखे फर्राटे... आता मात्र अण्णांना अस्वस्थ वाटायला लागलं... पहिल्यांदाच ब्लड प्रेशर वाढल्या सारखं वाटलं अण्णांना... कसतरी स्वतःला सावरत अण्णा पलंगा जवळ आले...
"माईsss!... ए माईsss!... माई उठ गंsss..."
अण्णांच्या इतक्या जोरात मारलेल्या हाकेने माईंना ही जाग आली... त्या तडक उठल्या ही, पण झोपेमुळे त्यांनाही सावरायला थोडा वेळ गेला...
"काय झालं ओ?... काय होतंय?... असा का तुमचा आवाज घाबरलेला वाटतोय... कोणाला बोलावू का???..."
"नको!... हे बघ आधी भिंतीवर..."
आणि अण्णांचे शब्द जणू तोंडातच विरले... मगाशी ज्या भिंतीवर रक्ताळलेल्या हाताचे छाप आणि रक्ताचे फर्राटे बघितले ते काहीच नव्हतं...
"आहो काय झालं??? सांगाल का काही??? काही वाईट स्वप्न बघितलत का??? थांबा मी अमर ला आवाज देते..."
"नकोsss!... काही नाही झालंय... स्वप्नच होतं कदाचित... एक भयानक स्वप्न... चल झोप तू..."
"तुम्ही झोपा बरं आधी... मी आले लाईट घालवून..."
"नाहीsss!... नकोsss!... असुदे तो लाईट..."
"आहोsss! काय झालंय नक्की?... सांगाल का मला काही?... काय बघितलत स्वप्नात एवढं?... तुम्ही अंधार असल्या शिवाय झोप नं येणारे आणि आज लाईट चालू ठेव म्हणताय?... एक काम करा, तो डोक्याशी काय तो टेबल लॅम्प का काय आहे नं तो चालूच ठेवा मी माझ्याकडाचा पण चालू ठेवते... प्रकाश असेल तेवढाच... मोठा लाईट बंद करूया चालेल???..."
"ह्म्म्म..." एवढच उत्तर दिल अण्णांनी आणि कसल्या तरी विचारात हरवले... माई अण्णांच्या डोक्याशीच बसून होत्या... अण्णांना इतकं विचारात गढून गेलेलं त्या पहिल्यांदाच बघत होत्या...
"आपल्या बरोबर नक्की काय घडलं? कपाळावर काहीतरी पाण्यासारखं पडलं एवढं तर नक्की... कारण त्यानेच आपल्याला जाग आली... पाण्यासारखं पडलेलं कपाळावरून ओघळत आपल्या गालावर आलेलं आपल्याला जाणवलं... बेसिन मध्ये आपण आपल्या डोळ्यांनी रक्त बघितलं... बेडरूमचा लाईट लावल्यावर ही आपल्याला सगळीकडे रक्तच रक्त दिसलं... मग अचानक ते गायब कुठे झालं???"
विचारात असलेल्या अण्णांच्या कपाळावर माईंनी हात ठेवला तसे अण्णा शॉक बसल्या सारखे दचकले...
"कोण एsss!"
"आहो असं का करताय... मी आहे मालती..." अण्णांकडून आलेल्या अशा प्रतिसादाने माई पण दोन सेकंद घाबरल्या...
"तू आहेस होय!... झोपली नाहीस अजून?..."
"रात्रीचा दिड वाजलाय आणि त्यात तुम्हाला अस विचारात बघून कशी झोप येईल मला???... झोपा नं थोडावेळ, परत सकाळी लवकर उठता..."
"ह्म्म्म... झोप तू ही..."
अण्णांनी झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती... कधी नाही ते बंगल्यात बांधलेला शेरू आणि बंगल्या बाहेरची भटकी कुत्री कर्कश्य भुंकत होती... अण्णा बराचवेळ पलंगावरच तळमळत पडून होते... थोड्या वेळा पूर्वी जे बघितलं ते सारखं नजरे समोर येत होतं...
"आपण खरंच ते बघितलं होतं? की आपला भास होता? आपल्याला भास तर नसेल नं झाला? पण मग ते रक्त???..."
अण्णा स्वतःच्याच विचारात होते... बाहेरच्या कुत्र्यांचं भुंकणं आता जरा जास्तच वाढलं होतं... नुसती भुंकत असती तर ठिक होतं, पण आता ती विचित्र अशी विव्हळत होती... त्यांच्या त्या विव्हळण्यात शेरू ही आता सामील झाला होता... न राहवून अण्णा परत पलंगावर उठून बसले... त्या कुत्र्यांच्या विव्हळण्याने का माहिती नाही खूप अस्वस्थ होत होते... काहीतरी चुकतंय अशी पाल मनात चुकचुकत होती सारखी... अण्णांनी माईंकडे वळून बघितलं, माई परत शांत झोपलेली... अण्णा पलंगा वरून उठले आणि बेडरूम च्या बाल्कनीत जाऊन उभे राहिले... गल्लीतली झाडून सगळी कुत्री जणू अण्णांच्या बंगल्या बाहेर जमली असावीत, असं दोन क्षण अण्णांना वाटलं... सगळी एकजात भेसूर आवाजात बंगल्याकडे तोंड कडून विव्हळत होती... अण्णा उभी असलेली बंगल्याची बाजू जरी साईडची असली तरी अगदीच बंगल्याची पुढची बाजू दिसत नाही असं नव्हतं... शेरू सकट सगळीच कुत्री विव्हळतायत आणि ते ही आपल्याच बंगल्याकडे बघून म्हंटल्यावर अण्णांना थोडी शंका आली... अण्णांनी बाल्कनीतूनच वाकून बघायचा प्रयत्न केला तर एक मोट्ठी काळी सावली अण्णांना बंगल्यावरून मागच्या बाजूला गेल्या सारखी वाटली आणि सगळी कुत्री भुंकत आणि विव्हळत बंगल्याच्या मागच्या बाजूला गेली, शेरू ही मागे पळाला...
"कोण होतं ते? एखादा भिकारी वगैरे तर नसेल? रस्त्यावरच्या लाईट मुळे आपल्याला उगीच सावली मोठी वाटली असेल..."
"चsss! चsss! चsss!..."
आवाजाने अण्णांनी चमकून वर बघितलं तर भिंतीवर खरंच एक पाल चुकचुकत होती... पाली कडे बघत असतानाच एक जोरदार चमक अण्णांच्या पाठीतून पायापर्यंत गेली... बाल्कनीतल्या आरामखुर्ची वर अण्णा जवळ जवळ कोलमडलेच आणि असह्य वेदना जाणवत होत्या... अण्णांनी माईंना आवाज द्यायचा ही प्रयत्न केला पण वेदनेची कळ इतकी असह्य होती की त्यांना ग्लानी आली आणि अण्णा आरामखुर्चीतच बेशुद्ध पडले...
...........
"रखमा!... कधी उठलीस?... माईंची देवपूजा झाली?... देवाच्या खोलीत दूध साखरेचा नैवेद्य दिलास का?... अण्णांना चहा घेऊन जातीये... आलेत ना ते?..."
"तुमी इचारलं ती समदी कामं जाली... तुमी म्हंजे ना वैनीसाब... चला म्या जाते..."
"मी म्हणजे काय आता?... आणि कुठे जाते?..."
"आवंsss! तुमास्नी असं समद्यांची असलेली मालूमात बगुन कोनलाबी वाटनार न्हाई की तुमचं आनी आमच्या अमरभाऊंचं लगीन होऊन फकस्त सा महिने झाले ते..."
"तुझं आपल काहीतरीच... अण्णा आले का गं फिरून?..."
"नाय म्हाईत बा!... माई देवपूजेला बसताना काई बोल्या न्हाईत..."
"थांब मीच बघते... आणि हो! शेरू ला दूध दे... उपाशी असेल ते पोर... रात्रभर गल्लीतल्या कुत्र्यांबरोबर भुंकत होता..."
रमा अण्णांसाठी चहा घेऊन मागच्या लॉन मध्ये गेली... अण्णा फिरून आले की मागच्या लॉन वर कोवळ्या उन्हात पेपर वाचत बसत... पण आज अण्णा तिथे नव्हते... "फिरून आले नसतील अजून..." असं स्वतःशी म्हणत ती वळली आणि सहज तिच लक्ष शेरुच्या पिंजऱ्याकडे गेलं... तोंडात काहीतरी धरून जमिनीवर लोळवत शेरू खेळत होता... अण्णांचा चहा परत स्वयंपाकघरात ठेऊन रमा बाहेरच्या हॉल मध्ये आली... "अण्णा कसे आले नाहीत अजून?" रमा ला थोडी काळजी वाटली... बाहेर बघण्यासाठी म्हणून रमा गेट वर आली तर गेट ला अजून कुलूप तसच होत... रोज सकाळी अण्णा फिरायला जाताना कुलूप उघडू जात... फिरून आले की रमा बरोबर चहा घेता घेता पेपर मधल्या बातम्यांवर चर्चा चालायची... रमा खरंतर कॉम्पुटर इंजिनियर, पण नोकरी न करण्याचा नवऱ्याचा हट्ट म्हणून चांगला जॉब सोडून गायकवाडांच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी पोरीने सहाच महिन्यात आपल्या खांद्यावर पेलली होती... आणि याचीच अण्णांना जाण होती... आपल्या मुलाच्या हट्टाखातर बिचारी घर सांभाळत बसली होती... अण्णा आणि माईंचा रमाला जॉबसाठी पूर्ण पाठिंबा होता, पण अमरच्या हट्टा समोर काही चाललं नाही त्यांच आणि म्हणूनच अण्णा चहाच्या वेळी आपल्या या हुशार सुनेशी जगाची ओळख नवीन पिढीच्या भाषेत करून घेत असत.... अण्णांना शोधायला म्हणून रमा अण्णांच्या बेडरूम मध्ये आली पण अण्णा तिथेही नव्हते... स्वतःची आणि दोन धाकट्या दिरांची बेडरूम बघायची तशी तिला गरज नव्हती... लग्न झाल्यापासून कधीच तिने अण्णांना आपल्या मुलांच्या खोलीत गेलेलं बघितल नव्हतं... आणि दोन महिन्या पूर्वी जे झालं त्याने अण्णा तर तिन्ही मुलांशी बोलत ही नव्हते, जिने आई ची माया दिली त्या वहिनीला दुःख दिलं गेलं नकळत... रमा बाकीच्या बंगल्यात सगळीकडे अण्णांना शोधून आली, पण अण्णांचा कुठेच पत्ता नाही...
"माईsss!... माई ऐका ना!... अण्णा कुठे गेलेत?..."
"काय ए?... अगं फिरायला गेले असतील... आले नाहीत का अजून?... येता येता संजयभावजींकडे गेले असतील... कालच रात्री जेवताना म्हणत होते बरेच दिवसात भेटला नाही म्हणून... येतील येतील..."
"आहो माई नाही गेलेत अण्णा कुठे... आपल्या बंगल्याच्या मोठ्या गेट ला कुलूप तसंच आहे..."
"काय बोलतीयेस?..." माईंनी हातातली पोथी तशीच खाली ठेवली आणि त्या उठल्या...
"अगं सकाळी उठले मी तेंव्हा तर नव्हते हे बाजूला, मला वाटलं फिरायला गेले की काय..."
माई आणि रमा ने मिळून परत सगळ्या खोल्यांमध्ये अण्णांना शोधलं... माई तर मुलांच्या बेडरूम मध्ये ही जाऊन बघून आल्या, पण अण्णा नव्हते कुठेच... आता मात्र रमा आणि माई पुरत्या घाबरल्या... रमा जाऊन अमरला उठवून घेऊन आली... अमर अण्णांचा सगळ्यात मोठा आणि हुशार मुलगा... अमर, अजित आणि अमित अशी अण्णांना तीन मुलं आणि अनिता नावाची एक मुलगी... अमर सिव्हिल इंजिनियर झालेला पण अजित आणि अमित तसे अभ्यासात ढ... दोघंही जेमतेम ग्रॅज्युएट झालेले... अनिता अमर सारखीच हुशार, ती रत्नागिरीत ऍग्रीकल्चर कॉलेज ला शिकायला होती... अण्णा बांधकाम क्षेत्रातलं मोठ्ठ आणि प्रतिष्ठित नाव... फक्त बांधकाम व्यवसायच नाही तर जमिनीचे व्यवहार, स्टोन मायनिंग आणि क्रशिंग, शेती, लँड एस्केवेशन आणि बरेच बिझनेस होते... वयोमानापरत्वे आता मुलांच्या हातात सगळा कारभार गेला असला तरी अण्णा सगळ्यावर लक्ष ठेऊन होते... मुलं ही अण्णांना समाधानकारक असा व्यवसाय सांभाळत होती... पण जन्मजात सोन्याच्या कात्रीने नाळ कापलेली पोरं ती, पैशात वाढलेली... पैशाच्या ताकदीची मग्रुरी ही तेवढीच ठासून भरलेली... सहसा आई बाप आपल्या मुलांना ते कष्ट उचलू देत नाहीत ज्या खस्ता त्यांनी खाल्लेल्या असतात, आणि आयतं मिळालं की त्याची किंमत तर नसते पण मग्रुरी असतेच माणसाला... हेच नेमकं अण्णांच्या मुलांच्या बाबतीत झालं... मुलं संस्कारी नव्हती असं नाही पण पैशाचा माज त्या तिघांनाही कधीच लपवता आला नाही...
"माई काय झालं गं?... रमा काय म्हणतीये?..."
"अरे बघ ना!... काल रात्री पण अस्वस्थ होते... आज सकाळी मी उठले तर मला वाटलं नेहमीसारखे फिरायला गेले असतील... पण आत्ता कळतंय की घरातून बाहेर गेले नाहीत आणि घरातही सापडत नाहीयेत..."
"तू नको काळजी करुस, आम्ही आहोत ना... तू बस बरं इथे आधी... रमा तू आई जवळ थांब, मी आलोच अण्णांना बघून... कदाचित बाहेरच गेले असतील आणि जाताना आतून कुलूप लावलं असेल... तू संजय काकांना फोन कर, मी बागेत बघून आलो..." अमर अण्णांना शोधायला गेला...
"वैनीसाब मी माईंसाठी चाय करून आणू थोडी?... बरं वाटेल त्यास्नी... सकाळ पासून काय बी खाल्लं न्हाय बगा त्यांनी, काल पन उपास व्हता..."
"हो आण!... पण जरा माईंच्या खोलीत जाऊन त्यांचा मोबाईल आण आधी... मला संजय काकांना फोन करायचाय..."
"आनते वैनीसाब..."
रखमा माईंच्या बेडरूम मध्ये फोन आणायला गेली... एवढ्यात बाजूच्या बागेत अण्णांना शोधून अमर ही परत आला...
"केलास संजय काकांना फोन?..."
"काय झालं अमर?... भेटले का रे अण्णा?..."
"माईsss! माई शांत हो बरं आधी तू..."
"भेटतील अगं अण्णा... ते काय लहान बाळ आहेत का हरवायला... रमा तू नुसती बघत काय बसलीयेस लाव ना संजय काकांना फोन..."
"अरे होsss!... लावते... रखमा माईंचा मोबाईल आणायला गेली ए... माझ्या कडे नाहीये काकांचा नंबर..." आणि एवढ्यात...
माईsss!... वैनीसाबsss!... अमरभाऊsss!... लौकर हित या वरती... अण्णा हितचं हायती...
तिघंही धावतच वर येतात... अण्णांच्या बेडरूम मध्ये प्रवेश करतात तसं रखमा बेडरूमच्या बाल्कनीकडे बोट करते... रखमा प्रचंड घाबरलेली दिसते... सगळे बाल्कनीत येतात तर अण्णा आराम खुर्चीत झोपलेले असतात... मन चिंती ते वैरी न चिंती... "अण्णा असे का बरं झोपले असतील?" या काळजीने सगळ्यांच्या मनात नको नको ते विचार येऊन जातात... माई आणि अमर तर शॉक बसल्या सारखे नुसते बघत उभे राहतात... दोघांनाही काय करावं ते सुचत नाही... रमाचं पुढे जाते...
"अण्णाsss!... ओ अण्णाsss!..." अण्णांची काहीच हालचाल दिसत नाही... म्हणून रमा अण्णांना हलवून जागं करायला जाते, पण अण्णा काही उठत नाहीत...
"रखमाsss!... पाणी घे पटकन..." रखमा पाणी घेऊन येते... रमा अण्णांच्या चेहऱ्यावर पाणी मारते, तसं अण्णांना जाग येते...
"काय झालं अण्णा?..."
"रमा!... मी!... मी इथे कसा आलो?..." अण्णा आजूबाजूला बघतात...
"तुम्ही सगळे इथे काय करताय?..."
अण्णांना जागं झालेलं बघून अमर थोडासा सावरतो...
"अण्णा तुम्ही खाली चला, सांगतो सगळं तुम्हाला..."
अमर ला आलेलं बघून अण्णा थोडे नाराजीनेच त्याच्याकडे बघतात... त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता रमा कडे बघून...
"माई कुठे ए?..."
"आहो!... इथेच आहे मी... तुम्ही खाली चला बरं आता जरा... अमर संजय काकांना फोन कर आणि डॉक्टर ना बरोबर घेऊनच यायला सांग त्यांना... आणि पहिले अण्णांना घेऊन खाली चल..." माईंनी सांगितलं त्या मुळे आता अण्णांचा ही आता नाईलाज झाला...
"चला अण्णा..." पण अण्णा अमरच्या हातात काही हात द्यायला तयार होईनात... ते आपल्या आपणच उठायचा प्रयत्न करायला लागले...
"अण्णाsss!... तुम्हाला काय चिडायचं ना ते खाली जाऊन चिडा... पण आत्ता आम्ही सगळे खूप काळजीत आहोत... प्लिज नं हट्ट करता चला माझ्या बरोबर..."
कदाचित अण्णांना ही ते पटलं... सगळे अण्णांना घेऊन खाली आले... अजित आणि अमित ही आता उठले होते... सगळे डायनिंग टेबल वर बसले होते... अण्णांना खूप थकवा वाटत होता... रखमा आणि रमा चहा नाश्त्याचं बघत होत्या... बरेच दिवसा नंतर सगळे असे एकत्र जमले होते... एवढं सगळं होऊनही अण्णा टेबल वर बसताना आपल्याच जागेवर बसले, अक्का ची खुर्ची तशीच रिकामी होती... घरातला कर्ता असले तरी आपल्या वहिनीला अण्णांनी दिलेला तो मान होता... रमा ही आता येऊन टेबलवर बसली... अण्णा स्वतःहून काही बोलणार नाहीत आणि मुलांशी बोलत नसल्याने आपल्या चिडलेल्या वडिलांना विचारायची हिम्मत तिन्ही मुलांत नव्हती... रमानेच विषय काढला...
"अण्णा काय झालं?... तुम्ही बाल्कनीत कसे काय गेलात?... आराम खुर्चीत तुम्ही बेशुद्ध होतात... माई ही म्हणत होत्या काल रात्री अस्वस्थ होतात म्हणून... काय झालं सांगा ना?..."
"मला ते!... हां! मला काल रात्री जरा भयानक स्वप्न पडलं होतं म्हणून जागं आली होती... आणि नंतर झोप नव्हती येत म्हणून बाल्कनीत गेलो तर तिथे आराम खुर्चीत बसलो आणि मग तिथेच झोप लागली असेल..."
अण्णांनी काहीतरी सारवासारव करायची म्हणून उत्तर तर दिलं... पण इतक्यात संजयकाका डॉक्टर ना घेऊन येते झाले...
"काय रे अण्णा!... काय धाड भरली तुला?... अमरचा फोन होता मगाशी... डॉक्टर ला घेऊनच या म्हणून... काय झालं???..."
रमा ने घडलेला सगळा प्रकार डॉक्टरना सांगितला... डॉक्टरनी अण्णांचं बीपी चेक केलं आणि तपासलं सुद्धा... पण बीपी थोडंसं वाढण्या पलीकडे डॉक्टरना काही नाही जाणवलं...
"He is absolutely fine, काळजी करण्या सारखं काहीही नाही मी काही गोळ्या लिहून देतो... आठवडाभर घेउदेत गोळ्या..."
डॉक्टर निघून गेले तसं...
"अण्णा काय झालं रे तुला?... अरे आमच्या सगळ्यात अजून तू तरुण हायस गड्या... आणि हे काय रे अचानक झालं तुला?..."
"बघा ना काका आम्ही ही विचारतोय कधीचं तर काहीतरी नं पटणारी उत्तरं देतायत... मी मगाशी अण्णांना आरामखुर्चीत बेशुद्ध बघितलं आणि तोंडावर पाणी मारून उठवलं... त्यावर अण्णा म्हणतायत की बसलो आणि झोप लागली... माई म्हणत होत्या की रात्री ही घाबरल्या सारखे झाले होते म्हणून... नीट सांगत नाहीयेत काही..."
"थांबा जरा... बोलेल तो..."
"अरे बाबांनो नाही झालं मला काही... काल रात्री बाल्कनीत उभा होतो, तर बराच वेळ उभा राहिल्याने कमरेत कळ आल्या सारखं झालं... मी आराम खुर्चीत बसलो त्या पुढचं काहीही आठवत नाही बघा... रमा म्हणते तसं कदाचित आली असेल चक्कर... त्यात एवढं काळजी करण्या सारखं काहीही नाही..."
अण्णांच्या उत्तराने सगळ्यांचं समाधान झालं नसलं, तरी कोणी काही विचारू ही शकलं नाही पुढे... तरी संजय ला काही समाधानकारक उत्तर अजूनही अण्णांच्या बोलण्यातून मिळालं नव्हतं... आपला हा लंगोटी यार आपल्या पासून काहीतरी लपवतोय हे त्यांनी चटकन ओळखलं... आपल्या मित्राला आपण बरोब्बर बोलत करू शकतो, हे ठाऊक असल्याने संजयने विषय आवरता घेतला...
"अरेsss! रखमाsss! अरे आज या संजयकाकांना विसरलीस काय गं?... सगळे नाश्त्याला बसलेत आणि मला काहीच नाही अजून... संपला की काय नाश्ता..." विनोद बाष्कळ असला तरी वातावरण बदल घडावा म्हणून केलेला विनोद आहे हे लक्षात येऊन सगळेच हसले...
"आण बाई रखमा... तसाही हा जन्माचा उपाशी... माझ्या आई ला आणि नंतर अक्का ला ही असाच त्रास द्यायचा हा..." अक्काचं नाव निघालं तसं वातावरण परत सिरीयस झालं...
"काका!... मला म्हाईत व्हतं तुमास्नी सांगावा घडलाय त्ये... तुमच्या नावचा पण उपमा केलाय म्या..."
"आणि..."
"होsss! हाये ध्यानात... चहा बी येतीया घेऊन..."
"चला आम्हाला ही मिटींग्स आहेत... आपल्याला ही निघायला हवं..." असं म्हणताच अजित आणि अमित ने अमर कडे बघितलं... दादाचा इशारा कळल्या सारखं तिघेही उठले... पोर आपापल्या कमला निघून गेली तशी माई ही उठल्या, त्या ही अर्धवट राहिलेली आपली पूजा पूर्ण करायला निघून गेल्या... रमा पुढच्या स्वयंपाकाचं बघायला उठली...
"चल आपण जरा वर बसून बोलू... माझ्या खोलीत..."
"माहितीये मला..."
"कायsss?..."
"अरे म्हणजे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं हे... माहितीये मला..."
"ह्म्म्म... चल खा लवकर..."
रमा आवरायला म्हणून स्वयंपाकघरात आली तर तिला रखमा काहीतरी विचारात दिसली...
"रखमा काय झालं गं?... कसला विचार करतीयेस..."
"वैनीसाब... मला सांगायचं हाय तुम्हास्नी कायतरी..."
"काय झालं रखमा?... इतकी का घाबरलीयेस?..."
"वैनीसाब... म्या जवा वर मोबाईल आनायाला गेली व्हती ना... तवा..."
"हो ना... तुला कसं कळलं अण्णा बाल्कनीत आहेत ते..."
"आओ तेच तर म्या सांगते ना तुम्हास्नी... मी वर गेली ना, तवा मला बाल्कनी मंदी आवाज आला म्हनून म्या बगायला ग्येले तर अण्णांची ती आराम खुर्ची मागं पुढं हालत व्हती..."
"मं! त्यात काय झालं एवढं घाबरायला?... भित्रीभागूबाई कुठली..."
"आवं वैनीसाब... जवा मी तुम्हास्नी आवाज द्यायला आले आणि तुमी समदे वर आला ना, तवा अण्णा बेसुद्ध व्हते... मं म्या बघितलं तवा खुर्ची कशी हालत व्हती?..."
आता रमा च्या डोक्यात प्रकाश पडला की रखमा ला नक्की काय सांगायचंय ते...
"काय बडबडतीयेस रखमा... अण्णा बेशुद्ध होते मग कशी खुर्ची हलेल?..."
"नाई वैनीसाब... पांडुरंगाची आण घेऊन सांगते म्या... म्या बघितलं तवा खुर्ची मागं पुढं हालत व्हती..."
"तू जे सांगितलंस, ते खरंच बघितलंस???..." स्वयंपाक घरात प्लेट ठेवायला आलेल्या संजय काकांनी रखमाला विचारलं... संजय काकांच्या अशा अचानक येण्याने दोघीही दोन सेकंद घाबरल्या...
"व्हय काका... खरंच म्या बघितलं..."
"ठीक ए!... तुम्ही दोघी नका काळजी करू... मी बघतो काय ते... आणि हो माई ला किंवा घरातल्या अजून कोणालाच यातलं काहीच सांगू नकात एवढ्यात... निदान मी सांगा म्हणत नाही तो पर्यंत तरी..."
असं म्हणत संजय काका गेलेपण... संजय काका तसे घरातलेच होते... अण्णा आणि संजय काका एकाच गावातले... एकत्र शाळा कॉलेज झालं... पुण्यातच होते दोघंही शिकायला... संजय काकांच्या घराची परिस्थिती गरीब होती... अण्णांनीच आपल्या बरोबर त्याला ही त्याचा बिझनेस थाटून दीला... अण्णांच्या या उपकाराची जाणीव संजय काकांनाही होती... आपल्या मित्राने केलेल्या मदतीचं त्यांनी सोन करून दाखवलं... घरात ही संजय काकांना सगळे तेवढाच आदर दाखवायचे जितका अण्णांना...
"रखमा तू शेरू ला दूध आणि खायला दिलंस?..."
"अरे कर्मा... या सगल्या अण्णांच्या गडबडीत त्याला द्यायचंच ऱ्हायल बगा... आत्ता येते म्या त्यास्नी देऊन..."
"नको थांब... मीच जाते... असपण आज त्याच्याशी खेळणं नाही झालंय... मी आलेच.,."
...........
अण्णा आणि संजय वर अण्णांच्या खोलीत येतात... आत येतात तसं अण्णा दार आतून लावून घेतात... मनात संभ्रम आहे की संजय ला सांगायचं की नाही त्या बद्दल... पण काल पासून जे घडतंय ते इतकं विचित्र होतं की कोणाला तरी सांगायलाच हवंय...
"अण्णा काय झालंय सांगशील?..."
"सांगतो...:
"काल रात्री..." आणि एवढ्यात....
"माईsss! अण्णाsss!..."
अशी रमा ची किंकाळी ऐकायला येते... अण्णा आणि संजय खाली धावून जातात... माई देवघरातून बाहेर धावत येतात... रखमा स्वयंपाक घरातून धावत बाहेर येते... अमर, अजित आणि अमित खाली येतात... रमा चा आवाज बंगल्याच्या मागच्या बाजूने आलेला असतो... सगळे मागच्या बाजूला धाव घेतात... रमा शेरू च्या पिंजऱ्याजवळ उभी राहून ओरडत असते...
"काय झालं रमा... इतक्या जोराने का ओरडलीस अशी?..."
आणि रमा जे दाखवते त्या कडे बघून अण्णा, माई आणि सगळेच सुन्न होतात कारण...
शेरू च्या पिंजऱ्याच्या बाजूला एका केळीच्या पानात एक मेलेली उलट्या पिसांची कोंबडी, दोन अंडी, त्यावर हळद कुंकू गुलाल अबीर, काळे तीळ, आणि रक्त, खिळा आरपार टोचलेले लिंबू टाकलेलं असत... आणि शेरू च्या तोंडात एक काळी बाहुली असते जिच्या बरोबर रमा ने मगाशी त्याला खेळताना बघितलेलं असत...
क्रमशः.........
वेलिंग नाडकर्णी