मृत्यूवर विजय मिळविण्याचा Formula
लेखक - प्रा. दयानंद सोरटे
लेखक - प्रा. दयानंद सोरटे
परदेशातून डॉक्टरी डिग्री मिळविल्यानंतर त्याने परत आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. अगदी कायमचं. त्याच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. हवं तर मोठ्या डिग्रीच्या जोरावर तो कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला join होऊन किंवा स्वतःचा दवाखाना सुरु करून भरपूर पैसे कमवू शकत होता. परंतु त्याच्या डोक्यामध्ये काही वेगळेच विचार होते. त्याला मृत्यूवर विजय मिळवायचा होता. त्याने त्या दृष्टीने संशोधन करायला सुरुवात देखील केली होती. त्याकरिता त्याने शहरापासून दूर ३० कि. मी. अंतरावर असलेल्या घनदाट जंगलामध्ये वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. कारण संशोधन करण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नको होता. तो आणि त्याची पत्नी असे ते दोघे जण एवढंच त्याचं कुटुंब. कुणाचीतरी मदत असावी म्हणून त्याने एक assistant देखील नेमला होता. जंगला मध्येच त्याच्या घरापासून थोडे दूर म्हणजे १०० मीटर अंतरावर त्याने संशोधनाकरिता एक कार्यशाळा - लॅबोरेटरी बांधून घेतली होती. तिथेच तो आणि त्याचा assistant दिवसभर त्यावर काम करीत असत.
अशी बरीच वर्ष लोटली. जंगलामध्ये वास्तव्य करीत असल्यामुळे. त्या जंगलामध्ये राहणारे मूळचे आदिवासी देखील त्याच्या चांगले परिचयाचे झाले होते. त्या आदिवासीयांना उपचार करणे औषधे देणे, तपासणे इ. गोष्टी तो अधूनमधून करत असे. त्यामुळे आदिवासीयांना देखील त्याच्याबद्दल खूप आदर होता. त्या मोबदल्यात ते आदिवासी लोक त्याला फळे, मासे, फुले अशा वस्तू घरी आणून देत असत.
अशाच एके दिवशी एक आदिवासी साधारणपणे संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्या दारावर आला. आणि त्याने बाहेरूनच हाक मारली. त्याची पत्नी बाहेर आली तशी त्याने त्याच्या हातातील टोपली तिच्या पुढे केली. तिने विचारल्यावर त्याने त्यामध्ये मासे आहेत असे सांगितले. त्यानंतर तो आदिवासी तिला नमस्कार करून निघून गेला. टोपलीचे तोंड एका मोठ्या झाडाच्या पानाने झाकलेले होते आणि ते पान निघू नये आणि त्यातील मासे खाली पडू नयेत म्हणून टोपलीचे तोंड वेलीने घट्ट बांधलेले होते. सुमारे रात्रीच्या ८ वाजता तो आणि त्याचा assistant घरी आले. ते दोघे आलेले पाहून तिने जेवण करायला सुरुवात केली. त्याकरिता ती स्वयंपाकघरात गेली. तिने टोपलीच्या तोंडावरील पान काढताच त्यामध्ये मासे होते पण ते जिवंत होते आणि तडफडत होते. जणू काही ते आत्ताच पकडलेले असावेत. तिला देखील हे पाहून आश्चर्य वाटले. म्हणून तिने हाक मारून त्याला स्वयंपाक घरात बोलावले. त्याला देखील ते पाहून जरा नवलच वाटले. आणि क्षणात त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चमक दिसली. जणू काही त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते. तो तसाच तिला काहीही न बोलता. लगोलग आदिवासीयांच्या पाड्यावर गेला. आणि त्याच्या घरी ती माशांची टोपली कुणी दिली याचा तपास घेतला. तो मासे देणारा आदिवासी त्याला या वेळी घरी आलेला पाहून भलताच घाबरला. त्याला वाटले आपण दिलेल्या माशांमुळे कुणाला काही इजा झाली कि काय ? म्हणून तो भितभितच त्याच्या झोपडीमधून बाहेर आला. पण तसे काही झाले नाही असे त्याने त्या आदिवासीला सांगितल्यावर त्याच्या जिवात जीव आला. मग त्याने त्या आदिवासीला विचारले कि तू ते मासे केव्हा पकडले म्हणजे साधारणपणे किती वाजता ? आता त्या आदिवासीला वेळ कशी सांगता येणार ? तरी त्याने दिवस मावळायच्या २ - ३ तास आधी असे अंदाजे सांगितले. म्हणजे दिवस जर संध्याकाळच्या ६ वाजता मावळतो असे जरी आपण गृहीत धरले तर त्याने ते मासे त्याच्या घरी ७ वाजता पोहचविले होते. आणि त्याच्या पत्नीने ती टोपली ८ वाजता उघडली होती. म्हणजे दरम्यान ५ तास होऊन गेले होते. तरीही ते मासे त्या टोपलीमध्ये पाण्यावाचून जिवंत कसे राहिले. याच गोष्टीचे आश्चर्य होते. त्यानुसार मग त्याने त्या आदिवासीला विचारले कि ज्या झाडाच्या पानाने ते टोपलीच्या तोंड बंद केले होते ते पान मला दाखवशील का ? त्यावर तो आदिवासी म्हणाला उद्या सकाळीच मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो. जंगलाच्या मध्ये जे तळे आहे त्या तळ्याच्या काठाशी त्या झाडांची जाळी आहे. त्यानुसार मग तो त्याचा निरोप घेऊन घरी परतला.
आता त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरु झाले होते. घरी गेल्यावर जेवण आटोपून अंथरुणावर तो त्याच गोष्टीचा विचार करत झोपी गेला. सकाळी लवकर उठला. प्रातःविधी आटोपल्यानंतर तो आदिवासी दाराशी येऊन त्याला हाक मारू लागला. तसा तो थेट त्याच्या सोबर बाहेर पडला. जंगलामध्ये त्या तळ्याच्या काठी पोहचल्यानंतर त्याने तिथली दोन - चार पाने तोडून आपल्या सोबत घेतली. आणि तसाच तो त्याच्या लॅबॉरेटरी मध्ये पोहचला. तिथे त्याचा assistant त्याची वाटच पाहत होता. त्याने तिथे गेल्याबरोबर त्या पानांचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्या पानांमध्ये काही वेगळी संरचना त्याला आढळून आली.इतर वनस्पतींच्या मानाने ४० पट हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता त्या पानांमध्ये होती. कदाचित त्यामुळेच ते मासे इतका उशीर होऊनही जिवंत राहिले असावेत असा त्याने निष्कर्ष काढला. आणि त्या दिवसापासून त्याच्या खऱ्या संशोधनाला एक नवी दिशा मिळाली.
त्यानंतर त्याने त्या झाडांची पाने आणून ती वाटून घेतली. त्यामध्ये काही आणखी जंगली वनस्पती मिसळल्या आणि एक लेप तयार केला. मग त्याने सुरीने आपल्या बोटाला कापून घेतले. बोटातून रक्ताची धार लागली. ती जखम स्वच्छ करून त्या जखमेवर त्याने तो लेप लावला. आणि पट्टीने बाहेरून घट्ट बांधले. साधारणपणे त्याने ती पट्टी पाण्याने भिजणार नाही याची काळजी घेतली. आणि सात दिवसानंतर त्याने ती पट्टी काढली तर ज्या ठिकाणे त्याने सुरीने कापले होते त्या ठिकाणी कापल्याच व्रणही दिसत नव्हता. त्याला जे हवे ते मिळाले होते. त्याचा आनंद गगनात मावेना. तो खूप खुश झाला. त्याच्या आयुष्यभराची मेहनत फळाला आली होती. पण आता त्याला पुढे एक मोठं धाडस करायचं होतं.
त्याकरिता त्याने एका आदिवासीला जंगलातील माकड पकडून आणायला लावले. कारण पुढच्या प्रयोगासाठी त्याला माकडाची गरज लागणार होती. आणि त्याने एका रात्री त्याच्या assistant ला सोबत घेऊन हा प्रयोग करण्याचे ठरविले. त्याने त्या माकडाचे हातपाय तोडले. काही वेळातच ते माकड गतप्राण होऊन निपचत पडले. मग त्या तोडलेल्या भागामध्ये तो बनविलेला लेप भरून त्याचे अवयव पट्टीने घट्ट बांधले. आणि त्या माकडाचे शव एका लाकडी पेटिमध्ये ठेऊन दिले. त्यानंतर त्याने ती पेटी बरोबर आठव्या दिवशी सकाळी उघडली. त्या माकडाच्या शरीरावरील पट्ट्या बाजूला केल्या तर त्या माकडाच्या जखमा पूर्णपणे भरलेल्या आढळल्या. पण त्या माकडामध्ये प्राण आलेले नव्हते. मग पुन्हा त्याने तो प्रयोग करायचा निर्णय घेतला. खूप अभ्यासानंतर त्याने २१ दिवस ते शव तसेच ठेवायचे अशा निष्कर्षावर तो पोहोचला. त्यानुसार त्याने दुसऱ्या माकडावर तो प्रयोग केला. आणि मग २१ दिवसानंतर २२ व्या दिवशी त्याने त्या माकडाची शवपेटी उघडली. तर आतमध्ये ते माकड जिवंत अवस्थेत आढळले. त्याचे कापलेले सर्व अवयव पुन्हा आहे तसे जॉईन झाले होते. त्याचा प्रयोग यशश्वी झाला होता. मृत्यूवर विजय मिळविण्याचा formula त्याला सापडला होता.
पण आता पुढे तो जे धाडस करणार होता ते काही वेगळेच होते. दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या assistant ला शहरात पाठवून एक मोठी माणसाच्या आकाराची भले मोठे टाळे असलेली लाकडी पेटी पेटी आणण्यास पाठविले. त्याच्या सांगण्यावरून तो assistant ती पेटी घेऊन आला. पण assistant च्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. त्याला वाटले कि आता हा प्रयोग आपल्यावर तर केला जाणार नाही ना ? म्हणून तो गप्पगप्पच होता. पण त्यारात्री त्याने assistant ला सांगितले. ते ऐकून त्या assistant चे कान सुन्न झाले. कारण आता पुढचा प्रयोग assistant वर नाही तर तो स्वतःवर करणार होता. आणि तो प्रयोग करण्यापूर्वी त्याचे काही बरेवाईट झाले तर त्यास तो स्वतः जबाबदार असेल असे मृत्युपत्र देखील त्याने तयार करून ठेवले. दुसऱ्या दिवशी तो आणि त्याचा assistant काही महत्वाच्या कामाकरिता बाहेर जाणार आहोत असे त्याने त्याच्या पत्नीला सांगितले. आणि दुसऱ्या दिवशीच्या रात्री त्याच्या पत्नीच्या नकळत त्यांनी हा प्रयॊग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा assistant त्याला असे करू नका म्हणून खूप समजावत होता पण त्याने त्याचे ऐकले नाही. शेवटी रात्री १२ च्या सुमारास त्यांनी या प्रयोगाला सुरुवात केली. एका टेबलावर त्याला झोपविले. एका मोठ्या धारदार सुऱ्याने सर्वप्रथम त्याने त्याचे हात धडापासून वेगळे केले. मग पाय, डोके असे अवयव वेगळे केले. सगळ्या लॅबोरेटरीमध्ये रक्त पसरले. तयार केलेला लेप त्या अवयवांमध्ये भरून त्याने सांगितल्याप्रमाणे त्या जखमांवर पट्ट्या बांधल्या. आणि ते शव त्या मोठ्या लाकडी पेटीमध्ये टाकून त्याला टाळे लावले. आणि सांडलेले रक्त साफ - सफाई करून तो रातोरात शहरात निघून गेला.
एक आठवडा झाला तरी त्याच्या पत्नीचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. कुठे गेलाय याची तिला काही माहिती नव्हती. केव्हा येणार काही सांगितले नव्हते. त्यामुळे तिला खूपच काळजी वाटू लागली.असेच पंधरा दिवस लोटले. घरामधील काही आवश्यक गोष्टी संपल्या होत्या म्हणून तिने शहरात जाऊन त्या घेऊन येण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती शहरात आली. तिने आवश्यक सामानाची खरेदी केली. तर दूर तिची नजर तिच्या नवर्याच्या assistant वर पडली. ती गर्दीतून वाट काढत त्याच्या दिशेने जाऊ लागली. तोच assistant ने तिला आपल्या दिशेने येताना पाहिली. तो तिला पाहून खूपच घाबरला. तिने आपल्याला काही विचारले तर काय सांगायचे ? या विचाराने त्याला दरदरून घाम फुटला. आणि क्षणाचाही विलंब न करता तो त्या गर्दीतून निसटला आणि दिसेनासा झाला. तिलाही त्याच्या अशा वागण्याचा संशय आला. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कुठेही न थांबता ती थेट City police station मध्ये गेली आणि तिचा नवरा मागील १६ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिने नोंदविली. सोबत असलेल्या assistant चेही तिने वर्णन केले. आणि बाजारात घडलेला प्रसंग तिने पोलिसांना कथन केला.
पोलिसांनी दुसऱ्या दिवसापासून त्या assistant आणि Doctor च्य तपासाला सुरुवात केली. दोन दिवसानंतर कुठल्यातरी मित्राच्या घरी तो assistant सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. आणि त्याच्याकडून Doctor कुठे आहेत याविषयी ते माहिती घेऊ लागले. पण assstant ने doctor ला वचन दिले होते कि २१ दिवसापर्यंत ती पेटी तो उघडणार नाही किंवा त्याविषयी तो कुठे काही बोलणार नाही . सुरुवातीला पोलिसांनी त्याला नम्रतेने विचारले पण त्याचे वागणे संशयास्पद वाटल्याने आणि तो काहीच सांगत नाही म्हणून मग पोलिसांनी त्याला थर्ड डिग्री ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. त्याला खूप मारझोड करण्यात आली. पोलीसांना वाटले कि, डॉक्टरांनी कुठलातरी एक मोठा शोध लावला होता आणि तो कुणाला कळू नये म्हणून किंवा त्या शोधाचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून त्या assistant ने डॉक्टरला kidnapped केले असावे किंवा त्यांचा खून केला असावा. त्यामुळे विसाव्या दिवशी त्याला अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आला. त्याच्या सगळ्या शरीराला जखमा झाल्या. तरीही त्याने तोंड उघडले नाही. आता शेवटचा दिवस उजाडला. त्याच्या अंगात काहीही त्राण नव्हते. तो जीव तोडून एवढेच सांगत होता. मी डॉक्टरांना काहीही केलेले नाही आजचा दिवस जाऊद्या मी उद्या तुम्हाला डॉक्टर जिथे आहेत तिथे घेऊन जातो. पण पोलीस आणि डॉक्टरांची पत्नी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. शेवटी ते त्याला घेऊन डॉक्टरच्या घरी गेले. तिथे गेल्यावर त्यांनी लॅबोरेटरी मध्ये काही सुगावा मिळतो का ते पाहण्यासाठी लॅबोरेटरी उघडली. आणि तिथे आजूबाजूला पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. तेव्हा त्यांना तिथेच एका कोपऱ्यात ती मोठी पेटी ठेवलेली दिसली. त्यांनी त्या पेटीची चावी त्याला मागितली. तो हात जोडून पोलिसांची आणि डाक्टराच्या पत्नीची विनवणी करू लागला. कि कृपाकरुन आत्ता पेटी उघडू नका. पण त्याचे कुणीही ऐकले नाही. पोलिसांनी पुनः त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मग नाईलाजाने त्याला त्या पेटीची चावी देणे भाग पडले.
Assistant च्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला. माझे ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. आजच्या दिवस तरी ती पेटी उघडू नका. पण शेवट पोलिसांनी ती पेटी उघडलीच. पाहिले तर काय डॉक्टरांचे शरीर आतमध्ये तसेच होते. पोलिसांनी ती बॉडी बाहेर काढली. शरीरावरील पट्ट्या वेगळ्या केल्या. सगळ्या जखमा भरून आलेल्या होत्या. सगळे अवयव पुन्हा आहे तसे जुळलेले होते. केवळ त्या शरीरामध्ये प्राण यायचे बाकी होते. पण दुर्दैव ! ते होऊ शकलं नाही. डॉक्टरांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. Assistant ला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण त्याने डॉक्टरांचे मृत्युपत्र कोर्टात सादर करताच कोर्टाने त्याचे निर्दोष म्हणून सुटका केली. डॉक्टरांची पत्नी आणि पोलिसांच्या एका चुकीमुळे जग एका महान आविष्काराला मुकले.
काल्पनिक कथा - समाप्त .
तात्पर्य : जन्माला येणारा प्रत्येक जीव हा कधीना कधीतरी मरणार आहे. शरीर नाशवंत आहे. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमामध्ये कुणीही हस्तक्षेप केलेला निसर्गाला आवडत नाही. म्हणून निसर्गाच्या विरोधी जाण्याचा कधीही प्रयत्न करू नये. नाहीतर त्याची वाईट फळे भोगावी लागतात.
सूचना : वरील कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे Copyright आहेत. कॉपी पेस्ट करून तुम्ही मूळ लेखकाच्या नावासह कथा सादर करू शकता. कुणीही नाव बदलून अथवा चोरी करून जर मूळ कथेत बदल करून कथा सादर करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.