भुताटकी
लेखक - प्रा. दयानंद सोरटे
माझ्या मावशीचे दीर श्री संभाजी भोसले सर. मी त्यांना आदराने बापू या नावाने संबोधतो. ते मुळचे साताऱ्याचे परंतु शिक्षक असल्यामुळे त्यांची बदली होऊन त्यांची रवानगी कोकणात झाली. कोकण हा त्यांच्यासाठी नवीनच. ओळखीचं असं कुणीही नाही. त्यामुळे राहणे आणि खाणे हे दोन प्रश्न त्यांच्यासमोर यक्ष म्हणून उभे राहिले. परंतु देवाच्या कृपेने एका शिक्षकाच्या मदतीने त्यांना कोकणातीलच एका खेडेगावात राहण्यासाठी एक जुन्या पद्धतीने बांधकाम केलेले घर मिळाले. आणि गावातीलच एका घरगुती खाणावळीमध्ये त्यांची खाण्याचीदेखील व्यवस्था झाली. घर बरेच दिवस बंद असल्यामुळे खूपच धूळ आणि जळमटे आतमध्ये जमा झालेली होती.शिवाय घर मोठे आणि सहा खणाचे होते. स्वस्तात आणि मोठे घर मिळाल्याचे त्यांना आश्चर्यही वाटले. परंतु दुसरा कोणताही option नसल्यामुळे त्यांनी त्या घरात राहायचे निश्चित केले.घराच्या तुळया लाकडी होत्या आणि भिंती दगडी लाल चिऱ्याच्या होत्या. त्यामुळे त्यांचा पहिला दिवस तर संपूर्ण घराची झाडलोट आणि साफसफाई करण्यामध्येच गेला. शिवाय त्यावेळी त्यांचे लग्न झालेले नव्हते त्यामुळे ते एकटेच होते. एकतर अगोदरच प्रवास झाला होता आणि त्यात हि साफसफाई त्यामुळे त्यांना थोडा थकवा आला. रात्री जेवण आटोपून ते लवकरच झोपी गेले.
दुसऱ्या दिवसापासून मात्र ते कामावर रुजू झाले.शाळेतील पहिला दिवस पार पडला. मात्र रात्री त्यांना काही लवकर झोप येत नव्हती. कारण जागा नवीन होती. शिवाय एकटेच असल्यामुळे वेळ जाता जात नव्हता.खूप उशिरा रात्री १२ नंतर त्यांना थोडी झोप लागली. आणि सुमारे रात्रीच्या २ च्या सुमारास त्यांना जाग आली कारण त्यांना कोणीतरी जोराने घुमल्याचा आवाज कानावर आला. त्या भयानक आवाजाने त्यांची झोपमोड झाली. त्यांनी डोळे उघडून नीट पाहिले तर त्या ज्या तुळईखाली झोपले होते त्याच तुळईच्या आड्यावर एक उघडबंब पिशाच्च बसलं होतं आणि ते इतक्या वर बसून देखील त्याचे पाय यांच्या तोंडापर्यंत लोम्बकळत होते. त्याच्या अंगावर लांबच लांब केस होते. आणि खूपच भयानक असा त्याचा चेहरा होता. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. हे अचानक पाहिल्यामुळे त्यांच्या छातीत धडकी भरली. काय करावे ते सुचेना. ना तोंडातून आवाज निघेना. त्यांना त्या जागेवर कुणीतरी घट्ट पकडून ठेवल्यासारखे झाले. त्यांच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. पण अशा वेळी त्यांनी धाडस दाखविले. ते पिशाच्च वर बसून , मोठाले डोळे त्याच्यावर रोखून जोराने घुमत होते.
सुदैवाने त्यांनी इगतपुरी येथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धानी स्थापन केलेल्या विपस्यना केंद्रामध्ये जाऊन ध्यानधारनेचा कॊर्स केला होता. त्यांना त्याची आठवण झाली आणि त्यांनी बसल्याजागेवरच ध्यान लावले. आणि ते पूर्णपणे त्या ध्यानामध्ये मग्न होऊन गेले. एक तासाभरानंतर त्यांनी डोळे उघडले तर ते पिशाच्च तेथे नव्हते. त्यानंतर त्यांना काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हा प्रसंग त्यांच्या एका शिक्षक सहचारी मित्राला सांगितला . पण त्यांना ते खरे वाटले नाही. तरीही दुसरीकडे राहण्याची सोय होईपर्यंत तिथेच adjust करा असे त्या मित्राने त्यांना सांगितले. नाईलाजाने तो पर्यंत तिथे राहणे भाग होते. आता तिथेच राहायचे म्हणजे माहित असून देखील मृत्यूच्या मुखात जाण्यासारखे होते. तसे ते घाबरत नव्हते कारण त्यांचा जन्म गावाकडचा. रात्रीच्या वेळेस शेतावर अनेकदा ते झोपले होते. पण ते गाव त्यांचं होतं आणि इथे तर सगळंच अनोळखी होतं. पण समोर खरंखुरं पिशाच्च दिसल्यावर चांगल्या - चांगल्याना देखील भीती वाटणारच. पुन्हा दुसऱ्या रात्री देखील त्यांना त्यांच्या छातीवर बसून कुणीतरी त्यांना दाबतंय असं जाणवलं. तेव्हा देखील त्यांनी ध्यान लावून स्वतःची सुटका करून घेतली.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि त्या संकटातून सुटका करून घेण्यासाठी मला उपाय विचारला. प्रश्न असा होता कि ते केवळ तथागत भगवान गौतम बुद्ध व्यतिरिक्त कुठल्याही देवाला मानत नव्हते. त्यामुळे त्यांना इतर देवांचे मंत्र सांगून काही उपयोग नव्हता. मग मला एक गोष्ट आठवली.. माझ्या एका जवळच्याच मित्राने मला एक खूप जुने म्हणजे साधारणपणे १९३५ ची आवृत्ती असलेले एक " बौद्ध धर्माचे रक्षण सूत्र " नावाचे पुस्तक दिले होते. त्यामध्ये काही पाली भाषेमध्ये मंत्र लिहिलेले होते. हे पुस्तक खूपच दुर्मिळ होते. आणि त्या व्यतिरिक्त त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्यांवर काय उपाय करायचे याविषयीचे देखील मंत्र पाली भाषेमध्ये होते. शिवाय त्याचा अनुवाद मराठी भाषेमध्ये केलेला होता. म्हणून त्याचा अर्थ समजण्यास सोपे होते. अट केवळ एकच होती कि, दारू पिणारा व्यक्ती आणि मांसाहार करणारा व्यक्ती त्या मंत्रांचा वापर करू शकत नाही. किंबहुना त्याला त्या मंत्राची प्रचिती येणार नाही. सुदैवाने संभाजी बापू पूर्णतः शाकाहारी आणि निर्व्यसनी होते.
त्यामुळे मी त्यांना त्या पुस्तकाच्या काही पानाच्या झेरॉक्स प्रति लगेच कुरियरने पाठवून दिल्या . त्याप्रमाणे त्यांनी दररोज घराच्या प्रत्येक खोलीत बसून सांगितलेले मंत्र केवळ अगरबत्ती लावून उच्चारायचे होते. असे सलग तीन दिवस त्यांनी मंत्रपठण केले. आणि बरोबर तिसऱ्या रात्री ते पिशाच्च जोराने ओरडत हवेत तरंगत घराच्या बाहेर निघून गेले हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. त्यानंतर मात्र त्यांना त्या पिशाच्चाचा कधीही त्रास झाला नाही. काही वर्षाने त्यांची त्या गावावरून दुसरीकडे म्हणजे कोकणातच जाकापूरला बदली झाली. सध्या ते आपल्या कुटुंबासह स्वतःच्या घरामध्ये तिथे वास्तव्याला आहेत.
योगायोगाने आज तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या महान स्मृतीस हि कथा अर्पण करीत आहे.