लेखक - प्रा. दयानंद सोरटे.
वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो , मी जी सत्यकथा आपल्यासमोर सादर करत आहे. ती मी स्वतः अनुभवलेली आहे. या कथेद्वारे मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती पसरवायची नाही. वाचकांनी केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनेच हि कथा वाचावी हि विनंती.
बऱ्याच वेळा मी गणित आणि भूमितीची काही अवघड सूत्र विद्यार्थ्यांच्या लक्षात रहावीत म्हणून त्यांना संमोहन करून त्या सूत्रांच्या सूचना देत असे. अर्थातच त्यांच्या आई - वडिलांच्या परवानगीनेच. त्याकरिता मी अख्या वर्गाला सामूहिक संमोहन करत असे. मुलं संमोहनाच्या तिसऱ्या अवस्थेत गेल्यावरच मी त्यांना त्या सूचना देत असे. संमोहनाच्या तिसऱ्या अवस्थेत गेल्यावर मुलं अक्षरशः घोरत असत. पण ती झोपलेली नसायची. त्यावेळी त्यांना केवळ माझ्या आवाजाशिवाय किंवा मी दिलेल्या सूचनाशिवाय इतर कोणताही आवाज ऐकू येत नसे. आणि त्या अवस्थेत मी त्यांना जे काही सांगत असे ते विद्यार्थी कधीही विसरत नसत. मी असे प्रयोग अनेकदा केले होते.
तेव्हा मी अष्टविनायक क्लासेसमध्ये भूमितीचा तास घेत होतो. त्याच वर्गात सुप्रिया नावाची एक हुशार मुलगी होती. सुप्रिया आमच्या नात्यातीलच असल्यामुळे मी तिला लहानपणापासूनच ओळखत होतो. तसे मी तिला इयत्ता ५ वी पासून शिकविले होते. खूपच हुशार आणि हसतमुख अशी ती मुलगी होती. तिचा आवाजही गोड होता. म्हणून मी तिच्या आईला तिला शास्त्रीय संगीताच्या गायनाच्या क्लासला पाठविण्याचा सल्ला दिला होता. आणि थोड्याच दिवसात तीने एका मराठी वाद्यवृंदामध्ये गायला सुरुवात देखील केली होती. थोडक्यात ती मुळातच हुशार असल्यामुळे कोणतीही गोष्ट ती लगेच आत्मसात करत असे.
माझा तास सुरु होऊन १० मिनिटे झाली होती. मी मुलांना संमोहन करण्यास सुरुवात केली. साधारणपणे अर्ध्या तासानंतर बरीचशी मुले संमोहित झाली. आणि माझे लक्ष अचानक सुप्रियाकडे गेले. सुप्रियाचे डोळे पूर्णपणे उघडे होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे तिची पापणीही खाली पडत नव्हती. आणि तिच्या डोळ्यावर पांढऱ्या रंगाचा पडदा आल्याप्रमाणे तिचे डोळे दिसत होते. मी तिच्या जवळ जाऊन तिच्या डोळ्याजवळ हात हलवून पाहिला तरीही तिने पापण्या मिटल्या नाहीत. मग मी तिला तिच्या नावाने हाक मारली तरीही तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. थोड्या वेळाने ती हुंकार द्यायला लागली. मला सुरुवातीला वाटले कि तिच्या अंगात वगैरे आले असेल म्हणून मी तिला तू कोण आहेस म्हणून विचारले. पण ती काहीही बोलली नाही. मला काहीच समजेना. म्हणून मग मी माझ्या पॉकेट मध्ये असलेली आमच्या देवाची उदि तिच्या कपाळाला लावली. तशी ती जोराने किंचाळली. मग मात्र मला शंका आली हे काहीतरी वेगळेच आहे म्हणून.
मला मंत्रशास्त्र ठाऊक असल्यामुळे मी प्रथम तिला बोलते केले. आणि ती कोण आहे असे तिला विचारले. खूप प्रयत्नाने तिने शेवटी सांगायला सुरुवात केली.
"ती म्हणाली, या झाडावर मी गेल्या १४ वर्षांपासून राहत आहे. झाडावर म्हणजे त्या मुलीच्या अंगामध्ये. आणि त्यामुळे हे झाड मला खूप आवडते."
त्यावर मी म्हणालो , तू या झाडाचा ताबा केव्हा आणि कसा घेतलास ? तेव्हा ती म्हणाली, कि त्यावेळी अमावस्या होती. तेव्हा हे झाड अवघ्या ६ महिन्याचं होतं. तिला नवीन कपडे घातले होते. तसेच काजळ पावडर लावलेली होती. रात्रीच्या ८. ३० वाजता झाडाचे आई - बाबा तिला घेऊन आमच्या गल्लीतून सिनेमा पाहायला चालले होते. तेव्हा माझी नजर झाडावर गेली. आणि मी झाडाला तेव्हाच पकडले होते. हे ऐकून मला खूपच नवल वाटले. पण ती म्हणाली कि मी झाडाचं अजूनपर्यंत कुठलंही नुकसान केलेलं नाही. त्यानंतर मी तिला जाण्यास सांगितले. ती गेल्यानंतर सुप्रिया पाच - दहा मिनिटे बेशुद्धच होती. तास संपल्यानंतर मी तिच्या आईला ताबडतोब बोलवून घेतले. आणि घडलेल्या प्रकारची तिच्या आईबरोबर चर्चा केली.
चर्चेनंतर तिच्या आईने अनेक गोष्टींचा उलगडा केला. आणि तिच्या आईने सुप्रिया ६ महिन्याची असताना तिला घेऊन सिनेमा पहायला गेल्याचेही कबुल केले. आणि हे तिच्या पक्के लक्षात राहण्याचे कारण म्हणजे. सुप्रियाने त्यांना सिनेमा पाहूनच दिला नाही त्यानंतर ती खूपच रडायला लागली. म्हणून तिच्या आई - वडिलांना शेवटी सिनेमा अर्धवट सोडून घरी यावे लागले होते. त्यामुळे हि घटना तिच्या आईच्या चांगलीच स्मरणात होती. तसेच तिची आई म्हणाली काही वेळा अमावस्त्या किंवा पौर्णिमेला ती मध्यरात्रीनंतर झोपेतून उठते. तिचे डोळे बंद असूनही ती दाराची कडी उघडते. झोपेतच चालत ती दोन मजले खाली उतरून चौकातल्या वडाच्या झाडाखाली असलेल्या ओठयावर जाऊन एकटीच बसते. असे तिच्या सोबत अनेक वेळा झाले होते. पण त्यांचा अश्या गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी हे दुर्लक्षित केले होते. पण आता मात्र सगळा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे तिची आई देखील घाबरून गेली. मी त्यांना तिला एखाद्या चांगल्या जाणकाराला दाखविण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. आज सुप्रियाचे लग्न झालेले आहे. ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. कथेमध्ये मी मूळ व्यक्तीचे नाव बदलून दिलेले आहे. नमस्कार ! ... पुन्हा भेटूया अशाच एका भयकथेसह ...