अवदसा - भाग २
काही दिवसात मुग्धा माझ्या घरात चांगलीच रुळली. कायम हसतमुख राहून ती घरात जिवंतपणा आणायची. तिच्यामुळे घरात चैतन्य पसरले होते. अपत्यासाठी राखून ठेवलेली माया बायकोने तिच्यावर उधळली होती. मुग्धाला ती डोळ्यात तेल घालून जपत होती. कधी नव्हे तो आमच्या एकसुरी संसारात रंग भरू लागला होता. निराशेच्या सावटाखाली झाकोळलेली ती वास्तू आता कशी रसरशीत भासू लागली होती. तिच्या भिंतीही जणू बोलू लागल्या होत्या.
त्या दिवशी मी कामावरून घरी आलो. आज दोघीना घेऊन बाहेर फिरायला जाऊ असा बेत मनात केला होता. घरी पोहोचलो तर बायको नवीकोरी साडी घालून नटली होती. हिला माझा बेत आधीच कळला की काय ? असा विचार करत असतांनाच ती लाजत माझ्याजवळ आली.
आज काय खास बात ? भलतीच सुंदर दिसतेहेस ! मी मखलाशी केली.
इश्श.. म्हणत ती पुन्हा झकास लाजली. पण काही बोलेना.
मी तिच्या डोळ्यात पाहिले. तिथे कमालीची तृप्ती जाणवत होती.
काही वेळ असाच गेला. मला ती शांतता असह्य झाली.
अगं, सांगशील तरी काय झालंय ? मी विचारलं.
ती शांतच राहिली. तेव्हढ्यात मुग्धा हसत हसत बाहेर आली.
काका, काही गोष्टी बायका सांगू शकत नाहीत. पुरुषांनी त्या समजून घ्यायच्या असतात. ती म्हणाली.
म्हणजे ? मला काहीच कळत नव्हतं.
अहो, आज सकाळी मावशीला उलट्या झाल्या ! मुग्धाने सांगितले.
अरे, मग डॉक्टरकडे गेली कि नाहीस ? मी विचारता झालो.
गेलो हो.. आणि त्याने गुड न्यूज दिली... मुग्धा हसत म्हणाली.
आता बायकोने चेहरा वर करून माझ्याकडे बघितले. तिचा चेहरा लाल झाला होता.
अहो.. तुम्ही बाबा होणार आहात !
बायकोचे ते उदगार माझ्या मनावर आनंदाच्या असंख्य लहरी पसरवून गेले. तब्बल १५ वर्षांनी माझ्या घरात पाळणा हलणार होता. माझा संसार खऱ्या अर्थाने पूर्ण होणार होता. माझ्या भावना उचंबळून आल्या. जवळ मुग्धा उभी आहे याची जाणीव असतानाही मी प्रेमभराने बायकोच्या कपाळाचे चुंबन घेतले.
अहो काय करताय.. ही पोरगी काय म्हणेल ? मला ढकलत बायको म्हणाली.
इट्स ओके मावशी.. आज तर काकांना तेव्हढा अधिकार आहेच आहे ! म्हणत डोळे मिचकावून मुग्धा स्वयंपाकघराकडे वळली.
त्या दिवसानंतर मुग्धाने संपूर्ण घराचा ताबा घेतला. आईच्या मायेने ती बायकोला सांभाळू लागली. तिला काय हवं, काय नको ते बघताना, डोहाळे पुरवताना तिचा दिवस पार पडत होता. तिला ठसका लागला तरी मुग्धाचा जीव घाबराघुबरा होत असे. ती नसती तर माझे आणि बायकोचे काय झाले असते याचा जितका विचार मी करत होतो तितकाच मुग्धाविषयीचा आदर वाढत होता.
सातव्या महिन्यानंतरच गर्भारपण बायकोला जड जाऊ लागलं. तिच्या चेहऱ्यावरचं तेज लोप पावू लागलं. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं घेरा टाकू लागली. हालचाली मंदावल्या. या वयातलं गर्भारपण असं त्रासदायक ठरतंच हा डॉक्टरांचा अभिप्रायही मला दिलासा देईना. पहिलंच मूल.. त्यातही अशी वाईट लक्षणे.. मी कोलमडून पडलो. पण वरकरणी बायकोची हसून, आस्थेने चौकशी करून तिला काही जाणवणार नाही याची दक्षता घेत होतो. दिवसेंदिवस तिचा खोल जाणारा आवाज माझ्या काळजाला घर पाडत होता.
ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही.... काळजावर फुटक्या काचेच्या तुकड्याने संपूर्ण जोर लावत कोरावी तशी ती रात्र.. अजूनही उरात ठसठसते ! जखमा ताज्या करते.
मी हॉलमध्ये झोपलो होतो. बायको आणि मुग्धा बेडरूममध्ये होत्या. मी काहीसा अस्वस्थ होतो. छातीवर अनामिक दडपण असल्यासारखे वाटत होते. श्वास गुदमरत होता. कितीदा कूस बदलली याचा हिशेब नव्हता. मध्यरात्र उलटल्याचा सुमार असावा.. एका उग्र दर्पाने माझ्या नाकपुड्या चाळवल्या गेल्या. काहीतरी जळत असल्यासारखा तो वास होता. हॉलमध्ये हळूहळू धुराची वलये गोळा होत होती. पंख्याच्या हवेने त्या धुराचा भोवरा तयार झाला होता.
मी झपाट्याने उठलो. स्वयंपाकघरात गेलो. गॅस तपासला. शेगडी, सिलेंडर सर्व काही व्यवस्थित होतं. स्विचबोर्ड पाहिले. तिथेही काही नव्हते. मी हॊलमधले सर्व दिवे पेटवले. बेडरुमकडून धूर येत होता. मी धावत जाऊन तिथला दरवाजा ठोठावला.
आतून विचित्र आवाज येत होता. ती भाषा, ते शब्द अगम्य होते. एका लयीत, विशिष्ट शब्दांवर आघात करीत चाललेला हा उच्चार नक्कीच मंत्रघोष होता. मध्येच खरखर होत होती. कोणाचा, कोणासोबत आणि कशासाठी हा अघोरी संवाद चाललाय या शंकेने मी धास्तावलो. ते जे कोणी आत होतं, स्वतःच्या क्रियाकलापात इतकं गुंतलं होतं की माझ्या दार बडवण्याचा त्याच्यावर ढिम्म परिणाम होत नव्हता.
अखेर मनाचा हिय्या करून मी दार तोडण्याचा निश्चय केला. बेडरूम असल्याने त्याच्या दाराची आतली कडी फारशी मजबूत नव्हती. त्यामुळे खांद्याचा जोर लावून दिलेल्या दोन धक्क्यातच दार उघडले गेले.
सुदैवावर काहीदा विश्वास ठेवावाच लागतो. माझं हृदय थांबलं नाही हे नशीबच !
त्या खोलीत माझी बायको झोपली होती.. पण तिचे डोळे सताड उघडे होते. कुठले संमोहन, आदेश, भय, आमिष तिला अंमलाखाली ठेऊन होते ? तिची नजर निर्विकार होती. आपल्यासोबत काहीतरी घडतंय हे तिच्या गावीही नव्हतं.
नुकतीच न्हाऊन आलेली मुग्धा ओले केस मोकळे सोडून बसली होती. एका लोखंडी कढईत अग्नी पेटला होता. माझ्या बायकोच्या पोटावरून काही विचित्र दिसणाऱ्या वस्तू फिरवून ती आगीत टाकत होती. प्रत्येक आहुतीसरशी भूक वाढल्यागत त्या ज्वाला उफाळून वर येत होत्या. कित्येक वर्षांपासून उपाशी असलेल्या त्या अधाशी ज्वाला काही सेकंदातच प्रत्येक आहुती गडप करीत होत्या. त्यांची ती लपलपती तांबडीनारंगी जिव्हा मुग्धाच्या चेहऱ्यावर उजेड फेकत होती. तिचा मूळचा सुंदर चेहरा तापून लालबुंद झाला होता. भरपूर काजळ भरल्याने डोळे भयावह दिसत होते. तिच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या मंत्रोच्चारनीशी मानेला झटका बसून केस हिंदकळत होते. तिचा त्वेष अपूर्व होता. मी दार तोडून आत आल्याचं तिच्या गावीही नव्हतं.
मुग्धा...काय चाललंय हे ! थांबव सगळं ! मी ओरडलो.
एक क्षणच..तिने नजर माझ्यावर रोखली. मंत्रोच्चार मात्र सुरूच ठेवले. डाव्या हाताने आहुती टाकत उजव्या हाताने मला बाहेर जाण्याचा इशारा केला. भानावर येऊ पाहणारी बायको मात्र केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होती.
मुग्धाची नजर...कमालीची हुकूमत होती त्यात...त्या काजळमायेच्या नेत्रातून निघालेली थंडगार आणि शिरशिरी आणणारी अदृश्य काळोखी तिरीप माझ्या डोळ्यापर्यंत पोहचली आणि माझा जणू शक्तिपात झाला. त्राण हरवलेल्या शरीराने आणि लोळागोळा झालेल्या मनाने मी खोलीबाहेर पडलो. हॉलमधल्या बिछान्यावर कोसळलो. पराभव स्वीकारूनही त्याची खंत जाणवत नसेल तर पुरुष अधिकच लाजिरवाणा होतो. माझे तेच झाले होते.
पहाट झाली असावी..माझ्या कपाळावर कोणीतरी हात फिरवीत होतं. मला त्या स्पर्शाने धुगधुगी आली. डोळे उचलून मी वर पाहिले.
नेहमीसारखी प्रसन्न हसत मुग्धा उभी होती. केवळ नजरेच्या बळावर मला खोलीबाहेर हाकलून लावणाऱ्या मघाच्या रौद्र रूपाचा तिच्या चेहऱ्यावर मागमूसही नव्हता. मी काही बोलणार तोच ती म्हणाली...
काका, घाबरू नका. हे मावशीच्या मर्जीनेच चाललंय !