अवदसा -भाग 3
काका, घाबरू नका. हे मावशीच्या मर्जीनेच चाललंय!
मुग्धाचे ते उदगार माझ्या कानात तप्त लोहरस ओतून गेले.
माझी सरळसाधी बायको अशा प्रकारच्या विधीला मान्यता देते, नव्हे त्यात सहभागी होते. एकाच वेळी आश्चर्य, खेद आणि संताप माझ्या चेहऱ्यावर दाटून आला. मी प्रश्नार्थक नजरेने मुग्धाकडे पाहिले.
काका, तुम्हाला मूल होणं शक्य नव्हतं. आणि मला वाटतं हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे...मुग्धाने पुढचा आघात केला.
मी सुन्न झालो. बायकोच्या गर्भाशयात दोष होता. तिला दिवस जाणे शक्य नाही हे डॉक्टरांनी आधीच सांगितले होते. तिचं मन दुखावू नये म्हणून मी ती गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती. तिनं गर्भार असल्याचं सांगितल्यावर पहिल्यांदा चरकलो पण देवाने दया केली असेल म्हणून ते आनंदाने स्वीकारले होते. काहीही झालं तरी मी तिला दुखावणार नव्हतो.
देव इतका चांगला असता तर मग आणखी काय हवं होतं ? मुग्धा बडबडली.
मी हादरलोच..हिला मनातलं कळतं की काय ?
हे तू काय केलंस मुग्धा ? मी कळवळून विचारलं.
काका, आईचं प्रेम मला मिळालं नाही. ते या मावशीनं दिलं. वांझ म्हणून तिला येणारे नैराश्य मी पाहू शकत नव्हती. मावशीने खूप हट्ट धरला. सर्व जबाबदारी स्वीकारली. म्हणून मी हा प्रयोग केलाय...मुग्धा जपून बोलत होती.
आणि तुला हे कसं जमलं? तू नेमकं काय केलंस ?.मला उत्सुकता होतीच.
मी लहानपणापासून होस्टेलवर वाढलेली..आमची रेक्टर या विद्येत महापारंगत होती. आईवेगळी पोर म्हणून माझ्यावर तिचा विशेष जीव होता. जगतांना कधी अडचण आलीच तर राहू दे म्हणून अशा विद्या तिने शिकवल्यात.
मुग्धा बोलत होती....
मावशीला नैसर्गिकरित्या गर्भाधान होणार नाही हे कळल्याने मला हा प्रयोग करावा लागला. त्यासाठी मृत्यूनंतरही मानवी योनीतुन मुक्त होण्याची इच्छा नसलेल्या आत्म्याला आवाहन करावे लागते. त्याची संमती घ्यावी लागते. त्याला पुन्हा जन्म देणाऱ्या माध्यमाची माहिती दिली जाते. असा आत्मा अत्यंत चिवट असावा लागतो. कारण सृष्टीतल्या पावन शक्ती या निसर्गविरोधी कृत्याला सहजासहजी फलद्रुप होऊ देत नाहीत. त्यामुळे जबर आसक्ती असलेले आत्मेच अशा विधींसाठी घेतले जातात.
म्हणजे बायकोच्या पोटात गर्भाऐवजी पुनर्जन्म घेऊ पाहणारा अमानवी आत्मा स्थिरावला होता तर...नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारा आला..ती बिचारी तर वांझपणाचा कलंक पुसण्यासाठी त्या असंगाला उदरात जागा देऊन बसली होती. माझे डोळे झरझर पाझरू लागले.
एव्हढे केलेस मुग्धा..आणखी एक उपकार कर ! तिच्या पोटात तू कोणाला स्थान मिळवून दिलेस तेव्हढं सांग..मी याचना केली.
सांगते...काका, कोणत्याही दुष्ट आत्म्याला मी बोलावलेले नाही. मावशीच्या पोटात एक सुष्ट जीव वाढतो आहे...मुग्धा म्हणाली.
कक..कोण आहे ते !!! मी विचारले.
ती माझी आई आहे काका..म्हणतांना मुग्धाचा स्वर कातर झाला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते.
हा काय फेरा होता माझ्या नशिबी..निपुत्रिक होतो, उदास होतो पण सुखी होतो आम्ही ! ही पोरगी आली काय आणि तिने सर्व काही उन्मळून टाकले. आईची माया मिळाली नाही म्हणून मग आईला पुनर्जन्म घ्यायला लावायचा. त्यासाठी कोणाचे तर माझ्या भाबड्या बायकोचे शरीर वापरायचे. ते काय जन्माला येईल, कसे असेल???
प्रश्नांच्या वादळाने डोक्यात थैमान घातलं. इतका ताण सहन करणं माझ्या आवाक्याबाहेर होतं. मी डोकं गच्च धरून बसलो. मला तसाच सोडून मुग्धा आत निघून गेली. त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज मला आज अनोळखी वाटत होता.
नवव्या महिन्याची सुरवात झाली आणि बायकोने हाय खाल्ली. तिच्या हातापायांच्या काड्या झाल्या. गाल बसले. तिच्या पोटात अन्नाचा कण टिकेना. तिला पाहून मी ही खंगल्यासारखा होऊ लागलो.
त्यादिवशी अमावस्या होती. बायकोला कळा येऊ लागल्या. दुपारी तिला इस्पितळात नेलं. सायंकाळी लेबर रूममध्ये घेऊन गेले. तिला असह्य वेदना होत असाव्यात. ती गुरासारखी ओरडत होती. एका कोपऱ्यात डोळे बंद करून बसलेली मुग्धा मात्र सातत्याने काहीतरी पुटपुटत होती.
मध्यरात्री डॉक्टर्सची धावाधाव कमालीची वाढली. माझा प्राण कंठाशी आला. मनाशी मी प्रार्थना भाकू लागलो. पण भीतीची एक अनामिक अमंगळ छाया पुन्हा पुन्हा वर्तुळ बनून डोळ्यापुढे फिरत होती.
दोन किंकाळ्या त्या कॉरिडॉरमध्ये घुमल्या...पहिली घुमली आणि विरली. दुसरीच्या मात्र एकामागे एक लहरी उठत होत्या. तो आवाज....तो आवाज मानवी नव्हताच..
असे कित्येक प्रसंग पचवल्याने निर्ढावलेले डॉक्टर माझ्याकडे आले. खांद्यावर हात ठेवून ठेवणीच्या सुरात म्हणाले,
आम्ही पूर्ण प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही. शी इज नो मोअर !
आणि बाळाचं काय डॉक्टर ? कमालीच्या औत्सुक्याने भरलेला हा आवाज मुग्धाशिवाय कोणाचा असणे शक्यच नव्हते.
मी खाडकन तिच्या थोबाडात लगावली. ती कोलमडलीच.
अवदसा....तुझ्यापायी ती गेली ग !! म्हणून जमिनीवर गडाबडा लोळत मी रडू लागलो. तेव्हढ्यात सावरलेल्या मुग्धाने मला लेकरासारखं कुशीत घेतलं. तिच्या उबदार आश्रयात मी अश्रूंना मुक्त वाट करून दिली. ती मला थोपटू लागली.
काही वेळाने वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यावर स्ट्रेचरवरून बायकोचा मृतदेह बाहेर आला. तिच्या चेहऱ्यावर कमालीची तृप्तता पसरली होती. निर्वाणाचं समाधान तिच्या ओठांवर होतं.
पाठोपाठ एक नर्स दुपट्ट्यात गुंडाळून त्या नवजात अर्भकाला घेऊन आली. मुग्धाने ते हातात घेतलं. माझ्याजवळ आणलं.
कमालीची गोड पोरगी होती ती. थेट मुग्धाच बालरूप..मी मुग्धाकडे पाहिलं. ती भान विसरून बायकोच्या मृतदेहाकडे बघत होती. त्या अर्भकाचा गाल तिने बायकोच्या थंडगार ओठांशी भिडवला. काही सेकंदच !!
बायको हसल्याचा मला भास झाला..एक जन्म आणि एक मृत्यू..दोन्हींच्या प्रतिकांच्या मधोमध त्या कॉरिडॉरमधल्या मृतवत भासणाऱ्या उजेडात मी उभा होतो...!