अवदसा-- भाग १
आज ती परत येईल...
ती येण्याची चाहूल मला सहजच लागते. ऋतू कोणताही असो, पाऊस पडणार हे नक्की ! ढग जीव मुठीत घेऊन धावू लागतात. वारा भणाणतो. झाडे झिंगल्यासारखी डोलू लागतात. कुत्री आभाळाकडे पाहून विव्हळतात. झाडून सर्व अपशकुन स्पर्धा लागल्यासारखे एकामागे एक घडू लागतात.
लोक म्हणतात, ऋतुचक्र बदलून गेलं आहे. निसर्गात असमतोल निर्माण झाला आहे. मी हे सर्व निमूटपणे ऐकत असतो आणि मनाशी हसतो.
ती येणार असते...
ती पहिल्यांदा आली तेव्हा मीही लोकांसारखाच सामान्य विचार करत होतो. जोरदार पावसामुळे घराच्या छपरावरून पागोळ्या लागल्या होत्या. इवलेसे अंगण बुडाल्यातच जमा होते. त्या अवकाळी पावसानेही भिंतींना ओल येते की काय, अशा भीतीने बायको बावळटासारखी भिंतीवर टॉर्चचा उजेड टाकून बघत होती. अर्थातच वीज गुल झाली होती. भर उन्हाळ्यातली ती संध्याकाळ पावसाने अंधारून आली होती. मी मात्र प्राप्त परिस्थितीचा आनंद लुटत खिडकीपाशी सिगारेटचा धूर काढत उभा होतो. तिच्या कडवट वासाशी मातीचा खरपूस वास एकजीव झाल्याने एक धुंद सुगंध पसरला होता.
तेव्हढ्यात रस्त्यावर रिक्षा येऊन थांबली. माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या. अंधारात आणि त्यातही पाऊस असल्यावर पाहुणा नको वाटतो राव !
रस्त्यावरून येणारी धूसर आकृती पाहिल्यावर ती एक तरुणी असल्याचे जाणवले. घराकडे येतांना ती थबकली. अंगणात बरेच पाणी साचले होते. अंधारही होता. पाय घसरला तर ? अशा शंकेने ती थांबली असावी. मी बायकोला हाक मारली. तिनेही खिडकीतून बाहेर पाहिले. मला खूण केली. दरवाजा उघडून मी बाहेर पडलो.
तिच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश टाकून पाहिले. तिचे डोळे दिपले.
अहो, टॉर्च खाली करा आणि रस्ता दाखवा ! ती हसत म्हणाली.
मी शरमिंदा झालो. पण नकळत चूक घडून गेली होती खरी !
मी टॉर्चने रस्ता दाखवला. ओले पाय घेऊन आम्ही दोघेही घरात शिरलो.
ही आगन्तुक कोण असावी याविषयी विचार करीत असतांनाच वीज आली. ट्यूबलाईटच्या प्रकाशात ती न्हाऊन निघाली. तिच्याकडे पाहून मी थक्क झालो.
वय २०-२२ असावं. कमालीची बांधेसूद. त्यातच थोडीशी भिजल्याने कपडे अंगाला चिकटले होते. अत्यंत देखणं रूप असलेली ही बया कोण, माझ्याकडे काय काम असावं तिचं..मी गुंतलोच.
तेवढ्यात बायको ओरडली..
अगं, मुग्धा तू !!
अच्छा तर ही मुग्धा आहे. छान आणि गोड.. पण नेमकी कोण असावी ?
अहो, तुम्ही ओळखलं नाहीत. आपल्या लग्नात ही एव्हढीशी होती. माझ्या चुलत बहीणीची मुलगी... बायकोनेच तिढा सोडवला.
हो, हो..मुग्धा तर.. किती मोठी झाली आता ! फारसा संदर्भ लागला नसतांनाही मी उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नेली.
पण तिकडे..
माझ्या बायकोच्या गळ्यात पडून मुग्धा हमसून रडू लागली. बायकोनेही गळा काढला. काही क्षणातच घरावर सुतकी कळा पसरली. तशी दुसरी वेळ असती तर बायकोवर मी केव्हढ्याने खेकसलो असतो. पण या सुंदर मुलीसमोर तसे करणे बरे दिसले नसते म्हणून मी गप्प राहिलो. रडण्याचा भर आटोपल्यावर दोन्ही आत गेल्या. काही वेळाने बायको बाहेर येऊन म्हणाली.
वनवासी पोर माझी.. तळपट होईल त्या मेल्यांचं ! सोन्यासारख्या जीवाला बोलून बोलून घराबाहेर काढली..
अगं काय झालं ते नीट सांगशील का ? मी खिजवून म्हणालो.
त्यावर वायकोने तिची हकीकत सांगितली. सांगली जिल्ह्यातल्या एका श्रीमंत घराण्यात तिची चुलतबहीण दिली होती. लग्नानंतर मुग्धाचा जन्म झाला आणि तीन महिन्यातच अनामिक आजाराने तिची आई वारली. काही दिवस उलटत नाहीत तोच तिचे आजोबा अपघातात वारले. वडिलांना असाध्य आजार झाला. आर्थिक परिस्थिती खंगली. त्यांच्या पारंपरिक ज्योतिष्याने मुग्धाचा जन्म कुयोगावर झाल्याने ही अवनती सुरु झाल्याचे निदान केले. झालं... आईवेगळी पोर सर्वांच लक्ष्य बनली. जो तो तिला घालून पाडून बोलू लागला. होस्टेलच्या आश्रयाने तिने शिक्षण पूर्ण केले. पण घरात घेण्यास कोणीच तयार नव्हते. नाईलाजाने ती आजोळी (आईच्या माहेरी) गेली. पण तिच्या पांढऱ्या पायांची कीर्ती ठाऊक असल्याने आणि आजी-आजोबांची घरातली सत्ता संपुष्टात आल्याने तिचे थंड स्वागत झाले. महिनाभरात मामाला एका व्यवहारात प्रचंड खोट बसली. मामीने कुजकट बोलायला सुरवात केली. आणि मुग्धाने घर सोडले. आश्रय शोधत ती थेट माझ्या घरापर्यंत येऊन पोहचली होती.
आम्ही निपुत्रिक असल्याने बायकोला तिचा अधिकच उमाळा आला असावा अशा विचारात मी गप्प राहिलो. तसाही कुयोग वगैरे खुळचट कल्पनांवर माझा विश्वास नसल्याने मुग्धा घरात काही दिवस काढेल तर माझी हरकत असण्याचे कारण नव्हते.
मध्यरात्री पाऊस थांबला असावा. मला उगीच झोप येत नव्हती. मुग्धा बेडरूममध्ये झोपली होती. मी आणि बायकोने हॉलमध्ये तळ ठोकला होता. बाथरूमच्या निमित्ताने मी उठलो. खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. चाळा म्हणून सिगारेट शिलगावली.. मोठमोठे कश ओढत बाहेर बघू लागलो. रात्र आज जास्तच गडद झाली होती. स्ट्रीट लाईटचा प्रकाश सांडत होता. त्याच्या उजेडात कुत्र्यांचा झुंड उभा होता. ते सर्व माझ्या घराकडे बघत होते. इथे काहीतरी विशेष घडणार असल्यागत त्यांच्या नजरा दाराकडे खिळल्या होत्या.
(क्रमशः)