वाड्यातला खवीस - एक सत्य - भयकथा
#प्रा. दयानंद सोरटे
मामाच्या गावाला जाऊया , हे गाणे आजदेखील ऐकले कि बालपणीच्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही महिना - दीडमहिना मामाच्या गावाला जात असे. बालपणीचे सवंगडी अगदी आतुरतेने आमच्या येण्याची वाट पाहत असायचे. त्यांच्या सोबत उन्हाळ्याची सुट्टी केव्हा संपून जायची हे लक्षात पण येत नसे. आज मी जी सत्य भयकथा आपल्यासमोर सादर करणार आहे ती मी स्वतः अनुभवलेली आहे.
त्यावेळी मी साधारणपणे १३ वर्षाचा होतो. माझ्या मामाच्या घरापासून साधारणपणे २५ मीटर अंतरावर एका विजय नावाच्या व्यक्तीचे घर होते. त्याला मी लहानपणी विजयदादा या नावाने हाक मारत असे. त्याच्याच बाबतीत घडलेली हि दुदैवी घटना आहे. विजयदादा हा वाडीतील एक सुशिक्षित तरुण. दिसायला उंच पुरा गोरा पान, तांबूस घारे डोळे आणि पिळदार शरीर असे एकूण याचे व्यक्तिमत्व होते. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील इंग्रजीवर त्याचे चांगलेच प्रभुत्व होते. आम्ही मराठी मेडीयम मधून शिकल्यामुळे आम्हाला त्याच्या इंग्रजी बोलण्याची तेव्हा कमालीची भीती आणि आश्चर्य वाटायचे. त्यामुळे आम्ही त्याच्यापासून दूरच रहायचो.
त्याचे शिक्षण साताऱ्याला झाले. कॉलेजमध्ये असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेम झाले. मुलगा हुशार , देखणा आणि सुसंस्कृत असल्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि त्यांचे लग्न लावून दिले. त्याची पत्नी तत्कालीन एका नामांकित मंत्र्याची लाडकी पुतणी होती. त्यामुळे त्या मंत्र्याने आपल्या पुतणीला सासरी सुखात राहता यावे यासाठी एक सुंदर पण जुन्या पद्धतीचा टुमदार चौसोपी वाडा बांधून दिला. त्यावेळी त्या वाड्याच्या बांधकामासाठी संगमरवरी लादीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्याकरिता वापरलेले दगड देखील रेखीव आणि प्रमाणबद्ध होते. आणि हीच त्यांची मोठी चूक झाली. कारण त्या वाड्याच्या तुळईकरिता जे मोठ्या झाडाचे आडवे खोड वापरण्यात आले होते. त्या खोडामध्ये खविस नावाच्या भुताचे वास्तव्य होते. त्या खोडाबरोबर ते खविस नावाचं पिशाच्च त्यांच्या त्या नवीन वाड्यामध्ये दाखल झालं आणि त्या दिवसापासून त्या घराचे वासे फिरले. विवाहानंतर विजयदादा आणि त्याची पत्नी दोघेच त्या वाड्यामध्ये वास्तव्याला होते. कारण विजयदादाचे माता - पिता त्याच्या विवाहापूर्वीच कालवश झाले होते. म्हणून विजयदादा शिक्षणाकरिता साताऱ्याला वास्तव्याला होता आणि तिथेच हॉस्टेल मध्ये रहायला होता. त्यामुळे त्याला जवळचे असे दुसरे कुणीही नव्हते.
विवाहानंतर त्याच्या पत्नीला दिवस गेल्यामुळे आणि त्याच्या घरी तिची काळजी घेण्यास कुणी नसल्यामुळे त्याने तिला तिच्या माहेरी पाठवून दिले. आणि तो एकटाच त्या वाड्यामध्ये राहू लागला. त्याला स्वतः जेवण बनवून खाण्याची सवय असल्यामुळे जेवणाची त्याची विशेष अशी गैरसोय झाली नाही कारण त्याच्या ते सरावाचे होते. एका पौर्णिमेच्या रात्री त्याच्या वाड्यातून कुणीतरी जोरजोराने ओरडण्याचे आवाज येऊ लागले. ग्रामीण भागात त्यावेळी टीव्ही वगैरेसारखी मनोरंजनाची साधनं त्याकाळी उपलब्ध नसायची. मुळात लाईट्सच नसायची. त्यामुळे सगळीकडे गर्द काळोख आणि भयानक निरव शांतता असायची. शिवाय दिवसभर शेतात काम करून थकलेली लोकं लवकर झोपी जायची. पण त्या रात्री त्या भयनांक ओरडण्याने आजूबाजूच्या घरातील काही लोक जागे झाले. त्यांनी पाहिले कि विजयदादाच्या वाड्यातून तो ओरडण्याचा आवाज येत आहे. म्हणून दोन - तीन तरणीबांड पोरं हातात कंदील घेऊन धाडस करून पुढं गेली. त्यांनी जोराने दारावर थाप मारायला सुरुवात केली. दार खूप मोठे होते. जणूकाही एखाद्या राजवाड्याचा दरवाजा असतो तसा साधारणपणे १० - १२ फुटाचा नक्षीकाम केलेला शिसवी लाकडाचा दरवाजा त्याला बसविलेला होता. दरवाजाच्या बाजूलाच एक मजबूत सळ्यांची खिडकी होती. काही जण त्या खिडकी मधून आतमध्ये डोकावून पाहू लागले. पण आतमध्ये काळोख असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आतून दंड थोपटल्याचे आणि षड्डू ठोकल्याचे आवाज घुमत होते. आणि विजय दादाच्या भीतीदायक ओरडण्याचा आवाज कानावर येत होता. बऱ्याच वेळाने विजयदादाने ते दार उघडले. तो घामाने पुरेपूर भिजला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दिसत होती. अनेक जण त्याला काय झाले म्हणून विचारात होते पण तो इतका घाबरला होता कि काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे काही जण त्याला घेऊन गावच्या देवळात झोपण्याकरिता घेऊन गेले. खरे तर तो उच्चशिक्षित असल्यामुळे त्याचा भुताखेतांवर विशेष असा विश्वास नव्हता. ती रात्र कशीतरी पार पडली.
दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी रात्रीच्या प्रकाराबद्दल त्याच्याकडे चौकशी केली. त्यावर तो म्हणाला कि, तो झोपेत असताना एका ७ - ८ फूट उंचीच्या व्यक्तीने त्याला हलवून उठविले आणि तो त्याच्यासोबत त्याला कुस्ती खेळण्याचा हट्ट करू लागला. सर्वप्रथम तो घरात आला कुठून म्हणून विजयदादाने त्याची चौकशी केली पण त्या पिशाच्चाने त्याचे काहीही ऐकून न घेता त्याला घोळायला सुरुवात केली आणि त्याला उचलून आपटायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला काही सुचायला मार्गच नव्हता. म्हणून तो मार सहन न झाल्यामुळे त्याने ओरडायला सुरुवात केली. ज्यामुळे आजूबाजूच्या घरातील लोकं जागी झाली.
अशा घटना त्यानंतर त्या विजयदादांसोबत प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला घडू लागल्या. दुर्दैवाने या गोष्टीमुळे त्याला वेड लागले. याचे कारण म्हणजे त्याला त्या पिशाच्चाने झपाटले होते. त्यामुळे तो त्या बंगल्यातच एकटा झोपायचा. शिवाय त्याला जवळचे कुणीही नसल्यामुळे त्याच्याकडे वेळीच कुणी लक्ष दिले नाही. शेवटी त्याला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. प्रसूतीनंतर त्याच्या पत्नीला मुलगा झाला. पण तेव्हा विजयदादा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याची हि अवस्था पाहून त्याच्या सासरच्या लोकांनीही त्याकडे दुलक्ष केले. आणि याच अवस्थेत त्याचा दुर्दैवी अंत झाला.
त्यानंतर , सुमारे एक वर्षांनी मी आणि माझा मित्र आनंद त्या वाड्याच्या पायरीवर दुपारी साधारणपणे १२ वाजल्याचा सुमारास गप्पा मारत बसलो होतो. त्या वाड्यात कुणीही राहत नसल्यामुळे वाड्याची पडझड झाली होती. दरवाजाला कुलूप नव्हते. स्थानिक लोक आपले धान्य किंवा इतर तत्सम वस्तू त्याठिकाणी ठेवण्याकरिता त्या वाड्याच्या वापर करू लागले. पण अमावात्स्या आणि पौर्णिमेला मात्र तिकडे कुणी फिरकत नसे. आणि नेमके आम्ही दोघे अमावास्येच्या दिवशीच त्या वाड्याच्या पायरीवर गप्पा मारत बसलो होतो. आणि दरवाजाच्या आतून एक घोगरा आणि भारदस्त आवाज आला, पोरांनो ! मला जरा भाकर आणून द्याल का ? हे मिठाचं गाडगं घ्या आणि मला थोडी भाकर आणून द्या. असा आवाज ऐकल्यानंतर आमच्या दोघांचीही पाचावर धारण बसली. आम्ही दोघेही मागे न पाहता समोर जोराने पळत सुटलो. आणि समोर थोड्या अंतरावर असलेल्या उकिरड्यामध्ये दोघेही पडलो. आणि मागे वळून पहिले तर त्या वाड्याच्या दारात एक ७ - ८ फूट उंचीचा माणूस डोक्याला पटका , अंगात सदरा , खांद्यावर घोगडी , गुढघ्यापर्यंत धोतर नेसलेला , झुपकेदार मिशा असलेला. एका हातात मडके आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन आमच्याकडे पाहत उभा होता. आम्ही तिथून थेट घरचा रस्ता धरला.
घरी जाऊन मी हि घटना आज्जीला सांगितली. आज्जी प्रथम मी तिथे का गेलो म्हणून माझ्यावर खूप रागावली. त्यानंतर तिने मला मांढरदेवी काळूबाईचा अंगारा लावला. आणि मोरपिसाच्या सहाय्याने माझी झाडणी केली. मला तसा काही विशेष त्रास झाला नाही पण त्या मित्राला थोडा ताप आला होता. पण तोदेखील एकदोन दिवसांनी पूर्ण बरा झाला.
तो वाडा आजही त्याठिकाणी त्या घटनेचा साक्षीदार म्हणून उभा आहे. आता वाड्याची खूपच पडझड झाली आहे. आजूबाजूला खूपच झाडी उगवली आहेत. त्यामुळे तो वाडा आतातर खूपच भेसूर आणि भयानक वाटतो. त्याच्या आजूबाजूला दिवसादेखील कुणी फिरकत नाही.आणि अजूनदेखील अमावस्त्या - पौर्णिमेला त्या वाड्यामधून घुमलेले किंवा षड्डू ठोकल्याचे आवाज येतात असं स्थानिक लोकं सांगतात. समाप्त