माका सोड... माका हात लावायचो नाय... मि हयसून भायर नाय पडनार.. माका सोड... साधारण पाऊण तास त्या घराच्या आतल्या बाजूने नुसता धिंगाणा चालू होता.. आणी मी बाहेर सुमो गाडीत बसून कमालीच्या उत्सुकतेनं घराच्या दाराकडे नजर लावून बसलो होतो..
या असल्या प्रकारांची अजीबात कल्पना नव्हती मला आणी अनुभव तर अजीबातच नाही.. 1998 च ड्रायव्हींग लायसन माझ.. अगोदर एक दिड वर्षापुर्वी पासुनच लोकल कोणा ना कोणा मित्रांच्या गाड्या चालवायचो.. पण आता प्राॅपर लायसन वाला ड्रायव्हर झालेला असल्याने जरा एक्साइटमेंट जास्त होती... मालवणच्या बाहेर कधी गेलोच नसल्याने ही वेंगूर्ले, सावंतवाडी, देवगड, कणकवली ची भाडी म्हणजे लय लांब वाटायची.. असाच दुपारचा पप्या म्हणून एका मित्राने त्याची सुमो गाडी घेउन पाठवलेला मला वेंगुर्ले साइडचा भाडा आहे म्हणून.. त्याने लिहून दिलेला पत्ता विचारत विचारत मी कातवड गावातल्या या घरासमोर गाडी उभी केली..
नेहमी कसं तयारी करून बाहेर वाट पहाणारी व गाडी दिसली की उड्या मारत 'गाडी आली आई गाडी आली पप्पा गाडी आली'' असं ओरडत घाई करणारी छोटी मुलं.. लगबगीने सामान आणुन गाडीत ठेवणारे घरातले पुरूष, गडबडीत तयारी उरकणा-या बायका.. असंच काहीसं चित्र असतं.. पण इथे तसं काहीच नव्हतं..
गाडी थांबवून पत्ता विचारल्यावर हातानेच थांबण्याचा इशारा करून खळ्यात बसलेली एक म्हातारी उठली व काठी टेकत टेकत घरात गेली.. पाच मिनीटानी फुल्ल पँट घातलेला व वरून उघडाबंब, गळ्यात रेडीयमच्या हिरव्या मण्यांच्या माळेत स्टीलचा क्राॅस असलेला, उभ्या चेह-याचा माणुस बाहेर आला.. गाडीच्या खीडकीतून आत डोकं घालून 'बंद कर वायच नी राव हयच, हयसरच नेरूराक वचाॅचे आसले रे, लय लाम वचांक नाका.. राव माचशे धा मिंटा'' म्हणून सांगीतलं.. मी पण बरा बरा म्हणून मान डोलावली.. तसा तो परत जायला वळला.. दोन पावलं पुढे गेल्यावर तो परत मागे फिरला आणी परत खीडकीतून डोकं घुसवंत सांगु लागला.. 'थय आमच्या पावण्याच्या चेडवांक व्हरूचे हा रे.. कोण ते वारा आसला म्हणंतंत थीयसर नू.. तीया जाणता रे केन्ना ते.. ?? त्याच्या प्रश्नाला नकारार्थी मान डोलवीत मी उत्तरलो.. बेगीन आवरून नेरराक पावया रे पयले.. मागीर थिसर पोळंवक येता कोण ते.. बरे बरें येता हाव राव माचशे म्हणत तो आत पळाला..
पाऊण तास झाला तरी घरातून दंगा धडपडंच ऐकू येत होती.. कोण तरी भेसूर आवाजात 'माका सोड, मि खय जाणार नाय, माका हात नाय लावायचो, म्हणुन ओरडत होतं..
पाऊण तासाने तीन बायका आणी दोन पुरूष एका एकोणीस वीस वयाच्या म्हणजे त्या वेळी माझ्याच वयाच्या मुलीला हाता पायांना, कमरेला घट्ट धरून बाहेर घेउन आले.. आधी येउन गेलेला तो व्यक्ती घाईघाईने पळत येउन गाडीचा मधला दरवाजा उघडून धरून उभा राहीला.. ती मुलगी त्या लोकांना आवरत नव्हती.. चांगलीच दमछाक झाली होती सगळ्यांची.. लाल फुलांचा पिवळसर गाउन, तोही अस्ताव्यस्त फाटलेला, मोकळे विस्कटलेले केस, डोळे लाल, पाय ओढणीने बांधलेले अशा अवस्थेत ती मुलगी थैमान घालत होती.. कशीबशी सगळ्यानी मिळून तीला गाडीत कोंबलं.. आता ती मोठ मोठ्याने रडायला लागली.. एव्हाना हा सगळा तमाशा पाहायला वाडीतल्या लोकांची गर्दी होउ लागली होती.. मी गाडीतून उतरून बाजूला जाउन उभा राहीलो होतो ( कारण ती मुलगी तरूण होती, व तिच्या अंगावर कपडे निट नव्हते, गाउन पुर्ण फाटलेला होता, सोबतच्या बायकांना ऑकवर्ड वाटु नये म्हणुन)... बाळा चल वच बेगीन.. मगाशी भेटलेला माणुस बोलला.. तॅल बी आसा नू गाडयेत.. खय पंपार बिंपार घालू नका.. डायरेक चल.. बेगीन पावाक जाय, मी होय होय म्हणतं ड्रायव्हींग सीट वर बसलो.. आणी गाडी सोडली.. त्या मुलीभोवती एक तांबडी चादर गुंडाळून एक पुरूष आणी एका बाइने गच्च धरून ठेवलं होतं..
साधारण आम्ही मालवण सोडून चौक्याजवळ कर्लाचा व्हाळ म्हणून ठीकाण आहे तिथे पोचलो.. आणी आधी थोडा वेळ शांत झालेली फक्त मुसमूसतं रडणारी ती मुलगी अचानक जागी झाली. याआआआऐ... हिं ह्हि ह्हिं हि हि.. असं विचित्र हसत ओरडत दोन्ही पाय माझ्या बाजूच्या सिटला लावुन पाठीने मागची सीट मागे रेटत ती पुन्हा थैमान घालू लागली.. हांगा थांबव नाका, हांगा थांबव नाका.. मागुन कोणीतरी तरी ओरडलं.. मि कशीबशी गाडी पूढे दामटली.. 'ह्या बरा नाय केलास.. बरा नाय केलास.. गावतंलास.. सगळे हावळेक गावतलांस.. तीची बडबड चालूच होती.
नेरूर ला पोहचलो.. एक पोरगा मोटरसायकल घेऊन उभा होता.. त्याला पत्ता विचारला.. त्याने सांगता सांगता आत डोकावून पाहीलं आणी लगेच मोटरसायकल वळवून.. येवा पाटसून येवा.. दाखवतंय.. म्हणून आमच्या समोर मोटरसायकल पळवू लागला.. त्याला परिस्थिती न सांगताच लक्षात आली असावी.. मी निमूटपणे गाडी त्याच्या मागे नेवु लागलो.. थोड्यावेळाने एका मोठ्ठ खळं असलेल्या जून्या धाटणीच्या घरासमोर आम्ही थांबलो.. घरातून एक पांढरी शुभ्र फुल बनीयान व निळी हाफ पँट घातलेला साधारण पन्नाशीचा माणुस बाहेर आला.. यावेळी आमच्या गाडीतील एक बाई खाली उतरली व पुढे जावून त्या माणसाशी काय तरी बोलणी केली.. पंधरा मिनिटं चर्चा चालली.. मग तो माणुस परत घरात गेला.. व त्या मुलीला उतरवून घरात नेण्यात आलं.. आता ती परत मोठा दंगा करेल असं वाटलेलं.. पण तसं काहीच झालं नाही.. ती फक्त झोपेत असल्यासारखी मान खाली घालून चालत होती.. मग सुमारे तिन साडेतीन तास काहीच झालं नाही.. किंवा झालं असल्यास बाहेर काही ऐकू आलं नाही.. मी एक छोटीशी डुलकी काढुन घेतली..
आमच्या सोबत आलेला दुसरा एक पुरूष गाडी जवळ आला.. किते झालां.. मी विचारल.. झालां आता फुडे पोळवया किते जाता ते.. तो उत्तरला.. आमचं बोलण चालू असतानाच मंडळी बाहेर आली.. सगळ्यांच्या चेह-यावरचा तणाव ब-यापैकी कमी झालेला स्पष्ट दिसत होता.. ती मुलगी पण बरी दिसली.. निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता, केस मागे घेउन बो बांधला होता.. व्यवस्थीत चालत होती.. सोबत एक बाई उगाच तीच्या दंडाला धरून चालत गाडी पर्यंत घेउन आली.. व्यवस्थीत गाडीत बसली.. मि गाडी स्टार्ट केली तेवढ्यात मघाशी दिसला होता तो निळ्या हाफ पँट वाला बाहेर आला.. त्याच्या हातात बशी होती.. त्या बशीत उगळलेल्या गंधासारख काय तरी होतं.. थोडे तांदूळ, व कसल्या तरी सुकलेल्या गवतासारख्या काड्या होत्या.. त्याने काय तरी पुटपूटत गाडीवर तांदूळ उडवले व त्या सुक्या काड्यानी ते गंधासारखं होत ते गाडीच्या चारही बाजूंनी गाडीला लावलं.. ती पहिल्यांदा त्याच्याशी चर्चा करणारी बाई होती तीला कानात काय तरी सुचना दिल्या.. व मग आम्ही निघालो.. चौक्यात थांबून चहा वडा खाल्ला.. व तिथून थेट कातवडला त्यांच्या घरी त्यांना नेवून सोडलं.. भाड्याव्यतिरीक्त दोनशे मला दिले.. मी घरी आलो..
दोन तिन महीने गेले... एक दिवस असंच म्हापण च्या बाजारात उभा असताना त्या लोकांच्यातला मला पहिला भेटलेला तो माणुस भेटला.. मला बघून कसनुसं हसला.. मी पण हात दाखवला.. जवळ आल्यावर.. ते दिसचे ते चेडू बरें हा मारे.. मी सहज चौकशी केली.. आधी तो थोडा वेळ माझ्या कडे पहात राहीला.. मग अचानक गेले मारे ते.. तुका जाणा ना ?? म्हणून बोलला.. मी चकीत झालो.. किते म्हुणताय.. कशे रें.. केन्ना झाले.. ?? मी म्हणालो.
चार दिसा पाठी परतान तशेच करूक लागले ते.. धरलां रे ते कोणी.. लय काय करून पयला पण उपेग काय जाय ना.. मागीर फादर म्हणांक लागलो.. मुंमयक खय मोटो चर्च हा थीय व्हरान पय म्हणून.. तेंचे तेनीच गाडी ठरवन व्हरा होते तेचे डॅडी, माय होती नी कणकवलेची गाडी होती.. डायवर कणकवलेचोच होतो.. ता लय आरडाओरड करी.. माका माझ्या मर्यादेच्या भायर न्हेव नको.. माझ्या मर्यादेच्या भायर न्हेलास तर सगळ्यांका घेवन जाईन.. लक्षात ठेवा.. धमकीच दिलेली तेनी..
माझ्या घशात आवंढा अडकला होता तो सांगत होता ते ऐकून.. मगे फूडे ?? मी विचारलं..
पोलादपूरात अॅक्सिंडेंट झालो मारे.. सगळी गेली.. ड्रायवर सकट..
( मालवण किंवा जवळपासच्या लोकांना ही घटना माहिती असण्याची शक्यता आहे.. मुद्दाम नावे वापरली नाहीत.. व गावांची नावे सूद्धा वेगळी वापरली आहेत..)