गहिरे पाणी-Diffrent Horror story
-------------------घड्याळाने बारा टोल दिले. सारे शहर झोपले. पण सुमी....सुमी उठली, दरवाजा उघडून विहिरीच्या दिशेने चालू लागली. विहिरीवर येऊन रहाट ओढणार एवढ्यात यशोदामाई म्हणजे सुमीच्या आईने तिला मागे ओढले. विहिरीत घागर पडल्याचा "बुडुक" असा मोठा आवाज झाला. गेला आठवडाभर रोज रात्री हा खेळ चालला होता. दोन आठवड्यापूर्वी बारा वर्षाची सुमी अन् तिची आई विकासवाडीच्या पाटलांच्या वाड्यात राहण्यास आल्या. पाटलीणबाईंनी त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या दोघींना कामावरती ठेवून घेतले होते. बाकी सर्व वाड्यामध्ये सुबत्ता नांदत होती, बाळगोपाळ व गुराढोरानी वाढा गजबजून गेला होता. सुमी तर एव्हढा थोरला वाडा बघून हरखूनच गेली. पहिले दोन दिवस सारा वाडा पाहण्यातच गेले तिचे. वाड्याच्या परसातील खंदकाजवळ असणाऱ्या विहिरीकडे जाण्यास मात्र सर्वांनाच मज्जाव होता. तशी कल्पना माई व सुमीला बाईंनी दिली होती. पण का कोणास ठावूक सुमीला मात्र त्या विहिरीची फारच ओढ वाटत होती. चंदा....पाटलांची लाडकी लेक...पौर्णिमेच्या चंद्रासारखी देखणी म्हणून तिचं नाव चंदा ठेवलं होतं. सुमीची व तिची छान मैत्री झाली.
सहज खेळता खेळता सुमीने चंदाला विचारले, "का गं चंदा, त्या विहिरीकडं काहून जाऊ दित न्हाईत. मला त लै विच्चा हाय तितं जावून बगायची.." विहिरीचं नाव काढताच चंदाचे डोळे विस्फारले.
"आगं बये, आजिबात जावू नगस तिकडं. हाडळी हाय तितं येक. म्हून तिथलं पानी बी कोन पित न्हाई." असं सांगून चंदा निघून गेली. पण सुमीच्या डोक्यातून ती विहीर काही जाईना. मनाचा हिय्या करून अन् सर्वांची नजर चुकवून अंधार पडल्यावर आपण तिकडे जायचं असं सुमीने ठरवलं. दिस कलू लागला. रात्रीच्या स्वयपाकाची लगबग वाड्यात सुरू झाली. आज पाटलांचा वाढदिवस होता ना. मेजवानीच होती. सर्वजण कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते. हाच मोका साधून सुमी खंदकाच्या दिशेने निघाली. काट्याकुट्यातून वाट काढत कशीबशी विहिरीपर्यंत पोहोचली. विहिरीचे पाणी फारचा खील वाटत होते. इतके खोल कि जणू सुमी त्यात हरवत जात होती. एकटक त्या पाण्याकडे ती पाहत होती. अचानक भितीची एक कळ तिच्या मस्तकामध्ये गेली अन् ती भानावर आली. मागे सरकून उभी राहिली. तिचे विहिरीकडेच्या हाळाकडे लक्ष गेले तर हाळाच्या दगडावर भरजरी साडी, दागदागिने लेवून एक नितांत सुंदर अशी बाई गुडघ्याभोवती हाताचा कवळा घालून बसली होती. सुमीकडेच पाहत होती ती. वेशभूषेवरून तर ती तमासगिर वाटत होती. सुमी खूप घाबरली होती. पण ती काही हालचाल करू शकत नव्हती. सुमी त्या बाईसोबत काही बोलणार एवढ्यात वाड्यात मोठ्याने डिजे वाजू लागला. त्या आवाजाने सुमी भानावर आली अन् घराच्या दिशेने धूम ठोकली. झाल्या प्रकाराने सुमीचा ऊर थडाथडा उडत होता. एकिकडे भितीपण होती अन् दुसरीकडे कुतूहलपण! "कोण असावी ती बाई? हडळ तर दिसायला भयानक असती पण ती बाई....तिच्याएवाढी सुंदर आख्ख्या जगात कोण नसेल! अन् ती एव्हढी गप्प का होती? भयानक हसणं नाही, बोलणं नाही! उलट ती माझ्याकडं प्रेमानंच बघत होती.....काय असंल सगळा प्रकार??" असे अनेक प्रश्न भुंग्यासारखे डोक्यात घोंघावत होते. याचा छडा लावायचाच असा चंग बांधून सुमी परत एकदा विहिरीकडं जाण्याचा मोका शोधू लागली. अन् तो तिला मिळालापण! पुन्हा एकदा कलत्या दिसाची वेळ साधून सुमी विहिरीवर गेली. मनात भिती होतीच पण कुतुहलाने त्यावर मात केली होती. सुमीने रहाट हलवला तसा "कर्रकर्रकट्टकट्टकृट्ट" असा जोरात आवाज झाला. सुमी घाबरून मागे झाली अन् वळली तर मागे ती कालचीच बाई उभी. सुमीकडे बघून ती मंद हसली व म्हणली, "आलीस पोरी? किती वाट बगाय लावलीस??" "तु अन् माजी वाट कशापाई बगत व्हतीस? कोन हाईस तू??"...सुमी"व्हय बाळ. लै मोटी कहानी हाय बग. सांगंन कवातर. मी चंद्रकला. तमाशाचा फड हुता माजा. आता चांद वर यालाय. तू माजं येक काम कर. मी देति त्ये पाटलास्नी न्हेऊन द्ये. बदल्यात मी तुला चांगली कापडं आन् दागिनं दिन."दागिने व कपड्याचं अमिष मिळताच सुमी आनंदली. चंद्रकलेने तिला एक कापडी खलिता दिला व त्याचबरोबर सरळ जा मागं बगू नगं असा निरोपही दिला. चारच दिवसात अमावस्या होती. त्यामुळं चंद्राचा प्रकाशही नव्हता. घराच्या जवळ येताच विहिरीच्या दिशेने मोठ्यानं किंकाळी ऐकू आली व पाठोपाठ पाण्यात वस्तु पडल्यावर होतो तसा "छपाक्" आवाज आला. सुमीची पावलं थबकली. पण मागे वळून पाहू नको असे सांगितल्यामुळे ती थेट घराकडे पळत सुटली. घरी आली तर आई तिची वाटचा पाहत होती. सुमी घरात आली तर बोलताही येत नव्हतं इतका दम लागलेला. घामाने चिंब भिजलेल्या सुमीचा ऊर धपापत होता व तोंडातून शब्दही फुटत नव्हता. हातातला कापडी खलिता आईकडे देवून सुमी बेशुद्ध पडली. आई या साऱ्या प्रकाराने घाबरूनच गेली होती. ती शुद्धीवर आली तेव्हा तापाने फणफणून बाजेवर पडली होती. शेजारी आई, चंद्रा, डाॕक्टर व पाटलीणबाईहोत्या. सगळीजणं काळजीने सुमीकडे पाहत होते. कारण होतंच काळजीचं. कारण सुमी तब्बल दोन दिवसांनी शुद्धीवर आली होती. तिला चंद्रकलेनं दिलेला कापडी खलिता पाटलीणबाईंच्या हातामध्ये तिला दिसला.
सुमी मोठ्या कष्टानं म्हणाली,"बाईसाब त्यो खलिता मला द्या. मला त्यो सायबास्नी द्याचा हाय." हे ऐकताच पाटलीणबाईंच्या भव्य रेखीव कपाळावर आठ्यांचं जाळं दाटून आलं.
"सायबास्नी? कोन दिला तुला ह्यो खलिता?" आता काय सांगायचं? कोणाचं नाव घ्यायचं? मी विहिरीकड गेल्याली कळलं तर? असे अनेक प्रश्न सुमीच्या मनात थैमान घालू लागले. ती काही बोलेना हे बघून बाईसाहेबांनी तो खलिता उघडला तसा खंदकाजवळच्या त्या विहिरीचा रहाट वाजल्यासारखा आवाज आला. तो काळपट रंगाचा रेशमी कपडा होता अन् त्यावर काचकवड्याच्या खेळात आखतात तसा पट आखला होता. पण थोडासा विचित्र असा पट होता तो. नऊ घरांमधून एक रस्तादर्शक बाण होता. त्या बाणाचे मागचे टोक तोंडात पकडलेली जाडगेल्या सर्पाची प्रतिमा फारच भयावह वाटत होती. नऊ घरांमधल्या दोन नंबरच्या घरात पौर्णिमेचा चंद्र, चार नंबरच्या घरात एक नथ, सहा नंबरच्या घरात कोरीव मुठ असणारी समशेर अन् आठव्या घरात फेट्यावर गुंडाळलेली घुंगराची चाळ अशी विचित्र चित्रे होती. नवव्या घरामध्ये एक मोठा काळा ठिपका होता. एकंदरीत सारा विचित्र प्रकार! पाटलीणबाई विचारात पडल्या. त्या खाणाखुणांचा अर्थ काय असावा, अन् त्या निर्जीव सर्पाचे डोळे इतके कसे जिवंत आहेत. पाहू हे कूट उलगडून असा विचार करून तो खलिता घरी घेवून गेल्या. तो खलिता वाड्यात प्रवेश करताच वातावरणाचा नूरच पालटला. अचानक आभाळ काळवंडून आलं. विहिरीतल्या शेवाळासारखा कुबट ओलसर वास सगळ्या वातावरणात भरला. देवघरातल्या नंदादीपाची ज्योत वारा न लागताही फडफडून शांत तशी गोदाआजी घडल्या अपशकुनानं मनात घाबरली.
दुसऱ्या दिवशी गोठ्यात आक्रित घडलं. एरव्ही शेरानं दूध देणारी पाटलाघरची कपिला गाय अचानक आटली. तिनं अन्नपाणीच सोडलं जणू. सगळ्यादेखत कपिलेनं जीव सोडला. चार दिवसानी भोरी म्हशीचं कवळं रेडकू तडफडून जमिनीवर पाय खुरडत खुरडत गतप्राण झालं. एव्हाना पौर्णिमा उलटून गेली होती. सुमीच्या विहिरीकडील फेऱ्या सुरूच होत्या. तिनं चंद्रकलेला खलिता पाटलीणबाईनं घेतल्याचं सांगितलं. त्यावर चंद्रकला गडगडाटी हसली. तेव्हा प्रथमच ती सुमीला भेसूर वाटली. भितीनं ती थरथर कापू लागली. ते पाहून चंद्रकला म्हणाली, "तू मला भिऊ नगस. तुला मी कायबी न्हाई करनार. तुजं माजं जुनं नातं हाय. तू माजी मदत करतियास. मला वाड्यात वाट पाडून दिलीस तू. तवा आता तू जा." एकामागोमाग एग अपशकुनी घटना घडल्यानं बाईसाहेब घाबरून तो खलिता घेवून गोदाआजीकडे गेल्या. खलिता उघडून पाहतात तर काय! तो बाणाचं टोक पकडलेला सर्प एक घर पुढे सरकला होता. दोघीही डोळे विस्फारून एकमेकीकडे पाहू लागल्या. त्यांची तंद्री भंग झाली घुंगराच्या चाळेच्या आवाजानं. दोघीही वरच्या कोठीकडे धावल्या. तो आवाज चंद्राच्या खोलीमधून येत होता. खोलीच्या दारात दोघीही थबकल्या. खोलीच्या फरशीवर सगळी ओल पसरली होती. काळपट रंगाचं पाणी सगळ्या फरशीवर पसरलं होतं. अन् खिडकीपाशी चंद्रा पाठमोरी उभी होती. "पोरीsssss" अशी हाकाटी देताच चंद्रा झपकन् मागे फिरली. तिचा वेश बघून बाईसाहेबांनी घाबरून किंकाळी फोडली. तमासगिर बाईसारखा वेश, पायात चाळ, अन् पांढराफटक पडलेला चेहरा. डोळ्याखाली ओघळलेले काजळ तिच्या भयानकपणात भर घालत होतं. "आगं चंद्रे काय ह्यो आवतार??" गोदाआजी ओरडताच चंद्रा चिडली व म्हणाली, "चंद्रा न्हाई.....चंद्रकला म्हन म्हातारे!!" चंद्रकलेचं नाव ऐकताच गोदाआजी डोक्याला हात लावून मटकन खाली बसली. वीस वर्षापूर्वीचा सारा घटनाक्रम तिच्या मनात चित्रपटासारखा तरळू लागला. चंद्रकलेच्या फडानं गावाच्या वेशीजवळ तंबू ठोकला. नितांत कोवळ्या सौंदर्यानं तिनं सर्वांना पुरतं वेड लावलं होतं. याला गावच्या थोरल्या पाटलाचा लेक रंगरावही अपवाद कसा असेल. रंगराव नावाप्रमाणेच रंगेल. त्यात ही सौंदर्यखणी आयती त्याच्या गावात चालून आल्यावर ही संधी तो सोडणारा नव्हता. आपलं दोस्तलोकांचं टोळकं घेवून तो तमाशाला गेला. तिथं त्यानं चंद्रकलेसोबत असभ्य वर्तणूक केली. तरी पाटलाचा लेक या भितीने सगळी फडाकरी लोकं गप्प बसली. पण रंगरावाने मर्यादा ओलांडत तिचा पदर पकडला तशी मानी असणारी चंद्रकला बिथरली अन् तिनं रंगरावाला कानशिलात लगावली. फड बर्फ गिळल्यागत गार पडला. झाल्या प्रकारानं रंगराव औशाळला, रागावला, बिथरला अन् ताडताड पावलं टाकत तिथून निघून गेला. या अपमानाचा पुरेपूर बदला घेण्याचा चंगच बांधला त्यानं. पण सरळ वार करून नव्हे. चंद्रकलेच्या मनावर वार करून. दोन दिवसांनी मनात काहीतरी ठरवून रंगराव चंद्रकलेला भेटला अन् झाल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. त्याच्या या बदललेल्या पवित्र्यास चंद्रकला भुलली अन् आपलं मन त्याला देबसली. प्रेमाचं भरतं आलं अन् त्या प्रेमाच्या पावसाने झालेल्या चिखलात दोघेही घसरून तोल घालवून बसले. नंतर फड हालला. वर्षभर चंद्रकलेचा काही पत्ताच नव्हता. रंगरावानेही तो शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. नसती ब्याद गेली म्हणून तो खुशीतच होता. पण अचानक एकेदिवशी हातात तान्हं बाळ घेवून चंद्रकला पाटलाच्या वाड्याच्या दारात उभी राहिली. ती अतिशय क्षीण झाली होती. ते बघून थोरल्या पाटलांच्या मस्तकाची शीरच उठली. त्यांनी रंगरावाचा अन् तिचा चांगला समाचार घेतला. चंद्रकला रंगरावाला "ही तुमची लेक हाय. हिला अन् मला पदरात घ्या म्हणून गयावया करू लागली." गावासमोर पाटलाची पार नाचक्की झाली. झाला प्रकार अंगाशी आल्यामुळं रंगराव बिथरला अन् त्यानं तिला वाड्यात आणून बेदम मारहाण केली. एकुलता एक लेक अन् आबरू दोन्ही वाचवायसाठी चंद्रकलेची आन् तिच्या पोरीची खंदकाजवळच्या विहिरीत विल्हेवाट लावायचं ठरलं. अमावस्येच्या रात्री मार खावून अर्धमेली झालेल्या चंद्रकलेला व तिच्या तान्ह्या बाळाला गोणपाटात बांधून त्याला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आलं. बिचारीला शेवटच्या प्रतिकाराचीही संधी मिळाली नाही. या सगळ्या प्रकाराची मूक साक्षीदार होती गोदाआजी, रंगरावाची धाराऊ. थोरल्या पाटलीणबाई अकाली वारल्यानंतर तिनंत रंगरावाचा सांभाळ केला होता. हा सगळा प्रकार तिला आठवून व त्या वीस वर्षापूर्वी विहिरीच्या गहिऱ्या पाण्यात जीव सोडलेल्या चंद्रकलेचं नाव परत वाड्यात ऐकून गोदाआजी आजारीच पडली. बाईसाहेबांना तिनं ही सारी हकिकत सांगितली. ते ऐकून त्या सुन्नच झाल्या. नवऱ्याच्या करतूतीचा त्यांना फार राग आला. पण त्या गप्प बसल्या. इकडं चंद्रीचं वेड वाढतच चाललं होतं. ती दिवसभर शृंगार करून चाळ बांधून नाचायची. वडिल तोंडापुढं आले कि अंगावर धावून जायची. या वेडाच्या भरातच तिनं फास लावून घेतला. पाटलाच्या घरावर पहिला आघात झाला. रंगराव पाटलाची झोप उडाली. गोदाआजीनं खलिता काढून पाहिला तर सर्पानं पौर्णिमेचा चंद्र गिळून टाकला होता व तो आणखी एक घर पुढे सरकला होता. पोटची पोर डोळ्यासमोर गेल्यामुळं बाईसाहेबांनी अंथरूण धरलं. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्या तिरमिरीतच त्यांनी खंदकाजवळच्या विहिरीत उडी मारली. पटावरच्या सर्पानं नथही गिळंकृत केली. हा प्रकार, तो खलिता हे सगळं गोदाआजीनं रंगरावास समजावला. तो अंतर्बाह्य हादरून गेला होता. आपला सूड घेण्यासाठी चंद्रकला आली आहे याची त्याला मनोमन जाणीव झाली होती. पण एक गोष्ट चंद्रकलेला पाटलापर्यंत पोहोचू देत नव्हती, ती म्हणजे गोदाआजीची पुण्याई. "म्हातारी आडवी यायले माझ्या. आधी तिचा काटा काढला पाहिजे...." अशी चंद्रकला सुमीजवळ बडबडली. तिनं एक विषाची कुपी सुमीला दिली व तिच्या औषधापाशी ठेवायला सांगितली. सुमीनं त्याप्रमाणं केलं. अमावस्येच्या दोन दिवस आधी रंगराव गोदाआजीला औषधे पाजताना अचानक विज गेली. अंधारात त्यानं बाटलीतलं विष औषध समजून पाजलं अन् गोदाआजीनं पडल्याजागी प्राण सोडला. विज परत आल्यावर झाला प्रकार लक्षात आल्यानं रंगराव रागानं बेभान झाला. आपल्या धाराऊचा आपणच जीव घेतला या विचारानंच बिथरून गेला. पटावरील सर्पानं रंगरावाची रक्षणकर्ती समशेर गिळली होती. "ह्या कलीला बगतोच" असे म्हणून वाड्याच्या बैठकीत तो आला. तर तिथं सुमी बैठकीच्या गाद्यांवर पाय पसरून बसली होती. तिला पाहून त्याच्या रागाचा बांध फुटला. "कार्टे, अवदसे तूच चंद्रकलेला वाड्यात आणलंस ना. तूच सगळं वाटोळं केलंस. तुला जिता नाई ठेवणार" असे म्हणून तो सुमीचे केस पकडणार एवढ्यात "थांब..." अशी हाक ऐकू आली. दारात चंद्रकला उभी होती. "चांडाळा, माझ्या पोरीचा एकदा जीव घेतलायस तू. पुन्यांदा न्हाई घिवू देनार. ही सुमी माझी मागल्या जल्मीची पोर हाय." हे ऐकून सुमी अन् रंगराव दोघेही आश्चर्यचकित झाले. "तेवा तुजा काळ हुता. आज माजा हाय." असे म्हणून तमासगिराच्या वेषातील नाजूक दिसणाऱ्या चंद्रकलेनं अक्राळविक्राळ रूप घेतले. ते पाहून सुमी घाबरून पळून गेली. तिच्या डोळ्यांच्या जागी पोकळ्या झाल्या, हाताची नखे हातभर लांब झाली व शरीर पाण्यात बुडून कुजल्यासारखे दिसू लागले. "तू माझी हि गत केलीस. म्हनून मी तुजं घर खाल्लं. आता तुझी पाळी" असे चंद्रकलेनं म्हणताच वाड्यात कुजलेलं पाणी जमीनीतून पाझरू लागलं. हा सगळा प्रकार पाहून रंगरावाच्या डोक्यावर परिणाम झाला अन् तो डोक्याचा फेटा सोडून फरशीवरचं पाणी पुसू लागला. वेड्यासारखा मोठमोठ्यानं "मला सोड...." असं ओरडू लागला. चंद्रकला भेसूरपणे हसू लागली. हळूहळू सगळ्या घरात पाणी भरलं. पाण्याच्या खणीत वाडा खचू लागला. बाहेर सारं गाव गोळा होवून हे आक्रित पाहू लागलं. खंदकाजवळची विहिर फुटून वाड्याची जमीन खचायला लागली होती. सुमी व माई जीव वाचवून पळाल्या. वाडा खचला होता व विहिरीच्या गहिऱ्या पाण्यानं रंगरावासह त्याच्या सगळ्या घराचा ग्ग्रास घेतला होता.
END--!!
Writer- ASWINI KULAKARNI.