बालपणीचा थरारक अनुभव - सत्य कथा
बालपणीचा थरारक अनुभव - सत्य कथा |
प्रा. दयानंद सोरटे.
हि गोष्ट मी साधारणपणे ११ वर्षाचा होतो तेव्हाची आहे. आम्ही त्यावेळी चाळीमध्ये रहायचो. त्यावेळी नवरात्र , गणेशोत्सव , आंबेडकर जयंती, शिव जयंती अशा सणांना पडद्यावर चित्रपट दाखविले जायचे. त्यावेळी घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. त्यामुळे कलर चित्रपट पहायला मिळणार आणि तोही मोठ्या पडद्यावर या गोष्टीचे लहानपणी खूपच आकर्षण वाटायचे. लोकांची असे पडद्यावरील चित्रपट पाहण्याकरिता एकच गर्दी व्हायची.लोकं अगदी चादर किंवा चटई टाकून जागा अडवून ठेवत असत.
मला आठवते , आमच्या बाजूच्या दोन इमारती सोडून तिसऱ्या आणि चौथ्या इमारतींच्या मध्ये त्यावेळी सत्यम शिवम सुंदरम नावाचा झीनत अमान आणि शशी कपूरचा चित्रपट होता. त्यावेळी रोमँटिक चित्रपट कळण्याइतकी बुद्धी परिपकव् नव्हती. त्यामुळे अर्धा चित्रपट संपल्यानंतर खूपच कंटाळा आला. आमच्याच इमारतीतील दोन मुली एकीचे नाव आशा आणि दुसरी मीना मला घरी जाण्यासाठी विनवणी करू लागल्या. कारण त्यांना अंधाराची भीती वाटत होती. पण मी टाळाटाळ करत होतो. त्या देखील माझ्याच वयाच्या होत्या. त्यामुळे त्यांनादेखील अंधाराची आणि भुताची भीती वाटणे साहजिक होते. म्हणून त्या मला सोबत येण्याकरिता बोलत होत्या. शेवटी मी दुर्लक्ष केल्यामुळे त्या कंटाळून निघाल्या.
त्यावेळी आमच्या इमारतींच्या मोकळ्या जागेत एक मोठा जुना वटवृक्ष होता. लहानपणी आम्ही त्या वृक्षाच्या पारंब्यांना लोम्बकळून झोके घ्यायचो. त्या दोघींना जाऊन १० मिनिटेच झाली असतील त्यांच्या मागोमाग मी कंटाळा आल्यामुळे एकटाच निघालो. आमच्या इमारतीजवळ आल्यानंतर मी पाहिले कि, त्या दोघीही त्या वडाच्या झाड्याच्या खाली अतिशय घाबरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो. तर त्यांना अक्षरशः घाम फुटला होता , आणि दोघीही भीतीने थरथर कापत होत्या. मी काय झाले म्हणून विचारले तर त्या दोघींच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्यातून मीनाने धाडस करून बोटानेच इशारा करून मला काहीतरी दाखविण्याचा इशारा केला. खरे तर मी त्यावेळी आमच्या इमारतीच्या पाठमोरा उभा होतो. आणि त्यांनी जो इशारा केला तो आमच्या इमारतीच्या जिन्यांच्या दिशेने. म्हणून मी मागे वळून पाहिले तर एक पांढऱ्या रंगाच्या साडीचा पदर मला ओझरता दिसला. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी मला भूत वगैरे काहीच दिसले नाही. म्हणून मला त्यावेळी भीती अशी वाटली नाही. शिवाय मी एकटाच लहानपणी पोद्दार हॉस्पिटलच्या अभ्यास गल्लीमध्ये अनेक वेळा जात असे आणि रात्री उशिरा घरी येत असे.
परंतु या दोघींची हि अशी अवस्था पाहून मात्र आता मला खरंच भीती वाटली. म्हणून मी त्यांना धीर देऊन काय झाले ते विचारले. तर त्या दोघी मला रडतच सांगू लागल्या. कि, आपल्या इमारतीच्या जिन्यावर पांढरी साडी घातलेल्या चार बायका बसल्या होत्या आणि त्या मशेरी लावत होत्या आणि आमच्याकडे पाहून जोरजोराने हसत होत्या. त्यांचे केस सोडलेले होते. आणि त्या आम्हाला त्यांच्याकडे बोलवत होत्या. म्हणून मग आम्ही घाबरून इथेच या झाडाखाली उभे राहिलो. त्यांनी असे सांगितल्यानंतर मला एक गोष्ट आठवली कि, मी इमारतीजवळ येत असताना कुणीतरी जोराने हसण्याचा आवाज येत होता नक्की. पण असेल कुणीतरी म्हणून मी दुर्लक्ष केले होते. पण आता मला सत्य कळल्यावर माझीही भीतीने गाळण उडाली. आणि वेळ अशी होती कि, पुन्हा माघारीही जाऊ शकत नव्हतो. म्हणूनमन मन घट्ट करून आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला.
त्यात आम्ही तिघेही रहायला तिसऱ्या मजल्यावर. त्यामुळे आणखीनच भीती वाटू लागली. जिने चढताना आलेच मध्ये कुणी तर काय करायचे. शिवाय इमारतीमध्ये घडलेले काही भीतीदायक किस्से आम्ही ऐकून होतो. तरीही. जागेवाला बाबाचे नाव घेत आम्ही एकमेकांचे हात - हातात घट्ट धरून एक - एक पायरी चढू लागलो. जिने चढताना मी पाहिले कि, खरोखरच जिन्याजवळील भिंतींवर जणू काही आत्ताच कुणीतरी मशेरी घासून थुंकल्याचे ओले डाग दिसत होते.तोंडातून जागेवाल्या बाबाच्या नावाचा धावा चालूच होता. सुदैवाने आमच्या मजल्यावर येईपर्यंत आम्हाला काहीही दिसले नाही. . मात्र आमच्या मजल्यावर येईपर्यंत आम्ही तिघेही घामाने डबडबून गेलो होतो. आमच्या मजल्यावर पोहोचताच आम्ही जे घराच्या दिशेने पळालो. ते मागे वळून देखील पहिले नाही.
दुसऱ्या दिवशी आशा आणि मीना दोघीही तापाने फणफणल्या. त्यानंतर एक आठवडाभर दोघीही आजारी होत्या. त्यांच्या अंगावरून उतारे काढून टाकल्यानंतर त्यांना बरे वाटले. पण त्या दिवसापासून ठरवले. कि , रात्रीच्या वेळेस पुन्हा कधीही चित्रपट पहायला एकट्याने जायचे नाही. आणि या घटनेमुळे आईने मला रात्रीच्यावेळी पोद्दारच्या गल्लीत अभ्यास करायला पाठविणे देखील बंद केले.