नमस्कार मित्रांनो.. आशा करतो की तुम्ही सर्व बरेच असाल.. आता बरेच याचा अर्थ खूप, आधीक , जास्त किंवा पुष्कळ असं नाही. तर बरेच म्हणजे बरे असाला. शेवटी मराठी भाषा जशी वळवता येईल तशी वळते. आणि आपण सर्व मराठी. जाती, धर्माने वेगवेगळे असले तरी मराठी. आता आमच्यात जात आहे पण धर्म नाही. धर्म वगैरे संकल्पना तुमच्यात. आमच्यात फक्त जात, ती ही तुम्ही ठरवली म्हणून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला जात आहे पण धर्म नाही, असा हा आहे तरी कोण..? याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच,
आज उन तसं जास्तच आहे. म्हणजे सकाळी मस्त थंडी पडते आणि दुपारी अस सहन न होण्यासारख उन. ते राक्षस अजूनही बाहेर आहेत . या छोट्याशा घराच्या लहानशा झरोक्यातून मी अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित त्यांना पाहू शकतो पण त्यापैकी कोणाचं लक्ष माझ्यावर नाही. आता मी अशा कोणत्या जागी आहे की मी त्यांना पाहू शकतो पण ते मला पाहू शकत नाहीत..? ते ही दिवस. आणि रखरखत उन्ह असताना.?
किती हे प्रश्न..?
आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
आता मी लपून बसलोय ती खरतर माझी जागा नाही,. आणि कोणाचे आहे हे मला माहिती नाही, आणि ते माहीत करून घेण्याची गरजही नाही. कारण त्या राक्षसांपासून आपला जीव वाचवण्यासाठी एका आसरा हवा होता आणि तात्पुरता का असेना तो मला मिळाला आहे. खरतर काल घडलेला तो प्रसंग माझ्यासाठी अनपेक्षित होता.
ते दैत्य. माझ्यावर झालेला प्राणघातक हल्ला, ती पळा पळ. बापरे. आठवलं तरी अजूनही काळजाचा थरकाप उडतो.
तर त्याचं झालं असं, कालही असंच रखरख उन पडल होत. सोबत मंद वारा ही सुटलेला. अशात मी निवांत एका झाडाखाली सावलीत बसून विश्रांती घेत होतो. एकंदरीत मन प्रसन्न करणारे वातावरण होतं. तोच मला काही अंतरावर झाडाखाली वाळलेल्या पानांची सळसळ जाणवली आणि मी सावध झालो. मान किंचित तिरकी करून पाहिल, पण कोणी दिसत नव्हता. म्हणून पुन्हा आपल्या जागी निवांत बसून राहिलो. तोच पुन्हा पानांची सळसळ. कोणीतरी आजूबाजूला आहे याची जाणीव मला झाली. आणि मी ही शोध घ्यायचे ठरवले. तडक उठलो. मान जरा उंच करत काही नजरेत येतय का हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो.
आणि मला, 'ती' दिसली. काही अंतरावर असलेल्या एका भल्या मोठ्या वृक्षाखाली उभी, 'ती'. थोडी अस्वस्थ, कावरीबावरी. वाट चुकलेल्या हरणी सारखी. जागेवरच उभी असली, तरी तिची संशयित नजर सर्वत्र फिरत होती. दिसायला सुंदर. अंगानं गुटगुटीत. शरीराची ठेवण अगदी जिथल्या तिथं . मी तिला पाहतच राहिलो आणि शरीराची भूक जागी झाली. आता ती कधी भूख आधीपासूनच होती. पण तिला पाहताच ती भुख चवताळून उठली. असं वाटत होतं की ते थेट तिच्यावर झडप घालावी आणि.....
मी थोडासा कानोसा घेत पुढे सरकू लागलो पण माझ्या हालचालींमुळे वाळलेल्या पानांची सळसळ तीने ऐकली आणि सावध झाली. मागे पहाताच तिची नजर माझ्यावर पडताच ती आणखीनच घाबरली.
तीच अस घाबरून जाण स्वाभाविक होत. कारण त्या जागी आम्ही दोघेच होतो . आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. तिची नजर माझ्यावर खिळलेली आणि माझी नजर तिच्यावर. काही सेकंद सारं काही थांबल्या सारखा वाटला. कदाचित माझ्या नजरेतील चवताळलेली भूख तिला दिसली असावी आणि त्यामुळेच तिने घाबरून आपला चालण्याचा वेग वाढवला. मी ही तिला असं सहजासहजी सोडणार नव्हतो. मी ही तिच्या मागे चालू लागलो. मी पाठलाग करतोय हे समजताच मागे वळून न पाहता ती जिवाच्या आकांताने धावत सुटली. पण मला माहीत होतं तिथे हे सर्व प्रयत्न तोडके पडणार होते. धावता-धावता ती एका पडक्या घरात शिरली आणि तिथेच फसली. तिच्या मागे मगे मी ही त्या घरात शिरलो.
आता ती आयती माझ्या जाळ्यात सापडली होती. तोंडातून लाळ गाळत मी अधाशासारखा तिला पाहत होतो . ती मात्र बाहेर जाण्यासाठी केविलवाणी धडपड करत होती. मी तिच्यावर झडप घालणार तोच मला कोणतरी पकडला आणि त्या घरातुन बाहेर खेचू लागल. तसा मला भयंकर राग आला. 'तळपायाची आग मस्तकात जाण' म्हणतात ना अगदी तसंच. तिला तिथेच सोडून रागाच्या भरात मी बाहेर आलो आणि सुंन्न झालो. एक, दोन , तीन , .........सात, आठ...? अरे काय....? किती जण तिला वाचवयला आले होते. म्हणजे ही सगळी तीची 'चाल' होती तर. मला पकडून देण्याची. ज्याने मला पकडलं होतं मी नुसत वळून त्याच्याकडे पाहिल तसा तो घाबरला आणि मला सोडून दिला.. आणि बाजूला झाला. आता मला घेणाऱ्या एका एकाला निट बघू लागलो . काहींच्या हातात काठ्या होत्या तर काही नुसतेच दूर उभे पाहत होते. त्यातला एक जण होता बिचार्याला सरळ उभेही राहता येत नव्हतं. पतंग आकाशात तरंगत असतो अगदी तसा तरंगत होता. त्याला बघून कोणीतरी ओरडलं
"ए बेवड्या बाजूला हो.."
बाकी काही मुली, महिला दूरून फक्त पहात होत्या. सोबतच विचित्र अवतारातील दोन 'हिरो' माझ्याजवळ येऊन आपण जरा जास्त धाडशी आहोत हे अप्रत्यक्षपणे त्या मुलींना सांगत होते. पण मला एकट्याला संपवण्यासाठी एवढी मोठी फौज. त्यात मी एकटा.. छाती थोडी फुलून आली. इतक्यात त्यांच्यातील एक जण लांबूनच ओरडला.
"हे सोडू नका त्याला. संपवा."
मी त्याच्याकडे पाहत मनात म्हटलं
'स्वतः कोसभर दूर उभा राहून आदेश कसले देतोस दम आहे तर समोर ये ना'
त्यातल्या एकाने माझ्यावर काठी उगारताच दुसरा म्हणाला
"मारू नका . मी पाहतो."
त्याचे शब्द ऐकून थोडं बरं वाटलं. कुठतरी दया, करूणा आहे. पण माझं लक्ष नसताना त्याने माझी मान पकडुन चक्क मला वर उचलला.
मला मानेची हालचाल करता येईनाशी झाली. तसा मी जोराचा हिजडा मारला आणि त्याच्या पकडीतून निसटून जमिनीवर आदळलो.. मला आता काही सुचेनासे झाले. जीव वाचवण्यासाठी मी सैरावैरा धावू लागलो आणि एकच कल्लोळ, गदारोळ माजला.
मला मारण्यासाठी इथे जमलेले आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिकडे पळत सुटले होते. त्यातला एकजण शेजारच्या काटेरी कुंपणात पडला तर दोघे गटारीत कोसळले. पण मघापासून 'हिरोगिरी' , हिरोपंती करणारे मात्र कुठे गायब झाले ते मला शेवटपर्यंत समजलं नाही. बाकीचे रस्ता दिसेल तिकडे उड्या मारत नुसत पळत होते. इतक्यात त्यातला एक जण ओरडला.
"अरे मारू नका त्याला. सर्पमित्र आलाय"
हे शब्द कानावर पडताच मनाला थोडा धीर आला. जागेवरच थांबलो आणि माझा कोण मित्र आहे पाहू लागलो. घोणस, मण्यार, धामण यांच्या पैकी कोणीतरी असेल तोच आणखी कोणीतरी ओरडलं "पकडू नका.. मारून टाका त्याला.. 'नाग' आहे तो.."
"मारू नका. मी सर्पमित्र आहे. त्याला पकडून दूर सोडून येतो."
मला संजीवनी देणारे हे शब्द बोलत एक माणूस पुढे आला. त्याच्या हातातील ती विचित्र काठी . विचित्रच पेहरावा. त्याला खालून वर नीट पाहत मनात म्हणालो.
"अरे हा माझा मित्र कधी कधीपासून झाला.? तसे फेसबुक वर कधी न पाहिलेले पण आपले मित्र असतात पण आम्हा सर्पांमधे फेसबुक व्हाट्सअप किंवा सोशल मीडियाची सुविधा नाही.. त्याचं बोलणं संपताच मी सैरावैरा धावू लागलो. धावतच मनाला म्हणालो.
" हा माझा मित्र..? कोणत्या बाजूने , कोणत्या अँगलने हा माझा मित्र वाटतो..?"
तोच कुणीतरी काठी भिरकावली आणि जाता जाता ती माझ्या पाठीत बसलीच. जोरात कळ उठली, पण न थांबता तसाच धावत सुटलो. म्हटलं आधी सुरक्षित जागी पोहोचू, मग काय आणि किती लागलय यावर विचार करू. शेवटी एका सुरक्षित जागी पोहोचलो पण ते सर्व बाहेर ठाण मांडून बसले होते . या सर्व गोंधळात ती म्हणजे 'बेडकी' पळून जाण्यात यशस्वी झाली. रात्र झाली तशी बाहेर सुरू असलेली चर्चा ऐकू येऊ लागली. एक जण म्हणाला,
" आज ती बेडकी आमच्या मुळे वाचली."
पण हे सांगताना समोर ठेवलेली कोंबडीच 'चिकन ६५' मात्र अधाशासारखा खात होता. पण त्यात एक जण जे बोलला त्याचा खूप राग आला.
"आमच्या घरात आज 'साप' आला होता."
मनात म्हटलं, 'अरे मुर्खा मी तुमच्या घरात नाही तर मी माझ्या घरात आला आहात.' या ठिकाणी भल मोठ जंगल आणि माझ छोटस वारूळ होतं. ते उद्ध्वस्त करून तुम्ही तुमची घरे बांधली आहेत. आम्ही छोट्या छोट्या जीवांनी जायचं तरी कुठे, आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी काल पासून ह्या जागेवर अडकून पडलोय. पोटात भूक आहे पण बाहेर गेलो आणि त्यांच्या नजरेस पडलो तर सगळं संपलं म्हणायचं. जिथे पहावं तिथे माणसांचा अतिक्रमण झालय . आमच्यासारख्या जीवां ची घर नष्ट करून आपली वस्ती वाढवत आहेत आणि वर आम्हालाच 'घुसखोर' ठरवून ठेचत आहेत. पण एक दिवस असा येईल की येणाऱ्या पिढीला पशु, पक्षी , प्राणी असे दिसायचे हे चित्रामधेच दाखवावे लागेल. कारण प्रत्यक्षात आमच्यासारख्या सजीवांचं अस्तित्व स्वार्थी माणसाने संपवल असेल.
आशा करतो की सुरुवातीला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. चला. पहातो काही खायला भेटत का ते..
समाप्त.
मित्रांनो अवनी वाघिणीच्या हत्येमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘रेड लिस्ट’चा आढावा घेतला तर असे दिसून येते की सन २०१४-१५ पर्यंत जगातून ७८ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २१ सरपटणारे प्राणी, ३३ उभयचर, १४० प्रकारचे पक्षी व ६४ प्रजातींचे मासे कायमचे नष्ट झाले आहेत, पुन्हा कधीच न दिसण्यासाठी. अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीमधून निसर्गतः निर्माण झालेल्या जीवसृष्टीमधून ३३७ प्राणी नामशेष झाले आहेत., आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मागणीमुळे प्राण्यांची बेकायदेशीर शिकार, तस्करी तसेच दिवसेंदिवस पोखरत असलेल्या जंगलामुळे जंगलातील प्राणी आता मनुष्यवस्ती शिरकाव करत आहेत.आणि हे जर असेच राहिले तर पृथ्वीवर केवळ माणूसच माणूस राहील आणि एक दिवस असा येईल की जसे डायनासोर या पृथ्वीवर नष्ट झाले तर माणसाचा अंत होईल
धन्यवाद...