©️ काल्पनिक कथा -श्रद्धा भट
"कभी तनहाईयॊ में यूं...
हमारी याद आयेगी....... !!"
रेकॉर्डवर मुबारक बेगम गात होती आणि इथे माझे डोळे अश्रूंनी भरून आले....
"नेहा... माझी नेहा !!!!" का गेलीस मला सोडून...???
मी आसवं गाळू लागलो. माझी नेहा मला नुकतीच सोडून परलोकीच्या प्रवासाला निघून गेली होती... अचानक हार्ट अटॅक आणि मृत्यू !! मलाच काय कोणालाहीं हे खरं वाटत नव्हतं... !!! दीड -दोन वर्षे झाली होती लग्नाला... अजूनही नवलाईचा काळ होता आणि मध्येच हे अघटित घडलं !!!!
मी ..शरद सराफ, वय वर्षे 30, मजबूत देहयष्टी, सावळा रंग तर नेहा, गोरटेली, उभा चेहरा आणि हसरे डोळे... अगदी बोलघेवडी होती पोर !! सदानकदा ती जुनी गाणी आपल्या गोड आवाजात गुणगुणत असायची... माझ्या पेक्षा नेहा थोडी उजवीच होती... आणि नेमकी हीच गोष्ट मला आवडत नव्हती... नाही म्हणायला माझं तिच्यावर खूप प्रेम होतं पण सगळे तिची स्तुती करायचे ना तेव्हा माझा पारा असा चढायचा म्हणून सांगतो...!! माहित आहे हे चुकीचं आहे पण म्हणतात ना स्वभावाला औषध नाही... !!
तर अशी माझी नेहा !!!! सारेच तिच्या वर प्रेम करत होते आणि ती सुद्धा सगळयांचा मान राखून होती.. !!!आपल्याच दुनियेत वेडी खूष होती.. एकेदिवशी कोणालाही न सांगता हे जगच सोडून गेली..
मला मागचं सारंच आठवत होतं.. माणूस गेल्यावर त्याची खरी किंमत कळते म्हणतात... माझंही तेच झालंय... नेहाला मी विसरू शकत नाही... हे जरी खरं असलं तरी एक सांगू का???? आज मला खरं सांगायचं आहे...
शु sss कान करा इकडे !!!
एक गंमत सांगायची आहे तुम्हाला..!!
किनई नेहाला मीच मारलं आहे....!!
हो.... हो, ओरडू नका !!!!कोणाला सांगू पण नका मी आज तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगणार आहे.... ऐकता आहात ना?????
आटपाट नगरातल्या राजासारखंच झालं सारं !!मी राजा होतो आणि नेहा राणी !!! हो हो...... पण ती नावडती राणी !!! माझी राणी तर होती " प्रिया..".. माझ्या ऑफिस मधली मैत्रीण... ! पण ती घरात कोणालाच आवडत नव्हती... आणि सगळेच मला ओरडले.... असा राग आला सांगू !!!! पण माझं काहीच चाललं नाही आणि मग हे नेहाचं लोढणं माझ्या गळ्यात बसलं.... !!! आई बाबा, मिनू माझी बहीण सारे नेहावर खूष होते, मला मात्र माझी प्रियाचं प्यारी होती....
लग्नानंतर प्रियाने देखील माझ्याशी कट्टी घेतली... काय करू??? खूप समजावलं तिला..... शेवटी तिनेच वचन घेतलं.... माझ्या कडून.... नेहाला कायमच दूर करण्याचं !!!दिलं वचन !! पण तिला दूर करण्यासाठी मला काही दिवस तिच्याशी खूप चांगलं वागावं लागणार होतं... तेही केलं... !! थोडं थोडकं नाही तब्बल दीड /दोन वर्ष चांगला वागलो की तिच्याशी..... !!!!प्रिया ला हे पटतच नव्हतं... म्हणाली.... बस्स झालं... शरद, तुला काही हे जमणार नाही.... तू रहा तुझ्या नेहासोबत !!
कसली रागावली ती माझ्या वर... मग मीही ठरवलं... कसं जमणार नाही म्हणते.... करूनच दाखवतो प्रियाला... माझा अपमान करते काय????
त्या दिवसापासून मी आणखीन चांगला वागलो नेहाशी !! मला माहित होतं, नेहा भूतांना खूप घाबरते.. तिनेच मला कधीतरी ते सांगितले होते.. काळोखाला ती फार घाबरायची.. मी ना तिला रोजच भुतांच्या गोष्टी सांगू लागलो.. ती नको नको म्हणायची पण मी काही तिला सोडलं नाही... ती हळू हळू घाबरायला लागली.. मी मुद्दाम काळोख करून तिला घाबरवू लागलो... पांढरी चादर हलवून तिला घाबरवू लागलो.. तिने किती विनवण्या केल्या मला.... पण मी काही ते मनावर घेतलं नाही.... ती हळू हळू वेड्या सारखं वागू लागली.. मी आईला म्हटलं देखील, "डॉक्टर कडे नेऊ का?? "पण नेहा माझ्या पासून लांब पळत होती.. ती माझ्या बरोबर यायलाच तयार नव्हती... तिचं हृदय भारी कमकुवत झालं होतं... मग मी तरी काय करणार???
डॉक्टर कडे नेतो असं म्हणून मी चक्क तिला स्मशानात नेऊन आणलं... त्याच रात्री अटॅक आला तिला !!आणि ती..... माझी नेहा मला सोडून गेली.... कितीतरी वेळ खरं वाटत नव्हतं मला !!! मी मला हळूच चिमटाही काढला... खरंच होतं ते !!!! मी चक्क रडलो ओक्सबोक्शी.... पण ते अश्रू आनंदाचे होते..... !!!!
yes....I have done it....
everything is possible in love... हे मी prove केलं..... हा हा हा हा....प्रिया हे सारं तुझ्या साठी केलं.... पण.... !!!!
त्या दिवसा पासून एक गोची झाली आहे माझी !!
काय विचारता???
तुम्हालाही सांगतो मी आता.... घरी सगळ्यांना सांगून थकलो... सांगू... विश्वास ठेवाल माझ्यावर...????
मला आता रोजच नेहा दिसतेय.... ओरडू नका... !!! आई शपथ !!! ती रोज माझ्या अवती भवतीच असते... आणि मला विचारते...
"मी सांगू का तुम्हांला गोष्ट...." "भुताची???? "...मला खरंच काही सुचत नाही हो तिला काय उत्तर द्यायचं....???
मी मला माझ्या बेडरूम मध्येच कोंडून घेतलंय आता !!
पण भीती वाटते नेहा कधीही येईल आणि मला भुताची गोष्ट सांगून घाबरवून सोडेल... !! ती येते तेव्हा किती थंडी वाजते मला इथे... मला हसत राहते ती !! तिचे हसरे डोळे आता खूप रागीट दिसतात.. ती जातं नाही मला सोडून.. अगदी गोल गोल फिरत राहते माझ्या भोवती.. मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो.. पण कोण ऐकूनच घेत नाहीत माझं !!!
माझी ही अवस्था बघून प्रियाही आता इथं फिरकत देखील नाही आणि घरातले, शेजारी पाजारी सगळेच म्हणतात...
"शरदाचे किती प्रेम होते नेहावर....!!! बिच्चारा !!!! अगदी वेडा झाला... स्वतः ला घरातच कोंडून घेतलं आहे त्यानं... खात नाही पीत नाही, सतत नेहा आली.. नेहा आली बोलतो.. थंडी वाजते म्हणून बडबडत राहतो. सतत नेहाचं आवडतं गाणं लावून बसतो आणि मोठमोठ्यानं रडत राहतो..... !!!!!
काल्पनिक कथा by Shraddha Bhat