रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र(भाग 1)
लेखक :नितीन काकड
शिवापुरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक दुर्लक्षित गाव ,गावाला पार पांडव काळाचा इतिहास लाभलेला पण तरीही सरकारच्या दुर्लक्षामुळे गाव सर्व सामान्य जनतेपासून अनभिज्ञच आहे ,सर्वांच्या नजरेआड आणि दुर्लक्षित सुद्धा ,ह्या टुमदार गावाला लोकांनी जरी दुर्लक्षित केलं असेल पण निसर्गाने मात्र गावाला भरभरून दिल होतं ,गाव सह्याद्रीच्या एकदम पायथ्याशीच ,त्यामुळे एका बाजूला सह्याद्रीचे उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग असा क्षितिजा पर्यंत पसरलेला समुद्र आणि दोघांच्या मधात हे टुमदार गाव ,गावाला जायला पक्का रस्ता नाही डोंगराच्या पायथ्यापासून थोडं जंगल तुडवत आत जावं लागतं आणि जंगल सुद्धा खूप घनदाट,थोडी पायपीट करून आत गेल्यावर नजरेत भरणार हे गाव लागतं ,इनमिन 500 वस्तीच गाव पण अतिशय स्वछ ,सुंदर ,प्रत्येक घरासमोर नारळ ,काजू ,पोफळीचे झाड ,टुमदार कौलारू घर ,प्रत्येक घरासमोर अंगण अंगणात छोटीशी बाग ,त्यात वेगवेगळे झाड झुडपं जाई ,जुई ,मोगरा ,पारिजातक ,केवडा ,बकुळ ,सोनचाफा ,इत्यादी फुलझाडे ह्या सर्वांनी परिसर अगदी सुगंधित होत असे ,तीन ते चार गल्ल्यांमध्ये पूर्ण गाव संपून जात असे त्यामुळे सर्वच एकमेकांना चांगल्या प्रकारे अन जवळून ओळखत ,सर्व सुख समाधानी होते ,गुण गोविंदयाने एकत्र नांदत होते ,गावाच्या कडेला , हाकेच्या अंतरावर एक अतिशय पुरातन,काळ्या कातीव दगडांमध्ये शंकराचं हेमाडपंथी मंदिर इतिहासाची साक्ष लेऊन दिमाखात उभं होतं,मंदिर अतिशय विचारपूर्वक बनवलं गेलं होतं,त्याची रचनाच अश्या प्रकारे केल्या गेली होती की प्रत्येक 12 वर्षांनी महाशिवरात्रीच्या आधी जी माघ पौर्णिमा यायची ,त्या पौर्णिमेला रात्री बरोबर 12 वाजता चंद्राचा प्रकाश मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीवर पडायचा ,तो प्रकाश पायापासून हळूहळू वर येऊन शंकराच्या पूर्ण मूर्तीवर काही मिनिटं स्थिर व्हायचा ,जणू काही साक्षात भगवान शिव त्या मूर्ती मध्ये विराजमान होत आहेत ,आणि नंतर तो प्रकाश त्रिशूळा मधून परावर्तित होऊन मुख्य गाभार्याच्या बाहेर असलेल्या नंदी समोर उभ्या असलेल्या खांबावर पडायचा आणि त्या खांबामधून सप्तरंगी प्रकाश निघून पूर्ण मंदिरभर पसरायचा,असं वाटायचं जणू काही स्वर्गच तिथे अवतरला आहे की काय ,हा उत्सव बघण्यासाठी लोकं दूर दुरून यायचे ,त्यामुळे नंतर येणारी महाशिवरात्री खूप धूम धडाक्यात साजरी व्हायची ,कारण लोकांचा असा विश्वास होता की त्या काळासाठी त्यांचं आराध्य दैवत,महादेव शंभो ,शिवरात्री पर्यंत तिथे राहायला येत , पण काही वर्षांपासून घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे सर्व गाव मुळापासून हादरून गेलं होतं ,गावात एक भीतीच वातावरण तयार झालं होतं ,त्याला कारणही तसंच होत ,गावातील जनावरं गायब व्हायला लागली होती ,जवळपास प्रत्येकाच्या घरातून,गोठ्यातून रात्रीतून जनावरं गायब व्ह्यायची आणि दुसऱ्या दिवशी मेलेल्या जनावरांच शीर विचित्र अवस्थेत ,कुणीतरी अनुकुचिदार दाताने फाडल्या सारखे, वेशी बाहेर,मंदिराच्या परिसरात पडलेले सापडायचे ,सुरुवातीला लहान प्राणी जसे कोंबडी ,मांजर ,कुत्रा ,बदक वगैरे प्राणी गायब होत ,पण लोकांना वाटायचं कुणी तरी जंगली जनावर गावात घुसून प्राणी गायब करत असतील पण ,जेव्हा पासून मोठं मोठे प्राणी जस गाय ,बैल ,म्हैस ,घोडा ,गाढव गायब व्हायला लागले तसं तसं गावकरी चिंतेत पडले ,बरं प्राणी जंगली प्राण्यांनी पळवले असते तर ठीक होतं पण ते प्राणी प्राण्यांचं फक्त धडच कश्याला खातील ,आणि मुंडक त्याच विशिष्ठ जागी का सोडून देतील ,शंकेची पाल आता गावकऱयांच्या मनात डोकावत होती ,पण कुणी ते बोलून दाखवत नव्हतं ,आताश्या ज्यांचे शेतं जंगलाला लागून आहेत त्या लोकांना काहीतरी वेगळ्या जाणिवा व्हायला होत्या ,आणि एक दिवस पुजारी पूजा करायला गेला असतांना त्याला तिथे मंदिराच्या बाहेर एक मृतदेह मिळाला,तो सुद्धा फक्त धडच मुंडक मात्र गायब होतं,आता मात्र हा देवाचा प्रकोप आहे असेच सर्वांना वाटू लागलं , त्यामुळे सर्वानुमते मंदिर काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला ,हे सर्व वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं आणि हळू हळू लोकं मंदिराकडे,त्या उत्सवासाठी येणं बंद झालं ,शरद पौर्णिमा जवळ येत होती ,महाशिवरात्री देखील तोंडावरच होती गावातील लोक ह्या वर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होणार नाही म्हणून खूप दुःखी होते ,एवढया काळापासून सुरु असलेली परंपरा खंडित होणार म्हणून गावातील म्हातारे ,जुने जाणकार लोकं उदास होते,समर्थ सुद्धा ह्या वर्षी तो उत्सव बघण्यासाठी इथे मावशीकडे आला होता ,पण असं वातावरण बघून तो सुद्धा मनातून घाबरून गेला होता, पण मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे ,आणि त्याची देवावर नितांत श्रद्धा असल्यामुळे त्याच्या सद्सद बुद्धीला हे काही पटत नव्हतं ,कि देव कश्याला असं काही करेल जो जगाचा निर्माता आहे तोच का असा विनाकारण त्याच्या लेकरांवर कोपेल,नक्कीच ह्या मागे काहीतरी काळं बेर आहे असं त्याला मनोमन वाटू लागलं होतं ,आणि ह्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहचायचंच असं त्याने ठरवलं,त्याने मग गुप्तपणे माहिती जमवायला सुरुवात केली ,तो उगाच गावातल्या पारावर जाऊन बसायचा आणि तिथे गप्पा मारत बसलेल्या म्हाताऱ्या लोकांच्या गप्पा कान देऊन ऐकायचा ,त्यामुळे त्याला थोडीफार माहिती मिळाली की ह्या अश्या घटना ह्या आधी सुद्धा 2,3 वेळा घडल्या होत्या ,आणि मंदिर काही वर्षा साठी बंद ठेवण्यात आलं होतं ,समर्थ चा दिमाग आता वेगाने फिरत होता तो सर्व कड्या जुळवण्याचा प्रयत्न करत होता ,म्हाताऱ्याना खोदून खोदून विचारत होता की हे जेव्हा जेव्हा घडलं तेंव्हा तेंव्हा त्या वर्षी ती पौर्णिमा होती का ,सकारात्मक उत्तर मिळाल्यावर समर्थ च्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं की आपण ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतो म्हणून ,त्याचं विचार चक्र जोरात फिरत होतं ,म्हणजे ह्या सर्व घटना नेमक्या त्याचं वेळेत व्हायच्या जेव्हा 12 वर्षानंतर ती पौर्णिमा जवळ यायची,आणि महाशिवरात्री नंतर थोडं थोडं करत सर्व काही सुरळीत होत जातं ,आणि वर्षभराच्या आत मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडण्यात येतं, मग पुढे 11 वर्ष काहीच होत नाही सर्व सुरळीत चालतं आणि मग पुन्हा बाराव वर्ष लागायच्या वेळी अश्या विचित्र घटना घडायला सुरुवात होते आणि मंदिर पुन्हा वर्षभरासाठी बंद करण्यात येते , जेंव्हा समर्थ जास्तच खोलात शिरतोय असं एका म्हाताऱ्याला जाणवलं तेंव्हा तो म्हातारा समर्थ कडे येऊन ,त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणातो की, लेकरा जाऊ दे ,तू कश्याला आमच्या साठी विषाची परीक्षा घेतोय ,त्या मंदिराचं रहस्य आजपर्यंत कुणीही बाहेर आणू शकलं नाही ,जो पण त्या मंदिराकडे त्याचं रहस्य शोधायला जातो तो कधीच वापस येत नाही ,तुझा बापाचं असाच तुझ्यासारखाच12 वर्षांपूर्वी त्या मंदिराचं रहस्य शोधायला आला होता ,आणि तो आजपर्यंत वापस आला नाही ,आम्ही त्याला किती समजावलं होतं ,पण तो काही ऐकला नाही ,त्या दिवशी तो किती आनंदात होता ,काहीतरी मोठ्ठ त्याच्या हातात मिळालं होतं म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी ग्रामसभा ठेवली होती आणि त्या सभेतच तो त्या मंदिराचा राहास्यभेद करणार होता ,पण त्याच्या आदल्या दिवशीच तो अचानकपणे कुणालाही काहीही न सांगता गायब झाला ,.........
(क्रमश....)
(क्रमश....)