#एक छोटासा पण विचित्र अनुभव
#लेखक - प्रा. दयानंद सोरटे.
या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली. माझा मित्र उदय आणि मी सी.बी.डी.बेलापूरला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका व्यक्तीला रेकी ट्रीटमेंट करण्याकरिता गेलो होतो. माझ्या रेकीच्या नुकत्याच तीन डिग्र्या पूर्ण झालेल्या होत्या. आणि उदय तर स्वतः रेकी ग्रँड मास्टर होता. ज्या व्यक्तीला आम्ही उपचार करण्याकरिता गेलो होतो. त्या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्या व्यक्तीला दिवसा किंवा रात्री कोणत्याही प्रकारचे भीतीदायक भास होत असत. असे आम्हाला त्यांच्या पत्नीने सांगितले. ती व्यक्ती ख्रिस्ती धर्माची होती. त्यामुळे Healing वर त्यांचा विश्वास आणि श्रद्धा होती.
आम्ही त्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला तिथे थोडी नकारात्मक एनर्जी जाणवली. थोडी अस्वस्थता वाटू लागली. म्हणून मग आम्ही त्यांना घराच्या खिडक्या खोलायला लावल्या. तसेच घरातील सर्व लाईट्स चालू करायला लावल्या. घरामध्ये त्यावेळी ती व्यक्ती आणि त्यांची पत्नी दोघेच होते. आम्ही जास्त विचारपूस न करता त्यांना आम्ही मीठ टाकून जागा पुसून घेण्यास सांगितले.आणि जमिनीवरच चटई आणि त्यावर चादर अंथरून त्या व्यक्तीला झोपायला लावले. तोपर्यंत उदयने अगरबत्ती पेटविली आणि येशू ख्रिस्ताच्या फोटोजवळ लावली. तसेच तिथेच बाजूला एक मेणबत्ती देखील होती. ती देखील त्याने पेटविली. त्यानंतर आम्ही दोघे त्या व्यक्तीला रेकी उपचार करण्याकरिता खाली बसलो. तसे अचानक खिडकीमधून एक जोराची वाऱ्याची झुळूक आली ज्यामुळे मेणबत्ती विझली आणि अगरबत्तीचा स्टॅन्ड खाली पडला. आम्हाला वाटले वाऱ्यामुळे झाले असावे. म्हणून त्याने पुन्हा उठून अगरबत्ती आणि मेणबत्ती पुन्हा पेटवली. आणि तो खाली येऊन नुसता बसलाच असेल तर पुन्हा तशीच जोराची एक वाऱ्याची झुळूक आली आणि पुन्हा तोच प्रकार घडला. मग मात्र आम्हाला शंका आली . म्हणून मग आम्ही त्यांना थोडं खोदून विचारल्यावर ते म्हणाले. कि आमच्या घरामध्ये असे प्रकार रोज घडतात. मेणबत्ती किंवा अगरबत्तीचा स्टॅन्ड कुणीतरी फेकून दिल्यासारखा खाली पडतो. लावलेली मेणबत्ती किंवा अगरबत्ती पूर्णपणे जळत नाही. रात्रीच्या वेळी कोणतीही वस्तू टेबलावरून खाली पडते. अचानक घरातील दरवाजा उघडतो आणि बंद हतो. किंवा घरातील लाईट्स सुद्धा आपोआप बंद चालू होतात. असे प्रकार चालू आहेत.
आमच्या लक्षात आले कि हा भुताटकीच्या प्रकार आहे. आम्ही त्यांना एखाद्या ख्रिस्ती धर्मगुरू किंवा फादरची भेट घ्या असा सल्ला दिला. कारण हा काही वेगळाच प्रकार होता. असे त्यांना सांगून आम्ही त्यांचा निरोप घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्या व्यक्तीच्या पत्नीने आम्हाला विनंती केली. कि जर तुम्ही आता आलाच आहात , तर त्यांना रेकी देऊनच जा. म्हणून मग आम्ही केवळ त्यांच्या समाधानासाठी त्यांना रेकी देण्याचा निर्णय घेतला.
खरे तर अशा लोकांना रेकी देण्यापूर्वी रेकीच्या नियमानुसार आपल्या शरीराभोवती रेकीचे एक संरक्षक कवच निर्माण करायचे असते. जेणेकरून आपल्याला त्या नकारात्मक शक्तींचा त्रास होत नाही. मी साईड वर जाताना अशा प्रकारचे संरक्षक कवच घेऊनच नेहमी बाहेर पडत असे. पण उदय मात्र नेमका त्या दिवशी संरक्षक कवच घ्यायला विसरला होता. आणि अशा परिस्थितीत आम्ही दोघांनी मिळून त्या व्यक्तीला रेकी दिली. रेकी देऊन झाल्यानंतर उदयच्या तोंडामध्ये थुंकी जमा झाली होती. तो थुंकण्यासाठी washroom मध्ये गेला तर त्याच्या तोंडातून थुंकीऐवजी रक्त पडले. ते त्याने आम्हाला देखील दाखविले. ते पाहून त्या व्यक्तीची पत्नी खूपच घाबरली. उदयला या गोष्टीचा अनुभव असल्यामुळे त्याला विशेष असे काही वाटले नाही. पण लवकरात लवकर तुम्ही त्यांना धर्मगुरू किंवा फ़ादर्सना दाखवा असा सल्ला त्यांच्या पत्नीला देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.