#UrbanHorrorLegends #माटुंगाझेडब्रीज #मानकाप्या
UrbanHorrorLegends-bhutachya navin goshti |
मुंबईत माटुंगा हा विभाग मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही रुळांवर आडवा पसरला आहे. असं पाहायला गेलं तर मध्य रेल्वेचा माटुंगा हाच खरा माटुंगा ज्याला खडा माटुंगा असं ही नावं आहे. पश्चिम रेल्वेचा माटुंगा (रोड) म्हणजे दादर आणि माहीम यांच्या चिमटीत असलेल्या रुमालासारखा... १९८० च्या उत्तरार्धात कधीतरी माटुंगा रोड ते धारावी लेबर कॅम्प ला जोडणारा फ्लाय ओव्हर झाला. आणि कल्याण, ठाणे, मुलुंड कडून येणाऱ्या गाड्या सायन मधून लेबर कॅम्प मधून दादरला येऊ लागल्या. हे सगळ पुराण सांगण्याच कारण म्हणजे जेव्हा मध्य माटुंगा आणि पश्चिम माटुंगा जोडलं नव्हतं तेव्हा पासून 'त्या'चं महत्त्व अनन्यसाधारण होतं. सायन, अथवा पूर्व मुंबईत जाण्याकरता दादर टी टी पर्यंत जायचं नसेल तर 'त्या'ला पर्याय नव्हता...
झेड ब्रीज
माटुंगा रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्वे पासून चालू होणारा हा पूल मध्य रेल्वेच्या मालकीच्या दादर ते माटुंगा या जमिनीवरून जातो. पूल जिथं माटुंगा पश्चिमेला सुरू होतो तिथंच म.रे. चं मोठं कार्यालय आणि प्रवेशद्वारावर टुमदार लोको ट्रेनचा छोटा डबा आहे. ३०० मीटर वर हा पूल मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशनवर संपतो. लाखो लोक, रुईया, पोदार, खालसा या विद्यालयाचे विद्यार्थी यांचा आधार आहे हा पूल. मात्र हीच वास्तू अनेक वर्ष एक जितिजागती दंतकथा, भयकथा बनून जगते आहे हे आजच्या पिढीला माहीत नसेल.
हा फूट ओव्हर ब्रिज कधी बांधलाय ते माहीत नाही पण १९६० ते ७० च्या दरम्यान असावा किंवा त्या ही पेक्षा आधी. याचं भयानक वाटणारं वैशिष्टय म्हणजे एक तर हा पूल राहत्या वस्ती, वाहता रस्ता यातून न जाता मध्य रेल्वेच्या सूनसान कारशेड (ही वेगळी दास्तान, लवकरच सांगेन) मधून जातो आणि याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दहा बारा फूट पत्र्यांच्या भिंती. आजूबाजूच काही दिसेल तर शपथ. त्यामुळे अतिशय खतरनाक अशी फिलिंग येते जर तुम्ही रात्रीच्या वेळी इथून एकटे जात असाल. खूप लोकांचा असा अनुभव आहे की रात्री जेव्हा वर्दळ कमी असते तेव्हा मधला जो लांबलचक पासेज आहे तो संपता संपत नाही व कुणीतरी बरोबर चालतंय किंवा अगदी मागेच आहे अशी भावना होते. हा पूल अगदीच z या आकाराचा नाही, बराच काटकोनात वळतो पण हा मधला पासेज थरकाप उडवणारा आहे नक्की. तरी हल्ली एका बाजूला पत्रा तुटून लागूनच असलेलं म.रे. चं प्रशस्त वर्क शॉप खाली दिसतं. इथं आधी लूटमार, विनयभंग असे गुन्हे घडायचे. एक बाजू धारावीत आणि एक मध्य माटुंग्याच्या शांत परिसरात त्यामुळे किरकोळ गुन्हेगार पसार व्हायला झेड ब्रीज उत्तम मानायचे.
पण जवळपास ४० वर्षांपूर्वी मात्र झेड ब्रीज आणि परिसर एका वेगळ्याच भयावह कारणामुळे हादरला होता... ते म्हणजे .... मानकाप्या...
हा कुणी चिरकुट गुन्हेगार नव्हता. हे होतं....एक पिशाच्च. ज्याला स्वत:ला मानेवरती मुंडकं नव्हतं. असं हे भयानक पिशाच्च मध्यरात्री झेड ब्रीज वर प्रकट व्हायचं आणि आपले हात दोन्ही बाजूला गरागरा फिरवत रहायचं. त्याच्या तीक्ष्ण हातांचा फटका जर कुणाला बसलाच तर त्याचं ही शिर धडापासून अलग व्हायचं (आणि ती व्यक्तीसुद्धा पिशाच्च योनीत प्रवेश करून मानकाप्या बनायची) असा प्रवाद होता. नुसतं झेड ब्रीज नाही तर मध्य माटुंगा, सायन, चुनाभट्टी, पश्चिम माटुंगा इथं या मानकाप्याची दहशत होती. काही टॅक्सीवाले भय्ये तर आपण जीव वाचवून धूम ठोकली हे शपथेवर सांगायचे. हे पिशाच्च उंच होतं त्यामुळं खाली वाकून जीव वाचवून पळ काढायला कठीण नव्हतं. शिवाय शिर नसल्याने मानकाप्या बघू शकत नाही, ही एक त्याची लंगडी बाजू.
तीन मुंडी वाल्या बाई इतकी मानकापे महाशयांची मात्र दहशत नव्हती, कारण ती थेट घरीच यायची तर मानकाप्या हा स्थानबद्ध होता. (त्याने निर्माण केलेले मानकापे अधर्मप्रसारार्थ इतरत्र गेले असतील तर कल्पना नाही.) आम्ही मुलं तर मानकाप्या असा खेळ बनवून खेळू लागलो होतो. म्हणजे माझ्यावर राज्य आणि तू आऊट तर तू पण मानकप्या असं करून सगळ्यांना आऊट करायचं. अस्तु...
झेड ब्रीज पण म्हातारा झालाय. नुकतीच डागडुजी केलीय त्याची. सुधरल्यासारखा वाटतोय. पण परवाच वाचलं, मुंबईतल्या असुरक्षित जागांपैकी एक आहे हा म्हणे....शेवटी जित्याची खोड!
पुण्यातही असा बदनाम भयानक झेड ब्रीज आहे म्हणे...