गावाचं नाव भैरुवाडी . नावाप्रमाणेच गावाच्या मधोमध भैरोबाचं जुनाट मांडणीचं देऊळ होतं. गावाच्या वेशीवर मारुतीचं एक छोटंसं देऊळ . गावाच्या मागच्या बाजूला बार्शी नावाची छोटीशीच पण बारमाही वाहणारी नदी होती. नदीच्या पलीकडील तीरावर वाघाची वाडी नावाचं एक गाव होतं. भैरुवाडीतील लोकं कष्टाळू होते . शेती हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं. बाबा पाटील हे त्या गावाचे पाटील . गावात त्यांना मोठा मान होता. त्यांचा शब्द कुणीही डावलत नसे. गावातील सगळे महत्वाचे निर्णय त्यांच्याच संम्मतीने मंजूर व्हायचे. त्यांच्याकडे महादू नावाचा एक चाकरीचा गडी होता. तोच पाटलांच्या घरची सगळी शेतीची कामे पाहत असे. महादुला सदा नावाचा एकुलता एक मुलगा होता. सदाला जन्म दिल्यावर त्याची आई देवाघरी गेली. सावत्र आई सदाला नीट बघणार नाही म्हणून महादुने दुसरं लग्न केलं नाही. आईच्या माघारी म्हादूनेच सदाची आई बनून त्याला लहानाचा मोठा केला. आता सदा ११ वर्षाचा झाला होता. शाळेतही जात होता. पाटलाची छोटी मुलगी चिमा आणि सदा दोघं मिळून शाळेत जायचे. सदांच आणि महादुचं दोन वेळचं जेवण पाटलाच्या घरीच व्हायचं. सगळं काही सुरळीत चाललं होत. पण नियतीच्या मनात काही औरच होतं. रात्रीच्या वेळेला महादुला पान लागलं ( म्हणजे साप डसला ) आणि त्यातच महादूचा दुर्दैवी अंत झाला. मरण्याआधी महादूनं सदाचा संभाळ करण्याचं पाटलांकडून वचन मागितलं. सदावर जणू काही आभाळंच कोसळलं. आई - बापाविना पोरगं पोरकं झालं. पण पाटलीन बाईंनी सदाला मायेन सांभाळलं. आता सदाच शिक्षण बंद झालं . सदा पाटलाच्या शेतावर कामं करू लागला . इकडे चिमा शाळेत जाऊ लागली. दिवसामागून दिवस जाऊ लागले . सदा आता तरणाबांड गडी दिसू लागला होता. पाटलाच्या घरचं दूध - दुभतं खाऊन आणि गावाच्या तालमीत जाऊन सदान भरभक्कम शरीर कमावलं . गावात सदाच्या कुस्तीला कुणाचीही जोड नव्हती.
गावची जत्रा आली . कुस्तीचा जंगी आखाडा उभारण्यात आला. गावोगावचे पैलवान त्यात सहभागी होण्याकरिता आले. मोठमोठ्या कुस्त्या झाल्या . आणि अंतिम कुस्ती भैरुवाडीच्या सदानं मारली. गावानं सदाला डोक्यावर घेतला. ढोलताशाच्या गजरात मोठी मिरवणूक काढण्यात आली. चांदीची गदा सदाला बक्षीस देण्यात आली. मिरवणूक पाटलाच्या दारात आली . चिमा आणि पाटलीणबाई ओवाळणीचं ताट घेऊन दारातच उभ्या होत्या. सदा बैलगाडीतून खाली उतरला. त्यानं पाटलाच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला मग पाटलीणबाईंचा आशीर्वाद घेतला. पाटलांनी चिमाला सदाला ओवाळण्यास सांगितले. चिमा पुढं झाली. तिनं सदाला कुंकवाचा टिळा लावला , अक्षता डोक्यावर टाकल्या सदाचा चेहरा गुलालाने माखला होता. पण का कुणास ठाऊक त्याला चिमा आज काही वेगळीच वाटली. दोघांची नजर नजरेला भिडली आणि आपोआप काळजाची धडधड नकळत वाढली. सदालाच कळलं नाही कि हे आज असं काय झालं ? रोज पाहणारी चिमा आज आपल्याला वेगळी का वाटली ? चिमा पण आता लहान राहिली नव्हती. तिचं रूपांतर आता एका सुंदर नवतरुणीत झालेलं होतं. तारुण्याची लाज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
सदा रात्रीचं जेवण आटपून मळ्यातल्या घरावर झोपायला गेला. त्याच्या डोळ्यासमोर सतत चिमाचा तो हसरा चेहरा येऊ लागला. त्यालाच कळेना आज आपल्याला असं का होतंय ? गालातल्या गालात हसून तो स्वतःच्या मनाला समजावयाचा प्रयत्न करू लागला. जमिनीवर राहणाऱ्या सुरवंटानं आकाशातल्या चंद्राची हाव धरू नये. कुठं आपण अडाणी रोमनाळ चाकरीचा गडी अन कुठं फुलासारखी नाजूक शिकलेली चिमा असं म्हणत आपल्याच मनाची समजूत काढत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी नदीवर अंघोळ वगैरे आटोपून सदा न्याहारीसाठी पाटलाच्या वाड्यावर आला. चिमा त्याला पाहून गालातल्या गालात खुद्कन हसली. सदाने मुद्दामच न पाहिल्यासारखं केलं . न्याहारी आटपून तो काहीच न बोलता बैलं सोबत घेऊन शेतावर निघून गेला. इकडे त्याने केलेलं दुर्लक्ष चिमाच्या लक्षात आले. दुपारी ती शेतावर गेली सदाला भेटण्यासाठी. सदा उन्हामुळं थोडा झाडाच्या सावलीला विसावला होता. चिमाला पाहताच उठून बसला. आज इकडं कुठं ? सदा म्हणाला. काय न्हायी सकाळी काय न बोलताच निघून आलास , म्हटलं कुणी काय बोललं का तुला ? म्हणून आले होते इच्चरायला. सदा हसून म्हणाला आमी काय चाकरीचं गडी . आमी कुणावर रुसून फुगून कसं बरं चालल ? माणसानं आपल्या पायरीनुसार वागावं ! चिमा म्हणाली असरे काय बोलतोस. आम्ही काय तुला कुणी परका समजलो का कधी ? तसं न्हायी ! पर तुमच्या अन्नावर पोसलेला पिंड हाय ह्यो ! खाल्लेल्या अन्नाला जगायला पायजे , सदा म्हणाला. तशी चिमा म्हणाली, बघ सदा तुला आता मी स्पष्टच सांगते , माझा जीव जडलाय तुझ्यावर. तसा सदाच्या चेहऱ्याचा रंगच उतरला. तो चिमाला म्हणाला , असा वंगाळ इचार करू नगस चिमा ! आई - बापाच्या माघारी पोटच्या पोरावानी संभाळलयं मला पाटलांनी. वाईट वंगाळ वागलो तर नरकात दिकूल जागा मिळणार न्हाई मला. असा म्हणून सदाने चिमाची कशीबशी समजूत काढून तिला घरी पाठवून दिले.
चिमच्या डोक्यातून मात्र सदाचा विचार जात नव्हता. सदाला लहान पणापासूनच पावा ( बासरी ) वाजविण्याचा खूप नाद होता. आणि चिमा सदाच्या बासरीची वेडी होती. सदा बासरी वाजवायला लागला कि चिमा तहान - भूक विसरून जात असे. तिला वेळेचेही भान राहत नसे. शेवटी घडू नये ते घडले , गावातल्याच कुणीतरी सदा आणि चिमाचं काहीतरी लफडं आहे अशी चुगली करून पाटलाचे कान भरले. आपल्या तुकड्यावर जगणाऱ्या चाकरीच्या गड्यावर आपली एकुलती एक पोरगी प्रेम करते हे पाटलाला सहन झालं नाही. पाटलानं सदाला बोलावून घेतलं आणि या गोष्टीचा जाब विचारला. सदा जीव तोडून सांगत होता हे साफ खोटं आहे पण चिमाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. त्यामुळे पाटलाने सदावर संशय घेतला. त्याला आपल्या चाकरीवरून काढून टाकले आणि गावात राहायचं नाही म्हणून दम दिला.सदा खाली मन घालून तिथून निघून गेला. कारण एकाच चिमाला त्रास होऊ नये म्हणून सारं काही त्यानं निमूटपणे सहन केलं. नदीच्या पलीकडील वाघाच्या वाडीत तो आता राहू लागला. मिळेल ते काम करू लागला. इकडे चिमाची बैचेनी वाढू लागली. आपल्यामुळे त्या बिच्चाऱ्या अश्राप जीवाला त्रास सोसावा लागला याचं तिला फार वाईट वाटलं. सदाला एकदा भेटून त्याची माफी मागावी असं तिला वाटलं. सदाला रात्रीच्या वेळी पावा वाजवण्याची सवय होती. त्याच्या पाव्याची धून चिमाच्या कानावर पडू लागली. ती तशीच उठली अंथरुणावरून आणि निघाली भेटायला सदाला. हातामध्ये कंदील घेतला आणि दबक्या पावलांनी ती बाहेर पडली. नदीला गुढगाभर पाणि होतं. नदी ओलांडून ती पलिकडं आली . पाहते तो काय ? सदा नदीवरच्या महादेवाच्या देवळात एकटाच पावा वाजवत बसलेला. तिला समोर पाहताच तो दचकला. आणि तिला तो म्हणाला, तू या वक्ताला इकडं कशी काय ? त्यावर चिमा म्हणाली माझ्यामुळं तुला हा सगळा त्रास सोसावा लागला म्हणून मी तुझी माफी मागायला आले होते. त्यावर सदा म्हणाला पण तू या वक्ताला इकडं यायला नको होतं . कुणी बघितलं तर काय म्हणत्याल. तू आल्या पावली लगोलग घरी जा बगु आताच्या आत्ता , सदा म्हणाला.
तोवर इकडे पाटलीणबाईला जाग आली. तिला चिमा अंथरुणावर दिसली नाही. ती घाबरली पण आरडाओरडा न करता तिने पाटलाला चिमा घरात नसल्याचं सांगितलं. पाटलाने कंदील उचलला आणि पाटलीणबाईंना सोबत घेऊन ते नदीजवळ आले. नदीच्या पलीकडे कंदिलाचा उजेड दिसत होता त्यांना संशय आला बहुतेक चिमा सदाला भेटायला गेली असावी. म्हणून ते दोघेही नदी पार करून पलीकडे आले. पाहतात तो काय चिमा आणि सदा तिथेच मंदिरात उभे होते. सदाला तिथे पाहताच पाटलाच्या मस्तकाची शीर उभी राहिली. जास्त बोभाटा नको म्हणून त्यांनी सदाला उद्याच्या उद्या इथून तुझं तोंड काळं कर अशी धमकी दिली. आणि दिसलास तर तुझं काय खरं न्हाय असं म्हणाले. पाटलीणबाई देखील सदा जवळ आल्या. आणि म्हणाल्या असं पांग फेडलंस व्हयं तुला संभाळल्याचं. ते दोघंही त्यांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते पण पाटील आणि पाटलीणबाई काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पाटलीणबाई सदाला म्हणाल्या, मी जर तुला आई सारखं सांभाळलं असलं तर या जन्मात तरी तू यापुढं चिमाला भेटणार नाहीस असं वचन दे मला. सदाचं डोकं सुन्न झालं . पुन्यांदा न्हायी भेटणार मी चिमाला निदान या जन्मात तरी , असं त्यानं वचन दिलं पाटलीणबाईला.
झाल्या प्रकाराने सदा अस्वस्थ झाला. त्याला पुन्हा पुन्हा वाटू लागलं चिमाने इतक्या रात्री यायला नको होतं भेटायला. पण नकळत सदाही मनातून चिमावर प्रेम करत होताच. पण त्याने आपल्या प्रेमाचं बलिदान द्यायचं ठरवलं होतं. इकडं पाटलाचं डोकं भडकलं होतं. त्यांनी चिमाला मामाच्या घरी रवाना केलं काहीतरी विपरीत घडायच्या आत सदाचा काटा काढलाच पाहिजे असं पाटलाने ठरवलं. नाही तर आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं त्यांना वाटलं. रातोरात त्यांनी सत्या बेरडाला बोलावून घेतलं आणि सदाला संपवायची सुपारी दिली. बेरडांन डाव साधला . सदा झोपलेला असताना कुऱ्हाडीनं त्याच्या छातीवर घाव घातला. भळभळ रक्त वाहू लागलं . सदाच्या छातीत जोराची कळ आली. तरी सदा उठला दोघांची झटापट झाली. पण दुसऱ्या बेरडांन दुसरा घाव सदाच्या मानेवर घातला तसा सदा खाली कोसळला. सदाला मारल्याची पाटलाला वर्दी मिळाली. गावाच्या वगळीजवळच्या मोकळ्या जागेत सदाला पुरायला लावले.
इकडं चिमाला वाईट स्वप्न पडलं म्हणून झोपेतून दचकून ती जागी झाली. रात्रीच्या बारा वाजल्या होत्या. घराची खिडकी वाऱ्यानं करकर वाजू लागली तशी दारावर कुणाची तर थाप पडली. आणि मागोमाग आवाज आला चिमा दार उघड मी आलोय तुला न्यायला. चिमाला आवाज ओळखीचा वाटला ती दाराजवळ गेली तिनं पुन्हा विचारलं कोण आहे ? बाहेरून आवाज आला , मी सदा . तिने दार उघडलं . सदा शांत चेहऱ्यानं दारातच उभा होता. त्यांच्या दोघांच्या बोलण्याने मामा - मामी जागे झाले. आणि या वेळेला तू इथं कसा म्हणून सदाची चौकशी केली. तिकडं पाटलाची तब्बेत अचानक बिघड्ली म्हणून लगोलग चिमाला घेऊन यायला आलोय म्हणून त्यांना सांगितलं. पण मामा आणि मामी त्याला उजाडल्यावर जावा असं सांगू लागले. पौष महिना होता. थंडी चांगलीच पडली होती. पण त्यांचा विषय तोंडत सदा मधेच म्हणाला सकाळपर्यंत लई उशीर होईल, लगोलग निघायला पाहिजे. असं म्हणून दोघंही तसेच माघारी फिरले.सदा पाटलाची बैलगाडी घेवूणंच आला होता. मामा - मामीचा निरोप घेऊन वाऱ्याच्या वेगानं सदान बैलगाडी पळवायला सुरुवात केली. चिमा त्याला म्हणाली , एवढ्या घाईनं का पळवतोस बैलगाडी? त्यावर तो म्हणाला उजडायच्या आत आपल्याला पोहचायला पाहिजे. असं म्हणून त्यानं बैलगाडीचा वेग थोडा कमी केला. मग चिमाने त्याला विचारलं. बाबांचा राग मावळला वाटतं ? त्यावर तो काहीच बोलला नाही. मग पुन्हा ती म्हणाली , आईला तू मला भेटणार नाहीस म्हणून वचन दिलं होतस ना ? मग मला आणायला कसा काय आलास ? त्यावर तो म्हणाला , आता मी समद्या वचनांतून मुक्त झालोय. म्हणून आलोय तुला आणायला. तिला त्याच्या बोलण्याचा रोख कळला नाही. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा हात बर्फासारखा थंड पडला होता. त्यावर तो म्हणाला थांबायला वेळच नव्हता. तसाच निघालो तुला आणायला. थंडीनं डोकं लय जड झालयां बघ काय आसल तूज्याकडं तर बांध माझ्या डोस्क्याला. ती पण अशीच निघाली होती. तिनं विचार करून तिची चोळी काढली आणि बांधली करकचून सदाच्या डोक्याला. त्यावर सदा म्हणाला कसा दिसतोय ग मी? त्यावर चिमा म्हणाली चांगला डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या नवरदेववाणी वाटतोयस कि तू, त्यावर सदा गालातच हसला. त्यानं पेरणीच्या खिशात हात घातला आणि चिमाला म्हणाला , मी तुला आवडतू नव्ह मग हे धर डोरलं आन घाल बघू तुझ्या गळ्यात. चिमाला या साऱ्या गोष्टीचं नवलंच वाटलं. ती म्हणाली तूच घाल माझ्या गळ्यात ते. त्याप्रमाणे सदाने चिमाच्या गळ्यात डोरलं घातलं. पहाटेच्या ३ वाजायला आल्या होत्या. सदा आणि चिमा पाटलाच्या वाड्यावर पोहचले. सदा चिमाला म्हणाला, तू हो म्होरं , मी बैलं गोट्यात बांधून आलोच तुझ्या मागणं. चिमाने घराचं दार वाजवलं. पाटील स्वतः दार उघडण्यास आले. बघतात तो काय , चिमा दारात उभी. कशी आली विचारल्यावर सांगितलं तुम्हीच पाठवलं होतं ना सदाला मला आणायला. तसा पाटलाच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला दरदरून घाम फुटला. चिमाला वाटलं त्यांची तब्बेत बारी नसावी म्हणून त्यांना तसं होतंय. तेवढ्यात पाटलीन बाई तिथं आल्या . पाटलांनी चिमाला घरात जायला लावलं आणि सदा जिवंत नसल्याचं पाटलीणबाईला सांगितलं . तिचा विश्वासच बसेना. ती सदा या जगात नाही असं पुटपुटत असतानाच ते शब्द चिमाणे ऐकले. पाटील गडबडीने गोट्यात गेले . बैलगाडी आत्ताच आल्याच्या चाकोरीच्या ताज्या खुणा मातीवर स्पष्ट दिसत होत्या.बैलांच्याही तोंडाला फेस आला होता. तिथं न थांबता पाटील जिथे सदाला पुरलं होतं . तिथे गेले आणि सदाच प्रेत तिथं आहे का हे पाहण्यासाठी तिथं त्यांनी प्रेतावरची माती बाजूला केली. सदाच प्रेत तिथंच होतं पण त्याच्या डोक्याला चिमाची चोळी गुंडाळलेली तशीच होती. पाटील अवाक झाला. त्यांना केल्या कृत्याचा पश्चाताप झाला. तोवर चिमा धावतच तिथं आली तिनं सदाला त्या अवस्थेत पाहताच जोराने सदा म्हणून टाहो फोडला आणि तिथेच ती देखील मरून पडली.
असं म्हणतात कि आजदेखील ती दोघं दिसतात कधीतरी अवसं - पुनवला. सदा त्याचा मंजुळ पावा वाजवत असतो आणि त्या पाव्याच्या मधुर सुरांवर चिमा धुंद होऊन डोलत असते.