देव तारी त्याला कोण मारी
भाग-1
विश्वास न बसणारी सत्यकथा
नमस्कार वाचकहो ! मी पुन्हा तुमच्या भेटीस यायला उशीर केला .त्याबद्दल क्षमस्व....सध्याच्या युगात असे काही लोक आहेत कि देवावर त्यांचा अजिबात विश्वास नाही.पण देव आहे ..मी त्याला पावलो पावली अनुभवलय..तसाच आज माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीचा अनुभव मी लिहतेय..आवडल्यास नक्की अभिप्राय द्या.
गोपाळ एक तेरा वर्षाचा खेडेगावातील मुलगा..हुशार चुणचुणीत देखणा असा.आजोबा गावचे सरपंच .शेतीही बक्कळ..वडील शहरात चांगल्या पगाराची नोकरी करणारे..घरच सगळ आलबेल होत.घरातले सगळेच देवभक्तही होते.गोपाळला गणेशभक्तीचे अतिशय वेड होते.तो गणेशाला आपला मोठा भाऊच मानायचा.त्याच्या गावाच्या मध्यभागी एक सुबकस अस गणेशाच देऊळही होत..तो तसा वडिलांसोबत शहरात शिकायला होता.पण नेहमी या सुट्टीत या गावातल्या गणेशाला भेटायला आतुर असायचा.गणेशावरची त्याची निष्पाप भक्ती अशी होती की त्याने वर्गातही आपल्याच गावचा गणेश या मुलाशी अगदी जिवश्च कंठश अशी मैत्री जुळवलेली.
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी गोपाळ आजोळी सुट्टीला आला.आजोबांच्या आग्रहास्तव तो गावातील तालमीत जाऊ लागला.तालमीत मोगरा फिरवणे ..नांगर....पठाळ फोडणे यासारख्या कसरती करु लागला..तालमीला जाताना वाटेत गणेशाच देऊळ लागे.गोपाळ न चुकता गणेशाला वंदन करुन मनातील हितगुज करुन मगच पुढे जात असे.
एकदा नेहमीप्रमाणे तो गजाननाशी मोठा भाऊ या नात्याने गप्पा मारुन तालमीत गेला ..तालीम उरकल्यावर तो भर मध्यान्ही घराकडे एकटाच परतु लागला..खेडेगाव असल्यामुळे दुपारची शुकशुकाट पसरलेली..गोपाळ आपल्याच तंद्रीत लगबगीने जात होता .वाटेत त्याला नदीकिनारा लागायचा..तिथुन जात असताना अचानक गोपाळाला त्याच्या नावाची हाक ऐकू आली.....
"सोन्या ये सोन्या!" घरी फक्त आजी आजोबा अन त्याचा वर्गमित्र गणेशच फक्त त्याला या नावाने हाक मारत, आणि हा आवाज गणेशचा होता..
गोपाळ हाक ऐकून तिथेच थबकला..त्याने गणेशला आजुबाजुला शोधले पण गणेश कुठेच दिसत नव्हता....पण हाक मात्र ऐकू येत होती....अचानक त्याची नजर नदीपात्राकडे गेली ..गणेशची हाक तिकडुनच ऐकू येत होती..गोपाळ भारल्यासारखा तिकडे चालु लागला..त्याला त्या हाक मारणार्या नदीतील मुंज्याची मोहिनी पडली.खरतर खेडेगावात भरउन्हाच नदिवर कोणीही जात नाहीत .कारण नदितील साती- आसरा मुंजा येणाऱ्याला पाण्यात ओढुन नेतात अशी ख्याती होती.त्यातलाच हा प्रकार गोपाळसोबत घडत होता.तो मंतरल्यासारखा नदिपात्राजवळ गेला .तो पाण्यात उतरणार तोच त्याला एक मागुन दरडावणीचा स्वर ऐकू आला.,.....
"ए! थांब....कुठे चाललास?"
गोपाल तसाच स्थिर राहुन निर्विकार आवाजात म्हणाला .."मला जाऊ द्या .माझा मित्र गण्या मला बोलावतोय!"
तो पाठीमागुन दरडावणारा स्वर म्हणाला
"मग मी कोण?"
गोपाल या आवाजाने किंचितसा भानावर आला.कारण मागून येणारा आवाजही गणेशचाच होता .त्याने स्थिर राहुनच मागे मान वळविली..मागे खरच त्याला त्याचा मित्र गणेश दिसला..पण तरीही तो भारल्याप्रमाणे पुढे जाऊ लागला...
मागे असलेल्या त्याच्या मित्राने त्याला सर्रकन पाठीमागे ओढले अन सनकन त्याच्या मुस्काटात हाणली.अन त्याला सोबत घेऊन घराकडे निघाला.घराजवळच असलेल्या गणेशमंदिरापर्यत दोघे चालत आले.एव्हाना मुस्काटित खाऊन गोपाळ भानावर आलेला.त्याच्या मित्राने त्याला तिथेच थांबवले आणि थांब आलोच एक काम आहे असे म्हणत देवळात शिरला.पण तो परत काही आला नाही वाट पाहुन पाहुन गोपाल शेवटी घरी परतला.त्याने आंघोळ केली..भरपेट जेवण करुन झोपी गेला..
दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राची आई काही कामानिमीत्त गोपाळच्या घरी आली..गोपाळने गणेशला पाठवुन द्या काकु असे सांगितले..पण त्याच्या आईने सांगितले तो शहरातुन अजुन गावी आलेलाच नाहीये..
लहानग्या गोपाळाला कोडे पडले मग काल ज्याने माझ्या मुस्काटीत लगावली तो कोण होता??.....
त्याने न राहवुन आपला गाल चोळत आजीला आपला कालचा पराक्रम सांगितला आणि आजीला विचारले " आजी तो मला देवळापर्यंत आणुन बाहेर सोडून देवळातच गेला तो कोण होता मग?"
त्याने न राहवुन आपला गाल चोळत आजीला आपला कालचा पराक्रम सांगितला आणि आजीला विचारले " आजी तो मला देवळापर्यंत आणुन बाहेर सोडून देवळातच गेला तो कोण होता मग?"
आजीने ओळखले आपल्या नातवाला साक्षात गणेशाने वाचविले....तिने आनंदाने आपल्या नातवावरुन कडाकडा बोटे मोडली .गोपाळाला कळेना मुस्काटीत देऊन बोटे उमटवणारा खरा कि ...अश्रु गाळत आपल्यावरुन बोटे मोडणारी आजी......
शेवटी देव तारी त्याला कोण मारी
क्रमशः
वाचकहो हाच गोपाळ पुढे ऐकोणिस वर्षाचा झाल्यावरही एक असचा अनुभव त्याला आलेला तो मी पुढच्या भागात तुम्हाला सांगेन..