मित्राच्या नावाने आलेल्या मेसेजमुळे होऊ शकते फसवणूक
मोबाईलवर येणाऱ्या एका मेसेजने सध्या
धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा
केल्याचा हा मेसेज आहे. मात्र या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास आपली
फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं
आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या
मोबाईलवर बीडब्ल्यूजीएफवायएनडी यांच्याकडून मेसेज येत आहेत. तुमच्या
मित्राने तुमच्यासाठी एक हजार रुपये एफवायएनडीमध्ये जमा केले आहेत.
त्यासाठी एक्सओएमएमएफएल हा कोड वापरा. पाठविलेली लिंक डाऊनलोड करा, असा तो
मेसेज आहे.
हा मेसेज मिळालेल्यांना आपल्या मित्राने
पैसे पाठवल्याचे वाटू लागते. त्यामुळे संबंधित मोबाईलधारक त्या लिंकवर
क्लिक करुन लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे जातो. मात्र असं करुन आपली
फसवणूक होऊ शकते, असं सायबर एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.
अशाप्रकारचे मेसेज फसवे असल्याची माहिती
सायबर पोलीस देत आहे. अशा लिंक डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण
डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचतो. या माहितीच्या आधारे तुमच्या बँक
खात्यातील पैसे काढण्यापर्यंत उपयोगी पडू शकतो. सायबर गुन्हेगार या
डेटाच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारु शकतात. त्यामुळे
अशा मेसेजवर क्लिक न करता तो मेसेज डिलीट करणं फायदेशीर होईल.
या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास,
अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. नंतर परमिशन अलाऊ करण्यास
सांगितले जाते. ज्यामध्ये आपले फोन नंबर, लोकेशन, फोन स्टोअरेज आणि अन्य
माहिती या अप्लिकेशनच्या माध्यमातून डेव्हलेपरकडे सेव्ह होते. त्यामुळे असा
मेसेज कुणाला आला असेल तर, या लिंकवर क्लिक करु नये असं आवाहन सायबर
पोलिसांनी केलं आहे.