अघोर.
भाग पहिला...
लेखक : कनिश्क हिवरेकर “ अनु.... ? बाळा खाली ये नाश्ता करायची वेळी झालीय ना...चल बर लवकर ये...” संध्याने टेबलवरती प्लेट्स लावत अनुला हाक मारली...तशी दहा बारा वर्षाची अनु पायऱ्यावरतून उड्या मारतच खाली येऊ लागली... विश्वास टेबलजवळच पेपर वाचत उभा होता. संध्याने त्याच्या हातून पेपर काढून घेतला... “ काय हे ? ब्रेकफास्ट थंड नाही का होणार ? बस न आता...”
“ हं..होय बसतोय...” बसता बसता विश्वासची नजर संध्यावरतीच टिकून राहिली...इकडून अनु खाली आली व थेट जाऊन आपल्या बाबांच्या मिठीत शिरली “ good morning पप्पा...”
“ गुड morning स्वीटी...ये इकडे...आज मी भरवतो माझ्या स्वीटी अनु ला...” अनुला भरवता भरवताच विश्वास उद्गारला... “ माझ डॉक्टरशी बोलणे झालेय...आज वेळ आहे त्यांना. Appointment भेटलीय...मला वाटतय आपण जाऊन यायला काही हरकत नाही त्यांच्याकडे.” एवढ बोलून विश्वासने संध्याकडे पाहिले, तर संध्या आपल्या भरलेल्या ताटाकडे एकटक पाहत होती. विश्वासच्या बोलण्याकडे तीच काहीच लक्ष नव्हत. “ संध्या ? ए संध्या ?” तशी संध्या भानावर आली... “ हन ? काय ?”
“ मी म्हणत होतो आज डॉक्टरकडे जाउयात आपण. वेळ आहे बकुळा घेईल अनुची काळजी...”
“ हं ठीक आहे...” संध्या उद्गारली...
“ बकुळा हे सगळ घेऊन किचनमध्ये ठेव...” नाश्ता आवरून झाल्यावर संध्याने बकुळाला ताटे उचलायला सांगितली... “ बकुळा.. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो अनुची काळजी घे आम्ही माघारी येई पर्यंत...”
“ होय बायसाहेब...तुम्ही काय बी काळजी करू नका बघा...मी हाय नव्ह जावा तुम्ही बिनघोर...”
विश्वासने गाडी बाहेर काढली आणि दोघेही गाडीमध्ये बसून हॉस्पिटलला निघाले...
“ आज आपण डॉक्टरांना विचारून पाहू..यावर काही उपचार असेल तर ते नक्कीच सांगतील...” विश्वासने संध्याचा भूतकाळ काही एक माहित नसताना तिच्याशी लग्न केल होत. तिच्याकडून त्याने आजवर काही ऐकल होत ते फक्त तिच्या आईचा मृत्यू जो तिने तिच्या डोळ्यांनी पाहिला होता आणि तिच्या मामाने केलेला तिचा सांभाळ...कधी विश्वासने तिच्या वडिलांबद्दल प्रश्न केला तर त्यांचा विषय जरी निघाला तरी तिच्या अंगावर काटा यायचा ते विषयच ती टाळायची परंतु हि रात्री पडणारी स्वप्न त्यांचा नेमका काय अर्थ असेल... संध्याने आपल्या मामाकडे आपले आयुष्य काढले आणि नंतर तिच्या मामानेच सखामामाने तीच शिक्षण केले बहिणीच्या पोरीचा सांभाळ करताय आणि आपल्या वंशांच काय ? माझा विचार आहे कि नाही ? म्हणत मामाच्या बायकोनीहि त्याची साथ सोडून दिली पण सखाने बहिणीच्या पोरीचा सांभाळ जणू स्वतःची पोर असल्यासारखा केला संध्याला कॉलेजात शिकायला पाठवले तिथे तिची ओळख विश्वासशी झाली...ओळख मैत्रीत आणि मैत्री प्रेमात व नंतर लग्न झाले व काही वर्षातच त्यांना एक गोड मुलगी झाली... मुलगी झाल्याची बातमी तिने आपल्या मामाला कळवली तसा मामा इकडे भेटायला आला... भेटायला आला तेव्हा... संध्याला पाहून तो म्हणाला... “ आज ताई इथ पाहिजे होती ग पोरे...तुझ सुख बघून ती...” बोलता बोलता मामाचे डोळे भरून आले. ओल्या पापण्या पुसतच त्याने संध्याच्या डोक्यावरून हात फिरवला...अन तिला आशीर्वाद दिला...
“ मामा आज आई जिवंत असती तर...तिची खूप आठवण येतेय मला.” संध्या आपल्या मामाकडे पाहत म्हणाली... “ नशिबाचा भाग तो पोरी... सावित्री ताईने तीच नशीब स्वतःच लिहल होत. असह्य यातनेची साखळी तिने स्वतःभोवती गुंडाळून घेतली होती. अह...मी पण ना कुठल कुठे घेऊन जातो बघ पोरी.. अग आज तुझ्यासाठी एवढा आनंदाचा दिवस आणि तू काय रडतेय ? बघ किती गोड पोरगी झाली तुला...रडायचं नाही आता काळजी घ्यायची...चल मी जावईबापुची भेट घेतो बाहेरच बसले आहेत विहीणबाई देखील दिसताय त्यांना हि भेटून मग मी निघतो घरी जायला...”
“विश्वासराव मी निघतो आता...पोरीची काळजी घ्या आणि तुमची पण , विहीणबाई तुम्ही पण...माझ्याकडे द्यायला अस काही नाहीये पण;” मामा बोलत होते तोच विश्वासने त्यांचा हात हातात घेतला...
“ अहो मामा तुम्ही अस काय बोलताय? मी आजवर कधी तुमच्याकडून काहीच मागितले नाही. मला त्याची गरज कधी नव्हतीच...”
“ तरी पण विश्वासराव काही कपडे घ्या पोरीसाठी...मामाकडून पहिली भेट म्हणून तिला हे राहुद्या..” असे म्हणत मामाने त्याच्या खिशातून काही पैसे काढून विश्वासच्या खिशात ठेवले विश्वासच्या आईने कधीच विश्वासच्या निर्णयावर बोट उगारले नव्हते. संध्याचा त्यांनी मुलीसारखा स्वीकार केला होता. दिवसामागून दिवस उलटून गेले...आणि अनु जन्मूली त्याच रात्री तिला स्वप्न पडले... जुन्या पुराण्या आठवणी अगदी ताज्या जखमेसारख्या मेंदूत उठून ठणकू लागल्या...संध्याची रात्रीची झोप उडून गेली डॉक्टरांना तेव्हा दाखवले तसे त्यांनी झोपेच्या गोळ्या दिल्या तसे काही महिने त्रास बंद झाला त्या सर्वांचा तिने अनुच्या वाढीवर कधीच परिणाम होऊ दिला नाही. बाहेरून एक हसरा खेळणारा मुखवटा तिने अनुसाठीच खास चढवला होता. परंतु आतमध्ये दडलेली एक अनामिक भीती ती मात्र तिला कीड लागल्या सारखी खात सुटली होती. आता परत एकदा तीच मालिका तीच शृंखला सुरु झाली होती.
***
“क्र्ररर्र्रच्चsSS...” गाडीचे ब्रेक लागले तसे संध्या आणि विश्वासची नजर समोरच्या बिल्डींगवरती पडली...तिथे एक बोर्ड लावलेला होता त्यावरती नाव लिहील होत... बी .के घाडगे मानसिक आजार व मानसोपचार तज्ञ. दोघेही गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडले...
“ हम्म...या बसा...कस काय येणे केलेत ?” मध्यमवयीन किंचित जाड अशी प्रकृती नाकावर भिंगाचा पातळ काड्याचा चष्मा आणि डोक्यावरचे पांढरे काळे केस भरलेले. हातात पेन घेऊन दोघांकडेहि बारी बारीने पाहत घाडगे उद्गारले...
“ मग काय जोडी!? कसे काय येणे झाले ?”
दोघांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव होते एकमेकांकडे पाहून त्यांनी परत डॉक्टरकडे पाहिले.. “ डॉक्टर संध्याला पूर्वीसारखा त्रास सुरु झाला आहे. तिला तीच तीच स्वप्ने पडताहेत...आणि मध्येच रात्री उठून बसतेय..”
विश्वासने संध्याला होणारा त्रास सांगितला अश्याटली गोष्ट नव्हती कि तो तिच्या या त्रासाला कंटाळला होता. उलट मात्र त्याला तिची काळजी होती.
“ ये संध्या इथे या चेअर वरती बस...” डॉक्टर घाडगे नी संध्याला खुर्चीत बसवले ज्याला समोरच एक स्क्रीन होती आणि त्यावर एक black and white असे एकालगट एक वेढे करून वर्तुळ फिरत होती.
“ संध्या आता या स्क्रीनच्या मध्यबिंदूकडे बघ आणि दीर्घ श्वास घे.....पाहत रहा... पाहत रहा..... आता तुझे डोळे जड होतायत.... जड होतायत.... आता तुला फक्त माझा आवाज ऐकू येत आहे..... आता तुला फक्त माझा आवाज ऐकू येत आहे...”
संध्या फक्त होकारली...
“ हो...”
“मी जे बोलतोय ते लक्ष देऊन ऐक....आता आपण तुझ्या भूतकाळात जात आहोत...ते स्वप्न आठव... काय आहे त्या स्वप्नात ?”
स्वप्नाची गोष्ट विचारताच संध्याच्या श्वासात बदल झाला... बघता बघता तिचे श्वास वाढले सोबतच लावलेलं ब्लड प्रेशर मशीनमध्ये पारा वरती अन वरती चढत जाऊ लागला...
“ संध्या .....? संध्या ? मला ऐकतेस न ?”
“ होsss... मी .... हो...” संध्याचा आवाज मात्र तिच्या संमोहित होकाराना साथ देत नव्हता तिच्या आवाजात दरदरून भीती होती. घामाने तिचा चेहरा भिजून गेला होता...बंद पापण्या मागील अंधारात आता एकेक करून चित्रफित उभी राहू लागली...तोच चिरेबंदी भव्य वाडा....गावाबाहेरील शिव मंदिराजवळ वसलेला..झट झट धाड धाड करत एक एक दरवाजा उघडू लागला त्या मोठ्या दरवाज्याचा दिंडी दरवाजा आतमधले सताड उघडे अंगण, आतमध्ये अजून एक खोलीचा दरवाजा उघडला... धाडsss.... आणि हळू हळू एक अत्यंत करडा आवाज कानी पडू लागला... कोणीतरी पद्यात्मक रित्या उच्चारत होत...
“ देवा सद्बुद्धी दे तया...मुक्त होऊ देत वासना तयाची.....कीडकृमी पडो दुष्टास त्या आस हि लागे मजला...ओढ त्या क्षणाची त्या घटकेची...पुत्ररत्नाची....” बघता बघता खोली मागून खोली उघडू लागली...कोठाराची खोली, स्वयपाक घराची खोली...नंतर जो दरवाजा उघडला तो उघडता समोर वरती दिशेने जाणाऱ्या पायऱ्या संध्याला दिसू लागल्या..तो येणारा आवाज अजून स्पष्ट आणि कर्क्काश होऊ लागला... झप झप पायऱ्या उलटुन गेल्या आणि शेवटचा दरवाजा धाडकन उघडला... संध्याच्या बंद पापण्या आड ते सर्व चालू होत. तिचा देह सुटला पण आत्मा मात्र त्या ठिकाणी पोहोचला होता. खोली उघडताच आतमध्ये चोहीकडे फक्त लाल पिवळा धुपेच्या आणि अगरबत्तीच्या धुराचा लोट आणि त्यात हळद कुंकू उधळलेले... खोलीत फक्त दरवाजा उघडा तेवढाच प्रकाश आत पोहोचला होता... आणि ते उच्चारण करणारा करडा आवाज देखील आता बंद झाला होता...संध्याने खोलीमध्ये पाउल टाकले सगळ्या फरशीवर कुंकू आणि हळदीचा थर साचला होता... संध्याने त्या थरावर जसा पाय टाकला तसे समोरून धुराचा लोट विरघळून गेला....समोरच्या गोष्टी तिला अगदी स्पष्ट दिसू लागल्या... समोर कोणीतरी जमिनीवर पाट टाकून त्यावर मांडी घालून बसल होत अंगात फक्त धोतर होते पाठीवरती लांबसडक काळीभोर जट नागासारखी लोंबत होती त्याच उघड कपाळ माथा त्यावर एकमात्र हि केस नव्हता कंबरेच्या धोतर भोवती लालसर कापडाचा पट्टा गुंडाळला होता. दोन्ही च्या दोन्ही हात कुंकूवाणे अगदी हाताच्या कोपरा पर्यंत भरलेले होते हाताच्या डाव्या बाजूस झांज आणि पुजेची घंटी ठेवली होती.. परंतु समोर कुठल्या दैवाची पूजा मांडली होती ते स्पष्ट नजरेस पडत नव्हत. त्याचे वेगळेच मंत्रोच्चार चालू होते. तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता तो. इकडे संध्याने जसे आत पाउल टाकले तसे त्याने आपले सर्व उच्चार थांबवले उधळते कुंकूचे हात थांबवले.. झनाझन वाजणारी झांज थांबवली...आणि मग त्या खोलीत पसरले एक भयानक किनरी रौद्र हास्य..खीखीखी करणारा आवाज त्याचा केव्हा राक्षसमय होऊन गेला समजलेच नाही...इकडे संध्याचे काही क्षण शांत झालेले शरीर परत थरथरू लागले... हृदयाचे ठोके धडधड वाढले...डॉक्टर घाडगे तिला हाक मारत होते परंतु तिचा आवाज निघत नव्हता भीतीने जणू तिचे ओठच शिवले गेले. डॉक्टर घाडगेनी आता संमोहन तोडण्याचा निर्णय घेतला आणि तिला आज्ञा देऊ लागले...
“ संध्या....? संध्या मला ऐकतेयस न ? संध्या ??? जागी हो...संध्या जागी हो..” असे म्हणत ओरडत डॉक्टर घाडगे चुटकी वाजवू लागले टाळी वाजवू लागले तिच्या कानामध्ये परंतु संध्यावरचे संमोहन ततुटत नव्हते.
“ डॉक्टर डू समथिंग...bring her back....” विश्वास ओरडू लागला..आणि इकडे...
तिच्या बंद डोळ्यांमागे...
त्या विचीत्राचे हास्य थांबले आणि त्या अंगावर काटे आणणाऱ्या करड्या आवाजाला शब्द फुटले त्याचा चेहरा मात्र पुढेच होता.
“आलीसsss ? अग एवढा वेळ का घेतलास तू ? तसे हि मी येणारच होतो न चार दिवस आहेत चार दिवसांनतर शुभ मुहूर्त आहे अमावस्येचा... येईन हो मी भेटायला...; अनुला तुझ्या...” आणि असे म्हणत त्याने हळू हळू आपली मान मागे वळवायला सुरुवात केली आणि चेहरा संध्याच्या दिशेबे तिरकस नजर टाकून पाहू लागला...
“ अग आईला तरी भेटून जा.... अशीच कुठे चाललीस ? कुठे चाललीस तू , आईला भेटून जा तुझ्या आईला भेटून जा......असे म्हणत तो ताडकन आपल्या जागचा उठला .... दाट काळ्या भुवया...मोठे डोळे लंब चेहरा ओठांवर दाट मिश्या..आणि तसेच राक्षसी हास्य घेऊन तो पुढे सरसावू लागला...
“ अग आईला भेटून जातेस न तुझ्या ? हि बघ हि बघ... तुझी आई....”
असे म्हणत तो बाजूला सरकला तसे समोरचे ते भयानक दृश पाहून तर संध्याचे होते नव्हते तेवढे आवसान गळून गेले...कारण तो ज्या गोष्टीसमोर बसून एवढा वेळ झांज बडवत होता ते दुसर तिसर काही नसून संध्याच्या आईचे पाटावर मांडलेले शीर होते.
“ ये .. ये ना....” हळू हळू तो आपल्या पावलांची काहीएक हालचाल न करता..,पुढे पुढे सरसावू लागला...दोन्ही हात पुढे करून संध्याच्या गळ्यावर तिचा गळा आवळायला...
“ येsss ... बघ तुझी आई बोलवतेय तुला...” त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमायला लागला...तोच संध्याला विश्वासचा आवाज त्या अंधारात कुठून तरी कानावर पडला.... तिचे संमोहन तुटत नव्हते विश्वास जीवाच्या आकांताने तिला ओरडत होता हाक मारत होता त्याच आवाजाने संध्यामध्ये बळ संचारले...आणि तिथून तिने काढता पाय घेतला आणि मिळेल त्या रस्त्याने पायऱ्यानी बोळीतून दरवाज्यातून धावत सुटली जेव्हा तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला दिसले कि तो अजूनही मागावच होता अंधारातून त्याचा भयंकर चेहरा भसा भस बाहेर निघून तिच्याकडे आपले दोन्ही हात वाढवून येत होता....अगदी हातभराच्या अंतरावरून तो संध्याला ओरडत तिच्या मागावर येत होता संध्या मिळेल त्या वाटेने धावत सुटली होती. अचानक तिचे केस त्याच्या हातात सापडलेच होते कि तोच संध्या किंचाळून खडबडून जागी झाली वेदनेने विव्हळू लागली ते संमोहन तुटले आणि संध्या जाऊन थेट विश्वास च्या हातावर पडली...
“ संध्या ? संध्या तू ठीक आहेस न ? संध्या ?? ए संध्या?” संध्याचा भीती पोटी आवाज निघत नव्हता घसा कोरडा पडून तिला श्वास हि घेणे अवघड झाले होते घामाने सर्व चेहरा भिजला होता तिचा. वेदनेने कळवळतच तिने आपल्या मानेवरती हात ठेवला तीच गोष्ट विश्वास आणि डॉक्टर घाडगे दोघांनीही पाहिली कि संध्याचे मानेवरील केस जणू कोणीतरी उपसून काढले होते आणि मुळातून रक्त बाहेर ओसरून येत होत.
क्रमशः
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,