कथेचे नाव : लेखक
भाग : एक
कर्रर्रर्रर्रर्रर्र…
आज कितीतरी दिवसांनी त्या खोलीचा तो दरवाजा करकरला…
आजवर अंधारात बुडून गेलेली ती खोली दरवाज्यातून आत पडलेल्या प्रकाशाने थोडीशी उजळून निघाली.
अंधुकसा प्रकाश होता तो…
पण तरीही ती खोली थोडीफार का होईना, झगमगली.
खोलीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसत होते.
ठिकठिकाणी जळमटं आणि कोळ्यांची जाळी झाली होती.
पाहावं तिकडे धूळच दिसत होती.
मधोमध असणाऱ्या टेबलावर तर धुळीचा खच लागला होता. अगदी डोळ्यांना स्पष्ट दिसावा इतका…
त्या टेबलावर धूळ खात पडलेली एक अर्धवट डायरीसुद्धा होती.
शेजारीच लेखणी ठेवण्यासाठीचे पात्र आणि शाईचे पात्र होते.
शाईच्या पात्रातील शाई आता धुळीने सुकून गेली होती आणि एकदम घट्ट झाली होती.
धुळीचा थरच्या थर साचला होता.
टेबलच्या एका कोपऱ्यात टेबल लॅम्प जळमटांनी भरलेल्या अवस्थेत उभा होता.
त्यातील बल्ब कधीच फुटलेला असावा बहुतेक…
कारण खाली तिथेच काचेचे तुकडे पडलेले होते.
तेही धुळीने माखलेले…
एका बाजूला असणाऱ्या कपाटावर वेगवेगळी पुस्तके मांडलेली होती.
तीही धुळीने माखलेली होती.
काही पुस्तके उंदरांनी कुरतडलेली होती.
काही पुस्तके अस्ताव्यस्त झाली होती.
तर काही खाली पडलेली होती.
खोलीच्या एका बाजूच्या भिंतीवर दोन फोटो फ्रेम लटकलेल्या होत्या.
धुळीने त्या इतक्या खराब झाल्या होत्या की त्या कोणाच्या असाव्यात हे देखील ओळखता येत नव्हते.
फोटोवर काही मजकूर लिहिलेला जाणवत होता…
पण वाचता येत नव्हता.
टेबलाच्या समोरच एक लाकडी खुर्ची होती.
तिचा हात ठेवायचा एक पायंडा मोडलेला होता.
तो तसाच मोडलेल्या अवस्थेत तिथेच लोंबकळत होता.
त्याने टेबलावरची ती डायरी हातात घेतली.
हाताने थोडीशी झटकली तसा धुळीचा लोट बाजूला झाला.
थोडीशी फुंकरही त्याने मारली.
आता ती डायरी थोडीशी स्वच्छ वाटू लागली.
त्याने डायरीचे पहिले पान उघडले…
आणि तो वाचू लागला.
“अरे लेखक… म्हणून तू या लेखकांच्या दुनियेतील नालायक माणूस म्हणूनच ओळखला गेलास!
तू चांगला लेखक आहेस यात कोणतीच शंका नाही… पण तुझ्या स्वभावाचं काय करायचं?
किती कथा लिहिल्यास?
तुला तरी आठवतंय का?
कसं आठवेल?
लिहिणे हा एकच तर छंद होता तुला…
वाचक अगदी वेडावून जायचे तुझ्या कथा वाचताना.
एक-एक शब्द वाचकाच्या काळजावर घाव घालायचा.
अगदी तू लिहिणार आहेस हे जरी समजलं, तरी ते चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसे तुझ्या कथांची वाट पाहायचे.
पण…
तू मात्र नालायक निघालास!
एक अशी कथा दाखव जी तू पूर्ण केलीस…
सगळ्याच अर्धवट आणि अपूर्ण!
हा हा हा…
म्हणता म्हणता कथा रंगात यायची…
अगदी शेवटच्या क्षणावर जाऊन त्या कथेचा शेवट बाकी राहायचा.
आणि मग वाचणारा परत हैराण होऊन जायचा.
कारण कथेचा शेवट त्याला मिळायचा नाही.
आणि मग सुरू व्हायची त्यांची हजारो पत्रे…
कितीतरी वाचक पत्रे पाठवत…
‘सर, तुमच्या कथा खूप छान असतात… तुम्ही असेच लिहीत राहा… पण सर, या कथेचा शेवट आलाच नाही… आम्ही आतुरतेने वाट पाहतोय…’
वगैरे वगैरे…
अगदी नेहमीचं होऊन बसलं होतं ते.
पण तुला मात्र त्यांची दया आलीच नाही.
फक्त कथा रंगवायची आणि शेवटच्या क्षणाला तिला भरकटायला सोडून द्यायची…
हीच का रे तुझी पद्धत?
आणि त्यामुळेच तुला नालायक म्हणायची इच्छा मला नेहमी होते.
खरं पाहता तुला असं बोलणं चुकीचं आहे.
कारण तुझ्या लेखणीने वाचकांच्या मनावरच नाही, अगदी त्यांच्या कल्पनाशक्तीवरही राज्य केलं.
कल्पनेच्या गाभाऱ्यातून अनामिक अशा गोष्टी शोधणारा तू वाचकांना अद्भुत वाटायचास.
कारण भयकथा म्हणजे फक्त एखादा घडलेला प्रसंग किंवा अनुभवाला आलेली गोष्ट यातूनच निर्माण होऊ शकते, हा जगाचा भास तू मात्र तुझ्या कल्पकतेच्या शक्तीने मिटवलास.
तुझ्या कथा काल्पनिक आहेत, असं जेव्हा वाचकांना तू सांगायचास तेव्हा ते चक्रावून जायचे.
आणि हे तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहेसच…
आणि म्हणूनच तुला आज नालायक म्हणताना त्रास होतो आहे.
पण काय करणार?
सर्व काही चांगलं केलंस…
पण शेवट मात्र अंधारातच ठेवलास.
अगदी एकूण एक सर्व कथा मी पुन्हा पाहिल्या…
त्या अर्धवटच आहेत.
याचं उत्तर आहे का तुझ्याकडे?
नसेलच कदाचित…
कारण तुला जेव्हा कोणी हा प्रश्न विचारला, तेव्हा तू फक्त स्मितहास्य करायचास त्या व्यक्तीला पाहून.
मलाही तेच उत्तर देणार आहेस का?
काय मूर्ख आहे मी पण…
कोणाला विचारतो आहे हे सर्व?
जो आजवर स्वतः हे ठरवू शकला नाही की या कथेला शेवट हवा…
तो माझ्या प्रश्नाला उत्तर काय देईल?
आणि म्हणून…
तू नालायक!
नालायक लेखक…….”
डायरीतील सुरुवातीचा तो मजकूर वाचून तो थोडा चक्रावलाच होता.
म्हणजे त्याने जे ऐकलं होतं ते अगदी खरं होतं तर…
तो विचारात पडला.
अर्धवट कथा?
हा नेमका काय प्रकार असावा?
त्या कथा अर्धवट आहेत की त्या पूर्ण आहेत, पण त्यातील शेवट गूढ आहे?
असा काही प्रकार असेल का?
की कथेचा शेवट हा त्या कथेतच कुठेतरी लपलेला असावा आणि वाचकाला तो लक्षात आला नसावा?
काय असू शकेल?
यासाठी त्या कथा वाचायला हव्यात…
त्याशिवाय समजणारच नाही की नेमकं गौडबंगाल काय आहे!
त्याने स्मितहास्य केलं.
काहीतरी उमगलं असलेल्या भावनेतच त्याने त्या खोलीत सर्वत्र पुन्हा एकदा नजर फिरवली.
तो उठला आणि खोलीतून बाहेर आला.
बाहेर असणाऱ्या सखारामला त्याने आवाज दिला.
“सखाराम…”
सखाराम धावतच आला.
“जी साहेब…”
सखाराम त्याचा नेहमीच जोडीदार.
तो जिथे जाईल तिथे तो सोबत असायचा.
वयाची चाळीशी गाठलेला सखाराम त्याच्यासाठी काय पण या तयारीतच असायचा नेहमी.
आजही सखाराम त्याच्यासोबत तिथे आला होता.
“सखाराम, ही खोली मला साफ करून हवी आहे. पण लक्षात ठेव… फक्त खोली साफ करायची आहे. बाकी आतील सर्व साहित्य आणि सामान मला जसंच्या तसं हवं आहे. काय समजलं?”
त्याने वाड्यातील इतर गोष्टी न्याहाळत सखारामला आदेश केला.
“जी साहेब… समजलं. अगदी तुम्हाला पाहिजे तसं काम होईल. तुम्ही आराम करा तोवर आटपतो मी.”
सखारामकडे पाहून त्याने पुन्हा एकदा स्मितहास्य केलं आणि तिथून निघाला.
सखाराम त्याच्या कामाला लागला…
�
⸻
�
�
⸻
�
२०१९…
२०१९ च्या सुरुवातीलाच भयकथांच्या दुनियेत एक नवीन वादळ नावारूपास येऊ लागलं.
आजवर अनेक भयकथा लेखकांनी आपल्या लेखणीतून अनेक रोमांचक आणि अनामिक अशा कथांना जन्म दिला होता.
पण या नव्याने नावारूपास आलेल्या वादळाने मात्र पुन्हा एकदा काल्पनिक दुनियेला आपल्या लेखणीत गुंतवून वाचकांना भीतीच्या साम्राज्यात लोटून घेतलं होतं.
त्याच्या कथा एकामागून एक धडकत होत्या…
आणि वाचक त्याच्या लेखणीवर वेडे होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं.
त्याचा एक-एक शब्द घायाळ करत होता वाचकांना…
भयकथेच्या दुनियेत अगदी भुतांच्या तोंडावरही आता त्याचंच नाव होतं.
“मी एक अनामिक…”
या टोपणनावाने तो या भयकथेच्या दुनियेत ओळखला जात होता.
पण त्याचं खरं नाव मात्र आजवर कोणालाच समजलं नव्हतं.
नव्यानेच जन्माला आलेला हा लेखक तसा अपरिचितच होता.
अचानक अवकाशात एखादा तारा चमकावा, तसा तोही या भयकथांच्या दुनियेत चमकला होता.
सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लेखन करणारा हा लेखक त्याच्या काल्पनिक शक्तीच्या जोरावर लिहिलेल्या कथांनी प्रसिद्ध झाला होता.
कारण…
कारण यापूर्वी असाच एक लेखक होऊन गेला होता, ज्याने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर वाचकांना वेड लावलं होतं.
अगदी त्याचीच आठवण या नव्या लेखकाला पाहून सर्वांना होत होती.
त्याच्या कथांना भरभरून प्रतिसाद मिळायचा…
आणि तोही त्यात आपलं समाधान मानायचा.
वाचकांची ओढ त्याला नेहमीच नवनवीन कथांच्या शोधात गुंतण्यास भाग पाडायची.
आणि मग तो लिहीत राहायचा…
�
⸻
�
असेच एकदा एक वाचक त्याला भेटायला त्याच्या घरी आला.
खूपच वयस्कर होते ते गृहस्थ.
तो जेव्हा त्यांच्या समोर आला तेव्हा त्या गृहस्थांनी त्याचं अभिनंदन करण्यासाठी उभं राहण्याचा प्रयत्न केला.
तसा तो पुढे सरसावला.
“अहो, ही तुमचीच कृपा म्हणून मी इथवर आलो. असे माझ्यासाठी उभे राहून मला शरमिंदा करू नका…”
ते गृहस्थ त्याच्याकडे पाहून हसले आणि पुन्हा खाली बसले.
“आज खरं तर तुला भेटायला आलो कारण नुकतेच तुझ्या कथा मला वाचायला मिळाल्या. तसा मी फक्त पुस्तकात छापलेल्या कथा वाचणारा वाचक… पण माझ्या नातवाने मला त्याच्या मोबाइलवरती तुझ्या कथा दाखवल्या.”
ते बोलत राहिले.
“सुरुवातीला मला थोड्या अडचणी आल्या… पण वाचन करताना लक्षात आलं की कथा खरेच उत्कृष्ट आहेत. आणि मग मी वाचतच गेलो. एकामागोमाग एक अशा सर्व कथा मी वाचून काढल्या…”
ते अचानक थांबले.
“आणि त्या वाचताना मला त्याची आठवण झाली…”
त्याने आतुरतेने विचारलं.
“त्याची? म्हणजे कोणाची?”
ते गृहस्थ त्याच्याकडे पाहून हसले.
“हो… त्याची.”
त्यांच्या आवाजात काहीतरी गूढ होतं.
“जेव्हा तरुण होतो तेव्हा मला वाचनाची आवड होतीच. पण भयकथा हा प्रकार त्यावेळी मी अजिबात वाचत नव्हतो. आणि त्याच वेळी एक असा लेखक आला ज्याने भयकथांची आवड माझ्यात निर्माण केली.”
ते बोलत होते आणि तो अगदी लक्षपूर्वक ऐकत होता.
“त्यांच्या कथा वाचताना मी शहारून जायचो. अगदी वेड लागायचं… आता जसं तुझ्या कथा पाहून वाचक थक्क होतात ना, अगदी तसेच त्यांच्या कथा वाचून आम्ही त्यावेळी थक्क व्हायचो.”
ते गृहस्थ थोडे पुढे झुकले.
“अगदी तुझ्यासारख्याच कथा लिहायचा तो…”
क्षणभर शांतता पसरली.
“फक्त एकच फरक आहे तुमच्या दोघांत.”
तो उत्सुक झाला.
“फरक…? कोणता फरक?”
ते गृहस्थ हसले.
“तुझ्या कथा पूर्ण असतात…”
क्षणभर त्यांनी त्याच्याकडे पाहिलं.
“त्याच्या मात्र अपूर्ण… अर्धवट असायच्या!”
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
“आणि म्हणूनच तो खूप मोठा लेखक असूनदेखील अखेरीस नालायक ठरला.”
ते गृहस्थ स्मितहास्य करू लागले.
तो गोंधळला.
“अपूर्ण… अर्धवट… म्हणजे मला काहीच समजलं नाही.”
“हो… अपूर्ण. अर्धवट…”
“कोण आहेत ते? मला त्यांचं नाव कळेल?”
त्याला आता त्या लेखकाबद्दल कमालीची उत्सुकता लागली होती.
ते गृहस्थ काही क्षण शांत राहिले.
मग म्हणाले…
“नाव तुला समजेलच… मी तुला त्यांचा पत्ता देतो. बाकी सर्व तुला तिथे गेल्यावर समजेलच.”
इतकं बोलून त्या गृहस्थांनी त्याला त्या लेखकाचा पूर्ण पत्ता दिला.
आणि ते तिथून निघून गेले.
त्याने लगेच सर्व ती चौकशी केली…
आणि त्या लेखकाचं घर शोधून काढलं.
�
⸻
�
कोल्हापूर जिल्हा…
गगनबावडा तालुक्यातील डोंगराळ भागात जंगलात वसलेलं एक छोटंसं गाव…
जावळी.
अगदी मोजक्याच घरांच्या वस्तीने सजलेलं हे गाव.
त्या गावात एकच वाडा होता.
तिथे हा लेखक राहायचा, अशी त्याला माहिती मिळाली.
आणि त्याने त्या गावी जायचा निर्णय घेतला.
सखाराम सोबतीला होताच.
स्वतःच्या खाजगी वाहनानेच तो त्या गावात दाखल झाला होता.
त्या वाड्यात त्याने प्रवेश केला.
आणि तो त्या लेखकाच्या खोलीकडे सरसावला.
येण्याअगोदर त्याने वाड्याच्या संबंधित मालकाला पूर्वकल्पना दिली होतीच.
त्यामुळे कोणतीच अडचण त्याला आली नाही.
खोलीला असणारं कुलूप त्याने उघडलं…
आणि दरवाजा आत लोटला.
कर्रर्रर्रर्रर्रर्र…
आवाज झाला.
आणि…
त्याच्या समोर उघडलं एक असं गूढ दार…
ज्याच्या पलीकडे त्याच्या आयुष्याचा पुढचा अध्याय त्याची वाट पाहत होता…
क्रमशः



