सोहमचे बाबा
हॅलो सोहमचे बाबा बोलताय ना?... पलीकडून एका महिलेने विचारलं.
अरे यार... परत रॉंग नंबर... हा कोण सोहम आणि त्याचा बाबा आहे एकदा शोधायलाच हवं. आजवर किती वेळा सांगितलं मी कुठल्याही सोहमचा बाबा नाही, दर वेळी नंबर ब्लॉक करत आलोय. तरी मला ह्या नावाने रॉंग नंबर का येत असतात? खरं तर राहुल खूप वैतागला होता. पण समोरच्या महिलेवर ओरडून काहीच होणार नव्हतं. फक्त स्वतःच्या मनाची शांती ढवळून निघणार होती. रॉंग नंबर एवढंच शांतपणे बोलून त्याने कॉल कट केला. पाण्याची बॉटल तोंडाला लावून दोन मिनिट तो गप्प बसून राहिला. मग एक दीर्घ श्वास घेऊन त्याने कामाला सुरुवात केली.
सोहमच्या बाबासाठीचे कॉल राहुलला येणं काही महिन्यापूर्वी सुरु झालं. असं होतं कधी तरी की डायल करताना एखादा वेगळाच आकडा टाकल्यामुळे चुकीच्या माणसाला कॉल लागतो. त्यामुळे चुकून आला असेल एखादा कॉल, म्हणून पहिल्यावेळी राहुलने दुर्लक्ष केलं. परत काही दिवसांनी सोहमचे बाबा म्हणून राहुलला कॉल आला तेव्हादेखील त्याने सोडून दिलं. पण असं वारंवार होऊ लागलं तेव्हा मात्र राहुल वैतागला.
पहिला कॉल आला तेव्हा राहुल बॉसच्या समोर बसून पेंडिंग कामाबाबत स्पष्टीकरण देत होता. मोबाईल सायलेंट वर असला तरी त्याच्या व्हायब्रेशनने बॉसचं लक्ष वेधून घेतलंच. राहुलने तो कॉल घेतला नाही. पण त्या नंबरवरून लगेचच कॉल आला. घ्यावा की नाही ठरवता येईना राहुलला.
बोलून घ्या फोनवर, बॉस थोडं वरच्या स्वरात बोलला. राहुलने केबिन बाहेर येऊन कॉल रिसिव्ह केला.
सोहमचे बाबा बोलताय ना? सोहमला परत फिट आली आहे वर्गात. त्याला घेऊन जा लगेच डॉक्टरकडे.
फोन कोणी उचलला आहे? आपल्याला हवा आहे तोच माणूस पलीकडे बोलतोय ना? अशी कुठलीही शहानिशा न करता त्या माणसाने बोलायला सुरुवात केली.
हॅलो कोण हवं आहे तुम्हाला? रॉंग नंबर आहे हे जाणवलं तरी राहुलला पटकन तोडता येईना.
सोहमचे बाबा बोलताय ना? पलीकडून विचारणा झाली.
सॉरी रॉंग नंबर म्हणून राहुलने कॉल कट केला. वास्तविक त्या अनोळखी सोहमची चौकशी करावी असं राहुलला खूप प्रकर्षाने वाटत होतं. पण काचेपलीकडे बसून बॉस राहुलकडे बघत होता. त्यामुळे त्याला कॉल आटोपता घ्यावा लागला.
काहीच दिवसानंतरची गोष्ट....
राहुल आज सुट्टी घेऊन साधना सोबत नाटकाला आला होता. थिएटर मध्ये अनाउंसमेंट झाली.... कृपया आपले फोन सायलेंट किंवा फ्लाईट मोडवर ठेवावेत. राहुल फोन स्विच ऑफ करतच होता, इतक्यात त्याला एक कॉल आला.
हॅलो सोहमचे बाबा, सोहमने आजसुद्धा क्लासला दांडी मारली. अभ्यास देखील तो रेगुलर करत नाही..... राहुलने फोन घेतल्यावर समोरचा माणूस बोलू लागला.
अहो साहेब मी कुठल्याही सोहमला ओळखत नाही. राहुल त्या माणसाला सांगतच होता, इतक्यात त्याला ठसका लागला. त्यामुळे मध्ये काही क्षण ब्लँक पॉज आला. तुम्ही सोहमचे बाबाच बोलताय ना? उशिराने का होईना त्या माणसाला विचारावंसं वाटलं की फोन नक्की कुणाला लागला आहे ते.
एवढ्यात नाटकाचा पडदा बाजूला झाला , रॉंग नंबर बोलून राहुलने फोन कट केला. पण का कुणास ठाऊक आपण त्या अनामिक सोहममध्ये गुंतल्यासारखं राहुलला जाणवू लागलं होतं. त्यामुळे त्या दिवशी त्याचं मन नाटकात रमलंच नाही.
राहुलला बरेचदा वाटायचं साधनाला सोहम बद्दल सांगावं. पण सांगायचं काय तेही कळत नव्हतं. आपल्याला सोहमचे बाबा समजून रॉंग नंबर येतात, तो सोहम बहुदा शाळेत जात असावा, थोडा द्वाडही असेल त्यामुळे अभ्यासाचा कंटाळा करतो, क्लासला दांड्या मारतो. कळत नकळत आपण त्याच्यामध्ये गुंतत चाललोय हे कसं सांगायचं? लग्न होऊन कित्येक वर्ष झाली पण अजून घरात छोटी पावलं उमटली नाहीत हे दुःख कसंबसं साधना सोसते आहे. सोहम बद्दल सांगून उगाच तीला आशा लावल्यासारखं होणार नाही का? त्यापेक्षा नकोच तीला काही सांगायला ह्यातलं म्हणून राहुल तो विषय टाळत असे.
मध्ये दोन तीन वर्ष गेली. सोहमचे बाबा म्हणून राहुलला कॉल येतंच होते. आजकाल तो देखील त्या रॉंग नंबरवर सोहमचे बाबा म्हणून बोलत असे. कुणी फोनवर सांगितलं आज सोहम क्लासला उशीरा आला, तर आम्ही दोघे थोडं शॉपिंगला गेलो होतो असं बिनदिक्कत ठोकून देत असे. सोहम कराटे खेळायला जात असावा, तिथून एक दोन वेळा कॉल आला सोहमची फी भरायची राहिली आहे सांगायला. अहो माझ्याकडूनच राहून गेली फी, उद्या पाठवतो नक्की, खोटं आश्वासन देऊन राहुल कॉल ठेवत असे.
त्या कधीही न पाहिलेल्या सोहम बद्दल राहुलच्या मनात अनुबंध निर्माण झाला होता. राहुलला खूप वेळा वाटत असे, त्या येणाऱ्या कॉलवर चौकशी करून सोहमच्या शाळेचा, क्लासचा पत्ता मिळवावा, त्याला एकदा भेटून यावं. बोललं नाही तरी किमान लांबून त्याला डोळे भरून पाहावं. पण राहुल तो मोह टाळत होता. आभासी दुनियेत मिळणारं हे खोटं सुख हिरावलं जाण्याची त्याला भीती वाटत होती.
दहावीचा रिजल्ट होता आज, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. अर्थात ह्या सगळ्याशी राहुल साधनाचा काहीच संबंध नव्हता. नातेवाईकांपैकी कुणी असलं तरी त्यांना एवढं विशेष कौतुक नव्हतं. कुणी पेढे द्यायला येईल तेव्हा ऐपतीप्रमाणे आणि रिलेशननुसार बक्षीस म्हणून काही पैसे किंवा भेट द्यायची हा शिरस्ता ते पाळणार होते. अंगात थोडी कणकण असल्याने राहुलने रजा टाकली होती. दुपारची झोप झाल्यावर त्याला थोडं फ्रेश वाटलं. किचन मधून चहाची तयारी सुरु होती. राहुल वॉशरूमला गेला इतक्यात त्याचा फोन वाजला. लागोपाठ दोनदा रिंग झाली म्हणून साधनाने फोन उचलला.
सोहमचे बाबा, सोहमला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के मिळालेत. संध्याकाळी क्लासमध्ये या नक्की, सत्कार समारंभ आहे सर्व मुलांचा.
फोनवरील बोलणं ऐकून साधनाच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. म्हणजे राहुलचं घराबाहेर एखादं प्रकरण सुरु आहे, त्याला सोहम नावाचा मुलगा देखील आहे? राहुलला डायरेक्ट विचारलं तर तो नाहीच म्हणेल. अशा गोष्टीत लपवाछपवी करण्यात पुरुष माहीर असतात. त्यापेक्षा आपणच छडा लावायला हवा. साधनाने क्लासचा पत्ता आणि वेळ नोंद करून घेतली. राहुलसाठी चहा ओतून ठेवला आणि आपलं आटपायला तीने सुरुवात केली. संध्याकाळी नक्की काय सत्य समोर येईल ह्याने ती धास्तावली होती.
ठरल्या वेळी साधना क्लासवर पोचली. टीचर्स रूम बाहेर बरीच मुलं पेढ्याचे बॉक्स घेऊन उभी होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नुसता ओसंडून वाहत होता. इतक्यात एक पीयून पुष्पगुच्छ घेऊन आला. सर्व टीचर्स बाहेर आले. प्रत्येकाला मुलांनी पेढे देऊन वाकून नमस्कार केला.
नंतर एक सर बोलू लागले. त्यांनी सर्व विद्यार्थीवर्गाचं आणि पालकांचं अभिनंदन केलं. मग हातातल्या लिस्टमधून एकेक विद्यार्थ्याचं नाव आणि टक्के सांगितले. साधना सगळ्यांची नावं कान देऊन ऐकत होती. त्या मुलांच्या ग्रुपमध्ये दोन सोहम होते, दोघांनाही नव्वदच्या वर टक्के मिळाले होते. विशेष म्हणजे दोन्ही सोहम त्यांच्या आई वडिलांसोबत आले होते. त्यामुळे आपल्या घरी नेमकं कुठल्या सोहमच्या नावाने फोन आला असेल हे काही तीला कळलं नाही.
तीथे थोडा वेळ थांबून साधना घरी निघून आली. पण तीचं चित्तं काही थाऱ्यावर नव्हतं. तीच्या वागण्यातील बदल राहुलच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही. त्याने खोदून खोदून विचारलं तेव्हा तीने थेट विषयाला हात घातला. राहुलने सुरुवातीपासून तीला सगळं सांगितलं. एखाद्या बायकोचा नवऱ्यावर अशा गोष्टीमध्ये विश्वास बसणं खरं तर कठीण असतं पण राहुलच्या बोलण्यातला सच्चेपणा तीला जाणवत होता. आपला नवरा बाहेरख्यालीपणा करायचा नाही एवढा विश्वास इतक्या वर्षाच्या सहवासानंतर तीला ठेवावाच लागणार होता. तो विषय कुठलंही आकांडतांडव न होता तीथेच मिटला.
राहुलला अजून सुद्धा कॉल येतंच होते. सोहमचं कॉलेज झालं, तो पुढील शिक्षण घ्यायला फॉरेनला गेला. आपण कधीही न पाहिलेला आणि चुकूनच आपला मुलगा म्हणून आपल्या आयुष्यात आलेला सोहम प्रगतीच्या एकेक पायऱ्या चढतोय ह्याने राहुल नकळत सुखावत होता. त्यानंतर सोहमसाठी येणारे कॉल अचानक बंद झाले. काही काळ राहुलला चुकल्यासारखं वाटलं पण हळूहळू तो सरावला. आहेस तीथे सुखी रहा सोहम. देवापुढे हात जोडताना राहुल आठवणीने शुभचिंतन करत असे.
राहुल त्याच्या काकांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्याचं वडिलोपार्जित घर रीडेव्हलपमेंट होऊन रेडी व्हायला जवळ जवळ पंधरा वर्ष गेली. फायनली आपण आपल्या हक्काच्या घरात जाणार म्हणून राहुल आणि साधना खुश होते. दरम्यान त्या घरात नवीन भाडेकरू जागा पाहण्यासाठी येत होते.
एक दिवस एका अनोळखी नंबरवरून राहुलला कॉल आला आम्ही तुमचं घर बघायला येतोय असं.
हो या ना संध्याकाळी, आम्ही घरीच आहोत. आपलं नाव नाही सांगितलं तुम्ही? राहुलने समोरच्या व्यक्तीला विचारलं.
मी सोहम... सोहम नार्वेकर... सोहम हे नाव ऐकताच राहुलच्या मनात एक तरंग उमटून गेले. ती भावना नेमकी काय होती राहुलला समजली नाही. पण कधी एकदा सोहम घरी येतोय असं राहुलला झालं होतं. त्याने स्वतःला सावरलं. घरी येताना त्याने कचोरी, नारळाची बर्फी, फरसाण असा बराच खाऊ आणला.
आज तुम्ही नारळाची बर्फी कशी आणलीत? साधनाने आश्चर्याने विचारलं. पण ह्यामागचं सयुक्तीक कारण राहुलला सुचलं नाही.
आज राहुल खूप बेचैन होता. कधी एकदा संध्याकाळी तो सोहम घरी येतोय असं त्याला झालं होतं. दुपारी त्याला व्यवस्थित झोप देखील लागली नाही. मग उगाच टीव्हीवर तो सर्फिंग करत राहिला.
सोहम साडेपाच पर्यंत येतो म्हणाला होता. मात्र त्याला राहुलच्या घरी पोचायला सव्वा सहा होऊन गेले.. सोहम मध्यम उंचीचा सावळ्या वर्णाचा तीस बत्तीस वय असलेला सुदृढ गृहस्थ दिसत होता. त्याच्या खांद्यावर छोटं बाळ आणि सोबत त्याची बायको असावी. त्याला पाहिल्यावर मिठी मारावी असं राहुलला खूप प्रकर्षाने वाटत होतं. पण असं वागणं बरं दिसलं नसतं. कसं बसं स्वतःला सावरत राहुलने त्यांना घरात घेतलं.
आमचं बाळ झोपलं होतं म्हणून यायला थोडा उशीर झाला सॉरी. सोहमची बायको साधनाला म्हणाली.
असू दे गं, साधनाने त्यांच्या हातात पाण्याचे ग्लास देत म्हटलं. मी घेऊ बाळाला? साधनाने विचारलं.
हो घ्या ना. मुलगी आहे, परी नाव ठेवलं आहे आम्ही. साधनाजवळ बाळाला देत आशा बोलली.
सोहम आणि आशानी घर पाहून घेतलं. त्यांना ते आवडलं असावं. पुढील बोलणी तुम्ही माझ्या काकांबरोबर करून घ्या. राहुलने सुचवलं.
तोवर साधना प्लेट मध्ये कचोरी, फरसाण, नारळाची बर्फी आणि चहा घेऊन आली.
अहो ह्याची काय गरज होती? आशा संकोचत होती. तोवर सोहमने बर्फी खायला सुरुवात केली.
काकू थँक यु, नारळबर्फी माझा वीक पॉईंट आहे. साधनाने एकवार राहुलकडे बघितलं. पण त्याच्याकडे कसलंच जस्टीफिकेशन नव्हतं.
काहीच वेळात सोहम जायला निघाला. त्याने अजून थोडं थांबावं असं राहुलला वाटत होतं. पण कुठल्या हक्काने त्याला थांब म्हणायचं कळत नव्हतं.
दोघे जायला निघाले. पण घराबाहेर पडण्याअगोदर सोहम परत वळला. काका मी तुमच्या पाया पडलं तर चालेल का? त्याने थोडं घाबरत विचारलं.
हो, पण काय झालं अचानक? राहुलने विचारलं.
काका मला आई वडील नाहीत. मी अनाथआश्रमात लहानाचा मोठा झालो. सोहम बोलू लागला. शाळेत ऍडमिशन घेताना फॉर्मवर चुकीचा मोबाईल नंबर लिहिला गेला होता. अर्थात मी लहान असल्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. पण शाळेतून कधी कुठल्या गोष्टीसाठी कॉल केला गेला तर त्याच नंबरवर जात असे. सुरुवातीला समोरचा माणूस रॉंग नंबर म्हणून कॉल कट करत असे. पण नंतर नंतर तो माणूस फोनवर माझे बाबा म्हणून उत्तर देऊ लागला.
हे सगळं ऐकताना राहुलला खूप अस्वस्थ वाटत होतं.
खोटं का असेना पण आपल्याला बाबा आहे ह्या गोष्टीचं मला खूप अप्रूप वाटू लागलं होतं. थोडी समज आल्यावर मी जाणूनबुजून सर्व ठिकाणी तो नंबर देऊ लागलो. आपलं माणूस म्हणून कोणी अज्ञात व्यक्ती फोनला रिप्लाय करते हेच मला उभारी देत होतं. काल त्या ब्रोकरकडून तुमचा नंबर मिळाला. तुमचा नंबर मी लगेच ओळखला. विसरेन कसा म्हणा हा नंबर? आजवर कित्येक ठिकाणी मी हा नंबर दिलेला आहे. सोहम बोलता बोलता थांबला. आशाने त्याचा हात घट्ट धरून ठेवला.
एकदा वाटलं इतक्या वर्षात आपण ह्या नंबरवाल्या माणसाला शोधलं नाही मग आता तरी का भेटायचं? पण नंतर वाटलं कदाचित हा नियतीचाच संकेत असेल म्हणून तुम्हाला आवर्जून भेटायला आलो. तुमची क्षमा मागायची होती. मला माफ करा काका. माझ्यामुळे तुम्हाला नाहक त्रास झाला. बोलता बोलता सोहमचा स्वर कातर झाला.
थोडा वेळ कुणी काहीच बोललं नाही. राहुलला वाटत होतं उठून सोहमला घट्ट मिठीत घ्यावं. त्याला सांगावं की माफी काय मागतोय? उलट तुझा खोटा बाबा बनून मलाच किती तरी सुख लाभलं आहे. आता नशिबाने भेटलोच आहोत तर एकत्र राहू. पण ह्यातला एक शब्दही राहुलला बोलायला जमलं नाही. सगळेच शांत बसून होते.
काहीच वेळात सोहम आणि आशा निघाले. राहुलने परीला जवळ घेतलं. सोहमला कुशीत घेतल्याचं समाधान त्याला जाणवलं.
सोहम आणि आशा निघून गेले. साधनाला काय बोलावं कळेना. सगळं काही अलबेल आहे दाखवण्यासाठी राहुल पेपर उघडून बसला. पण एकही अक्षर डोक्यात शिरत नव्हतं. ह्या क्षणी त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, ह्या घरात आपण जवळ जवळ पंधरा वर्ष राहिलो. आता हे घर सोडून जायचं. ह्या घराशी बऱ्याच कडू गोड आठवणी जोडल्या आहेत. घर सोडणं जीवावर येत होतं.
पण उद्या सोहम इथे राहायला आलाच तर आपल्या पुढल्या पिढीकडे हे घर सुपूर्द केलं असं म्हणू शकतो ना आपण? नुसत्या विचाराने राहुलच्या मनावरील मळभ दूर झालं.
(सत्य घटनेवर आधारित)
धन्यवाद
राजेंद्र भट
©®
८ सप्टेंबर २०२६
