#माझे_कल्पनाविश्व

#Flat_No_1303
लेखक :- मोहन नारायण गवंडे
कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अबाधित आहेत कोणीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये.
गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी उभा असलेला एक प्रचंड Residential Complex—उंचच उंच इमारती, सतत चालणारी लोकांची वर्दळ, दिवसभर गोंगाट आणि रात्रीही न झोपणारे जीवन. बाहेरून पाहताना सगळं अगदी सामान्य वाटायचं. पण त्या कॉम्प्लेक्सच्या E Wing मध्ये एक असा कोपरा होता, जिथे अंधाराने आपलं घर केलं होतं…
१३ वा मजला. रूम नंबर १३०३.
या फ्लॅटचं नाव कुणी मोठ्याने घेत नसे. पण प्रत्येक रहिवाशाच्या मनात त्याची भीती खोलवर बसलेली होती. हा फ्लॅट “Haunted” आहे, ही गोष्ट सगळ्यांना माहिती होती… पण कोणीच त्याबद्दल उघड बोलत नव्हतं.
पहिल्यांदा जे लोक त्या फ्लॅटमध्ये राहायला आले, ते फक्त चार दिवसांतच घर सोडून गेले. त्यांनी सांगितलं—रात्री २ वाजता कुणीतरी घरात चालत असल्याचा आवाज येतो. दरवाजे आपोआप उघडतात, आणि आरशात स्वतःशिवाय अजून कुणीतरी दिसतं. त्यांनी हे सांगितलं, पण कोणी त्यावर विश्वास ठेवला नाही… जोपर्यंत पुढचं कुटुंब तिथे आलं नाही.
दुसऱ्या कुटुंबाने तर काहीही न सांगता एका रात्रीत फ्लॅट रिकामा केला. त्यांनी त्यांच्या वस्तू सुद्धा तशाच सोडून दिल्या. त्या दिवसानंतर फ्लॅट ३०३ कायमचा बंद राहिला…
पण बंद दरवाज्यांमागे जे काही होत होतं, त्याचे परिणाम आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांवर दिसायला लागले.
फ्लॅट १२०३ मधील कुलकर्णी कुटुंब—त्यांना दररोज रात्री छतावरून ठकठक आवाज यायचा, जणू कुणीतरी जोरात चालत आहे. एकदा त्यांनी वर जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, पण १३ व्या मजल्यावर पोहोचल्यावर अचानक लिफ्ट बंद पडली. कॉरिडॉरमध्ये अंधार पसरला… आणि त्यांना स्पष्टपणे कुणीतरी श्वास घेत असल्याचा आवाज ऐकू आला.
फ्लॅट १३०४ मधील एक लहान मुलगा—तो नेहमी म्हणायचा, “आई, त्या बंद फ्लॅटमध्ये एक बाई आहे… ती मला बघते.” सुरुवातीला सगळ्यांनी त्याला दुर्लक्ष केलं. पण एक रात्री त्याने जे सांगितलं, ते ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला—
“ती बाई आता आपल्या घरात आली आहे… ती माझ्या बेडच्या बाजूला उभी आहे.”
त्या रात्रीपासून त्या मुलाचं वागणं पूर्ण बदललं.
कॉम्प्लेक्समधील सिक्युरिटी गार्ड्सनी देखील काही विचित्र गोष्टी पाहिल्या. CCTV फुटेज मध्ये अनेकदा १३ व्या मजल्यावर हालचाल दिसायची—एक सावली, जी कॉरिडॉरमध्ये फिरत असायची. पण प्रत्यक्षात तिथे कोणीच नसायचं. एकदा तर कॅमेरामध्ये स्पष्ट दिसलं—फ्लॅट १३०३ चा दरवाजा हळूहळू उघडतोय… आणि पुन्हा स्वतःच बंद होतोय.
रात्री २:१३ वाजता, E Wing च्या १३ व्या मजल्यावर एक विचित्र शांतता पसरते. जणू वेळ थांबलेला असतो. त्या वेळी जर कुणी तिथे गेलं, तर त्यांना थंड वाऱ्याची झुळूक जाणवते… आणि एक हलका कुजबुजण्याचा आवाज—
जणू कुणीतरी हळू आवाजात बोलतंय… पण शब्द समजत नाहीत.
आजही तो फ्लॅट तसाच बंद आहे.
कोणी तिथे राहायला येत नाही. कोणी त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करत नाही.
पण तरीही…
कधी कधी, रात्री उशिरा, त्या कॉम्प्लेक्सच्या अंगणातून वर पाहिलं तर—
१३ व्या मजल्यावरील रूम नंबर १३०३ मध्ये एक दिवा लुकलुकताना दिसतो…
आणि खिडकीत—
कोणीतरी उभं असतं.