“कर्माचा वरवंटा” (एक सामाजिक कर्म कथा)
मुंबईसारख्या चमचमत्या दुनियेत वावरताना अनुभवास आलेला एक सत्य प्रसंग मला सामाजिक जाणीव म्हणून तुमच्या सर्वांच्या दृष्टिक्षेपात लेख रूपात मांडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे.
“करोना काळानंतर माझ्या बिझनेस मधील अपडाउन्स मुळे मुंबईत मी नुकतच एका प्रोजेक्ट साइट वर MEP ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कामावर रुजू झालो होत. तसेच माझ्या दुसऱ्या एका साइटवर माझ्यासोबत दक्षिण कोकणातील एक मुलगा साइट इंजिनिअर म्हणून कार्यरत होता, थोडा शांत पण बरेचदा विचित्र वागायचा.
तर सदर विषय असा होता की तो प्रत्येक महिन्याला दोन - तीन दिवस सुट्टी घेऊन न चुकता गावी जायचा ज्यामुळे बरेचदा इमर्जेन्सी कामाच्यावेळी अनुपस्थित असल्याने शिफ्ट शेड्युल बिघडून गैरसोयी होतं त्यामुळे सततच्या साइट स्टाफ आणि मॅनेजमेंट तक्रारी नुसार ऑपरेशन्स लीड म्हणून हे प्रकरण माझ्याकडे निराकरण करण्यासाठी आलेलं.
तसेच, त्याला साइट ट्रान्स्फर करण्यासाठी मलाही वरून प्रेशर होत. त्यामुळे, पार्ट ऑफ इन्व्हिस्टिगेशन मी साइट स्टाफ सोबत यासंदर्भात चर्चा केल्यावर मला त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली तसेच त्याची मागील काही महिन्यांपासून ची अटेंडन्स रजिस्टर कॅलेंडर सोबत सिक्वेन्स चेक केले तेव्हा काही धागेदोरे सदर विषयाबद्दल निष्कर्षाप्रत पोहोचण्यास मदत झाली. जे तो प्रत्येक अमावस्येला न चुकता गावी जावून करत असे.
म्हणून त्या अनुषंगाने विषय गांभीर्य ओळखून तसेच, कोकणातील या अनिष्ट प्रथा विषयी माहिती असल्यामुळे त्यानुसार त्याला बाजूला घेऊन मी सदर विषयाबद्दल आपल्या कोकणातील मुलगा म्हणून स्नेह-भावणेने स्पष्टच विचारलं.
परंतु माझ्या अशा सरळ विचारण्यानं तो थोडा गोंधळला, पण माझ्या स्वभाव गुणा नुसार विश्वासात घेतल्यावर त्याने आपली कर्म-कहानी मला सांगायला सुरुवात केली.
विजय नाव त्याचं कुटुंब पूर्वी खूप गरीब परिस्थितीत होतं. घरात सतत आजारपण, आर्थिक अडचणी आणि तणाव होते. त्यामुळे त्या काळात वडिलांच्या मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी काही उग्र (कोकणात त्याला चेटूक, बाईंग, चाळा, अबाईत कलमदारी या स्वरूपात भजतात) श्रद्धेशी जोडलेले विधी आणि काही खास प्रथा सुरू केल्या. अमावस्येला विशिष्ट पूजापाठ आणि काही “मान देण्याचे” प्रकार घरात सुरू झाले.
काही वर्षांनी परिस्थिती सुधारू लागली. आर्थिक स्थैर्य आलं, घरात प्रगती दिसू लागली. सर्व नातेवाईक त्यांच्या शब्दांमध्ये हा मिळवत त्यांच्या अनिष्ट गोष्टीमध्ये साथ देऊ लागले. जस की तो म्हणेल ती पूर्व दिशा त्यामुळे त्या प्रथांवर घराचा विश्वास वाढत गेला.
खूप पैसा मान सन्मान मिळत गेला अस बरीच वर्ष चालल वडील वार्धक्याकडे झुकत चाललेले. त्यांच्या वडिलांच्या वडिलांचा या सर्व गोष्टीना नकार असतानाही स्व:महत्वकांशेने क्षणिक सुखासाठी ते त्यांच्या बोलण्याला न जुमानता आपली नीतिमत्ता विसरत चाललेले.
पुढे काही वर्षांनी आजोबांचा निधन झालं, विजय मोठा झाला, शिकून इंजिनिअर झाला आणि मुंबईत नोकरीला लागला. पण हळूहळू घरात जुन्या श्रद्धा आणि आधुनिक विचार यात तणाव निर्माण होऊ लागला. कुटुंबात मतभेद वाढले.
आणि आता खऱ्या अर्थाने दुसऱ्या पिढीचा कर्म -भोग सुरू झाला. पुढे काही वैयक्तिक अडचणीही सुरू झाल्या. लग्नानंतरही अपेक्षित स्थैर्य मिळालं नाही.लग्न झाली परंतु दोन्ही भावंडांना संतान प्राप्ती नव्हती. पत्नी प्रेग्नंट राहायची परंतु 2/3 महिन्यात गर्भस्तलन होऊ लागलं.
कुटुंबात मानसिक तणाव वाढत गेला. हळूहळू घरातील वातावरण अधिक कठीण होत गेलं. आई-वडिलांचे निधन झाले, आणि कुटुंब विखुरले गेले. मोठा भाऊ वेडा झाला आणि आणि दुर्दैवाने आताच फेब्रुवारी मध्ये विजयच ही अपघाती निधन झालं.
या सगळ्या घटनांकडे दोन सामाजिक मतप्रवाह असू शकतात, एक विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहता एक श्रद्धेचा दृष्टिकोन, जिथे लोक काही घटनांना अध्यात्मिक कारणांशी जोडतात.
दुसरा म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन, जिथे अशा परिस्थिती मागे मानसिक तणाव, आर्थिक दबाव, आरोग्य समस्या, कौटुंबिक संघर्ष आणि जीवनातील अनिश्चितता ही कारणं असू शकतात.
परंतु माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासातून आणि अशा विविध सामाजिक प्रसंगातून एक गोष्ट सुनिश्चित होते जेव्हा माणूस अडचणीत असतो, तेव्हा तो कोणत्याही परिणामांची पर्वा न करता या रीतीने शॉर्टकट शोधतो.
काही वेळा तो उपाय श्रद्धेच्या रूपात असतो, पण तोच उपाय जर काळया अंधविश्वासात बदलला, तर तो त्रासदायक ठरू शकतो.
म्हणून माझा या लेखामागचा उद्देश एवढाच आहे की,गौड सारस्वतानी आकार दिलेल्या या कुळाचार रुपी शक्तीसोबत एकरूप होऊन त्यावेळची आपल्या भागातील 12/5 राठी पद्धती रचना नीट महत्त्व समजून घ्या जी आपल्याला इतर देवतां पेक्षा जलद फलप्राप्ती देते.
उगाचच स्मशान कांड, पंचाक्षरी, बंगाली काळया विद्येच्या तामसी पटलावर अजाणतेपणे उद्ध्वस्त होऊ नका.
तसेच, कोणत्याही उग्र-शक्तीच्या तामसी आहारी जावून आपण आपल्या कुलदेवता, ग्रामदेवता आणि सात्विक परंपरा नाकारून विवेक सोडू नका.
जसे की कोणत्याही भीतीवर आधारित किंवा गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टींच्या मागे न लागता विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण जे आज तुमची भरभराट करत ते उद्या तुमचं वंश वृध्दी खुंटून संपुष्टान देखील करत.
त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक जीवनात वावरताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मान-सन्मान,धन -संपत्ती महत्त्वाची आहेच, पण त्यासोबत समज, शांतता आणि वास्तव समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे.
कारण काही निर्णय फक्त आपलं आजचं जीवन बदलत नाहीत, तर पुढच्या पिढ्यांच्या भविष्यावर ही परिणाम करतात.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अडचणीत असलेल्या माणसाला दोष न देता त्याला समजून घेणं, आधार देणं आणि योग्य मार्ग दाखवणं हीच खरी माणुसकी आहे.
हा लेख-प्रपंच मी फक्त सध्या कोकणातील काही भागात दिसून येणाऱ्या सामाजिक पटलावर बदलत्या, स्वार्थी आणि अति-महत्त्वाकांक्षी कौटुंबिक, व्यक्ति-सापेक्ष दृष्ट प्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी आणि त्यातून सकारात्मक बोध मिळावा या उद्देशाने लिहिला आहे.
यामागे माझा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाही.
तर सामाजिक परिस्थिती आणि व्यक्ती अनुभवातून मिळालेल्या नकारात्मक परिणामांचे विश्लेषण दर्शविन्याचा आहे.
जर कुणाला या कथेत स्वतःचे प्रतिबिंब दिसल असेल, तर त्यांनी वाईट वाटुन घेऊन दोष शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे विजय सारख वाईट दृष्टचक्रात न गुरफटता यातून सकारात्मक मार्ग काढून स्वतःसोबत कुटुंबियांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येतील.

