©® लेखक: रूद्रदमन8265077252
राजेशने आपल्या शिक्षणासाठी...
गावातील परिचित मातीचा सुगंध मागे सोडून... दूर शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच्या आयुष्यातील हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा नव्हता, तर ते त्याच्या स्वप्नांच्या, भविष्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे, शिक्षणासाठी अवास्तव खर्च करणे त्याला परवडणारे नव्हते.
शहरात पोहोचताच त्याने कॉलेजमधील प्रवेशाचे सोपस्कार कसेबसे उरकून घेतले. दुपारनंतर, डोक्यावर वाढत जाणाऱ्या चिंतेच्या भारासह तो निवाऱ्याच्या शोधात बाहेर पडला. आज त्याला राहण्यासाठी रूम शोधून पुन्हा गावी जाऊन सामान आणायचे होते. पण शहराच्या या गर्दीत... बराच वेळ पायपीट केल्यानंतर परवडणारी जागा शोधणे हे त्याला एखाद्या महादिव्यासारखे वाटू लागले...
“कुठे कुठे फिरून आलो मी? या सिमेंटच्या जंगलात मला कधी रूम मिळेल की नाही?”
शहराच्या अरुंद, गोंगाटलेल्या गल्ल्या पायाखाली पालथ्या घालताना त्याने स्वतःशीच हताशपणे विचार केला..
संध्याकाळची गडद सावली आता शहरावर पसरू लागली होती... दिवस मावळत होता आणि आकाशात केशरी-लाल रंगाची एक उदास छटा उमटली होती...
तो शहराच्या एका जुन्या, विस्मृतीत गेलेल्या भागामध्ये पोहोचला...
तिथे एका अंधाऱ्या कोपऱ्यात असलेल्या दुकानात चौकशी केल्यावर, दुकानदाराने जीर्ण झालेल्या इमारतींच्या दिशेने बोट दाखवत सांगितले की, "पुढील गल्लीत काही ठिकाणी कमी भाड्यात खोल्या मिळू शकतात."
राजेश एका बारीक आशेच्या किरणासह सांगितलेल्या दिशेने निघाला...
आजूबाजूला नजर फिरवत तो पुढे सरकत होता. तिथल्या बऱ्याच इमारती पडझड झालेल्या होत्या, त्यांची खिळखिळी अवस्था पाहून त्या कधीही कोसळतील असे वाटत होते. काही इमारती तर जवळपास निर्मनुष्यच होत्या, त्यांची दारे आणि खिडक्या तुटून आतून काळोख डोकावत होता... पण काही ठिकाणी अजूनही जीवनाची अस्पष्ट हालचाल दिसत होती. तो एक-एक करून प्रत्येक इमारतीत गेला आणि विचारपूस करू लागला...
“भाऊ, इथे कमी भाड्यात रूम आहे का?” प्रत्येक जीर्ण दरवाजासमोर उभे राहून त्याचा हा प्रश्न ठरलेला होता...
“नाही रे बाबा, इथे एकही रूम नाही. ऑलरेडी दिलेल्या आहेत,” आणि हे उत्तरही तितकेच ठरलेले होते.
प्रत्येक नाही सोबत त्याची आशा अधिकच धुळीस मिळत होती...
राजेश निराश झाला...
"खरंच, मला आज रूम मिळणार नाही का?" त्याच्या मनात भीती आणि चिंतेचा कल्लोळ माजला...
दिवस पूर्णपणे मावळला होता, रस्त्यावरचे दिवे परिसरात अंधुक पिवळा प्रकाश टाकत होते... त्याला लवकरात लवकर रूम शोधणे गरजेचे होते, कारण गावी जायची शेवटची गाडी नऊ वाजता होती. त्या आत जर आवरले, तरच त्याला गावी जाऊन उद्या त्याला सामान आणून कॉलेज सुरू करता येणार होते...
विचारांच्या तंद्रीत चालत असताना थोड्याच अंतरावर... त्याची नजर एका जुन्या, पण दिमाखदार वाड्याकडे गेली...
त्याचा भव्य आकार आणि कलाकुसर डोळ्यांत भरत होती. वाड्यावर लावलेल्या अनेक दिव्यांमुळे तो दूरूनच चमकत होता, जणू काही तो आपली जुनी शान अजूनही मिरवत होता...
त्याच्या मनात एक क्षीण आशा चमकली. त्याने हिम्मत करून दारावर टकटक केली...
थोड्या वेळाने... एक वृद्ध माणूस दार उघडून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक अविश्वासाचा भाव होता, जणू त्याला इतक्या रात्री कुणीतरी येणार याची अपेक्षा नव्हती...
“इथे रूम मिळेल का?” राजेशने उत्सुकतेने विचारले...
“तुला रूम पाहिजे?” वृद्धाने त्याच्याकडे संशयाने पाहत विचारले...
“हो... छोटीशी असली तरी चालेल. फक्त रेंट कमी असावा," राजेशने त्याची अडचण नम्रपणे सांगितली.
"ठीक आहे, आहे एक रूम आमच्याकडे. आणि भाड्याचे म्हणशील तर तुला परवडेल ते दे. चल, मी तुला दाखवतो," वृद्धाने सांगितले आणि ते राजेशला आत येण्याची खूण करत, वाड्याच्या मागच्या भागाकडे निघाले...
वाड्यात प्रवेश केल्यानंतर राजेश सगळीकडे निरखून बघत त्या वृद्धामागे जात होता. वाडा खूप जुन्या घडणीतील होता. त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात ऐतिहासिक खुणा दिसत होत्या.... आतल्या सजावटीच्या सर्व वस्तू कित्येक शतकांपासून तिथेच असाव्यात असे वाटत होते... पण तरीही त्यांची सुंदरता आणि आकर्षकता कमी झालेली नव्हती... त्या पुरातन सौंदर्याची मोहिनी जणू राजेशला पडली होती... तो पुढे जात असताना त्याची नजर भिंतीवर लटकवलेल्या एका मोठ्या पेंटिंगकडे गेली... ती एका अति सुंदर स्त्री-पुरुषाच्या जोड्याची होती... स्त्रीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तिचे डोळे खूपच आकर्षक होते... जणू त्यात एक वेगळीच ओढ होती... दोन मिनिटे राजेश त्या डोळ्यांमध्ये हरवून तिथेच थबकला... वृद्धाच्या खोखल्याच्या आवाजाने त्याची मोहिनी तुटली... वृद्धाने आपले मन ओळखले की काय असे वाटून तो ओशाळला आणि त्यांच्या मागे चालू लागला...
वाड्याच्या सर्वात शेवटच्या भागात, उजव्या हाताला एका दरवाजाकडे बोट दाखवत वृद्धाने राजेशला आत जाऊन खोली बघायला सांगितली...
राजेशने खोली पाहिली... ती छोटी होती, पण स्वच्छ आणि व्यवस्थित होती. भिंतीला लागून एक जुन्या पद्धतीचा सागवानी पलंग होता, त्यावर पांढरे शुभ्र बेडशीट अंथरलेली गादी होती. पांघरण्यासाठी छान मऊमऊ लाल रंगाची रग होती. जसे काही ती खोली त्याला लगेच झोपण्यासाठीच सज्ज केलेली होती. आतल्या आत एका कोपऱ्यात अंघोळीसाठी मोरी होती आणि पाण्याची सोयही दिसत होती. त्याने तातडीने तीच खोली घेण्याचा निर्णय घेतला...
त्या वृद्धासोबत बाहेर येत, त्याने भाडे ठरवून घेतले. आणि मी उद्या सकाळी सामान घेऊन राहायला येतो असे सांगून, खोली बुक करण्यासाठी वृद्धा नाही म्हणत असतानाही थोडीफार पगडी देऊन तो वाड्यातून निघाला...
वाड्याच्या बाहेर रस्त्यावर आल्यावर त्याने एकदा मागे वळून पाहिले... तो वृद्ध त्याच्याकडे बघत हसत हसत दरवाजा बंद करत होता. तो जाण्यासाठी वळला... वळताना त्याची नजर वाड्याच्या वरच्या बाजूच्या खिडकीत गेली... तिथे एक अति सुंदर स्त्री, सफेद साडी घालून त्याच्याकडेच बघत उभी होती...
राजेश ने डोळे बारीक करून तिचे निरीक्षण केले.. तेच डोळे, तेच मोहित करणारे रूप... ती त्या फोटो मध्ये असलेली स्त्री असल्याचे त्याच्या लगेच लक्षात आले.. पण आता तिने सफेद साडी परिधान केलेली होती...
तिचे ते रूप फोटोतील तिचा नवरा मरण पावला आहे हेच सूचित करत होता... ती स्त्री हळूच आतल्या बाजूला वळली... आणि परत एकदा तिच्या रूपाची मोहिनी पडलेला राजेश भानावर आला...
"अरे, साडे नऊ झालेत!" मन थाऱ्यावर आल्यावर घड्याळात बघत तो स्वतःशीच पुटपुटला...
"आता कुठून गावी जायला गाडी मिळणार?",
असा विचार करत तो तिथेच वाड्याकडे बघत उभा राहिला...
"आज इथेच थांबायचे का? तसे पण आपण पगडी आजच दिली आहे म्हणजे आपण रीतसर भाडेकरू झालोच आहोत या वाड्याचे," मनाची समजूत घालत तो स्वतःशीच बोलत होता...
नक्की कारण काय होते, काय माहीत... त्याला जर गावी जायचेच असते, तर कोणत्याही गाड्यांना लिफ्ट मागत तो थेट गावाच्या जवळ पोहोचू शकला असता... पण कदाचित मघाशी खिडकीतून झालेली ती नजरानजर... त्या नजरेने कदाचित त्याला मोहिनी घातली होती...
त्याने थांबण्याचा निर्णय पक्का केला आणि पुन्हा वाड्याच्या दरवाजाकडे निघाला...
दारावर टक टक करणार तोच एका क्षणात दरवाजा उघडला... जसे काही उघडणाऱ्याला माहीत असावे की आता कोणीतरी येणार आहे...
समोर तीच अति सुंदर, हा शब्दही तोकडा पडावा असे रूप असलेली लावण्यवती सफेद साडीमध्ये उभी होती... तिचे ते निळेशार डोळे त्याच्या मनाचा वेध घेत होते... ती मंद हसत होती. “या, आत या,” तिने नम्रतेने म्हटले. तो परत भानावर आला...
"काय होते आहे आपल्याला आज? आज पहिल्यांदाच एका स्त्रीला बघितल्यावर आपण असे सैरभैर का होतोय?" स्वतःलाच प्रश्न विचारत त्याने त्या वाड्यात पाऊल टाकले...
हॉलमध्ये असलेल्या आलिशान सोफ्यावर ते वृद्ध गृहस्थ बसले होते... त्यांना आपली अडचण सांगून राजेशने आजपासूनच खोली ताब्यात देण्याची विनंती केली... बोलत असताना, त्या वृद्धाच्या चेहऱ्यातील आणि त्या फोटोतील तरुणाच्या चेहऱ्यातील साम्यावरून त्याला समजले की ते या स्त्रीचे सासरे आहेत...
त्यांनी त्या स्त्रीकडे एक नजर टाकली...
तिने मानेनेच होकार दर्शविला...
तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता....
राजेश कडे वळत त्यांनी त्याला परवानगी दिली आणि खोलीची चावी त्याच्या हातावर ठेवली...
त्या स्त्रीकडे एक कटाक्ष टाकत राजेश खोलीकडे गेला... कुलूप उघडताना ते किती जुने असावे याचा अंदाजच लागत नव्हता... त्यावर खूपच सुरेख आकृत्यांचे कोरीव काम केलेले होते, पण त्या कसल्या आकृत्या आहेत याचा राजेशला काहीही संदर्भ लागत नव्हता...
तो रूममध्ये आला, लाईट लावली आणि थोडी साफसफाई केली. नंतर बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावे म्हणून निघाला... हॉलमध्ये ती स्त्री बसलेली होती... ते वृद्ध आजूबाजूला कुठेही दिसत नव्हते... तिला जेवण करून येतो असे सांगून बाहेर जाण्यास निघाला...
"या वेळी या भागात कुठे जेवण भेटणार नाही, तुम्हाला काही अडचण नसेल तर घरात थोडेफार जेवण आहे... इथेच जेवा, मी वाढून आणते." ती बोलली..
काय तो मधुर आवाज...
राजेश त्या आवाजातील गोडव्याने भारावून गेला...
नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता...
तो तिथेच जेवला.. भाजी म्हणून रस्सा शिल्लक होता फक्त... कोणत्या भाजीचा होता माहीत नाही, पण खाताना सुद्धा त्याच्या तोंडातून पाणी गळत होते...
जेवताना ती समोरच असावी अशी भावना मनात उफाळून येत होती... एक मन त्याला हे चूक असल्याचे सांगत होते, पण तिच्या रूपाची मोहिनी त्याला तिच्याकडे वारंवार आकृष्ट करत होती... कसेबसे मनावर ताबा मिळवून त्याने जेवण उरकले आणि रूममध्ये आला...
मऊशार गादीवर त्याने अंग टाकले... त्याचे मन मात्र तिच्या अवती भोवतीच फिरत होते. तिची सुवर्णकाया, रेखीव शरीर त्याला स्वस्थ झोप येऊ देत नव्हते... बराच वेळ तळमळत पडल्यानंतर त्याला झोप लागली...
स्वप्नातही तीच स्त्री त्याच्या आजूबाजूला रुंजी घालत होती...
रात्री अचानक काही आवाजांनी त्याची झोप मोडली...
बघत असलेल्या मधुर स्वप्नातून त्याला बाहेर यायचे नव्हते म्हणून तो आवाजाकडे दुर्लक्ष करत तसाच डोळे बंद करून पडून राहिला... पण स्वप्न एकदा भंगले की पुन्हा त्याची सांगड घालता येत नाही हे त्याला माहीत नव्हते...
सर्वत्र भयाण शांतता पसरलेली होती... त्यात तो आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला...
एखादे श्वापद जिभल्या चाटत असताना जसा आवाज येतो, तसा तो आवाज होता... त्याला नक्की काय होते आहे हे कळेना...
काहीतरी भास आहे म्हणून त्याने उशी कानावर दाबून परत झोपण्याचा प्रयत्न केला... पण तो आवाज अजूनही येत होता.
त्याने डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर एक पाल कर्रकुईई आवाज करत वरच्या दिशेने सरपटत नाहीशी झाली...
कटाक्षात काहीतरी वेगळे जाणवले म्हणून त्याने नजर हळूहळू खाली आणली...
समोरील दृश्य बघून त्याचे डोळे खाडकन उघडले!
ती पांढऱ्या साडीतली स्त्री मोरीमध्ये बसली होती. तिचे निळेशार डोळे आता गारगोटीसारखे झाले होते... त्या गारगोटीमध्ये एक काळी उभी रेघ इकडे तिकडे हालत होती...
रक्तासारखी लाल, लांब आणि पुढे टोक निघालेली जीभ ओठांवर फिरवत, ती त्याच्याकडेच बघत जिभल्या चाटत होती...
तिचा चेहरा पूर्वीसारखा मनमोहक नव्हता... त्यावर भीतीदायक सुरकुत्या होत्या... जसे काही तिची त्वचा आत मांसच नसल्यासारखी लटकत होती...
घशातून एखाद्या भुकेल्या श्वापदा सारखा घुर्रर्र घुर्रर्र आवाज येत होता...
आजूबाजूची खोली बरळण्याच्या आणि हेल काढून रडण्याच्या अस्पष्ट आवाजांनी व्यापून टाकली होती!
“क... कोण आहेस तू? काय चालले आहे इथे?” राजेश घाबरून विचारत म्हणाला आणि त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात त्याचे लक्ष पलंगाच्या कडेला उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडे गेले...
मघाशी सर्वसामान्य दिसणाऱ्या वृद्धाचे शरीर आता लिबलिबीत झालेले होते, वर्ण काळवंडला होता, शरीरावर ठीक ठिकाणी काळे पांढरे केस वर आले होते... पलंगाशेजारीच उभा असल्यामुळे त्याच्या त्वचेतून येणारा उग्र दर्प राजेशला सहन होत नव्हता...
“हे काय चालले आहे?” त्याने भीतीने विचारले.
वृद्धाचा चेहरा आता भयंकर दिसत होता...
“तू आलास... खूप आनंद झाला... खूप दिवसापासून कोणी या बाजूला फिरकतच नाही," सुरकुतलेले, आक्रसलेले ओठ हलवत वृद्धाने म्हटले...
त्याचा आवाज चिरकत होता, जणू गळ्यात असलेल्या हजारो वर्ष जुन्या पडद्यातून येत असल्यासारखा...
राजेश कडे क्रूर, भेदक, पाशवी नजरेने बघत दोघेही हळूहळू जवळ येऊ लागले....
ते बघून निखशिकांत घाबरलेला राजेश मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला... तोच मागे टेकण्यासाठी असलेली पलंगाची फळी त्याच्या पाठीला लागली...
राजेशकडे समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता... पण समोर, दोन्ही दिशांना ते दोघे होते... तो कधी तिच्याकडे तर कधी त्याच्याकडे भीतीने भरलेली नजर टाकत होता.
एकदम सर्व वातावरण स्तब्ध झाले होते.....
ते दृश्य पाहून नखशिकांत हादरलेला राजेश भीतीने मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला.... मागे सरकता सरकता पलंगाची ती लाकडी फळी त्याच्या पाठीला लागली... आता समोर जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता... त्याच्यासमोर दोन्ही बाजूंनी ते दोघे उभे होते... तो कधी त्या स्त्रीकडे, तर कधी त्या वृद्धाकडे भयाण नजरेने पाहत होता... अचानक तिथले संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले...
त्या वृद्ध व्यक्तीने स्त्रीकडे पाहत तिला आधी जाण्याचा इशारा केला, तेव्हा ती स्त्री आपल्या कर्कश आणि भयानक आवाजात म्हणाली होती की, "नाही, आधी तू जा. तुला याची जास्त गरज आहे. कित्येक दिवसांनी आज तुला जिवंत शिकार मिळाली आहे... जा!"
तिचे ते शब्द ऐकून तो वृद्ध माणूस पुढे सरसावला...
त्याच्या तोंडातून आता दोन टोकदार सुळे बाहेर आले....
राजेश थरथर कापत त्या वृद्धाकडे पाहत होता...
राजेशला स्वतःचा अंत समोर स्पष्ट दिसू लागला होता.. त्याने किंचाळत डोळे मिटून घेतले... मरताना सुद्धा त्या भयानक चेहऱ्याकडे पाहण्याची हिंमत त्याच्यात उरली नव्हती...
तेवढ्यात त्याला मानेजवळ कोणाच्या तरी गरम श्वासांची जाणीव झाली होती... सडलेल्या मांसाच्या उग्र दुर्गंधीने त्याला मळमळून येऊ लागले....
त्या वृद्धाने राजेशच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि आपले ओठ त्याच्या मानेकडे नेले.... राजेश स्वतःला सोडवण्यासाठी धडपडत होता, पण त्या वृद्ध शरीरातील अमानवी शक्तीपुढे त्याची ती धडपड व्यर्थ ठरत होती...
जिभेने ओठांना चाटत त्याने सुळ्याची टोके राजेशच्या मानेवर टेकवली..
त्याच क्षणी अचानक विजेचा तीव्र झटका बसल्याप्रमाणे तो वृद्ध ओरडत चित्कारत बाजूला झाला.. त्याच्या डोळ्यात भीतीचे एक वादळ उठले होते... राजेश पासून जास्तीत जास्त दूर जाण्याच्या हेतूने त्याने खोलीचा एक कोपरा पकडला..
नक्की काय झाले हे पाहण्यासाठी राजेशने डोळे उघडले, तेव्हाच ती स्त्री त्या वृद्धाकडे अत्यंत रागाने पाहत राजेशवर झेपावली होती... पण जशी तिने ओठ राजेशच्या मानेवर टेकवले तशी ती सुद्धा त्याच वेदनेने ओरडत त्या वृद्धाला जाऊन बिलगली...
राजेशला काहीच समजत नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा ती सुंदर खोली आता एका जीर्ण आणि पडक्या खोलीत बदलली होती..
खोलीभर उंदीर इकडे-तिकडे धावत होते आणि मातीचे ढिगारे साचलेले होते...
तो पलंग सुद्धा विद्रूप झाला होता आणि त्यावरील गादी कित्येक वर्षांपासून न धुतल्यामुळे मेणचट आणि रक्ताच्या डागांनी भरलेली होती...
राजेशने तातडीने उठून उभा राहिला...
"हे नक्की काय आहे? ती खोली कुठे गेली आणि मी नक्की कुठे अडकलो आहे? ते मला का मारू शकले नाहीत?" असे अनेक प्रश्न त्याच्या मनात गोंधळ घालत होते. .
त्याने हात स्वतःच्या माने जवळ नेला तेव्हा त्याच्या हाताला लॉकेट लागले...
त्याला आठवले की शहरात येण्यापूर्वी त्याच्या आईने श्री गुरुदेव दत्ताच्या मंदिरातून आणलेले रक्षणकवच त्याच्या गळ्यात बांधले होते...
त्या भयावह संकटातून वाचण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचे त्याला उमगले होते....
त्याने मनोमन दत्तात्रेयांचे नाव घ्यायला सुरुवात केली..
ते दोघे पुन्हा हल्ला करण्याची तयारी करत आहेत हे ओळखून राजेशने आपली बॅग उचलली आणि तो जीवाच्या आकांताने बाहेरच्या दिशेला पळू लागला...
ते दोघेही भयानक किंचाळ्या फोडत त्याच्या मागे धावत होते..
पण मनात असून आणि सर्व शक्ती एकवटून पण ते दोन्ही पिशाच्च राजेश ला स्पर्श करू शकत नव्हते..
सर्व मानवी मर्यादा पणाला लावत राजेश कसाबसा त्या वाड्याच्या बाहेर रस्त्यापर्यंत पोहोचला..
त्याने मागे वळून पाहिले तेव्हा ते दोन भयानक पिशाच्च दरवाजाच्या आतून त्याच्याकडे रागाने पाहत गुरगुरत उभे होते...
काही वेळा पूर्वी रोषणाईने चमकणारा तो वाडा आता केवळ एक पडकी आणि भयानक वास्तू दिसत होता...
राजेश क्षणभरही न थांबता, श्री गुरुदेव दत्तांचा जयघोष करत तिथून वेगाने निघून गेला....
राजेश दिसेनासा होताच, त्या वाड्यामध्ये सावज निसटल्यामुळे ते दोन अतृप्त पिशाच्च विभत्स आवाज करत चित्कारत होते..
राजेश गेल्यानंतर थोड्याच वेळात तो वाडा पुन्हा एकदा आपले खरे रूप पालटून दिव्यांच्या रोषणाईत लखलखू लागला होता...
एका नवीन सावजाची वाट पाहत...
©® लेखक: रूद्रदमन
8265077252
(कथा वाचल्यावर कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या... तुमच्या कथारसिक मित्रांकडे कथा नक्की शेअर करा)

