उतारा..
©® लेखक: रूद्रदमन
8265077252
(कथेतील नावे आणि स्थळ काल्पनिक आहेत.. सार्धम्य आढळल्यास योगायोग समजावा..)
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका टोलेजंग इमारतीत राहणारे पिसाळ कुटुंब (अमोल आणि अनघा आणि दोन मुले ) तसे सुखात होते...
पण २१ ऑक्टोबरच्या त्या रात्री जे घडले त्याने त्यांच्या आयुष्यातील शांततेचा शेवट झाला आणि एका न संपणाऱ्या दहशतीचा थरार सुरू झाला...
रात्रीचे साधारण २.४० वाजले होते...
गाढ झोपेत असलेल्या अनघाला अचानक घराच्या पायऱ्यांवरून कोणीतरी जड पावलांनी वर येत असल्याचा आवाज आला...
टप... टप... टप... पावलांचा आवाज इतका स्पष्ट होता की जणू काही एखादा धिप्पाड माणूस पायऱ्या चढत आहे...
तिने बाजूला पाहिले, नवरा अमोल शांत झोपला होता...
अनघाला वाटले तिचा मोठा मुलगा सोहम पाणी पिण्यासाठी उठला असेल.. उठून तिने मुलांच्या खोलीत डोकावले, पण सोहम आणि धाकटा चिन्मय दोघेही गाढ झोपले होते...
कसला आवाज असेल हा विचार करत ती खाली आली..
घाबरत घाबरतच तिने हॉल आणि किचन पालथे घातले..
पण घर संपूर्ण रिकामे होते..
त्यांचा पाळलेला कुत्रा 'टायगर', हॉल च्या एका कोपऱ्यात किचन कडे बघत बसलेला होता..
तिने जवळ जात कुत्र्याला गोंजारले.. त्याच्या अंगाची होणारी थरथर तिच्या हाताला जाणवली..
"मग मघाशी पायऱ्यांवर कोण चालत होते आणि टायगर आज इतका थरथरत असेल?"
आजूबाजूला न्याहाळत तिने स्वतःला च प्रश्न विचारला..
मनात डोकावलेल्या प्रश्नांबरोबरच खोलीत विचित्र वास दरवळल्यासारखे तिला जाणवले.. तो वास तिला असह्य होत होता..
काहीतरी अघटित घडत आहे… या जाणिवेने अनघा थरथरू लागली होती... बोटे जड झाली होती, पण तरीही तिने मोबाईलवर घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज उघडले...
श्वास रोखून धरत तिने फुटेज ची वेळ मागे नेली… २.३० वाजता स्क्रीनवर जे दिसले, ते पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला...
स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर एक उंच, धूसर आणि अमानवी सावली स्थिर उभी होती. तिचा चेहरा पूर्ण अंधारात गडप होता… पण त्या काळोखातसुद्धा निखाऱ्यासारखे लालसर दोन डोळे उठून दिसत होते..
अचानक ती आकृती हलली.
हळूच, पाय ओढत ती जिन्याकडे वळली... पुढच्याच क्षणी ती एकेक पायरी चढत होती…
अनघाचा श्वास अडकला होता..
अर्धा जिना चढून झाल्यावर काहीतरी बदलले.. ती आकृती थांबली…
आणि मग, अस्वस्थ करणाऱ्या शांततेत, हळूहळू मागे वळली...
तशीच सावकाश चालत ती पुन्हा स्वयंपाकघराच्या दिशेने गेली..
पण दरवाज्यात पाऊल टाकताच ती थांबली...
आणि तेव्हाच…तिने मान वळवली...
कॅमेऱ्याकडे...
त्या क्षणी त्या डोळ्यांनी.. त्या रक्तलाल, जळजळीत, अमानवी डोळ्यांनी.. कॅमेऱ्याकडे, थेट अनघाच्या दिशेने पाहिले...
त्या नजरेत एक थंडगार जाणीव होती..
‘मी तुला पाहतोय.'
अनघाने भीतीने डोळे घट्ट मिटले. छातीत धडधड उसळली.
क्षणभराने डोळे उघडले… पण ती आकृती अजूनही तिथेच होती...
अनघाने घाईने व्हिडिओ लाइव्ह वर घेतला..
लाइव्ह व्हिडिओ मधील दृश्य बघून अनघा च्या तोंडातून एक अस्पष्टशी किंकाळीच बाहेर पडली..
कारण ती आकृती अजूनही त्याच जागेवर उभी होती..
फक्त आता तिची नजर कॅमेऱ्याकडे नव्हती तर अनघा उभी असलेल्या दिशेला स्थिरावलेली होती..
अनघाने भीतीने स्वयंपाक घराकडे बघितले.. पण उघड्या नजरेला तिथे कोणीच दिसत नव्हते...
अनघाच्या अंगात भितीचा आगडोंब उसळला होता..
तिची नजर कधी मोबाईल मध्ये दिसणाऱ्या त्या आकृतीवर तर पुढच्याच क्षणी किचन च्या रिकाम्या दरवाजावर फिरत होती..
भयाने पछाडलेली ती वेगाने वर धावली..
"अहो उठा.. हे बघा.. आपल्या घरात नक्की काही तरी आहे.."
अमोलला उठवून तिने त्याला मोबाईल मधील सीसीटीव्ही फुटेज बघण्यास सांगितले..
"अगं, अर्ध्या रात्री का उठवलेस आणि हे का दाखवते आहेस?"
अमोल ने मोबाईल मध्ये बघत शंका विचारली..
"अमोल.. किचन च्या दरवाजात कोणीतरी उभे आहे.. बघा ना हे काय इथे.. भयानक डोळ्यांचे.."
घाबरलेल्या अनघा ने बोलत पुढे होत मोबाईल मध्ये अमोल ला आकृती दाखविण्यासाठी मोबाईल हातात घेतला....
मोबाईल मध्ये बघून ती स्वतःच काही क्षण गोंधळली..
कारण सीसीटीव्ही फूटेज मध्ये आता किचन च्या दरवाजात कोणीच नव्हते..
अनघा दोन्ही हाताने डोके गच्च पकडत जागेवरच खाली बसली... तिच्या मागे मागे पळत आलेला टायगर देखील बेडरूम चा एक कोपरा पकडून केविलवाणे रडत होता..
अमोल खाली बसलेल्या अनघाला बघून संभ्रमित झाला होता..
"अगं, काय होत आहे तुला.. काही त्रास होतो आहे का?" अमोल ने तिच्या जवळ जात तिला आधार देत विचारले..
तसे अनघाने थरथरत्या ओठांनी त्याला घडलेला सर्व प्रसंग सांगितला..
"काहीतरीच काय.. मी तुला कितीतरी वेळा सांगितले आहे ना..
त्या फेसबुक वर येणाऱ्या भूतांच्या कथा वाचणे जरा कमी कर.. बघ झाला ना भ्रम तुला.. या जगात भूत प्रेत काहीच नसते ग.. वाचतेस त्या फक्त भाकड कथा असतात.. " अमोल तिच्या केसात हात फिरवत थोड्याशा रागात पण समजावणीच्या सुरात बोलला....
त्याचे बोलणे ऐकून अनघाने देखील तो निव्वळ एक भ्रम असावा असे गृहीत धरण्याचे मनोमन ठरवले..
पण तिचे एक मन मात्र तिला तो भ्रम नाही तर सत्य आहे हे ओरडून सांगत होते.. तिने त्या कडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले..
थोड्याच वेळात ती अमोल च्या मिठीत शांत चित्ताने झोपी गेली होती..
टायगर मात्र त्याच कोपऱ्यात बसून बेडरूमच्या दरवाजाकडे बघत नजर लावून बसलेला होता..
त्याच्या नजरेत राग आणि भीती असे संमिश्र भाव होते..
खरे तर...
ती रात्र फक्त एक सुरुवात होती...
त्यानंतर अनघाच्या बाबतीत हे प्रकार रोजच घडू लागले... तिला रात्री बेरात्री घराच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून विचित्र कुजबुज ऐकू येऊ लागली.. जणू कोणतरी काही तरी बोलत असल्यासारखी... कधी कधी अर्ध्या रात्री बाथरूमला जाताना घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी अचानक उभे राहिल्याचा भास व्हायचा... कधी एखादी सावली जमिनीवर सरपटत असल्यासारखे भासायचे..
अनघाने लाइट लावला की तिथे कोणीच नसायचे....
पहिल्या अनुभवा वेळी अमोल ने दिलेला प्रतिसाद आठवून तिने त्याला घडणाऱ्या घटनांविषयी पुन्हा सांगणे टाळले होते..
पहिला प्रसंग घडल्यानंतर चौथ्या दिवशी सोहमला प्रचंड ताप भरला...
सोहम अनघा चा मोठा मुलगा..
अमोल ला डॉक्टरांना आणण्यास पाठवून अनघा त्याच्या जवळच बसून होती..
त्याचा देह आगीसारखा तापत होता.. तोच अचानक तो तापात बरळू लागला,
"मला सोडा... मला सोडा... मी नाही देणार... कुठून आणू? मला मारू नका..!" अर्धग्लनीत असलेला सोहम प्रचंड घाबरला होता...
तो प्रकार बघून अनघा मनातून पूर्ण हादरली होती..
तेवढ्यात अमोल डॉक्टरांना घेऊन आला..
इंजेक्शन दिल्यानंतर बराच वेळाने सोहम चा ताप पूर्ण पने उतरला..
त्याने हळहळू डोळे उघडले.. त्याचे डोळे अतिशय कृश वाटत होते..
अमोल आणि अनघा त्याच्या जवळच बसलेले होते..
सोहम ला काही वेळ स्थिर होण्यास अवकाश देऊन अनघाने त्याला तो बरळत असलेल्या वाक्याविषयी विचारले..
ते वाक्य अमोल ने ऐकताच त्याने पुन्हा अनघा कडे रागाने बघितले..
अमोल काही बोलणार तोच अनघाने एक जळजळीत नजर त्याच्या दिशेने टाकली..
तसे अमोल तोंडाला कुलुप लावून काय घडते हे बघू लागला होता..
"बोल, सोहम.. कोण त्रास देत आहे तुला.. कोण काय मागत आहे.." अनघा ने सोहमच्या कपाळावर हात फिरवत ममता पूर्ण आवाजात विचारले..
ताप पूर्णतः कमी झाल्यामुळे सोहम बराच स्थिर झाला होता..
त्याने रडत सांगितले की, रात्री एक काळी धिप्पाड आकृती त्याच्या पलंगापाशी उभी होती... तिचे डोळे निखाऱ्यांसारखे लाल होते आणि ती त्याच्यावर वाकून ओरडत होती..
"मला रक्त हवे आहे... रक्त दे... मला घरी का घेऊन आला.... आता मला रक्त पाहिजे आहे.. येत्या अमावस्येला मला जर ताजे ताजे रक्त नाही मिळाले तर मी तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही! मी तुमच्या रक्ताने माझी भूक भागवणार..
मम्मी मम्मी.. मी त्याला रक्त नाही दिले तर तो मला मारून टाकेल.... मला सोडणार नाही.. मी त्याला खरच घरी आणले नाही.. तो काय बोलतो आहे.. मला काहीच समजत नाहीये.."
"घाबरू नको सोहम.. मम्मा आणि पप्पा आहेत ना तुझ्याजवळ.. तुला कोणी काहीच करू शकणार नाही.." सोहमच्या डोक्यावर ओठ टेकवत अनघा उत्तरली..
पुन्हा सरळ होताना अनघाने एक अर्थपूर्ण नजर अमोल कडे टाकली..
सोहमने सांगितलेली घटना आणि चार दिवसापूर्वी अनघाने सांगितलेली घटना दोन्ही मधील आकृतीचे रूप एक समान असल्याचे अमोल च्या लक्षात आले..
अनघावर त्या रात्री अविश्वास दाखविल्या मुळे तो मनातल्या मनात खजिल झाला होता..
तो काही तरी बोलणार तोच अनघाने त्याला बोटाने शांत राहण्याचे सांगितले..
डॉक्टरांनी दिलेली औषधे सोहम ला दिल्यानंतर त्याला पुन्हा झोप लागली..
तसे अनघाने अमोल बाहेर येण्यास खुणावले..
"माफ कर अनु... मला... त्या रात्री मी तुझ्या वर विश्वास ठेवायला हवा होता.. पण अनु हे नक्की काय घडतंय.. माझ्या तर बुद्धीच्या पलीकडचे आहे.. काय करायचं आपण?" बाहेर येताच अमोल विनवणीच्या सुरात बोलू लागला..
"अहो.. मागचे जाऊ द्या.. तसा पण कोणीच विश्वास ठेवला नसता.. पण एक आहे.. त्या रात्री नंतर देखील, मला घरात बऱ्याच वेळा कोणीतरी वावरत असल्यासारखे जाणवत होते... एक आकृती अंधारात, आपल्या घरात सर्वत्र फिरत असल्याचे दिसत होते.. मी माझ्या एका मैत्रिणीकडे या गोष्टी सांगितल्या तर तिने इथून तीस किलोमीटर वर असलेल्या महादेवाच्या प्राचीन मंदिरातील पुजाऱ्यांची भेट घेण्यास सांगितले.. मी पत्ता लिहून घेतला होता.. आता तुम्हाला खात्री पटलीच आहे तर तुम्ही तातडीने तिकडे जाऊन भेट घ्या.." डायरीत लिहिलेला पत्त्याचा कागद फाडून अमोल कडे देत अनघा बोलली..
सोहमची झालेली अवस्था पाहून अमोलने लगोलग जाऊन त्या सिद्ध पुजाऱ्यांची भेट घेतली... पुजारी काकांनी सर्व घटना ऐकल्यावर लगेच अमोल बरोबर येण्याचे मान्य केले..
अमोल आणि पुजारी काका अमोल च्या घरी पोहोचायला सायंकाळचे सहा वाजले होते....
घरात पाऊल ठेवताच पुजारी काकांना अस्वस्थ वाटू लागले...
"घरात काहीतरी अश्लाघ्य आणि अत्यंत अपवित्र गोष्ट शिरली आहे," पुजारी काका गंभीर आवाजात बोलले..
त्यांनी घराच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला आणि शेवटी ते सोहमच्या खोलीत येऊन थांबले...
बाहेर अंधार भरून आला होता.. त्यामुळे उशीर न करता पुजारी काका सरळ सोहम जवळ जाऊन उभे राहिले..
त्यांनी सोहमला विश्वासात घेऊन अगदी शांत आवाजात विचारले, "बाळा, बाहेरून काही आणले आहेस का? खरे सांग, नाहीतर हे संकट तुला तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेल.."
पुजारी काकांच्या त्या प्रश्नाने खोलीतली हवा जणू गोठून गेली होती.. सोहमचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. त्याचे ओठ थरथरत होते, पण शब्द फुटत नव्हते...
"सांग बाळा... वेळ निघून चालली आहे," पुजारी काकांचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता...
सोहमने एकदा अनघाकडे पाहिले आणि मग गदगदल्या आवाजात बोलायला सुरुवात केली, "मम्मी... पप्पा... पाच दिवसांपूर्वी मी क्लासवरून येत होतो. रस्त्याच्या मधोमध कुणीतरी उताऱ्याचं एक कुंकू लावलेले लिंबू आणि एक काळी कापडी बाहुली ठेवली होती... सोहम अडखळत बोलू लागला, त्याचे शब्द भीतीमुळे अस्पष्ट होत होते...
"मी ' मी विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी असून असल्या अंधश्रद्धा मानत नाही' हा तोरा मिरवण्यासाठी... अतिशहाणपणा केला." त्याने डोळे मिटून घेतले, जणू काही पाप तो कबूल करत होता...
"मी 'बघा काहीच होत नाही' असं मित्रांना दाखवण्यासाठी ते लिंबू उचलून माझ्या खिशात टाकून घरी घेऊन आलो..."
सोहम बोलायचे थांबला..
"बाळा!" पुजारी काका जोरात ओरडले, "ते निव्वळ लिंबू नव्हतं! कोणत्या तरी तांत्रिकाने अघोरी विद्या वापरून एका 'अतृप्त पिशाच्चाला' त्या लिंबात कैद केलं होतं. तू ते उचललंस आणि त्या भयावह शक्तीला स्वतःच आमंत्रण देऊन या घरात आणलंस!"
ते ऐकून अनघाच्या तोंडातून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. अमोल तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचेही ओठ भीतीने थरथरत होते...
टायगरने देखील एका कोपऱ्यात जाऊन आपली शेपूट दोन्ही पायांमध्ये दाबून घेतली होती आणि तो केविलवाण्या नजरेने प्रत्येकाकडे पाहत होता, भीतीने पूर्णपणे गारठून गेला होता..
"ती वस्तू अजूनही तुझ्याकडे आहे का?" पुजारी काकांनी त्याला दिलासा देत विचारले, त्यांचा आवाज आता थंड आणि गंभीर होता...
"ते... ते माझ्या कपाटातल्या एका जुन्या बॉक्समध्ये आहे," सोहम रडत रडत भिंतीजवळ उभ्या केलेल्या कपाटाकडे बोट दाखवत म्हणाला...
पुजारी काकांनी घाईने सोहमने दाखविलेले कपाट उघडले...
कपाट उघडताच एक कुबट, सडलेल्या मांसासारखा वास संपूर्ण खोलीत पसरला...
जसा त्यांनी तो बॉक्स बाहेर काढला, आणि त्यातील लिंबू हातात घेतले.. ते लिंबू पिवळे नव्हते, तर कोळशासारखे काळे पडले होते आणि त्यातून रक्तासारखा लाल द्राव निघत होता..
त्याच क्षणी खोलीतील लाईट जोरात आवाज करत फुटला.... काचेचे तुकडे सर्वत्र पसरले आणि संपूर्ण खोलीत अंधार दाटला... फक्त खिडकीतून येणारा चंद्राचा फिकट प्रकाश खोलीत पडत होता...
अनघा आणि अमोल भीतीने एकमेकांना बिलगले. त्याच क्षणी,
अचानक, खाली हॉल कडून एक अमानवी, घोगरा हसण्याचा आवाज आला... 'ही... ही... ही...'
सर्व जण जागेवरच स्तब्ध झाले होते..
थोड्याच वेळात कोणीतरी जिना चढत वर येत असल्याचा आवाज घरभर घुमू लागला..
त्या मागोमाग घशातून निघणारी एक घरघर कानावर पडू लागली होती..
सोहम च्या खोलीत उभ्या सर्वांच्या नजरा दरवाजावर खिळल्या होत्या..
पावलांचा आवाज हळू हळू जवळ येऊ लागला.. तसे सर्वांनी शरीर आखडून घेण्यास सुरुवात केली..
काही क्षण कमालीचे तणावात गेले असतील तोच भीतीने परमोच्च बिंदू गाठावा असा तो क्षण आला..
त्या काळया धूसर आकृतीने हळुवार पाऊले टाकत खोलीत प्रवेश केला.. यावेळेस ती पूर्वीपेक्षा अधिक भयावह दिसत होती, तिच्या डोळ्यांतील लालसर निखारे अधिक तेजस्वी झाले होते, जणू काही तिचा क्रोध आता शिगेला पोहोचला होता...
"सगळे एकमेकांचा हात धरा!" पुजारी काका त्या आकृतीकडे बघून जागेवर खाली बसत बोलले..
पुढच्याच क्षणी पुजारी काकांच्या मुखातून मंत्रोच्चार सुरू होता..
मंत्रोच्चारात खंड न पडू देता.. त्यांनी आपल्या पिशवीतून पवित्र भस्म काढले... एका हातात भस्म आणि एका हातात ते लिंबू पकडून पुजारी काका मंत्र म्हणत होते..
दरवाजात उभी असलेली ती काळी सावली पापणी लावण्याच्या आत सोहमच्या मागच्या बाजूला पोहोचली..
तिचे रूप क्षणाक्षणाला अक्राळविक्राळ होत होते...
"मला रक्त हवे आहे.. तुम्ही याला इथे बोलावून खूप मोठी चूक केली आहे.. आता मी तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही.. सर्वांचे ताजे ताजे रक्त पिऊन माझी भूक भागवणार.." तिच्या घशातून निघणारे कर्कश शब्द सर्व घरभर घुमत होते..
सर्व जण वळून तिचे ते रौद्र रूप बघत जागेवर थरथरत होते..
पण पुजारी काकांचे मंत्रोच्चार अव्याहत सुरू होते..
क्षणाक्षणाला त्यांच्या मुखातून निघणाऱ्या मंत्रांच्या आवाजात फरक पडत होता.. स्वर हळू हळू उच्च होऊ लागला होता..
मंत्रोच्चारच्या प्रत्येक शब्दबरोबर त्या आकृतीचा राग वाढत होता..
एका क्षणी एक भयानक किंचाळी मारून तिने रागाने बेभान होत, मागून सोहमची मान पकडली.....
सोहम हवेत टांगला गेला... त्याचे पाय जमिनीपासून दोन फूट वर उचलले गेले...
"सोहम!" अनघा किंचाळली. तिने त्याला वाचवण्यासाठी हात पुढे करत धाव घेतली, पण एका अदृश्य धक्क्याने ती भिंतीवर फेकली गेली...
संपूर्ण खोलीत हाहाकार मजला होता..
त्याच वेळी "ॐ नमः चामुंडाय!" शेवटचा मंत्र अती उच्च स्वरात म्हणत पुजारी काकांनी डोळे उघडले..
त्यांनी एक जळजळीत नजर त्या भयावह सावली कडे टाकली..
"सोड त्याला.. हे दुष्ट शक्ती, कारण तुझा अंत अटळ आहे!"
बोलत पुजारी काकांनी ते काळे लिंबू जमिनीवर ठेवले आणि त्यावर दुसऱ्या हातातील भस्म टाकत त्यांच्या जवळचा एक लोखंडी खिळा जोरात ठोकला...
जसा खिळा लिंबाच्या आरपार गेला, तशी सर्व इमारत हादरली. खिडक्यांच्या काचा तडतडून फुटल्या... त्या काळ्या सावलीने एक कानठळ्या बसवणारी किंकाळी फोडली... एक काळया धुराचा लोळ वेगाने खोलीमधून बाहेर पडत खालच्या दिशेने पसार झाला.. त्याच बरोबर सोहम जमिनीवर जोरात कोसळला...
"अमोल, समोरच्या पात्रातील कापूर पेटवा! लवकर!" पुजारी काका ओरडले...
अमोलने पुढे होत थरथरत्या हाताने कापूर पेटवला... पुजाऱ्यांनी ते खिळा ठोकलेले लिंबू त्या अग्निमध्ये अर्पण केले.. . जसे ते लिंबू जळू लागले, तसे घरातील खालच्या खोल्यांमधून किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या..
त्या धुराच्या मागे पळालेला टायगर खोलीच्या दरवाजात उभे राहून खालच्या बाजूला बघत जोरात भुंकू लागला होता...
त्याच्या मागोमाग अमोल आणि अनघा देखील धावले..
वरून खाली वाकून बघणाऱ्या अनघाला किचनच्या दरवाजाबाहेर तेच दोन लाल डोळे पुन्हा दिसले, पण आता त्या डोळ्यांत जरब नव्हती, तर एक भयानक तडफड होती...
क्षणार्धात, एक काळा धूर त्या डोळ्यांमधून बाहेर पडला आणि खिडकीतून बाहेर निघून गेला... संपूर्ण घरात अचानक शांतता पसरली. जड झालेली हवा हलकी झाली होती...
दोघेही पुन्हा खोलीत परत आले..
पुजारी काकांच्या पूजा समाप्त झाली होती.. ते खाली मांडलेले साहित्य पिशवीत भरत होते..
काही वेळ कुणीच काही बोलले नाही... फक्त सोहमच्या हुंदक्यांचा आवाज येत होता.
अनघाने त्याला मिठीत घट्ट दाबून घेतले होते..
पुजारी काका उठून उभे राहिले , त्यांनी कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाले, "विज्ञानावर विश्वास ठेवणं चांगलं आहे, पण ज्या गोष्टी आपण समजू शकत नाही, त्यांना आव्हान देणं हा मूर्खपणा असतो. आज सोहमचा जीव वाचला.. तुमच्या जीवावरच संकट टळले, पण हे घर शुद्ध व्हायला वेळ लागेल.. एक शुभ मुहूर्त काढून वास्तू शुद्धीकरणाची पूजा करून घेऊ.. तो पर्यंत काळजी घ्या.."
"तुम्ही आमचे प्राण वाचवले, महाराज!" अमोल पुजारी काकांच्या पाया पडत बोलला... अनघाही त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली, डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते...
"मी फक्त माझ्या धर्माचे कर्तव्य केले, बाळांनो," पुजारी काका शांतपणे म्हणाले...
आज त्या घटनेला सहा महिने झाले आहेत. सोहम आता रात्री एकटा झोपत नाही... अनघा पण अर्ध्यरात्री एकटी कधीच कुठे जात नाही..
आजही कधी चुकून सिंहगड रोडवर रस्त्यात लिंबू किंवा उतारा दिसला, तर पिसाळ कुटुंब रस्ता बदलून जाते.. कारण त्यांना ठाऊक आहे...काही दरवाजे एकदा उघडले की, ते कधीच पूर्णपणे बंद होत नाहीत...
समाप्त..
©® लेखक: रूद्रदमन

