प्रतिशोध
सूडकथा संपूर्ण
संध्याकाळपासून त्या परिसरात पावसाने जोरदार आघाडी उघडली होती... धारदार वारे एकापाठोपाठ एक त्या पहाडाचे अजस्त्र कडे कापून काढत होते... पावसाच्या प्रचंड आवेगापुढे दरडी आणि मोठंमोठाली खडके कड्याकपारीतुन निसटून अवखळपणे नदीपात्रात जलसमाधी घेत होत्या ..
हळूहळू गहिऱ्या काळोखाने आपल्या कराल कवेत त्या परिसराला सामावून घेतले.. अस्मानात कृष्णपक्षाच्या द्वितीयेची चंद्राची बारीकशी कोर उगवली गेली होती.. जी साहजिकच त्या परिसरात प्रकाश देण्यासाठी पुरेशी नव्हती.
अन या अश्या मिट्ट गहिऱ्या काळोखात त्या पठाराच्या पायथ्याशी एक मोटार कच्च्यापक्क्या रस्त्यावरून वेगात वर चढत होती.
एका क्षणी ती पठाराच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात थांबली... अन त्यातून हाती कुदळ आणि पहार घेतलेल्या दोन आकृत्या बाहेर आल्या..
मोटारगाडीची मागील डिक्की उघडत त्यातून त्यांनी एक प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेले काहीतरी मानव शरीरसदृश बाहेर काढले.. अन हळूहळू ते दोघेही हातातील कुदळ पहारीने खड्डा खोदु लागले.
नांदुरणी गाव तसे आडबाजुला पण त्याला हवी तशी बदली मिळाली यातच समाधान वाटत होते गावात एक पोस्ट ऑफिस होते. सकाळी सात ते दहा पर्यत किरकोळ दैनंदिन कामे असत... त्यानंतर दिवसाचा पूर्ण वेळ कसा व्यतीत करावा यासाठी हल्ली तो काहीतरी विरंगुळा शोधू पाहत होता.
रतनलालचे वाणसामानाचे दुकान शाळेशेजारच्या वस्तीत होते... अधूनमधून फावल्या वेळेस त्याच्या दुकानात त्याची फेरी नेहमीच होत असे...
बारीक खोलवर डोळे गेलेला रतनलाल तसा महाकंजूस माणूस... पै अन पै जोडून उदास भविष्याची शेखचिली स्वप्न बसल्या बसल्या पाहायला त्याला फार आवडत असे.... अश्या या रतनलालच्या दुकानात त्याचे वरचेवर हल्ली जाणेयेणे होऊ लागले होते.
एका संध्याकाळची गोष्ट... गावात अंधार पसरला गेला होता.
दुकानात रतनलाल मेणबत्तीच्या उजेडात जुने वर्तमानपत्र वाचत बसला होता.. काही किरकोळ वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी तो गेला आणि पलीकडून एक गोरापान हात पुढे आला.
त्या अंधुकश्या काळोखात मेणबत्तीच्या अल्प प्रकाशात त्याची नजर तो सुंदर चेहरा मनात साठवून घेण्यासाठी धावू लागली..
अन अनपेक्षितपणे ती नजर सुद्धा त्याच्यात काहीतरी शोधू पाहात होती याची तीव्र जाणीव त्याला झाली... हळूहळू ती आत दुकानात वळली. इतक्या जहाल सौन्दर्याला डावलून रतनलालसारखा कवडीचुंबक इसम असा अरसिक कसा काय असू शकतो?? याबाबत त्याच्या मनात हळूहळू आंदोलने होऊ लागली.
प्रतिसाद अगदीच नगण्य असता तर गोष्ट निराळी असती... पण त्याला लज्जोकडून भरभरून प्रतिसाद मिळू लागला. वेधक आणि गहिऱ्या नजरा... गर्भित इशारे..... बेधडक आणि तरीही तितकाच अस्वस्थ करणारा वावर....आणि यावर कहर म्हणजे तिच्या हल्ली वाढलेल्या मादक नजाकती....
एकवेळ हे चूक आहे... हे सर्वाथाने नैतिक नाही...
अशी सूचक जाणीव त्याला अंतर्मनाच्या पोकळीतुन हल्ली सतावत जात असे... तर अगदी त्याच्या अगदीच उलट.... संधी मिळाली तर तिचे सुवर्णंसंधीत रूपांतर कर.... सर्वच सज्जन नसतात... पकडले जाण्याच्या भितीनेसुध्दा अनेकजण आलेली संधी नाकारतात... असले विचार हल्ली उसळी मारून येत असत....दुर्दैवाने त्याच्या अंतर्मनावर वासना विजयी ठरली.
त्या रात्री लज्जो त्याला भेटण्यासाठी आली होती.
या गावापासून दूर कुठेतरी जिथं आपल्या दोघांना ओळखत नाही अश्या ठिकाणी पळून जाऊन लग्न करूया... आणि तिथेच राहूया.. असा काही विचार तिच्या मनात हल्ली येऊ लागला होता.. अन तो नेहमीप्रमाणे तिला समजवण्याचा प्रयत्न करू पाहत होता.
खरंतर असं सहजच घडू शकले असते.. पण एक मोठा जहरी काटा त्यांच्या वाटेत होता..
रतनलाल....आणि तो मुळासकट काढून फेकला तर???
आयुष्यभर तहानभूक आटवत कवडीचुंबकासारखं आयुष्य जगलेल्या किडमुड्या रतनलालचा प्रतिकार किती असेल... मोजून पाच मिनिटात त्याच्या श्वासाची नाडी हरवून गेली... सहाव्या मिनिटाला त्याचे डोळे गारगोटीसारखे खाचेतून बाहेर आले.. अन जीभ बाहेर लोम्बू लागली..
रात्रीचे अकरा वाजले गेले होते.. रतनलालच्या मृतदेहाला या जगातून नाहीसे करणे भाग होते.. एका मेनकापडात त्याच्या मृतदेहाला लज्जो गुंडाळत होती..
पोस्ट ऑफिससमोर एक सरकारी जिप गेली कित्येक दिवस पडून उभी होती.. तिच्या चाव्या हल्ली ऑफिसात असत... ती जिप सुरु केली.. इंधन पन्नास किलोमीटर फिरून येऊ इतपत असावे...
पाठीमागच्याच डिक्कित रतनलालच्या मृतदेहाला टाकत लज्जो अन तो गावाबाहेरच्या टेकडीच्या दिशेने निघाले .
धुवाधार पाऊस कोसळला जात होता.. माती बरीच भूसभुशीत झाली होती.. अर्ध्या तासात चांगला तीन चार फूट खोल खड्डा खोदून झाला.. अन पुढच्या क्षणाला रतनलाल त्यात कायमचा विसवला....
लज्जो आणि त्याचे दिवस आणि रात्री सुखासुखीच्या जात होत्या.... दिवसा जरी सर्वकाही आलबेल असले तरी रात्रीच्या उधानात व्याभिचाराला ऊत येत असे... असे दोन एक महिने पार पाडले गेले असतील... त्या रात्रीची ही घटना मात्र त्यांच्या सुसाट चाललेल्या गाडीला थेट लाल दिवा दाखवून देण्यासाठीच घडली असावी....
कालरात्रीच्या उगमात मध्यरात्र प्रसंवली जात होती.. बेभान थंडी पसरली गेली होती.. अन रात्रीच्या या अकाल समयी खिडकीवर थाप पडली....
कोणीतरी मुद्दाम जोरजोरात खिडकी दार ठोठावेत... अगदी तसाच आवाज....काहीसा नाईलाजाने लज्जोशेजारच्या जागेवरून तो उठला. अन बाहेरच्या हालचालीचा कानोसा घेऊ लागला ...
कोणीतरी आपल्या कराल नख्या लोखंडी पट्टीवर घासत असावा... हुं हुं असा एकच विचित्र आवाज कानावर येत होता.....
हिम्मत करुन त्याने दार उघडले...बाहेर रतनलाल उभा होता... अस्ताव्यस्त धूळमातीने माखलेले कपडे अन चेहरा... आधीच किडमूड्या असलेल्या त्याच्या शरीराला ओढून तो काटकूळ्या पायावर धडपड करत उभा होता... उजेडात त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यातुन पांढऱ्याशुभ्र खाचा दिसत होत्या... आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे त्याची नखें ही अमानवी पद्धतीने धारदार लांब वाढलेली दिसत होती. इतका वेळ बंद असलेल्या दाराचा अड्सर दूर झाल्यावर त्याच्या मातकट चेहऱ्यावर छद्दी हास्य फुटले... त्याच्या डोळ्याच्या खाचातील खोल गेलेली नजर काहीतरी शोधू लागली... आतल्या खोलीत लज्जो झोपली होती... त्याने आपल्या हातांच्या एका फटकाऱ्यात त्याला झोपवले...एकच ताकदीने मारलेल्या पंज्याच्या फटकाऱ्यात त्याची पूर्ण पाठ सोलून निघाली होती... कपडे फाटले गेले होते.... अन तो जमिनीवर मुश्किलीने श्वास घेण्यासाठी तडफडू लागला होता ...
हळूहळू रतनलाल आत शिरला.... अर्धवट झोपेच्या ग्लानीत असलेल्या लज्जोला कदाचित थोडीफार जाग आली असावी.. तिचे डोळे भिरभिरु लागले होते.. पुढच्या क्षणाला तो तिच्याशेजारी ओणवा झाला...
कचकन धारदार सुरीने कोवळी काकडी कापल्यासारखी त्याची धारदार नखें तिच्या गोऱ्यापान लयबद्ध कटीप्रदेशावरून फिरू लागली...तिनेच हळूवार डोळे उघडले.
दाढीकेसाचे जंजाळ वाढवून शरीराला एकाप्रकारे अनामिक दुर्घधी सूटलेला रतनलाल तिला शेजारी बसलेला दिसू लागला... तिला धोक्याची जाणीव झाली.. ती अर्धवट झोपेत कसायाच्या तावडीत मान सापडलेल्या शेळीसारखी ओरडली...
पण प्रतिकार व्यर्थ होता.. रतनलालने ती धारदार नखें तिच्या ओटीपोटात घुसवली होती.... रक्ताचे ओघळ जमिनिवर वाहू लागले होते... अन तो नराधम रतनलाल त्यानंतर ते रक्त प्राशन करण्यासाठी बहुधा जमिनिवर ओणवा झाला..
सोड सोड.... जाऊ दे आम्हांला.... आम्हाला माफ कर..... जोरजोरात झोपेत ओरडत असलेल्या त्याला पाहून लज्जो उठली... कदाचित भयंकर स्वप्न पडले गेले होते.कारण दार बंद होते.. लज्जो सुध्दा व्यवस्थित दिसत होती... अन रतनलालचे तिथे कोणतेही अस्तित्व दिसून येत नव्हते....
आदल्या रात्री असे भयान स्वप्न पडले असल्याने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळपासून एकंदरीत वातावरण उदास आणि धूसर वाटत होते.
रतनलालच्या घरातुन काही टाय सूट घातलेली माणसे बाहेर पडताना दिसली..
आता ही कोण?? तर कवडीचुंबक रतनलालने स्वतःचा 10 लाखाचा जीवनविमा उतरवला होता. अन तो दावा सिद्ध करण्यासाठी रतनलालच्या विधवेने म्हणजे लज्जोने त्यांना बोलावले होते.
किती मुर्खासारखे वागणार! आता रतनलालच्या विम्याचे पैसे हवे असतील तर अगोदर रतनलाल कसा मेला हे सिद्ध करायला नको?? साहजिक पोलीस चौकशी होणार अन इतका दिवस लपवून ठेवलेला बनाव उघडा पडणार... आपण दोघेही अडकणार....त्याने लज्जोला रागात म्हटले..
मला काही माहित नाही.. आयुष्यभर मेल्याने मला दुःखात ठेवले.. हौसमौज पुरवली नाही.. की चार दागिने अंगावर घातले नाही... निदान आता तरी मला सुखाचे दिवस उपभोगु दे.... लाज्जो ने प्रत्युत्तर दिले..
दुर्दैवाने असं काही झाले नाही... ज्या भयानक अस्तिवाची चाहूल रतनलालने त्याला स्वप्नात दाखवली.. त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वास्तवात हल्ली तो लज्जोसमोर वावरू लागला.. स्वप्न भास.. विचार आणि वास्तव यात तो तिला जहरी छळु लागला.. लवकरच तिचे मानसिक संतुलन बिघडले... स्वप्नात रतनलालने केलेल्या मारहाणी आणि जखमाच्या खुणा वास्तविकतेत तिच्या अंगावर उमटू लागल्या... तिच्या गोऱ्यापान देहावर क्रूरतेची छाया स्पष्टपणे पसरली जाऊ लागली...
तिला दिवसरात्रीचे भान न राहू लागले.. कायमच ती वेड्यासारखी वागू फिरू लागली... लोकांना वाटले पतीवियोगाचे अतीव दुःख तिला सहन झाले नसावे... तिची रवानगी जिल्ह्याला वेड्याच्या इस्पितळात केली गेली..
पश्चातापाचे ढग हल्ली जास्तच गडद होऊ लागले होते.. त्यात हल्ली रतनलाल स्वप्नातला पाठलाग सोडून बिनधास्तपणे वास्तविकतेत प्रकट होऊ लागला... अगोदरच रतनलालच्या गायब होण्यामागे त्याचा हात असावा असा संशय लोकांना होता... तो त्याच्या विचित्र वागणुकीमुळे हल्ली दृढ होऊ लागला..
त्या रात्री काहीतरी ठरवून या प्रकरणावर कायमचा पडदा टाकावा असा निर्णय घेत तो त्या टेकडीवर गेला होता.रतनलालला गाडल्याची जागा उकरून तो काढू लागला.... अन महतप्रयासाने ती जागा उकरण्यात त्याला यश आले. रतनलालच्या हाडामांसाला ठिकठिकाणी गळती लागली गेली होती... रात्रीच्या चंद्रप्रकाशात रतनलालचा निस्तेज चेहरा अधिकाअधिक पांढराफटक दिसू लागला होता.. त्याचे कलेवर अजूनही आहे तिथेच निपचित पडले आहे याची खात्री होत गेली होती... अन पुढंच्याच क्षणाला त्या हाडाच्या सापळ्यातुन करकरणारा एक हात बाहेर आला अन त्याने त्याच्या पायाला घट्ट जखडून ठेवले.. त्या जीवघेण्या पकडीतुन सुटण्यासाठी कितीतरी वेळा हातातिल पहारीचे प्रहार त्याने त्या सापळ्यावर केले... सगळेच व्यर्थ.... बहुतेक प्रहार त्याच्या पायावर झाले होते.. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या गेल्या होत्या...
अन यावर कहर म्हणजे शेजारच्या एका खडकाला टेकलेला रतनलाल जहरी हास्य हसत बसला गेला होता.
लांबूनच कोणीतरी आपला पाठलाग करत आहेत याची शंका त्याच्या मनात येत होती.. ती शंका खरी ठरली.. दुरूनच हातात बंदूका घेतलेल्या चार पोलिसांचे पथक गस्ती कुत्र्यांसोबत त्याच्या मागावर होते.. दुरूनच त्यांच्या विजेरीतुन येणारे लांब प्रकाशझोत त्याच्या चेहऱ्यावर येत त्याचे डोळे दिपवून टाकत होते..
विमाप्रकरणात पोलीस तक्रार झाली असावी. अन या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती..
हातात बेड्या पडलेला तो जड पावलांनी हळूहळू पोलिसांच्या गाडीत बसला होता .
दूर एका कोपऱ्यात उभा राहून रतनलाल छद्दीपणे त्याच्यावर हसत असावा..
कोणीतरी खरच सांगितले असावे.. एकवेळ कॅन्सर बरा होऊ शकेल... पण अनैतिक संबधाचा शेवट कधीच बरा होऊ शकत नाही...
गाडी वेगात पुढे जात होती.. गडद काळरात्रीसारखे खडतर आयुष्य हळूहळू त्याच्या जीवनात प्रवेश करत होते.
समाप्त

संदीप मुणगेकर