आग-राजेंद्र भट- Aag Marathi Horror story by Rajendra Bhat
काय गं आई तुझं! बाहेर ८ पर्यंत टेम्परेचर खाली आलं आहे. आणि रात्री दोन वाजता उठवून मला एसी लावायला सांगत्येय तू. झोपू दे ना... एवढं कुडकूड होतं आहे. अंगावर दोन दोन रग ओढून घेतले आहेत तरी थंडी भागत नाही. निनाद तक्रार करत होता.
निनाद जीवावर येऊन अंथरुणात उठून बसला. लाईट लावून बघितलं. आई नुसती घामाघूम झाली होती. त्याने पंखा सुरु केला आणि आईला थंड पाणी आणून दिलं प्यायला. आईने अक्खी बाटली रिकामी करून बाजूला ठेवली. पदराने चेहरा आणि मानेवरचा घाम पुसला. तोवर निनादने एसी चालू केला होता. मनोरमा बाईंनी एसीचं टेम्परेचर सतरा केलं. तेव्हा कुठे त्यांना जरा बरं वाटलं.
निनाद हॉल मध्ये येऊन झोपला. उद्या आईला डॉक्टरकडे न्यायलाच हवं, कदाचित ब्लड प्रेशर मुळे तीला असा त्रास होत असेल. त्याने मनाशी पक्कं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी दोघं फॅमिली डॉक्टर कडे आले. किती दिवसापासून तुम्हाला हा त्रास होतोय मनोरमाबाई?
खरं तर डॉक्टरपासून कधीच काही लपवू नये असं म्हणतात, आपल्याला हा त्रास नेमका कधी सुरु झाला हे मनोरमाबाईंना चांगलंच आठवत होतं. अगदी दिवस तारीख वारासकट. पण तरी त्यांनी खोटंच उत्तर दिलं, हल्लीच दोन तीन दिवस झाले. त्यांचा खोटेपणा निनादच्या नजरेतून सुटला नाही. तरी आतापुरता तो गप्पच राहिला.
डॉक्टरनी ब्लड प्रेशर चेक केलं. नॉर्मल होतं. त्यांनी काही गोळया औषधं लिहून दिली. भरपूर पाणी प्या म्हणाले आणि चार दिवसांनी परत यायला सांगितलं.
मनोरमाबाई घरी आल्या. औषधं न चुकता घेत होत्या. दिवसात दोन वेळा थंड पाण्याची अंघोळ करत होत्या. भरपूर नारळ पाणी पीत होत्या. पण काहीच उपयोग झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्रास वाढतच होता. अंगात वणवा पेटलाय असंच वाटायचं.
दोन आठवडे उलटले तरी काही फरक पडत नव्हता तब्येतीमध्ये. दिवसेंदिवस सगळंच बिघडत चाललं होतं. आताशा मनोरमाबाईंच्या अंगावर जागोजागी भाजल्या सारखे फोड उठले होते. बसणं झोपणं सगळंच मुश्किल झालं होतं त्यांच्यासाठी.
आई उद्या डॉक्टरकडे जाऊया आपण. हवं तर दुसऱ्या एखाद्या स्पेशालिस्टला दाखवू. निनाद काळजीने बोलत होता.
नको आता कुठल्याही डॉक्टरकडे जायचं नाही मला. कुठलं औषध सुद्धा नको . कारण कशानेच मला आराम पडणार नाही. आता मेल्यावरच ह्या त्रासातून माझी सुटका. नेहाच्या फोटोकडे बघत त्या बोलत होत्या.
आई असं नको गं बोलू. तूझ्याशिवाय मला कोण आहे दुसरं? नेहा सोडून गेली मला अर्ध्या संसारातून. त्या गोष्टीला अजून एक महिना देखील नाही झालेला आणि आता तू देखील निरवानिरव करते आहेस. निनाद लहान मुलासारखा रडू लागला.
नेहा अर्धा संसार सोडून गेली त्याला मीच जबाबदार आहे निनाद. नेहाच्या फोटोकडे बघत मनोरमाबाई मनातल्या मनात बोलत होत्या..नकळत भूतकाळ पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला.
गेली कित्येक वर्ष निनाद आणि मनोरमाबाई दोघंच होते एकमेकांना. निनादचे बाबा जाऊन बरीच वर्ष झाली. दोन तीन वर्ष ते अंथरुणाला खिळून होते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पण पोटाचा कॅन्सर बाबांना घेऊनच संपला . होती नव्हती ती सगळी शिल्लक, दागिने सगळे उपचारासाठी कामी आले. पण गुण काही आला नाही. सुदैवाने निनादला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली त्यामुळे सगळं बस्तान हळूहळू मार्गी लागलं.
निनाद दिसायला देखणा होता. शिवाय लग्नाळू. त्याचं लग्न आपण एखाद्या श्रीमंत मुलीशी लावून देऊ. म्हणजे भरपूर हुंडा तरी मिळेल, मनोरमाबाई मनात मांडे खात होत्या. पण निनादने सगळ्यावर बोळा फिरवला.
एक दिवस निनाद नेहाला घेऊन घरी आला. आई माझं नेहावर प्रेम आहे.
नेहा दिसायला निनादला अनुरूप होती. पण मनोरमाबाईंनी ऑलरेडी अश्विनीला पसंत केलं होतं. अश्विनी मोठया घरची एकुलती एक मुलगी होती. लग्नाचा दोन्हीकडचा खर्च अश्विनीचे वडील करणार होते. सासरी येताना अश्विनी भरपूर काही घेऊन आलीच असती. मनोरमा बाई आतापासूनच इमले रचू लागल्या होत्या. त्या सगळ्याला नेहाने सुरुंग लावला होता. नेहा अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे वाजत गाजत कुठलं लग्न व्हायला? आता कुठे आपली हौसमौज होणार वरमाई म्हणून? कोर्ट मॅरेजच करावं लागणार आता, ते सुद्धा आपल्याच खर्चाने. मनोरमाबाई हिरमुसल्या. त्या नेहा बरोबर फार बोलल्या देखील नाहीत.
त्यांनी अंदाज केला होता त्याप्रमाणे निनाद नेहाचं कोर्ट मॅरेज झालं, लगेचंच आठ पंधरा दिवसात . कपड्यांची केवळ एक बॅग घेऊन नेहाने गृहप्रवेश केला.
अश्विनीच्या घरच्यांना कसं तोंड दाखवावं मनोरमाबाईंना समजत नव्हतं. एकदा अश्विनी रस्त्यात भेटली. मनोरमाबाई मान खाली घालून जात होत्या. पण अश्विनीने त्यांना अडवलंच.
काकू का असं वागलात माझ्या बरोबर? मी किती स्वप्न रंगवली होती निनाद बरोबर संसार करण्याची! वाटलं होतं आमचं लग्न झालं की आपण सगळे आमच्या बंगल्यात राहू. पपांचा बिझिनेस निनाद सांभाळेल. पण एका क्षणात सगळं संपल्या सारखं वाटत आहे. अश्विनी डोळ्यात पाणी आणून बोलत होती.
माफ कर गं मला.. माझ्या हातात काहीच नव्हतं. काकू खालच्या आवाजात बोलत होत्या. कदाचित तूझ्या नशिबात निनादपेक्षा चांगलं कुणी तरी येणार असेल..
नाही काकू.. मी आता इतर कुणाशीच लग्न करणार नाही. आयुष्यभर मी निनादची वाट बघेन. अश्विनी सहज बोलून निघून गेली.
अश्विनी अजूनही निनाद बरोबर लग्नाला तयार आहे? म्हणजे समजा उद्या नेहा निनादचं पटलं नाही, ते वेगळे झाले किंवा नेहाचं काही बरं वाईट झालं तर अश्विनी निनादचं लग्न होण्याची शक्यता आहे. त्यांचं लग्न झालं की ह्या वन बी एच के मधून आपण मोठया बंगल्यात राहायला जाणार. तीथे स्वयंपाक, धुणं भांडी करायला नोकर आहेत. आपण फक्त आराम करायचा. बसल्या बसल्या ऑर्डर द्यायची. मनोरमाबाई आता ह्याच एका दिशेने विचार करू लागल्या.
त्या नेहाबरोबर चुकून देखील प्रेमाने वागायच्या नाहीत. निनादच्या अपरोक्ष तीला घालून पाडून बोलायच्या. नेहा बिचारी शांत राहून सगळं सहन करत होती. लग्न झाल्यावर आपल्याला सासूच्या रूपात आई मिळेल ही तीची आशा फोल ठरली होती.
आता घरात नवीन पाहुण्याची चाहूल लागली. नेहासाठी टॉनिक, फळं, ह्यावर निनादचा खूप खर्च होत होता. थोडी ओढाताण सहन करून तो आनंदाने सगळं करतही होता. पण आईच्या डोळ्यात हे सगळं खुपत होतं. नेहा पासून सुटका कशी करून घेता येईल ह्याच एका गोष्टीचा त्या विचार करत होत्या. आणि लवकरच ती संधी त्यांना मिळाली.
ऑफिसच्या कामासाठी निनादला दोन दिवस बाहेरगावी जावं लागणार होतं. सहा महिन्याच्या गरोदर बायकोला आई जवळ सोडून जाणं त्याला जीवावर आलं होतं. पण पर्याय नव्हता.
त्याच रात्री....
नेहमीप्रमाणे सगळं आटपून नेहाने आपलं अंथरुण घातलं. मनोरमाबाई बाहेर गादीवर चुळबुळ करत होत्या. आजच्या सारखी संधी पुन्हा मिळणार नव्हती. पण काय करावं समजत नव्हतं. इतक्यात किचनमध्ये नेहाची हालचाल जाणवली त्यांना.
झोप नाही का गं येत नेहा? त्यांनी सुनेला विचारलं.
हो झोपतेच आहे थोडं गरम दुध पिऊन.. नेहा उत्तरली.
अगं आपल्या दोघींसाठी कॉफी बनवशिल का जायफळ घालून? त्यांनी विचारलं.
आणते हं सासूबाई नेहा म्हणाली.
नको थांब मीच आले आत मध्ये. मनोरमाबाई किचन मध्ये आल्या. शेजारी राहणाऱ्या दुर्गाबाई झोपेच्या गोळया घेत होत्या. मनोरमाबाईंनी आज संध्याकाळीच त्यांच्या घरातून त्या गोळया ढापल्या होत्या. त्या सगळ्या गोळया नेहाच्या कॉफीमध्ये मिसळल्या की नेहा कायमसाठी झोपून जाईल. त्यांच्या डोक्यात सैतान शिरला होता. फक्त एक संधी मिळण्याचा अवकाश होता.
कॉफी घ्या सासूबाई... त्यांच्या पुढ्यात कप धरत नेहा म्हणाली. मी आलेच बाथरूमला जाऊन. नेहा ओट्यावर कॉफी तशीच ठेऊन गेली.
हीच ती संधी ज्याची आपण वाट बघत होतो. मनोरमाबाईंनी सगळ्याच्या सगळ्या गोळया नेहाच्या कॉफी मध्ये मिसळल्या.
नेहा आली आणि कॉफीचा एक घोट घेतला. तीला थोडी वेगळी चव लागली. कॉफी पिऊ नये असं वाटत होतं. पण सासूच्या धाकाने तीने कॉफी एका घोटात संपवली आणि पाचव्या मिनिटाला ती किचनमध्येच आडवी झाली देव्हाऱ्याखाली. मनोरमाबाईंनी कॉफीचे मग आणि भांडी धुवून जागच्या जागी ठेवली. गोळ्यांचं पाकीट खिडकीतून बाहेर भिरकावलं आणि त्या आपल्या बिछान्यात येऊन पडल्या.
अर्ध्या तासाने पुन्हा त्या किचनमध्ये आल्या. त्यांना वाटलं नेहा प्रकरण संपलं असेल. पण नेहाचा श्वास चालू होता. त्यांनी बेडरूम मधून चादरी आणून नेहाच्या अंगावर टाकल्या. देवघरातलं निरांजन पेटवलं आणि ते नेहाच्या अंथरुणावर टाकलं. चादरीनी लगेच पेट घेतला. नेहा अर्धवट शुद्धीत होती. कसंबसं उठून स्वतःला वाचवायला ती इथे तीथे बघत होती. तीने पाहिलं सासू नुसतं बघत उभी आहे. सासूबाई मला वाचवा, माझं बाळ वाचवा सासूबाई. ती विनवण्या करत होती. पण सासूच्या डोळ्यात असुरी आनंद नाचत होता. नेहा असहाह्य होऊन किंचाळत होती.
एव्हाना धूर सगळीकडे पसरत होता. मनोरमाबाई दार उघडून बाहेर आल्या. नेहाचा आरडाओरडा ऐकून शेजारी बाहेर जमा झाले होतेच ऑलरेडी. पाणी वगैरे टाकून त्यांनी आग विझवली. मनोरमाबाई छाती बडवून घेत रडण्याचं नाटक करत होत्या. पोलीस आले... ऍम्ब्युलन्स मधून नेहाला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पण डॉक्टरांनी तीला आधीच मृत घोषित केलं.
शव विच्छेदन करण्यात आलं. नेहाने झोपताना त्या गोळया घेतल्या होत्या हे समजलं. पण त्या गोळया कुठून आल्या ह्याचा शोध चालू होता. नेहा एवढ्या गोळया एकदम घेते आणि त्याच रात्री नेमका जळून तीचा मृत्यू होतो.. हे सगळंच संशयास्पद होतं. आणि हा संशय थेट मनोरमाबाईंवर होता. कारण रात्री त्या दोघीच घरात होत्या. शिवाय त्या नेहाचा दुस्वास करायच्या अशी साक्ष शेजाऱ्यांनी दिली होती. पोलीस त्यांची चौकशी करत होत्या पण हाती ठोस असं काही लागत नव्हतं.
मनोरमाबाईंना मोठया हॉस्पिटलमध्ये हलवायला हवं. डॉक्टर निनादला सांगत होते. निनाद असली केस आम्ही अगोदर कधीच बघितलेली नाही. तूझ्या आईचं अंग काळं ठीक्कर पडतं आहे. आगीत सापडल्या सारख्या त्यांना वेदना होत आहेत. त्यांच्या बाजूला उभं राहिलं तरी चामडी जळल्यासारखा वास येतोय. जिवंतपणी जळत असल्यासारख्या त्यांना वेदना होत आहेत.
मला आता कुठेच नाही जायचं. कुठलाच डॉक्टर मला वाचवू शकत नाही. दोन शब्द बोलताना देखील मनोरमाबाईंना त्रास होत होता. मला पोलिसांना काही सांगायचं आहे. निनाद पोलिसांना ताबडतोब बोलाव. माझ्याकडे फार कमी वेळ आहे. मनोरमाबाईंची घाई चालू होती.
वॉर्ड बाहेर पोलीस उभेच होते. जीव एकवटून मनोरमाबाई कसंबसं बोलत होत्या. आपणच सुनेला मारलं हे त्यांनी कबूल केलं.
मनोरमाबाईंनी मनातच नेहाची क्षमा मागितली. नेहा माफ कर गं आता तरी. पोटातल्या बाळासकट मी तुला जिवंत जाळलं. किती वेळ तू तडफडत होतीस. पण तेव्हा मला असुरी आनंद मिळत होता. त्याच रात्री माझ्या स्वप्नात येऊन तू मला शाप दिलास ... की आता पुढील आयुष्य मला देखील ही आग जाळत राहील.
तुझा शब्द खरा ठरला नेहा. गेला महिनाभर ही धग मला जाळते आहे आणि मी काहीच करू शकत नाही. पण आता नाही गं सोसवत मला. सोडव मला ह्यातून. मनोरमाबाई मरणाची भीक मागत होत्या.
एवढा वेळ वेदनेने कळवळणाऱ्या आईचा आवाज अचानक कसा थांबला म्हणून निनादने आईकडे पाहिलं. आईला नुकतीच शांत झोप लागलेली दिसत आहे . पण हे कसं शक्य आहे? घाबरून त्याने पोलिसांकडे पाहिलं. डॉक्टर बाजूला होतेच. त्यांनी चेक केलं... मनोरमाबाई गेल्याचं त्यांनी डिक्लेअर केलं.
आपला संसार उध्वस्त करणारी बाई गेली म्हणून आनंद व्यक्त करावा की आपण पोरकं झाल्याचं दुःख करावं हेच निनादला समजत नव्हतं.
समाप्त
राजेंद्र भट
२८ डिसेंबर २०२२