कथेचे नाव - टेलीव्हिजन_सिग्नल. - Horror Story -Television Signal
त्या दिवशी नेहमीप्रमाणे सायंकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो, पण नेहमीपेक्षा रोडवर जास्तच गर्दी दिसत होती.. आणखी पुढे चौकात गेलो तर भयंकर ट्रॅफिक जाम..बाजुला थांबून गुगल मॅप चेक केले तर बराच अंतरापर्यंत रोड जाम दिसत होता..
"च्यायला, म्हणजे आज घरी जायला आठ वाजणार तर"
"एक मिनीटं..हा कोणता रस्ता आहे? हा पुढे जाऊन परत मेन रोडला मिळणार आहे, पण सगळे ट्रॅफिक मात्र वाचेल..अंम्म..चार किलोमिटर अंतर वाढेल, पण हरकत नाही, ट्रॅफिक मध्ये दोन तास घालवण्यापेक्षा हे परवडेल मला"
मी चौकातून माझी स्कुटी त्या अनोळखी रोडकडे वळवली.
हा रस्ता मेन रोडपेक्षा छोटा, वेगवेगळ्या सोसायटींमधून जाणारा होता, रोडवर वर्दळ पण तुरळकच होती, चला..ट्रॅफिकला बायपास करण्यासाठी मला एक चांगला पर्याय मिळाला होता, अधेमधे हा रस्ता वापरण्यास हरकत नव्हती..रमत गमत जात असताना मध्येच कोणाचा तरी फोन आला, एका मोठ्या बंगल्याच्या गेटसमोर माझी स्कुटी थांबवून मी फोन रिसीव्ह केला..
"हां, बोल ना अंकिता, काय.. तुमच्या फ्लॅटवरील एलसीडी खराब झालाय..अगं मग मी कशासाठी आहे? नको..नको, कोणालाच फोन करु नको, तुला माहितीये ना, आय एम टेक्नीकल पर्सन.. उद्या सॅटर्डे आहे ना, बघ उद्याच्या उद्या तुला चालू करून देतो, हो..मी येतो सकाळी तुमच्या फ्लॅटवर.."
मी फोनवर बोलत असताना बंगल्याच्या गेटच्या आतून एक लाल टी शर्ट आणी ३/४ बर्मुडा घातलेला एक गोरागोमटा गुबगुबीत तरुण मुलगा मला न्याहाळीत होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्षच केले..
"हम्मं..अब आयेगा मजा, एवढे दिवस मी तिला भेटायला येण्यासाठी फोन करत होतो, पण ती नेहमीच बिझी असायची, आता तिचं काम आले तर स्वताहून फोन करतीय, आता उद्या जातोच तिच्या फ्लॅटवर, तिच्यासोबत तिची पार्टनर पण राहतीय ना त्या फ्लॅटवर? मग तिच्यासोबत पण ओळख होईल माझी..हि नाहीतर ती.. पण उद्या जर अंकिता एकटीच असली तर तिच्या फ्लॅटवर? मग तर अजूनच भारी की "
फोन कट करुन मी स्वताशी पुटपुटत असतानाच, काहीवेळा पासून मला गेटच्या आतून न्याहाळणारी ती व्यक्ती कधी माझ्या जवळ येवून थांबली होती मला समजलेच नाही.
"एक मिनिट हां भया..प्लीज एक हेल्प करतेस का?"
त्याच्या आवाजाने मी त्याच्याकडे पाहिले..साधारण पणे पंचवीसच्या आसपास वय, अंगावर भडक लाल टि शर्ट आणी बर्मुडा, डोळ्यावर काचेचा गोल चष्मा, गोबरा, गुबगुबीत आणी सदैव थोडेसे हास्य असणारा चेहरा.. एकंदरीत त्याच्या अवतारावरून तो बंगल्याच्या शेठचा मुलगा असावा असे वाटत होते..
"बोल की मित्रा"
"ते काय झ्यालाय, कालपासून आमच्या घरातला टीव्ही बंद पडलाय हो, सिग्नलच कॅच करत नाहीये..प्लीज तु तेवढा चालू करुन दिला तर बरा होईल.."
त्याने विनंती केली.
"ओ हॅलो, मी काही टिव्ही मेकॅनिक वगैरे नाही हा, आय एम बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स..मी एक इंजिनिअर आहे, आता जॉब वरून घरी चाललोय" मी त्याला समजावले.
"नाही पण, मघाशी तुझा बोलणा ऐकला मी फोनवर, तु कोणाच्यातरी टीव्ही रिपेअर करून देतो बोलला ना"
तो हळुवारपणे शांत आवाजात बोलत होता. पण माझे डोके गरम होत चालले होते.
"अरे, ती माझी मैत्रिण होती अंकिता, मला तिला भेटायला जायचेच आहे, म्हणुन मी तिचे काम करण्यास होकार दिला, तुला जर तुझा टिव्ही चालू करायचा असेल तर तु मॅकेनिक ला बोलव.. समजले तुला? चल जाऊ का मी"
"मॅकेनिकचा नंबर नाय ना माझ्याकडं, घरातले सगळे लोक बाहेरगावला गेलेत फंक्शन साठी, मी एकटाच आहे..त्यामधी परत टीव्ही पण बंद झाला, खूप बोर व्हायला लागलंय..बघ ना कायतरी, मी पण तुज्या फ्रेंड आहे असं समज"
तो मागेच लागला होता.
"नाही रे बाबा, माझ्या मागे माझी कामे असतात खूप"
मी आता वैतागलो होतो. स्कुटी चालु करणार तेवढ्यात त्याने त्याच्या खिशात हात घातला.
"अरे तुला पैशा पायजे असेल तर देतो ना मी, एक मिनीट, हे ठेव तुज्याकडं..वाटलं तर अजून घे, पण तेवढा टीव्ही चालू करून दे" खिशातून त्याने दोन हजारांच्या दोन-तीन नोटा काढून माझ्या शर्टच्या खिशात कोंबल्या.
अच्छा..म्हणजे पैशाचा माज आहे तर शेठच्या पोराला.. मग तर ह्याचा माज उतरवलाच पाहिजे.. आयता बकरा सापडलाय. बघुतरी ह्याच्या टीव्हीला काय झालयं ते, छोटा मोठा काहितरी प्रॉब्लेम असेल तर करून देऊ जागेवर..पैसे पण मिळतच आहेत..नाही झाला चालू तर अजून जास्त बिघडवून ठेवू..ह्याला काय समजणार आहे..
"ठिक आहे चल, दाखव तुझा टिव्ही "
मी स्कुटीचे स्टॅंड लावून चावी काढून घेतली.
आम्ही दोघेही त्या मोठ्या बंगल्याच्या गेटमधून आत गेलो.. आतील गार्डन पार करुन समोरील मोठा रंगीबेरंगी सजावटीचा सागवानी दरवाजा खोलून आतमध्ये गेलो. आतील मोठ्या हॉलमधून एक गोल जिना वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये जात होता..मी त्याच्या मागोमाग वर चाललो..त्याचा एकंदरीत अवतार पाहून मला त्याची मस्करी करण्याची इच्छा अनावर होत होती.
"काय शेठ, एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटाच राहतो व्हयं"
"राहावं लागतं भया, बाकी फॅमीली बाहेर गावला गेलीय ना, माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी नाही गेलो त्यांच्यासोबत"
"मग एवढ्या मोठ्या घरात एकट्याने राहायला भिती नाही वाटत का?"
"भिती? कशाची?"
"भुत, प्रेत, आत्मा.." मी चेष्टेच्या स्वरात म्हणले..
पण तो अचानक चालता चालता थांबला, आणी एक क्षण माझ्याकडे रोखून पाहिले.
"अजिबात नाही" आणी पुन्हा पूढे चालू लागला.
"अच्छा, म्हणजे तुला अजून भुतांचा अनूभव नाही आला, म्हणुनच घाबरत नाही वाटतं..आणी समजा मीच भुत असलो तर मग?"
मी आता त्याच्या मनामध्ये भिती भरवण्याचा प्रयत्न करायला लागलो..पण तो बळेच हसून मला टाळत होता.
आम्ही आता त्या वरच्या मजल्यावरील मोठ्या हॉलच्या एका कोपर्यात जेथे भिंतीवर टिव्ही लटकवलेला होता तेथे आलो...संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते..बंद खिडक्यातून पुरेसा संध्याप्रकाश हॉलमध्ये येत होता..त्यामुळे लाईटस काही लावलेल्या नव्हत्या.
मस्त ऐसपैस चौसष्ट इंचेस ब्रॅण्डेंड एलसीडी होता तो..
"हम्मं..काय प्रॉब्लेम आहे याला?"
"सिग्लन कॅच करत नाहीये..एकही चॅनेल दिसत नाही, मला काय फक्त सुरुवातीचे तीन-चार चॅनेल चालु झाला, तरी माझा काम होईल "
त्याने शांतपणे सांगितले..आणी बटण दाबून टिव्ही सूरु केला.
त्या मोठ्या टेलीव्हिजन स्क्रीनवर खर्र खर्र आवाज आणी मुंग्या आल्या. मी काहीवेळ वायर्स आणी कनेक्शन चेक केले आणी नंतर माझ्या लक्षात आले की चॅनेल्सची सेटिंग्स मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब झालेली होती, त्यामुळे एकही चॅनेल दिसत नव्हते..पण एवढ्या लवकर काम झाले असे त्याला वाटू नये म्हणून मी आणखी काहीवेळ टाइमपास करत राहिलो..आणी थोड्यावेळाने शेठला विचारले.
"सगळ्या चॅनेल्सची सेटिंग डिस्टर्ब झालेली आहे..टिव्हीचे ॲटो स्कॅनिंगपण काम करत नाहीये, सगळे चॅनेल मॅन्युएली परत सेट करावे लागतील, रिमोट कुठे आहे टिव्हीचा?"
"माहिती नाय, रिमोट कुठं हरवलाय तो, मला तर सापडलाच नाय" त्याने उत्तर दिले.
"पण सेटिंग एवढी डिस्टर्ब कशी काय झाली हा शेठ? एकटे असताना भलते सलते शोज बघायचा तर शौक नाही ना तुला?" विनोद करून मी स्वताच हसलो, तो शांतच होता.
"ते टिव्हीला खाली बटण्स आहेत, त्यानेच चॅनेल्स चेंज करत असतो मी.. त्यावर सेटिंग करायला नाय जमणार का?"
त्याने सांगितल्याप्रमाणे बटणांच्या साहाय्याने सगळे चॅनेल सेट करायचे म्हणजे मला बराच वेळ लागणार होता.. तसेच त्याच्याकडून अजून काही पैसे उकळण्याची पण माझी इच्छा होती..त्यामुळे थोडावेळ विचार करून मी म्हणले,
"कसंय ना शेठ, तुला माहित नाही पण संध्याकाळनंतर एकटे असताना कधीही बटणावर मॅनुएली चॅनेल्स सेट करायचे नसतात. त्यामध्ये पण रिस्क असते, ज्या फ्रिक्वेन्सी बॅंड ला कोणतेही चॅनेल सेट केलेले नसते, त्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल कॅच करून त्या माध्यमातून बाहेरील वातावरणात भटकणारे आत्मे तुमच्या घरामध्ये पण येवू शकतात..माझे काय मी तर सेटिंग करून निघून जाईल, पण तु तर घरात एकटाच राहणार आहेस.. त्यामुळं तु एक काम कर, मला अशा आणखी दोन नोटा दे, मग बघ मी कशी सेटिंग करतो, भुत काय त्याचा बाप सुद्धा तुझ्या टिव्हीच्या जवळपास फिरकणार नाही, बघ मग ठरव, तुला काय करायचे ते."
टिव्हीच्या खर्र..खर्र आवाजात मी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करायला लागलो..तो पण थोडासा चपापला.
"हे बघ, आणखी पैसे नाहीत माझ्याकडं.. तुला टिव्ही चालू करता येत असेल तर कर, नाहीतर माझ्या घरातून निघून जा, पण सारखा शारखा भुताचा नाव माझ्यासमोर काढू नको..मी नाही मानत भुत बित वगैरे काय असते ते"
त्याच्या आवाजावरून तो थोडासा भेदरल्यासारखा वाटत होता, त्यामुळे मला जास्तच चेव आला.
"म्हणजे तुला विश्र्वास नाही माझ्यावर, ठिक आहे..बघ आता भुताचे सिग्लनच सेट करुन ठेवतो ह्या टिव्हीवर, जेव्हा तुला अनुभव येईल तेव्हा कळेल बरोबर..मग तुला माझी आठवण येईल"
मी थोडीच त्याला बोलायला ऐकणार होतो.
मी बटणांच्या साहाय्याने सेटिंग मध्ये जावून वेगवेगळ्या सिग्नलवर जावून एकेक चॅनेल स्कॅन करून सेट करू लागलो.. तो माझ्या हालचालींचे बारीक निरीक्षण करत होता..न्युज, स्पोर्टस, म्युजिक असे वेगवेगळे आठ-दहा चॅनेल सेट केले..आता त्याची चुळबुळ वाढली होती.
"बास..भया, आता बास झाला" तो काहीशा मोठ्या आवाजात म्हणाला.
"काय? फक्त एवढेच चॅनेल बघणार तु?"
"हा., एवढेच बघतो मी, तशीपण मी पाहलीय तुला सेटिंग करताना, मला वाटलं तर बाकी चॅनेल मी नंतर सेट करेल, तु आता जा लवकर येथून"
तो भिंतीवरील घड्याळाकडे पाहत म्हणाला..घड्याळाचा काटा सातच्या पुढे सरकला होता.
"अरे व्वा! मघाशी मी जात होतो तर बळेच हाताला धरुन घरात आणले, आणी आता तुझे काम झाले तर लगेच जा..काय शेठ, एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक तु आणी थोड्या पैशाचा विचार करतोस.. काही नाही, आता मी सगळे चॅनेल सेट करून मगच येथून जाणार..आणी माझे बाकीचे पैसे पण घेवून जाणार." मी पण हट्ट धरला.
मी माझे सिग्नल स्कॅनिंगचे काम पुढे सुरूच ठेवले.. त्याच्या वाढलेल्या चुळबुळीकडे मी दुर्लक्ष करत होतो.. लवकरच एक चॅनेल स्कॅन होणार होते..पण अचानक पुढे होवून त्याने माझा हात पकडला.
"तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? संध्याकाळचा टाईम संपलाय.. सात वाजून गेलेत..घरामध्ये पण कोणी नाही आणी तु येथे चॅनेल स्कॅन करत बसला आहेस..चुकून नको असणारा सिग्नल पकडला तर.."
बोलता बोलता तो थांबला, टिव्हीकडे बोट दाखवून मागे मागे सरकू लागला, त्याचा भयभीत चेहरा घामाने भरुन गेला होता..मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो..त्याचे बोट पाहुन मी चमकून टिव्हीकडे पाहिले..
स्क्रीनवरील मुंग्या कमी कमी होवून कुठलेतरी चॅनेल स्कॅन झाले होते..बहुतेक कुठल्यातरी हॉरर हॉलीवूड मुव्हीचा सीन असावा तो..स्क्रीनवर हळुवारपणे एकामागोमाग एक धुरकट, प्रकाशमान, पांढ-या मानवआकृती उभारून येत होत्या..एक, दोन...सात, आठ..अजून..
हे हॉलीवूड वाले पण ना..काय बनवतील याचा नेम नाही..
"तुला केव्हापासून सांगत होतो मी..पण तु ऐकत नव्हतास, आता बघ तो चॅनेल लागला टिव्हीवर.."
तो घाबरत म्हणाला.
"हा..! हा..हा.!"
पण त्याची अवस्था पाहून मला मात्र हसायला आवरत नव्हते.. स्वताच्याच हातावर टाळी देत मी त्याच्याकडे पाहुन पोट धरून हसू लागलो.
"काय शेठ, तु पण ना..आधी तर म्हणालास तुला भुताची अजिबात भिती वाटत नाही म्हणून..आणी टिव्हीवरचा साधा हॉरर सिनेमा पाहूनच तुझी एवढी फाटते."
"हा सिनेमा नही भया, तु खरा बोलला होतास, रात्र पडल्यावर घरामधे एकटा असताना कधी सिग्नल स्कॅन करायचे नसतात.. चॅनेल सेट नसलेले सिग्नल कॅच करून त्या माध्यमातून बाहेरील वातावरणातील भुते घरामधे येवू शकतात.."
तो आता गंभीरपणे बोलत होता, त्याच्या चेहर्यावरील भय आता हळूहळू कमी होत चालले होते आणी त्यासोबत माझ्या चेहर्यावरील हास्य सुद्धा..
"एकटा? पण..पण आपण तर दोघे आहोत ना?" मी आश्चर्याने विचारले.
"मी जिवंत माणशाची बात करतोय रे, सध्यातरी ह्या घरात जिवंत तर तु एकटाच आहेस ना भया.."
त्याचा बदललेला आवाज आणी चेहर्यावरील बदलत चाललेले हावभाव पाहून आता माझी छाती धडधडायला लागली होती..हे सगळे प्रकरण मी जितक्या हलक्यात घेत होतो ते तितके किरकोळ नव्हते हे मला आता समजले होते.
"मी..मी घरी जातो शेठ, मला उशीर होतोय"
मी उठून घाईघाईने तेथून निघून चाललो होतो, पण त्याने माझा हात पकडून मला थांबवले.
"आता तुला ज्याता येणार नाही, आता उशीर झालाय"
त्याने टिव्हीच्या दिशेने इशारा केला..,स्क्रीनवरील पांढर्या धुरकट आकृत्या आता हळुहळु टिव्हीच्या बाहेर पडताना दिसत होत्या..
आता मात्र भितीची कळ माझ्या डोक्यापासून पायापर्यंत गेली..मी त्याचा हात झिडकारला आणी तेथून धुम ठोकत वरच्या मजल्यावरील जिन्याने वेगात तळमजल्यावर आलो..हॉलच्या बाहेर जाण्यासाठी बंद असणारा दरवाजा खोलण्याचा अटोकाट प्रयत्न करू लागलो. पण दरवाजा उघडतच नव्हता..
माझ्या मागुन पावलांचा टपटप आवाज हळूहळू जवळ जवळ येत होता..मी मागे पाहिले, मागे तोच उभा होता..पण आता त्याचा चेहरा आधीसारखा चिकणाचोपडा नाही तर अत्यंत भेसूर दिसायला लागला होता..चष्याच्या आतून त्याचे लालभडक डोळे मला निरखत होते..
"दोन बरसपुर्वी माझी ह्या घरात डेथ झाली होती, तेव्हापासुन मी वाट पाहत होतो..त्यानंतर आता कुठं महिन्याभरासाठी माझी फॅमीलीवाले लोक बाहेरगावला गेलेत म्हणून मला असा आधीसारखा, जिवंत माणसासारखा राहायचा चान्स मिळाला.. पण असा एकटा एकटा राहुन बोरं व्हायला लागला म्हणुन टिव्हीचे सिग्नल वापरून बाहेरची भुत घरात बोलावून मला त्यांच्यासोबत खेळायचे होते..पण ते करण्याच्या प्रयत्नात काल सिग्नलची सेटींग बिघडून टिव्ही खराब झाला.. बिघडलेला टिव्ही रिपेअर करण्यासाठी तुला आणला, तु तुला सांगितला तेवढा काम करून चूपचाप इथून निघून जायला पायजे होतास भया, पण तु तुझा आगावपणा दाखवून खरोखरच बाहेरच्या भुतांना घरामंदे आमंत्रित केलास..मला पण माज्या खर्या रुपात येण्यास भाग पाडलंस..पण बरं झालं एकमेकांच्या सोबत खेळून आम्ही बोर झालो असतो..पण आता आमी सगळे मृतात्मे मिळून तुझ्यासोबत खेळणार.."
विक्षीप्तपणे हसत हसत, रोखलेल्या नजरेसोबत तो हळुहळु माझ्याकडे येत होता..दरवाजा खोलण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर घामाने डबडबलेल्या मी इकडेतिकडे पाहिले.. त्या हॉलमध्ये सर्वबाजूंनी एकामागोमाग एक बिनचेहर्याच्या पांढर्या, धुरकट मानवआकृत्या हळुहळु प्रकट होत होत्या..
एक, दोन....सात, आठ..अजूनही..
आजवर भुताखेतांना काल्पनिक मानणारा मी, आज माझ्या हेकेखोर स्वभावामुळे भलत्याच संकटात सापडलो होतो,
अशा भयानक प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी आता काय करावे हे मला काहीच सुचत नव्हते, दरवाजा जवळ उभा राहून मोठमोठ्याने आरोळ्या मारण्यापलीकडे मी काहीही करू शकत नव्हतो..अशा भीषण संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला एखादा मार्ग सुचत असेल तर तुम्ही तरी सांगा..!
#समाप्त.
©लेखक - Dnyanesh Vitthal Waghunde.