#तिरंगा
‘कान्हेवाडी’ महाराष्ट्रातील सांगली शहरापासून वीस किलोमीटर दूर असणारे एक छोटेसे खेडेगाव..त्या गावातील छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये शे दिडशे शेतकरी कुटुंबे राहायला होती.
तेथल्याच एका वस्तीवरच्या मळ्यात तानाजीचे पण एक घर होते.. सकाळची वेळ होती..आज घरात तानाजीची पत्नी ‘इंदू’ नेहमीप्रमाणे घरकाम आवरतच होती तेवढ्यात तिला घराबाहेर आवाज ऐकू आला..
“पप्पा आले...पप्पा आले” पाच वर्षाच्या सोनीचा आवाज तिच्या कानावर पडला..इंदू साडी सावरत आतल्या खोलीतून बाहेर येऊन पाहु लागली..घराबाहेरच्या अंगणात तिचा पती तानाजी उभा होता. अंगात लष्करी गणवेश, पायात काळे बुट, डोक्यावर टोपी आणी पाठीवर बँग अशा सैनिकी वेशामध्ये..सोनी लाडाने त्यांच्या अंगावर उडी मारून बसलेली होती.. आज जवळपास सहा महिन्यानंतर ती तिच्या पप्पांना भेटलेली होती ना..आपल्या पतीला असे अचानक आलेले पाहून इंदूला आश्चर्य वाटले,दरम्यान तानाजीची व्रूद्ध आई पण घरातून बाहेर आली..तानाजीला पाहून तिच्या चेहर्यावर समाधान पसरले.
“आरं पोरा..एखादा फोनतरी करायचा व्हता कि आज येणार हाईस म्हणुन..फोनबी नाय, कुठल पत्रबी नाय अन अचानकच आलास”
तानाजीची आई म्हणाली.
“हो ना..आधी कळवले असते तर सकाळीच सर्व कामे आवरून ठेवले असते कि मी” इंदू हसत बोलली.
“अगं ऐवढा वेळच मिळाला नाही मला..अचानकच रजा मंजूर झाली, म्हणल चला यावेळी तुम्हाला न कळवताच घरी येऊ” तानाजीनेही हसून उत्तर दिले आणी सोनीचे लाड करत तो घरामध्ये शिरला.
तानाजी हा सांगली जिल्ह्यातील कान्हेवाडीचा तरुण भारताच्या लष्करी सेवेत होता. पंजाब, काश्मिर आणी ईशान्य भारतात त्याची फिरती पोस्टींग असायची..दर सहा महिन्यानंतर त्याला घरी जाण्यासाठी काही दिवस रजा मिळायची..रजा मिळाली कि तो त्याच्या गावी यायचा आणी कुटुंबासमवेत काही दिवस घालवून पुन्हा सेवेवर रुजू व्हायचा ..पण यावेळी मात्र तो अचानकपणे पुर्वकल्पना न देताच घरी आला होता..
घरात येताच तानाजीने लष्करी पोशाख उतरवला आणी घाईघाईने स्नान उरकून चहापाणी घेऊन लहानग्या सोनीसोबत काहि वेळ खेळत बसला..नंतर काही विचार करत त्याने इंदूला लवकर आवरून तयार होण्यास सांगितले,
“कायम मला म्हणायचीस ना..सांगलीला फिरायला घेऊन चला.. थिएटरमध्ये सिनेमा दाखवा म्हणुन..चल मग आज जाऊनच येऊ आपण”
“आजच कशाला मग..नंतर जाऊ कि..रातभर प्रवासान दमला असाल तुम्ही” इंदुनी नकार दिला.
“अग जो सिनेमा आपल्याला पाहायचाय ना तो उद्या नाही राहणार थिएटरमध्ये..आणी प्रवासात आराम झालाय माझा..चल ग सोनी आवर पटापट” तानाजीने मुलीला सांगितले..सोनी पण आईच्या मागे लागली..
आपण आपल्या नवर्यासोबत शहरात जाऊन खूप फिरावे.. थिएटरमध्ये सिनेमा पाहावा असे इंदूला नेहमीच वाटायचे..
पण तिचा नवरा कायमच बंदूक घेऊन देशाच्या सिमेवर तैनात असायचा..कधीकाळी सुट्टीवर घरी आला तरी मित्रमंडळी आणी नातेवाईकांमध्येच जास्त रमायचा.. शेतीची अपुर्ण कामे पुर्ण करायचा..त्यामुळे तिची ईच्छा आजवर तशी अपुर्णच होती. पण आज ती पुर्ण होण्याचा योग आला होता..
तानाजीने गोठ्यातून अनेक महिन्यांपासून धूळ खात असलेली त्याची दुचाकी बाहेर काढली..आपल्या आवडत्या दुचाकीला निरखून पाहत धूवून चकाचक स्वच्छ केली.. घरात जावून त्याच्या बँगेतून एक कागदाचा तिरंगा झेंडा आणुन गाडीच्या हँण्डलला अडकवला..
तोपर्यंत इंदु आणी सोनी नटुन थटून तयार झाल्या होत्या.. सोनीला गाडीवर पुढे बसवून तानाजीने गाडी सुरू केली.. इंदु पाठीमागे बसताच ते तिघेही कान्हेवाडीच्या कच्या रस्त्याने हळुहळु सांगलीकडे निघाले..गावातून जात असताना इंदु तानाजीच्या खांद्यावर हात ठेऊन अगदी रूबाबात बसली होती..
काहीवेळातच ते तिघे सांगलीत पोहोचले..तिथल्या एका चांगल्या सिनेमागृहात जाऊन त्यांनी त्यांचा आवडता सिनेमा पाहिला.. सिनेमा पाहून झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये एकत्र जेवणही केले..त्यानंतरही ते दिवसभर शहराच्या आसपास निरनिराळ्या प्रेक्षणीय ठिकाणी फिरत होते, सुट्टीचा खर्या अर्थाने आनंद घेत होते..घरातील सर्वांसाठी कपड्यांची व इतर वस्तुंची खरेदी त्यांनी केली.. लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानातून सोनीला आवडलेली छोटी सायकल खरेदी करुन तानाजीने गाडीला मागे बांधली..
इंदू आणी सोनी दोघीही आज खूप खूश होत्या.. आज तानाजी त्या दोघींच्या छोट्या छोट्या ईच्छा पुर्ण करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत होता..इंदुला आज आपला नवरा काहिसा वेगळाच वाटत होता.
घरी परतायला त्यांना रात्र झाली होती..दिवसभर दमल्यामुळे इंदू आणी सोनी आल्याबरोबर झोपण्याच्या तयारीत लागल्या..गाडी परत गोठ्यात लावून तानाजी त्याच्या आईच्या खोलीत शिरला, आई जेवण करून झोपली होती..तानाजीने आईचा चरणस्पर्श करताच ती उठून बसली,
“आलास व्हय ..निदान आजतरी आराम करायचास पण आधीपासूनच मोठा धडपड्या तु..जराबी आराम नगच म्हणतोस जीवाला” आईने नाराजी व्यक्त केली.
“अग आई, आता खूप आराम करणार हाये..काळजी करू नगस” तानाजी हसत हसत उत्तरला.
“तु शिकव आता मला..तुझी आई हाय मी..लहानपणापासून वळखतेय तुला..तुझा बा आजारपणात गेला तवापासून तुला फक्त कष्ट करायचेच माहिती हाये..शेतीच काम बघून आणी गाईंचे दुध विकुन शिक्षण पुर्ण केलस तु..तुझ्या बरोबरीची गावची पोर शाळा सोडुन घरी बसली तरी दररोज सायकल मारीत तालूक्याच्या मोठ्या शाळेत जायचास..शिक्षण पुर्ण झाल्यावर हातची नोकरी सोडून देशाच्या फौजेत दाखल झालास..लगीन केलस, एक पोरगीबी झाली..तवापासून कायम बाहेरच असतोस..वर्षा- सहा महिन्यान कवातरी घरी येतोस तरी अजूनबी धावपळ करतोस..अन तु कवा आराम करायचास”
आईच्या बोलण्यात मुलाविषयी कौतूक होते..भुतकाळातील घडुन गेलेल्या वेगवेगळ्या घटनांना ती उजाळा देत होती.. तानाजी काहीवेळ फक्त गप्प राहून ऐकत होता.
“आई..ते जाऊ दे, मी काय सांगतोय ते ऐक. देशाच्या सिमेवरच वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललेय..दररोजच्या हल्ले प्रतिहल्ल्यात आपले अनेक सैनिक बळी पडत असतात..देव न करो, पण उद्या कदाचित मलापण काही झाले तर शहिद जवानांच्या परिवारासाठी सरकार ज्या योजना राबवत असते त्याची थोडक्यात माहिती मी तुला देतो..तेवढी ऐकून घे..भविष्यात कदाचित याची गरज भासू शकते”
तानाजीचे हे बोलणे ऐकून आईला धक्का बसला..पण तानाजीचा गंभीर चेहरा पाहून तिने त्याला रोखले नाही..त्याचे बोलणे तिच्यासाठी वेदनादाई होते..पण तिने सर्व निमुटपणे ऐकून घेतले..
त्यानंतरही खूप वेळ ते दोघे अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहिले.. जून्या आठवणींना उजाळा देत राहिले..रात्र वाढत चालली होती.. पण मायलेकरांना जणु आज झोप लागणारच नव्हती..
तिकडे दुसर्या खोलीत सोनीला झोपवून इंदु बराच वेळ तानाजीची वाट पाहत जागीच होती..पण नंतर कंटाळून ती पण झोपी गेली..
मध्यरात्री केव्हातरी तानाजी आईच्या खोलीबाहेर पडला..आणी इंदुच्या खोलीत गेला..तेथे गाढ झोपेत असणाऱ्या इंदू आणी सोनीकडे काही वेळ एकटक नजरेने पाहत राहिला.
************
दूसर्या दिवशी सकाळी इंदू उठली..आणी नेहमीच्या उत्साहाने घरातील कामे आवरू लागली..काहिवेळानंतर घरातील टेलीफोनची रिंग वाजली..तिने फोन उचलून कानाला लावला.. पलीकडून कोणीतरी अंत्यत गंभीर आवाजात बोलत होते.
“जय हिंद...तानाजी कान्हेंच्या घरचा नंबर आहे का”
“हो..बोला, मी त्यांची पत्नी बोलतेय”
“ताई, तुम्हांला कळविण्यास अत्यंत दुखः होत आहे..काल पहाटे काश्मिरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्यात तुमच्या पतींना वीरमरण प्राप्त झालेले आहे.. पुढील सर्व प्रोसेस पुर्ण करून आज त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी मुळगावी पाठवण्यात…”
वाक्य पुर्ण होण्याच्या आधीच इंदुच्या हातातील फोन खाली गळून पडला..तिने धावत जाऊन घराच्या सर्व खोल्या तपासल्या.. पण तानाजी कुठेच नव्हता..
ती घराबाहेर आली..बाहेर अंगणात चिमुरडी सोनी तिला कालच आणलेली नवीन सायकल खेळताना दिसत होती..काल तिच्या पप्पांच्या गाडीला दिसत असणारा कागदाचा तो चमकदार ' तिरंगा झेंडा’ आज मात्र सोनीच्या छोट्या सायकलला अडकवलेला दिसत होता..
सांगलीपासुन हजारो किलोमीटर दूर असणार्या काश्मिरमध्ये काही जणांना ‘जन्नत’ मध्ये जाण्याची जास्त घाई झाल्याने त्यांनी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करुन त्या सैनिकांच्या कुटुंबियांना कायमचे नरकात पाठवले होते..
परकीय हल्लेखोरांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी कान्हेवाडीच्या शेतकर्याचे पोर सिमेवर शहिद झाले होते.
समाप्त.
© लेखक - Dnyanesh W.