निरोप -marathi bhutachya goshti
पूर्ण कथा
रात्रीचे साडेनऊ होऊन गेले होते. प्रकाश आपल्या बंगलोच्या समोरील पोर्चमधील रिक्लायनर चेअरवर रेलून बसला होता. अंधार दाटु लागला होता.हवेत छान गारवा जाणवत होता.....जवळच कुठेतरी पाऊस पडला असावा. प्रकाशची नजर शून्यात होती. बंगलोच्या समोरील रस्त्यावरून तुरळक वाहनांची ये-जा सुरु होती. गाडी येताना काही क्षण प्रकाशाचा झोत दिसे अन पुन्हा तोच मिट्ट काळोख. पण प्रकाशला या काळोखाची आता सवय झाली होती. गेली दहा-बारा वर्ष तो इथं एकटाच राहात होता......गावापासून एक-दीड किलोमीटर दूर....या बंगलोमध्ये.....इथला एकटेपणाच जणू त्याचा सोबती बनला होता.....अन रात्रीचं असं बाहेर पोर्चमध्ये बसून ये-जा करणारी वाहने बघणं, हा त्याचा नवीन पासटाईम होता. आकाशात अचानक विजेचा लखलखाट झाला......प्रकाशनं आकाशाकडे नजर वळवली......काळे ढग दाटू लागले होते.....वारा आता नुकतंच जन्मलेल्या वासरासारखा चोहीकडे दौडू लागला होता.......हलकेच धुळीचे लोटही उठू लागले........पाऊस येणार बहुतेक.....प्रकाश उठला अन आत गेला.
****
साडेदहा वाजत आले होते.....एव्हाना बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता.....वाऱ्याने तर ताळाच सोडला होता....... एखाद्या मस्तवाल हत्तीसारखं रौद्र रूप त्यानं धारण केलं होतं......अन त्याच्या नादी लागून पावसाच्या सरीही पिसाटल्यासारख्या झाल्या होत्या.....
हॉलच्या मध्यावर असलेल्या गोलाकार झुंबराखाली ठेवलेल्या शिसवी लाकडाच्या आरामखुर्चीवर प्रकाश बसला होता....हलकेच हेलकावे खात तो समोरच्या खिडकीतून वळवाच्या पावसाचा हा धुमाकुळं पाहत होता....गेटबाहेरील रस्त्यावरून क्वचितच एखादं वाहन जात होत.....
वळवाचा पाऊस.....!!! अशाच पावसात एके सायंकाळी त्यानं अन शुभ्रानं मस्त धमाल केली होती.....शुभ्रा ....त्याची सहा वर्षाची मुलगी......तिच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं .....समोरच्या मेजवर ठेवलेला तिचा फोटो हातात घेऊन त्यानं हलकेच उराशी कवठाळला.
पुढच्याच क्षणाला स्वतःला सावरत तो परत खुर्चीकडे वळला....अन त्याला बंगलोच्या लोखंडी गेटचा आवाज आला....कुणीतरी गेट उघडलं बहुतेक....
कोण आलंय एवढ्या रात्री मरायला ....फुकटची डोकेदुखी.....प्रकाश काहीसा वैतागला. ह्या एकटेपणाची त्याला इतकी सवय होती कि त्याला आता कुणाशीच संपर्क.....संबंध नको होता......त्यात कुणी असं आगंतुक येणं म्हणजे त्याच्या सहनशीलतेचा अंतच.....!!!
एवढ्यात डोअरबेल वाजली......उघडावा का डोअर .....का नकोच.....!! एवढ्या रात्री कोण असेल....?? कुणी चोर वगैरे तर नसेल.....??? पण खरंच कुणाला मदत हवी असेल तर....??
तो पुढं झाला आणि डोअरच्या लेन्समधून बाहेर पाहू लागला..... पोर्चमधील दिव्याच्या मंद प्रकाशात त्यानं पाहिलं....कुणी स्त्री उभी होती....पस्तिशीच्या आसपासच वय असावं.....पावसात भिजली असावी.....थंडीनं कुडकुडत होती बिचारी.....
घ्यावं का नको आत.....?? खरंच गरजू आहे का काही फार्स असेल.....???
मनाचा हिय्या करत त्यानं डोअर उघडला....
"माफ करा हं .....तुम्हाला त्रास देतीये....पण हा पाऊस बघा ना.....थांबतच नाहीये.....रेनकोट पण नेमका आजच विसरला.....स्कुटर चालवणं शक्यच होत नाहीये....अन तुमचा बंगला दिसला.....वाटलं - थांबावं थोडावेळ....आत येऊन थांबले तर चालेल ना....??? पाऊस ओसरला कि जाईन मी....प्लिज....!!!"
आवाज एवढा मधाळ......प्रकाश ऐकतच राहिला....कुण्या बाईचा आवाज ऐकून दहा-बारा वर्ष होऊन गेली होती....
"तुम्हाला आवडणार नसेल तर जाते मी....त्रास दिल्याबद्दल सॉरी हं .....!!" अन ती जायला निघाली.
"माफ करा....मी तुम्हाला ताटकळतच ठेवलं बाहेर....या ना....आत या....!!" प्रकाश बाजूला सरकला आणि तिला घरात घेत त्यानं डोअर बंद केला.
हॉलमध्ये आत आल्यावर त्यानं तिला निरखून पाहिलं....बाई खरंच सुंदर होती....तीनं साडी नेसली होती...कसल्याश्या ड्रेसकोड सारखी.....लांब केसांची वेणी कमरेपर्यंत आली होती.....पावसात भिजल्याने ती स्त्री अजूनच मादक दिसत होती.....तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा करत तो पटकन बाजूच्या बेडरूममध्ये गेला अन एक टॉवेल अन ड्रेस घेऊन आला.....
"त्या समोरच्या बेडरूममध्ये जा....केस नीट पुसून घ्या....अन हा ड्रेस घाला....माझ्या बायकोचा ड्रेस आहे....स्वच्छ आहे..."
ती उठली अन ड्रेस व टॉवेल घेऊन बेडरूमकडे वळली.....तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहताच राहिला...पुढची पंधरा मिनिट जणू तो आरामखुर्चीत बसून तिची वाटच पाहत होता....अन ती बाहेर आली....पांढरा रंग तिच्या अंगावर अजूनच खुलून दिसत होता....ती येऊन काहीसं अंग चोरून सोफ्यावर बसली.....अन काहीतरी बोलायचं म्हणून बोलली-
"माफ करा हं ....मी ओळख करून द्यायला विसरले....मी मीना.....आपल्या गावच्या पुढं - संग्रामपूर गावात आरोग्य केंद्रात नर्स आहे......दोन महिन्यांपूर्वीच बदली झाली आहे इथं...... माझं गाव केळघर -तुम्हाला माहीतच असेल....रोज संग्रामपूरला अप-डाऊन करते स्कुटरवर....आज उपकेंद्रातून निघायला उशीर झाला...एका पेशंटला IV लावावं लागलं....अन ते संपायलाच साडेनऊ झाले.....त्यामुळे उशिरा निघाले अन पावसान गाठलं ...!!"
म्हणजे तिच्या अंगावरील साडी हा ड्रेस कोडच होता.
" माफ करा पण माझ्याकडे खायला काहीही नाहीये....म्हणजे मी बनवतच नाही.....!!"
प्रकाश काहीसा संकोचाने म्हणाला.
"नको...नको.....त्याची काही गरजही नाही....मी तुच्या गावातल्या त्या इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा -सामोसा घेतला आहे, घरी पोहोचायला उशीर लागणार म्हणून....आणि तुम्ही इथे एकटेच राहता.....?? घरी दुसरं कुणी दिसत नाहीये...!!"
"हो....मी एकटाच राहतो.....बायको अन मुलगी बारा वर्षांपूर्वी कार ऍक्सिडेंटमध्ये गेले.....नंतर दुसरं लग्न वगैरे केले नाही......चाळीशी गाठली.....अन तसही मला त्या गोष्टीत काही इंटरेस्ट राहिला नाहीये.....!!"
भावनांना आवर घालत प्रकाश म्हणाला.
"ओह ...सो सॉरी.....!!" मीना उद्गारली.
अन काहीवेळ शांतता. बाहेर फक्त धो-धो पावसाचा आवाज येत होता. कोपऱ्यातल्या फायर प्लेसकडे मीनाचं लक्ष गेलं....
"तुमची हरकत नसेल तर थोडं शेकूयात का....?? थंडी फारच आहे....नाही....??" ती म्हणाली.
"प्लिज नको.....मला धुराची ऍलर्जी आहे...!!" ठाम नकार देत प्रकाश उठला आणि त्यानं टीव्ही सुरु केला.
"तुमच्या घरी कोण-कोण असतं ....??" परत खुर्चीवर येऊन बसत त्यानं विचारलं.
"सध्या मी आईकडे माहेरी राहते.....आई आणि मी....बाबा सहा वर्षांपूर्वी गेले......माझं लग्न झालं होतं ....पण लग्न कसलं- फसवणूकच म्हणा. नवरा पक्का दारुडा होता..तरीही आईच्या सांगण्यावरून संसार करत राहिले. प्रेग्नन्ट होते मी अन एक दिवस त्या दारुड्याच्या मारहाणीत गर्भपात करावा लागला.....मग सोडून दिलं त्याला....आईकडे असते आता..."
डोळे पुसत मीना म्हणाली. तिची कहाणी ऐकून प्रकाशही भावुक झाला.
"पोटच्या मुलाला गमावणे किती क्लेशदायक असतं - मी समजू शकतो." आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ होत प्रकाश म्हणाला.
पावसाचं तांडव अजूनही सुरुच होतं. बंद होण्याऐवजी त्याचा जोर वाढतच चालला होता. बारा वाजून गेले असतील. मीना टीव्हीवर सुरु असलेलं न्यूज चॅनेल पाहत होती.
प्रकाश उठला....
"मी झोपायला चाललोय.....पाऊस थांबेल असं वाटत नाही.....तुम्ही सकाळीच निघा.....या बाजूच्या बेडरूममध्ये झोपू शकता.....पाणी वगैरे हवं असेल तर किचनमधून घ्या. तिथे वरती माझी बेडरूम आहे. काही गरज पडल्यास आवाज द्या. आणि हो......माझं नाव-प्रकाश...!!"
प्रकाश जिना चढून झोपायला गेला.
मीना सोफ्यावर आडवी होऊन न्यूज बघत होती. तिलाही पेंग आला अन तिने डोळे मिटले.
*****
सकाळी साडेसहा -सात झाले असतील. मीना उठून बसली. रात्रभर ती सोफ्यावरच झोपली होती. अंग काहीसं अवघडलं होतं . घरात हालचाल नव्हती.....प्रकाश अजूनही झोपला असावा. तीन पर्स उचलली.....ती जिन्यातून वरती गेली. प्रकाशच्या रूमचा दरवाजा ढकलला. पण तो आतून बंद असावा. तीनं दरवाज्याला कान दिला......आत कसलीच हालचाल नव्हती. तो अजूनही झोपला होता. ती जिना उतरून खाली आली अन पर्समधून कागद काढून नोट लिहिली-
"कालच्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद- मीना " अन खाली आपला मोबाइल नंबरही लिहिला.ती नोट टीपॉयवरील पॉटखाली सरकवून ओली साडी तशीच हातात घेत ती घरातून बाहेर पडली.
स्कुटरच्या डिक्कीत साडी ठेवून ती स्कुटर घेऊन बंगलोबाहेरच्या रस्त्याला लागली. शंभरएक मीटर पुढे गेली असता सायकलवरून जाणाऱ्या एका दुधवाल्याने तिला हात केला. ती थांबली.
"तुम्ही त्या संग्रामपूरच्या दवाखान्यातल्या नर्सबाई ना....??"
दुधवाल्याने विचारलं.
"हो.....काय काम आहे....??"- मीना वैतागलेल्या सुरात म्हणाली.
"अहो त्या बंगल्यात का गेला होता....?? तुम्हाला माहिती आहे का....प्रकाश सरपोतदारांचा बांगला आहे तो....!!"
"माहित आहे मला....मग काय...??? निघू का मी...??" मीना म्हणाली.
"अहो बाई....तिथं जात जाऊ नका....बारा वर्षापूर्वी त्या प्रकाशन आपल्या बायकोचा खून केलाय त्या घरात.....अहो बायको फार लफडेबाज होती त्याची....अन हा प्रकाश सदैव पैश्याच्या मागे.....त्या बाईनं आपल्या यारासोबत पळून जाण्यासाठी पोटच्या पोरीला मारलं अन पळाली यारासोबत......पण प्रकाशन तिला अन तिच्या याराला एक महिन्याच्या आत शोधून काढलं अन त्या बंगल्यात आणून दोघांनाही पिस्तुलाच्या गोळ्या झाडून ठार केलं...."
"शॉकिंगचं आहे.....पण मला हे सारं माहिती नव्हतं......माहिती असतं तर गेलेच नसते त्या घरात. पण माणूस तर चांगला वाटला मला....!!!" मीना म्हणाली.
"कोण माणूस बाई....?? ते दोन खून केल्यावर प्रकाशनं स्वतःला झुंबराला लटकऊन जीव दिला...तो बंगला आता रिकामाच असतो....कुणी राहत नाही तिथं....!!"
असं बोलून तो दूधवाला निघून गेला.
आता मीनाचे हात-पाय लटलट कापू लागले.....कालची ती रात्र आठवून तिचं अंग शहारलं.....ओठ कोरडे पडले....डोळ्यापुढं अंधारी आल्यासारखं वाटलं.....इतक्यात फोन वाजला......भांबावलेल्या अवस्थेत तीनं फोन कानाला लावला.....खूपच खरखर ऐकू येत होती.....अन त्या खरखरीतही तीनं तो आवाज ओळखला-
"अहो....निरोप न घेताच गेलात....?? या पुन्हा अशाच केव्हातरी...!!!" आवाज प्रकाशचा होता.
(समाप्त)
- दीपक पाटील