महालगड भाग 24 - अंतिम
नखं सोलली गेली होती. जळत्या निखाऱ्यावरून एखाद्याने चालत यावे, अशी त्याच्या पायांची गत झाली होती. अंगावरचे कपडे फाटून चिंध्या झालेले होते. जागोजागी कपड्यासोबत कातडीचीही लक्तरं लोंबत होती. पूर्ण शरीर काळं पडत चाललं होतं. शरीरातील एकूण-एक नस फुगली होती. रक्तप्रवाह दुपटीने वाढल्यामुळे शिरा शरीर ताणत होत्या. इतक्या, की त्यातील काही बाहेरून देखील दिसत होत्या.
हे बदल त्यात नेहमी होत असे. त्यात येणाऱ्या त्या असुरा मुळे त्याचं शरीर स्फोटक आणि अवजड व्हायचं. त्याला धड चालता सुद्धा यायचं नाही नीट.
आईने आणि यमाबाईने त्याला पहिल्यांदा अश्या स्थितीत पाहिलं होतं. त्या दोघीही प्रचंड घाबरल्या. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. आईच्या हालचाली वेग धरू लागल्या. आपली मुलगी एका राक्षसाच्या पायावर पडलीय, हे पाहून तिचा स्वतःवर ताबाच राहिला नाही. यमाबाईला धक्का देत ती झपझप पायऱ्या उतरून खाली येऊ लागली. त्याच्या समोर येऊन उभी राहिली. थोडं अंतर होतं. आता जे होईल, त्याला सामोरं जायचं ! जीव असाही जाणार होताच ! मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात गेला तर काय नवल ?
आईने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ते अत्यंत भयानक होते. प्रतिशोध आणि दहशतीचं बिंब त्यात उतरलं होतं. पूर्ण राख होण्याआधी, कोळश्याला आलेला लालसरपणा त्याच्या डोळ्यात उतरला होता. एक असुरी धुंद होती त्यात ! आईने त्याच्याकडे पहाताच तिला भोवळ येऊ लागली. तिचं डोकं थोडं गरगरलं. काही क्षण सगळं डोळ्याभवती फिरू लागलं.
"नका बघू ! " यमाबाईने वरून आईला सांगितलं. पण उशीर झाला होता. आई त्याच्यापासून लांब फेकली गेली होती. एका भिंतीला धडकून ती जमिनीवर पडली. तिचं शरीर अचानक संवेदनहीन झालं. अवयवांच्या हाल हालचाली बंद झाल्या. हालचाल करायची आपली किमान शक्ती डोळ्यानी कुणीतरी खेचून नेल्याचं तिला जाणवलं. आता तिला डोळ्यांनी दिसत होतं, कानाने ऐकू येत होतं. विचार करता येत होता. स्पर्शाच्या जाणिवा आणि वेदनांची सूचना , दोन्ही क्षणात संपुन गेल्या होत्या. आपल्या मुलीकडे बघत आई खिन्न मनाने तशीच पडून राहिली.
तो तिला मारणार नाही. हे यमाबाईला कळलं. खूप सावधपणे ती खाली येऊ लागली. बाहेरून कुणी आत येईल, अशी शक्यता नव्हती.
त्याने वृंदाला दोन्ही हातांनी उचललं आणि तो भुयाराकडे चालू लागला. यमाबाई खाली आली, तेव्हा तिने भुयाराच्या पलीकडे जड पावलांचे आवाज ऐकू आले.
सूर्य आता मावळतीला उतरू लागला होता. त्या चौकाचा काही भाग अंधारु लागला होता. तीच्यासोबत विश्वनाथ धीर धरून बसला होता. एकतर शरीरावर असलेले घाव, त्यात कुठेही पाण्याचा लवलेश नाही. भुकेने व्याकुळ झालेले जीव आता प्राणांतिक कल्लोळ करत होते. जीव तरी जावा , नाहीतर यातून तरी सुटका व्हावी ! पूर्ण अंधार झाल्यावर मध्य रात्री काय होणार होतं, हे कुणालाही टाऊक नव्हतं. ते नवीन एका संकटाला जन्म देऊन स्वतःच असुरी अस्तित्व अबाधित राखून , या भूमीला कायम शापित ठेवणार होतं. जर त्याच्या मनासारखं झालं, तर इथे मानवाचा लवलेशही उरणार नव्हता. मृत्यूच्या भयाने इथे वस्ती करून असलेल्या लोकांना कायमचंच इथून परागंदा व्हावं लागणार होतं. आपलं घर, जमीन-जुमला, कष्टाने कमावलेलं सगळं काही सोडून जावं लागणार होतं. किंवा, हळू-हळू स्वतःलाही त्याच्या अधीन होऊन असुरी कळपात सामील व्हावं लागणार होतं. देव-धर्म कायमचा सोडावा लागणार होता.
" जर आपण वाचलोच तर...?" तिने एक निरागस प्रश्न केला.
" स्वतःचा जीव वाचवत उर्वरित आयुष्य याच ठिकाणी काढावं लागेल." बोलण्याची शक्ती दोघांमध्येही नव्हती. आपला जीव जाणार हे ठाऊक होतं, आणि तो अत्यंत क्रूरतेने जाणार आहे, हे ही माहीत होतं.
" एक काम करशील ?" तिच्या डोळ्यात पाणी आलं. विश्वनाथ तिच्याकडे पाहू लागला.
" कुठूनही मदत आली नाही, तर ....!"
"तर काय ? " क्षणभर त्याच्या कपाळावर आठ्या आल्या.
" तर मला मारून टाक...!" विश्वनाथच्या अंगावर सरसरून काटा आला. हजारो मुंगळे चावून गेल्याची जणीव त्याला झाली.
" त्याच्या हातून जे मरण येईल, ते असाह्य असेल. स्वतःच्या शरीराचे लचके तुटलेले नाही सहन करु शकणार मी. तो छिन्न-विच्छिन्न करून संपवेल सगळं. नराधम आहे तो ! " तिच्या पूर्ण अंगाचा थरकाप उडत होता.
" जर सगळं काही आपल्या मनासारखं झालं, तर लग्न करशील माझ्याशी..?" विश्वनाथच्या या प्रश्नाने ती थोडी सावरली.
" हो...!" तिची भीती आता थोडी निवळली.
अंधार पडू लागला होता. त्याची वेळ होत आली होती. तो शापाच्या अधिनतेतून मुक्त झाला होता. आता तो एकटा आणि अधिक शक्तीशाली होता. त्याला कसलीही तमा उरली नव्हती. कसली बंधनं उरली नव्हती. एकदा त्याचे बीज वाढू लागले, पुढच्या सगळ्या पिढ्या त्याच्याच ! या साठी त्याने वृंदाची निवड केली होती. त्याच्या अपत्याला जन्म दिला, की तिचे काम संपले ! ते अपत्य पुढे नियतीच्या जोरावर जगणार होतं. आज काहीही करून त्याचा निःपात करणं गरजेचं आहे.
अंधारातून येणाऱ्या हवेचा स्वभाव बदलू लागला होता. तिने विश्वनाथला घट्ट धरून ठेवलं. कदाचित जगण्याची इच्छा पुन्हा श्वास घेऊ लागली होती. वेळ चांगली नव्हती, पण अजूनही हातात होती.
तो पूर्ण रुपात आला होता. मोहनच्या शरीरावर आता त्याचा पूर्ण ताबा होता. वृंदाला दोन्ही हातानी उचलून अत्यंत सावध रित्या तो भुयारातून किल्ल्याकडे येऊ लागला होता. त्याला वेळ लागायचा. स्वतःच अवजड शरीर, त्यात ती वाट संकुचित ! विश्वनाथचं विचारचक्र काळाच्या सोबत फिरत होतं. त्याला नष्ट करण्याचं काहीच साधन नव्हतं.
" काहीतरी असेल..! या जगात नष्ट होऊ शकत नाही, असं काहीच नाहीये. आपण शोधण्यात काहीतरी चूक केली असावी." ती त्याला सांगू लागली.
" शरीराने तो मरणार नाही. कारण, ते शरीर त्याचं नाहीये ! किरकोळ इलाज उपयोगाचे नाहीयेत, कारण तो खूप शक्तीशाली आहे. तुझ्या बाबांनी काही सांगितलेलं आठवतं का तुला ?"
"नाही, काहीच नाही !"
चंद्र आता पूर्ण आकार घेऊन आकाशाच्या मध्यभागी येऊ लागला होता. अत्यंत सावध बसलेल्या दोघांना त्याची चाहूल लागली. ते सतर्क झाले. कानाचे पडदे फाटतील, अश्या आवाजात भुयाराचा दरवाजा उघडला. दोघांच्या मागून तो आवाज आला. त्यांना आश्चर्य वाटलं. दिशेच्या हिशोबाने दार त्यांच्या पूर्वेला हवं होतं. पण ते पश्चिमेला उघडलं होतं.
त्या अंधारात तो त्यांना दिसला. खांद्यावर वृंदा होती. दोघांना घाम फुटला. अत्यंत संथ गतीने चालत तो दारापासून लांब जाऊ लागला. किती अजस्त्र , धिप्पाड आणि भयानक होतं त्याचं ते रूप ! दोघांच्या अंगाला चांगलंच कापरं सुटलं. याला कसं मारायचं...?
अचानक विश्वनाथचं लक्ष खाली जमिनीवर गेलं. मगाशी असलेला एकही जीव तिथे नव्हता. त्याने तिलाही ते दाखवलं. सावधगिरी म्हणून त्याने आधी पाऊल टाकलं. दोन पाऊलं चालला. काहीही धोका नाही पाहून त्याने तिला उतरण्याचा इशारा केला. ती ही उतरली. त्याच्या मागोमाग चालू लागली. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवत दोघे दबक्या पावलांनी चालू लागली.
आता प्रश्न हा नव्हता, की त्याला समाप्त करायचं आहे. आता प्रश्न हा होता, की सगळ्यांना यातून सुखरूप बाहेर काढायचं आहे. यमाबाई पुन्हा खोलीत परत आली. अर्धवट शुद्धीवर आलेली मालिनी एका कोपऱ्यात दडून बसलेली होती. यमाबाईने तिला करकचून बांधून ठेवलं होतं.
"तुझ्या लालची स्वभावामुळे बघ, काय परिस्थिती ओढवली. काहीही दोष नसताना तीन जणांचा जीव जातोय ! हे पाप तुला या जन्मी फेडता येणं शक्य नाही. "
यमाबाईने एक मडक्यात आणलेलं तेल वर काढलं.
"तू जिवंत आहेस, तो पर्यंत हे सगळं थांबणार नाही." आणि तिने सगळं तेल तिच्या डोक्यावर ओतलं.
यमाबाईला रडू कोसळलं.
" फुलासारखं जपलं तुला. या हाताने खाऊ घातलं ! लग्न होऊन आलीस, तेव्हा पाठराखीण म्हणून आले. सगळं होतं तुझ्याकडे, पण हव्यासामुळे सगळं घालवलं...! पोरी, देवालाही घाबरली नाहीस !"
मालिनी सगळं काही बघत होती. तिला कळत होतं.
"तुला काय वाटलं...! मी गेली की सगळं काही संपेल...?"
यमाबाईने काडी ओढली. क्षणात मालिनीच्या पदराने पेट घेतला. ती जोर-जोरात केकाटू लागली. स्वतःला सोडवण्यासाठी धडपडू लागली. यमाबाई मात्र लांबून सगळं काही शांतपणे बघत होती. त्या जवालांमधून काळा धूर निघु लागला. पूर्ण खोली काळ्या धुराने भरली. तीळ-तीळ करत मालिनी जळू लागली. यमाबाई बाहेर आली. डोळ्याला पदर लावला आणि खाली उतलेली. थोड्याफार शुद्धीवर आलेल्या आईला तिने आधार देऊन उभं केलं. दोघी हवेलीच्या बाहेर आल्या.
"यमाबाई, काय केलंत तुम्ही ?" आईला तिचे काळे हात आणि हेवलीच्या वरच्या मजल्यावरून निघणारा काळा धूर दिसला.
" गरजेचं होतं ते ! " घाबरलेली दुर्गा एकदम रडत आली आणि आजीला बिलगली.
" ती जिवंत आहे, तो पर्यंत आपण रोज मरणाच्या भीतीने कण-कण मेलो असतो."
एका मोठ्या खोलीत तो वृंदाला घेऊन गेला. तिला एका दगडी फलाटावर झोपवलं. अत्यंत क्रूर नजरेने तो तिला पाहू लागला. एखाद्या श्वापदाला सहज सावज मिळावं, अगदी तसंच. अंधारात नीट दिसलं नाही, पण या दोघांनी त्याच्या नजरेतील ती हवस टिपली. दोघांचे श्वास अत्यंत मंद सुरू होते. काय करायचं, कसं करायचं, हे दोघांना माहीत नव्हतं ! पण काहीही झालं, तरी वृंदाला तिथून काढणं गरजेचं होतं.
अचानक ती त्याच्यासमोर गेली. त्याची पाठ होती तिच्याकडे.
"असह्य आणि कमकुवत ,निष्पाप जीवांवर स्वतःला पोसतोस न तू ?"
तिने नकळत त्याला आवाहन दिलं.
"कधी एखाद्या शुराशी सामना झालाच नाही तुझा !" त्याने मागे वळून पाहिलं. त्याच्या कामात अचानक आलेली ही बाधा त्याला बहुधा आवडली नसावी. त्याचे डोळे अधिक लाल आणि भयानक दिसू लागले. विश्वनाथला क्षणभर काय करावं, ह्द सुचलं नाहीच.
"अरे नीच माणसा, तुला मरून इतकी वर्ष झालीत. नरकात सुद्धा तुला स्थान नाहीये , म्हणून अश्या ठिकाणि पडला आहेस. या भूमीवरचं सगळ्यात मोठं आणि हीन पाप आहेस तू !" तो वळला आणि तिच्याकडे पाहू लागला. विश्वनाथ आपल्या जागेवरून उठला. भिंतीचा अंदाज घेऊ लागला. तो असुर हळू-हळू तिच्या दिशेने सरकत होता. त्याची जड पाऊलं अडखळत होती. आपलं सावज मागे राहिल्याचं त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही. पण विश्वनाथच्या लक्षात सगळं आलं होतं. तिने वृंदाला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावला. तो आता वृंदाकडे सरकू लागला होता. त्या असुरात आणि वृंदात सुरक्षित अंतर दिसून आला. विश्वनाथने हलक्याने वृंदाला उचललं आणि तिथून निघाला.
ती देखील अंधारात गडप झाली. एक खिडकी विश्वनाथने हेरून ठेवली होती. त्यात अत्यंत सावधपणे त्याने वृंदाला ठेवलं. तिचे श्वास सुरू होते. ती मात्र बाहेर होती. वृंदाला आत ठेवून त्याने ती खिडकी बंद केली. हळूवार तो बाहेर आला. खांबाला टेकवून ठेवलेलं ते लोखंडी शस्त्र त्याने उचललं. आणि भिंतीला घासत तो चालू लागला. तो असुर अजूनही तिच्या मागावर होता.
"आज तुझा अंत निश्चित आहे. माझ्या हातून नाही, तर कुणा दुसऱ्याच्या हातून." विश्वनाथ तिच्या आवाजाच्या दिशेने बरोबर पुढे सरकत होता. दोघांचे अंदाज बरोबर होते. आणि अचानक तो दोघांच्या मध्ये आला. विश्वनाथला दरदरून घाम फुटला. तो अगदी समोर होता आणि त्याच्या मागे ती होती. नीट उंची मोजली असती, तर विश्वनाथ त्याच्या छातीपेक्षाही कमी भरला असता.
हा आपल्याकडे असणाऱ्या शस्त्राने मारणार नाही, हे दोघांना केव्हाच कळलं होतं. तरी दोघांनी एकमेकांसाठी आणि वृंदासाठी जीव धोक्यात घातला. याच्या हाती सापडलो , तर हाल-हाल होऊन अंत होईल, हे सत्य होतं.
"तू घाबरू नकोस. हा काहीही करू शकणार नाहीये. याचे शरीर आणि आपले भय, हीच त्याची शक्ती आहे." त्याने विश्वनाथचा आवाज ऐकला. विश्वनाथने आपल्या हत्याराने त्याला घाव देण्याचा प्रयत्न केला. त्याचे पूर्ण लक्ष विश्वनाथ कडे लागले.
"भिंतीच्या बाजूने माझ्याकडे सरक. साधारण तीस पावलावर एक खिडकी आहे." आणि विश्वानाथने हत्यार पूर्ण ताकदीने हवेत फिरवलं. तो प्रहार त्याच्या डोक्याला लागला. ते कितीही केलं तरी शरीर होतं. एका जिवंत माणसाचं ! घाव बसताच आतून रक्त वाहू लागलं.
"वेदना तुलाही होतात. आणि त्यातून रक्तही येतं. " त्याने दुसरा घाव घातला. तो चुकला. ती याचा फायदा घेऊन भिंतीकडे सरकली. तिला खिडकी लागली. ती आत गेली. तिसऱ्या घावही व्यर्थ गेला.
आता तो चवताळला. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि तो विश्वनाथकडे चालून येऊ लागला. विश्वनाथची भीती कुठल्याकुठे गेली होती. मरण्याच्या तयारीने त्याने त्याचा सामना करण्यास सुरुवात केली. त्या अंधारात सुद्धा त्याने त्याच्यावर प्रहार सुरू ठेवले. हातातली हत्यार सुटणार नाही, याची पूर्ण काळजी तो घेत होता. पण आता तो थकला. त्यालासुद्धा कळलं, की आपण फार काळ याच्याशी लढू शकणार नाहीये. दोघांचे अंतर कमी-कमी होऊ लागले होते. त्याने विश्वनाथचा हात धरला आणि त्याला उचलून फेकलं. त्याच्यापासून बऱ्याच अंतरावर तो फेकला गेला. पण हत्यार हातात होतं. त्याने पुन्हा विश्वनाथला उचललं आणि फेकलं , पण जवळ ! तो विश्वनाथला खेळवत होता. त्याची मान त्याने हातात धरली. त्याचा तो भेसूर चेहरा पाहून विश्वनाथला आपला अंत जवळ वाटू लागला. त्याने मनोमन बाबांची आठवण काढली आणि दोन्ही हात त्या असुराच्या डोळ्यावर दाबले. अंगठे अक्षरशः डोळ्यात गेले. पण त्याचा उपयोग झाला नाही. चेहरा त्याच्या हातात होता. विश्वनाथच्या नाकातून रक्ताची धार लागली. त्यांच्यातले त्राण संपू लागले. पाय लटपटू लागले. जीव कंठाशी आला.
"मोहन...!" अचानक वृंदाचा आवाज आला.
"मोहन, शुद्धीवर या...!" दुसऱ्या आवाजाने त्या असुराची पकड थोडी शिथिल झाली.
"शुद्धीवर या मोहन." अंधारात चाचपडत वृंदा बाहेर आली. विश्वनाथचा अर्धा जीव गेलाच होता.
"मोहन, ऐकता आहात न तुम्ही. वृंदा बोलावते आहे."
असुर एखादा झटका लागल्यासारखा बाजूला झाला.
"मोहन, हा चांडाळ तुमच्या आत बसून तुम्हाला छळतोय. तुमच्या घराची, आयुष्याची धूळधाण केली याने. याला रोखा. याला आताच मारा, नाहीतर आज इथे तीन जीवांना आपला जीव गमवावा लागेल. जागे व्हा मोहन , भगवंत आहे तुमच्या पाठीशी, मी आहे तुमच्या पाठीशी"
वृंदाचा आवाज कानाशी स्पष्ट ऐकू गेला. आत अत्यंत कष्टाने वसलेल्या मोहनच्या आत्म्याला असह्य वेदना होऊ लागल्या. तो असुर आता पूर्ण सचेत झाला होता. चंद्र आकाशात मध्यावर येऊन पोहीचला होता. अमावास्येला उधाण आलं होतं. पण काहीतरी चुकत होतं. मोहनचे शरीर त्याच्या ताब्यात होतं. त्याने याचा पुरेपूर फायदा उचलला. ते शरीर तो भिंतीवर, खांबावर आदळू लागला.
"मोहन, त्याला तुमच्या शरीराचा नाश नका करू देऊ. तुमचा जीव गेला, तर काहीही उपयोग होणार नाही. देवीचं नाव घ्या...!"
आत असलेल्या मोहनच्या आत्म्याने पूर्ण ध्यान लावून कुलदेवतेचे स्मरण सुरू केलं. अगदी एखादा मानव ध्यानस्थ बसून आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करतो, तसेच !
त्या असुराची शक्ती आता उत्तर देऊ लागली. आतून मोहनच्या आत्म्याची प्रबळता वाढू लागली होती. तिथे असलेल्या सगळ्यांनी गजर सुरू केला. तो इंद्रयांद्वारे मोहनच्या आत्म्यापर्यँत पोहोचू लागला. त्याचे शरीर आता त्या असुराचा विरोध करू लागले. डोळ्यातून , नाकातून काळ्या रक्ताची धार लागू लागली. मोहनचे शरीर अस्वस्थ होत होतं. त्याला अजूनही तो असुर छळत होता. पण यावेळी मोहनने ठरवलं होतं. आपल्या आत असलेल्या या पापाचा अंत करायचा ! तो मोहनला इजा करत होता, तितकाच मोहन त्याला सांभाळत होता. गजर कमी पडत नव्हता. उलट भिंतीला धडकून आवाज घुमत होता.
अचानक कुठूनतरी घंटानाद ऐकू येऊ लागला. रात्रीच्या त्या किर्रर्र अंधारात तो आवाज अधिक स्पष्ट झाला. किल्ल्याच्या प्रवेशावर असलेल्या त्या महादेवाच्या मंदिरात यमाबाई आणि आई येऊन उभ्या राहिल्या. मंदिर उघडून त्यातील घंटा वाजवू लागल्या. दोघींना प्रचंड इजा झालेल्या होत्या.
त्या आवाजाने असुराला अस्वस्थ वाटायला लागलं. कानातून आत जाणाऱ्या आवाजाने त्याचा दुष्ट आत्मा जर्जर होऊ लागला. काळ्या रक्ताची धार वाढली. आणि थकून तो जमिनीवर पडला.
...
हेवलीत आपल्या खोलीत मोहन निपचित पलंगावर पडला होता. त्याला शुद्ध यायला सुरुवात झाली होती. डोळे उघडताच त्याला आजूबाजूला नवीन नोकर आणि स्वतः महंत दिसले.
"आराम करावा सरकार...!" त्यांनी बाजूला पडलेली रक्षा मोहनला लावली.
" हवेलीचे शुद्धीकरण सूरु आहे. आज तब्बल तीन दिवसांनी तुम्ही शुद्धीवर आले आहात." मोहन त्याच्याच घरात नवीन असल्यासारखा भासत होता.
" इथे असलेली सगळी नकारात्मकता मालिनीसोबत गेली."
मोहनला गहिवरून आलं. लहानपण डोळ्यासमोर उभं राहिलं. तो उठून खिडकीपाशी आला. बाग सुंदर फुलली होती. झाड-न-झाड खूलत होतं. आकाशात सूर्य तळपत होता. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने महतांकडे पाहिलं.
"सगळे सुखरूप आहेत."
खाली बागेत वृंदा फिरत होती. एखाद्या दीर्घ आजारपणातून उठल्या सारखी. आई तिच्या मागे होती.
"पुढे काय ?" देवघरात पूजेच्या तयारीत असलेल्या तिला विश्वनाथने विचारलं. तिने एक फुल उचलून त्याच्या हातात ठेवलं.
"तुझं नाव विचारलं नाही, या सगळ्या गोंधळात...!"
"मंजिरी."
"किल्ल्याकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा गावकऱ्यांनी बंद केल्या आहेत." महंतांनी मोहनला सांगितलं.
"एखाद दुसऱ्या पावसाळ्यात तो पडूनही जाईल."
"हम्मम" लांबून दिसणारा महालगड तसाच उभा होता. खाली मोठे सरकार आणि तात्याही आले होते.
समाप्त
लेखन : अनुराग वैद्य
दीर्घभयकथाकार अनुराग वैद्य यांची "महालगड " हि दीर्घभयकथा आज समाप्त झाली. संपूर्ण कथा हि त्यांच्या परवानगीने आपल्या समूहासाठी सादर केल्याचा आनंद होत आहे. कथेच्या प्रत्येक भागाला मिळणारा तुमचा प्रतिसाद अतिशय स्पृहनिय आणि लेखकांना लिखाणासाठी प्रेरक होता.
व्यक्तिशः त्यांनी तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले असून मी सुद्धा तुमच्या वाचनरुपी साथ देण्यासाठी आभारी आहे.
कथेबाबत तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्या अवश्य कळवाव्या
यांनतर कदाचित ''महालगड" चा पुढचा भाग येत्या काही महिन्यात प्रकाशित होईल.
ऍडमिन पॅनलने कॉपी पेस्ट कथा प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.