अंकल ..
६०/६५ वर्ष त्या घरात राहून ते घर सोडणे सोप्पे नव्हते फिलिप अंकलकरता ,फिलिप अंकलचा जन्म त्या घरात गेला ,जन्मापासून ह्या क्षणापर्यंत हे घर त्यांनी कधी सोडले नव्हते असा विचार सुद्धा मनात कधी आला नव्हता . फिलिप अंकलची सारी जिंदगी इकडेच सरली होती . जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही इकडेच त्यामुळे अंकलची नाळ अजूनही घट्ट होती ह्या घराशी ,अशी बैठी घरं दुर्मिळहोत चालली होती शहरात ,मागे पुढे अंगण आणि तीन खोल्या,मागच्या स्वयंपाकघराच्या वर एक छोटीशी गच्चीवजा जागा आणि त्यावर जायला बाहेरून जिना , मागच्या परसात केळीची आठ दहा झाडं एकमेकाला चिटकून जंगलाचा भास निर्माण करत ,दोन चार पपईची झाड उगवायची उंच होऊन कोसळायची अजूनही मातीची जमीन होती अंकलच्या परसात ,पुढच्या बाजूस फरश्या लावून घेतल्या होत्या शहाबादी, एक करकरणार लोखंडी गेट होत चार फुटांचं ,बाजूला तारेचं कुंपण ,बाजूच्या घरात रॉड्रिग्स कुटुंब ,फिलिप अंकल पहिल्यापासूनच मनमिळाऊ ,खूप साधा आणि पापभिरू माणूस ,एरियात त्याबद्धल आदर होता लोकांच्या मनात ,दोन बहिणी ,दोन्हीही मिडल ईस्टला लग्न करून गेलेल्या ,जॅकी फिलिप अंकलची बायको ,जॅकी दिसायला शंभरात देखणी ,तिचा कमनीय बांधा आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आकर्षित करणारे होते. फिलिप अंकल खूप सांभाळायचा जॅकीला,एरियात काही बाही बोलायचे लोकं जॅकीबद्धल ,फिलिपच्या क्षमतेबद्धल संशय व्यक्त करायचे .
जॅकी घरातून निघून गेली आणि फिलिप अंकल एकाकी पडले . मुलबाळ झालंच नाही ,अवघी आठ वर्ष संसार झाला ,जॅकीच लक्षच नव्हतं संसारात ,ती तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडली होती . अंकल खूप दुःखी झाले जॅकी अशी निघून गेल्यामुळे ,पुढे काय करायचं हाच प्रश्न त्यांना सतवायचा ,अंकलना प्रायव्हेट फर्म मध्ये चांगली नोकरी होती त्यामुळे आर्थिक चिंता नव्हती . संध्याकाळी आल्यावर अंकल शांत बसायचे डिम लाईट लावून मागच्या बाजूला म्हणजे स्वयंपाकघराच्या पुढे त्यांनी छोटीशी ओसरीवजा बांधकाम केलं होत ,तिकडे बसून प्रत्येक घोटाबरोबर जॅकीची आठवण काढत बसायचे . अधून मधून रॉड्रिग्स यायचे कंपनी द्यायला पण ते सुद्धा कधीतरी ,त्यामुळे अंकलना एकटेपणाची सवयच झाली होती .
जॅकी गेली त्या महिन्यातली गोष्ट असेल ,अंकल असेच बसले होते संध्याकाळचे म्हणजे सात वाजून गेले असतील , एक पेग तर झाला होता इतक्यात अंकलना कसलीतरी चाहूल लागली ,अंकल कानोसा घेऊन अंदाज घ्यायला लागले पुढच्या खोलीतून कसलीतरी चाहूल लागल्यासारखं वाटलं म्हणून अंकलनी हातातला ग्लास समोरच्या टीपॉय वर ठेऊन ते उठले ,आगगाडीसारख्या तीन खोल्या होत्या ,प्रत्येक खोलीला दरवाजा , मधल्या खोलीतून अंधारातून बाहेरच्या खोलीत येताना दरवाजात काहीतरी बाजूने गेले असं जाणवलं ,अंकल दचकले म्हणजे एखादी व्यक्ती दरवाजातून येताजाता अडचण होते तेंव्हा अंग चोरून जाते तशी जाणीव होती ती ,अंकलच्या तोंडातून घोगऱ्या आवाजात ' "कोण आहे " असे आपसूक बाहेर आले . अचानक त्या आवाजाने ती चाहूल शांत झाल्यासारखी झाली . अंकलनी का कोणास ठाऊक पण बाहेरच्या आणि मधल्या खोलीतली बटणं फटाफट ऑन केली ,दोन मिनटं मधल्या खोलीत शांत उभे राहिले ,हो त्यांच्या बरोबर त्या मधल्या खोलीत कोणीतरी असावं असं त्यांना वाटत होत . नंतर एकदम खोली रिकामी वाटायला लागली ,अंकल हळू हळू मागच्या खोलीच्या दिशेने निघाले मधल्या खोलीत आणि मागच्या खोलीत छोटासा पॅसेज आणि पॅसेजच्या डावीकडे टॉयलेट आणि उजवीकडे बाथरूम, पॅसेज मध्ये परत कोणीतरी थांबलं असावास वाटलं अंकलना ,नकळत कपाळावर घाम जमा झाला त्यांच्या ,मान झटकून ते हळुवार पावलाने मागच्या ओसरीत आले आणि खुर्चीवर बसले ,दुसरा पेग झटक्यात संपवून मागे काही हालचाल होत्ये का ह्याचा अंदाज घेऊ लागले .
त्या रात्री फिलिप अंकल झोपू शकले नाहीत . म्हणजे जॅकीशी लग्न व्हायच्या आधी सात आठ महिने एकटे होते ते पण असं कधी जाणवलं नव्हतं ,हे अचानक असं का व्हायला लागलंय असा विचार अंकलच्या मनात आला . मधल्या खोलीत अंकलचा बेड होता ,मधल्या खोलीला बेडजवळ खिडकी होती,झोपताना मागचा पुढचा दरवाजा बंद करून अंकल झोपायचे . दोन च्या ऐवजी तीन पेग घेऊन फिलिप झोपायला आले होते ,मागचा दरवाजा लावताना कोणीतरी आत येण्याचा प्रयत्न करतंय असं असं काहीतरी वाटलं होत अंकलना ,कसातरी दरवाजा लावून अंकल बेडवर लवंडले , खिडकीकडे पाठ करून झोपले असताना अचानक खिडकीतून कोणीतरी डोकावतय असा भास झाल्यासारखं वाटलं फिलिपना ,तिरक्या नजरेनी अंधारात खिडकीत कोणी आहे का बाहेरच्या बाजूला हे बघण्याचा प्रयत्न केला अंकलनी ,अचानक कोणीतरी खिडकीतून खाली बसले असावे असं वाटलं . रात्रभर हेच चाललं होत अंकलना झोप काही लागली नाही .
पहाटे पहाटे थोडा डोळा लागून झोप चाळवली ,पाणी प्यावं म्हणून मागच्या खोलीत आले आणि दिवा लावल्यावर दचकले एकदम ,मागच्या दरवाजाला बाहेरच्या बाजूला कोणीतरी टेकून बसल्यासारखे वाटले ,हळूच पावलं न वाजवता दाराजवळ येऊन फटीतून बघितले तर कोणीतरी होत दाराजवळ बसलेले असं वाटलं ,अंकल घाबरले घशातून घुस्मटल्यासारखा आवाज आला आणि पाण्याचा ठसका लागला . ठसकण्याच्या आवाजाबरोबरच ते बाहेर कोणी बसलेले वाटत होत ते उठून फटीतून आत बघतंय असं वाटायला लागलं अंकलना ,उजाडल्यावर अंकलनी दरवाजे उघडले . घाईघाईत सगळं आटोपून ऑफिसला जायच्या तयारीला लागले . सकाळी शांत वाटल काही हालचाल जाणवली नाही . दिवसभर तेच विचार मनात ,संध्याकाळी अंकल घराजवळच्या स्टॉप वर उतरले आणि अंगावर एक भीतीचा शहारा आला .
दाराचं कुलूप काढताना हात थरथरत होता ,दार हळूच ढकललं आणि आत मध्ये जणू कोणाला तरी आनंद झालाय अशी हालचाल जाणवली ,ती हालचाल सारखी तिन्ही खोल्यातून वावरत होती . अंकलना काय करावं सुचत नव्हतं जणू आपलं माणूस आल्यावर लहान मुलं पायात कशी घोटाळतात तसं काहीतरी कोणीतरी आनंद झाल्यासारखं बघतंय आपल्याकडे असं वाटत होत फिलिप अंकलना . अंकलनी नेहमीप्रमाणे सगळं आटोपून आपली ड्रिंक्सची तयारी केली आणि मागचा दरवाजा उघडून बसले खुर्चीवर ,ओसरीच्या कट्ट्यावर ते अस्तित्व बसलं असावं असं वाटत होत अंकलना ,हळू हळू फिलिपना त्या अस्तितवाची भीती कमी वाटायला लागली ,उलट आज एक पेग झाल्यावर फिलिप त्या अस्तित्वाकडे बघून हसले ,समोरून सुद्धा स्मित आले असे जाणवले त्यांना ,आज सुद्धा दोन च्या ऐवजी तीन पेग झाले . जेवताना सुद्धा साथ होती त्या अस्तितवाची ,आज दरवाजा बंद करताना ते अस्तित्व आत आल्याचं जाणवल्यावरच दरवाजा बंद केला . रात्रभर मधल्या खोलीत फिलिप अंकलना सोबत होती .
हल्ली डेव्हलपिंगचे वारे वाहायला लागले होते ,बहिणीसुद्धा मागे लागल्या होत्या ,रिटायर्ड होऊन पाच वर्ष होऊन गेली होती .बिल्डरशी बोलणी झाली होती,आठ माळ्यांची बिल्डिंग उभी राहणार होती . इतके वर्ष इथे काढली होती , नकोस वाटत होत हे सगळं म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे ,शिवाय ते सुद्धा होत बरोबर ,त्याची जबाबदारी कोण घेणार ? शेवटी निर्णय घ्यावाच लागला . त्याची तडफड बघवत नव्हती फिलिप अंकलना ,नुसती घुसमट होत होती अंकलना जाणवत होत हे सगळं ,कधी कधी घरात धुसफूस केलेली जाणवत होती . पण इलाज नव्हता ,त्या अस्तित्वाबद्धल कोणाला सांगितलं तर वेड्यात काढलं असत लोकांनी आधीच घरात एकटे राहिल्याने लोक काहीतरी बोलत होते अंकलच्या नावानी ,शेवटी काल रात्री पिताना निर्णय सांगितला त्या अस्तित्वाला,घरात शांतता पसरली होती . हालचाल जाणवत नव्हती .
आज ६५ वर्षांनी घराला कुलुप लावताना त्या अस्तित्वाची चलबिचल आणि घुसमट बघवत नव्हती ,दारातच अडवल्यासारखं बसलं होत ते ,फिलिप अंकलनी मन घट्ट केलं आणि दाराला कुलुप लावलं ,ते मटकन दाराजवळ बसलेलं जाणवलं अंकलना ,लोखंडी दार ओढून घेतलं आणि फिलिप अंकल निघाले ,मागे वळून बघितलं तर ते उभं राहिलेलं ,लोखंडी दारावर चेहरा ठेवून फिलिप अंकलकडे बघत वाट बघितल्यासारखं ..
अनिरुद्ध